हैदर अली : (? १७२२–७ डिसेंबर १७८२). कर्नाटकातील एक स्वयंघोषित सत्ताधीश व शूर सेनानी. त्याच्या पूर्व जीवनाविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. त्याचा भाऊ शाहबाझ म्हैसूरच्या लष्करांत एक अधिकारी होता. हैदर अलीला लिहिता-वाचता येत नव्हते. त्याचे बालपण उनाडपणात गेले. अधूनमधून तो आपल्या भावाच्या वतीने काही काम करी. शिवाय त्याने जोसेफ-फ्रान्सिस डुप्लीक्स या फें्रचाकडून सैनिकी डावपेचाचे शिक्षण घेतले. चिक्क कृष्णराज हा म्हैसूरचा नाममात्र राजा होता. वस्तुतः सर्व सत्ता देवराज (दलवाई) व नंजराज (सर्वाधिकारी--दिवाण) या दोन बंधूंच्या हातांत होती. १७४६ नंतर देवराजाने वृद्धत्वामुळे सर्व सैनिकी अधिकार नंजराजास दिले. त्याच्या सैन्यातील शाहबाझच्या पलटणीत १७४९ मध्ये हैदर हा एक घोडेस्वार होता. देवनहळ्ळी येथील नेमबाजीच्या स्पर्धेत नंजराजाने हैदरच्या नैपुण्याने खुश होऊन त्याच्या हाताखाली ५० घोडेस्वार व २०० शिपाई दिले. त्यानंतर १७५०–६० दरम्यान तो लष्करात नाईक म्हणून ओळखला जाई. हैदरने ब्रिटिशांच्या मदतीने फेब्रुवारी ते डिसेंबर १७५२ दरम्यान फ्रेंचांच्या तिरुचिरापल्लीवर ( त्रिचनापल्ली) स्वारी केली. त्यात हैदरचा पराक्रम पाहून त्यास म्हैसूर लष्करात एका तुकडीचा प्रमुख नेमण्यात आले आणि त्याच्या हाताखाली १,५०० घोडेस्वार, ३,००० पायदळ व चार तोफा देण्यात आल्या. या युद्धात त्याने इंग्रज व फ्रेंच यांची शिस्तबद्ध कवायती फौज पाहून आपले लष्करही त्या धर्तीवर सुसज्ज केले. आरमार व दारूगोळा ह्यांचे महत्त्व हैदर जाणून होता. त्याची स्मरणशक्ती उत्तम होती. कार्यक्षम व्यक्तींची तो निवड करी. त्याला पाच भाषा अवगत होत्या. त्रिचनापल्लीच्या आग्नेयीस असलेल्या दिंडिगुल (किल्ला) येथे त्याची फौजदार म्हणून नियुक्ती करण्यात आली. या सुमारास (१७५५–५७) देवराज व नंजराज यांत वितुष्ट आले आणि देवराज संन्यस्त वृत्तीने सत्यमंगलम येथे गेला. परिणामतः नंजराज हा सर्वेसर्वा झाला. मराठ्यांनी १७५७ मध्ये म्हैसूरचा पराभव करून ३२ लाखांची खंडणी लादली तथापि नंजराजने सहा लाख दिले व उर्वरित रकमेसाठी त्याने पंधरा तालुके गहाण ठेवले. यानंतर लवकरच हैदर म्हैसूरला आला आणि त्याने नंजराजास मराठ्यांना या तालुक्यांतून बाहेर काढण्याचा सल्ला दिला. तेव्हा मराठ्यांनी म्हैसूरवर पुन्हा हल्ला केला (१७५८). त्यामुळे म्हैसूरच्या सैन्याचे नेतृत्व करण्यास कुणीही पुढे येईना. तेव्हा हैदरने सर्व सूत्रे हाती घेऊन मराठ्यांच्या खंडणीची जबाबदारी घेतली (१७६१). त्याने कौशल्याने नंजराजास बाजूला सारून सर्व सत्ता हाती घेतली. केवळ नाममात्र राजा सोडला, तर हैदर हा राज्याचा कारभार पाहू लागला. १७६३ च्या कर्नाटक युद्धात त्यास बिदनूरला मोठा खजिना मिळाला. त्याने होस्कोट, दोड बल्लापूर व सेरा जिंकले. त्यामुळे हैदरनायक खान बहादुर हैदर अली झाला. १७६५ मध्ये पूर्वी मराठ्यांबरोबर झालेल्या युद्धातील पराभवाचा त्याने वचपा काढला व कालिकत जिंकले. १७६६ मध्ये हैदरची वाढती सत्ता मद्रासच्या इंग्रजांच्या डोळ्यांत सलू लागली. त्यांनी हैदरविरुद्ध निजामाशी दोस्ती करण्याचा प्रयत्न सुरू केला तथापि त्यास मूर्त स्वरूप येण्यापूर्वीच हैदर अली व निजाम एकत्र होऊन त्यांनी १७६७ मध्ये इंग्रजांवर हल्ला केला आणि तिरुवन्नामलई व चंदगामा ही ठाणी हस्तगत केली. इंग्रजांशी त्याचा संघर्ष चालू होता. अखेर इंग्रजांनी हैदरबरोबर १७६९ मध्ये तह केला. त्या तहाप्रमाणे एकमेकांनी घेतलेला मुलूख ज्याचा त्यास परत करावा व एकमेकांस प्रसंगोपात्त साहाय्यकरावे, असे ठरले. १७७० मध्ये हैदरने मुंबईच्या इंग्रजांशी व्यापारी करार केला. १७७१ मध्ये मराठ्यांनी हैदरवर पुन्हा हल्ला केला. तेव्हा वरील तहाप्रमाणे त्याने इंग्रजांची मदत मागितली पण त्यांनी ती दिली नाही. त्यामुळे त्याने मराठ्यांशी तह केला व इंग्रजांच्या बेइमानीचा सूडघेण्याचे ठरविले. 

 

इंग्रजांनी १७७८ मध्ये फ्रेंचांना हिंदुस्थानातून हाकलून देण्याचे ठरविले. त्यांनी मलबार किनाऱ्यावरील माहे शहर १७७९ मध्ये घेतले. हैदरने आपले राज्य कृष्णा नदीपर्यंत वाढविले. त्याने मराठ्यांशी एकीकरून १७८० मध्ये कर्नल बेली याचे २,८०० सैनिक ठार केले आणि अर्काट घेतले. सर एअर कूट याने १७८१ मध्ये हैदरचा पोर्तोनोव्हो, पोल्लिलूर व शोलिंगडच्या लढायांत पराभव केला. पोर्तोनोव्होच्या लढाईत हैदरचे १०,००० सैनिक ठार झाले. मद्रासचा गव्हर्नर लॉर्ड मॅकार्टनीयाने नागापट्टिनम घेतले. तेव्हा हैदरने आपला मुलगा टिपू यास फ्रेंचांची आरमारी मदत आणण्यास सांगितले. दरम्यान चित्तूर येथे हैदरचे आकस्मिक निधन झाले. 

 

पहा : इंग्रज-म्हैसूरकर युद्ध टिपू सुलतान. 

 

संदर्भ : Majumdar, R. C. The Maratha Supremacy, Vol. 8, Bombay, 1977. 

देवधर, य. ना.