तोडरमल : (१५३५ ?–१० नोव्हेबर १५८९). अकबरचा एक ख्यातनाम खत्री जातीचा वित्तमंत्री. अयोध्या प्रांतातील लाहरपूर गावी टंडन कुळात त्याचा जन्म झाला, असे मानतात. प्रथम त्याने शेरशाहाकडे नोकरी केली. नंतर १५६१ साली अकबरच्या पदरी कारकून म्हणून त्याने नोकरी धरली. रणथंभोर, गुजरात, बिहार येथील लढायांत त्याने सेनानी म्हणून काम केले पण स्वतःच्या योग्यतेमुळे तो हळूहळू वित्तमंत्र्याच्या पदापर्यंत चढला. त्याने सुरू केलेल्या महसूलपद्धतीमुळे त्याचे नाव प्रसिद्धीस आले. त्याने जमिनीचे सर्वेक्षण करून विभागणी केली व नवीन सारा बांधून दिला. आजच्या महसूलपद्धतीत त्याच्या पद्धतीचा काही अंश आढळतो. त्याने महसूल खात्यात हिंदीएेवजी फार्सी भाषा सुरू केली. प्रामाणिक प्रशासक, उत्तम सेनानी व कट्टर स्वधर्माभिमानी म्हणूनही त्याची ख्याती होती. त्याचा तोडरानंद नावाचा धर्मविषयक विश्वकोशरूप ग्रंथ प्रसिद्ध आहे. नारायण भट्टाने त्याच्या व लोकांच्या साह्याने मुसलमानांनी तोडलेले काशीच्या विश्वनाथांचे देऊळ पुन्हा उभारले, अशी समजूत आहे.

खोडवे, अच्युत