शालिवाहन : पैठणच्या सातवाहन घराण्यातील एका राजाचे नाव. याविषयी सबळ ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही. अलीकडे उपलब्ध झालेल्या नाण्यांवरून सातवाहन हे व्यक्तिनाम असावे. पुढे त्याच्यापासून उत्पन्न झालेल्या वंशाला ते मिळाले [⟶ सातवाहन वंश]. त्याचे मूळ प्राकृत रूप ‘सालाहण’ असे आढळते. त्याचे पुढे संस्कृतीकरण होऊन ‘शालिवाहन’ असे राजनाम बनले. याचा शातवाहन, शाकवाहन, आंध्रभृत्य, आंध्र असाही उल्लेख आढळतो. शालिवाहन या शब्दाचा अर्थ शालि–साळी–चे भात भरलेली गाडी, तिला पाणिनीय काली शालिवाहण म्हणत. शालिवाहण हे ज्यांचे विशिष्ट देवक ते घराणे शालिवाहण (न) आडनाव धारण करी. शालिवाहन हे देवक असण्याचे कारण कलिंग व आंध्र प्रदेश यांत पूर्वी व आजही भात हेच मुख्य पीक आहे.

शालिवाहनासंबंधी काही प्रचलित आख्यायिका आहेत. त्यांपैकी एका ब्राह्मणाचे दोन मुलगे व मुलगी असे तिघे जण आईवडिलांच्या मृत्यूनंतर पैठण नगरात गेले आणि तेथे एका कुंभाराच्या घरी राहू लागले. एकदा ती मुलगी गोदावरी नदीवर स्नानास गेली असता, तिच्यावर शेषाची नजर गेली. त्याने तिला मोहून टाकले. त्याच्यापासून तिला एक मुलगा झाला. कुंभाराच्या घरी वाढल्यामुळे तो मातीची खेळणी करण्यात तरबेज झाला. मातीच्या भातगाड्या तयार करून तो आपल्या सवंगड्यांना देत असे. त्यावरून या मुलाचे नाव शालिवाहन पडले. या वेळी उज्जयिनीला विक्रमादित्य राजा राज्य करीत होता. त्याला वेताळाकडून समजले की, आपला नाश करणारा एक मुलगा पैठणला वाढत आहे. त्याने पैठणवर स्वारी करून सोमकांत राजाचा पराभव केला व त्यास कैद केले. शालिवाहनाला ही गोष्ट कळली, तेव्हा तो मातीचे घोडे, हत्ती, शिपाई यांच्याशी खेळत होता. त्याला एक कल्पना सुचली आणि त्याने शेषराजाचे स्मरण केले व मातीच्या खेळण्यांत प्राण फुंकले. तेव्हा त्यांतून असंख्य सैन्य व घोडेस्वार बाहेर पडले. त्यांच्या मदतीने शालिवाहनाने विक्रमादित्याचा पराभव केला आणि सोमकांताची कैदेतून मुक्तता केली. पुढे पैठणच्या जनतेने शालिवाहनाला आपला राजा म्हणून निवडले.

महाराष्ट्रात शालिवाहन राजाचे नाव शक कालगणनेशी जोडलेले आढळते परंतु त्याचा या कालगणनेशी काहीच संबंध नाही, हे आधुनिक संशोधनाने सिद्ध झाले आहे. शालिवाहनाने नाव शक वर्षाशी निगडित झालेले कृष्णदेव यादव (कार. १२४६–६१) याच्या तासगाव (सांगली जिल्हा) ताम्रलेखात (१२५१) प्रथम आढळते. तत्पूर्वी पंढरपूर येथील यादवांच्या शिलालेखात (११८९) सालवण सुरी किंवा सालहण असा शक उल्लेख येतो. तो शालिवाहन शकाचा असावा, असे व्युत्पत्तीच्या आधारे वाटते. त्यामुळे शालिवाहनाने इ.स. ७८ या वर्षी शक संवत्‌ सुरू केला, ही प्रचलित समजूत निर्मूल असल्याचे सिद्ध होते. [⟶ कालगणना, ऐतिहासिक].

देशपांडे, सु. र.