सातवाहन वंश : प्राचीन भारतातील एक बलाढ्य सुप्रसिद्घ राजवंश. या वंशातील राजांनी  इ. स. पू. सु. दुसऱ्या शतकापासून इ. स. तिसऱ्या शतकादरम्यान मुख्यत्वे महाराष्ट्रात अधिसत्ता गाजविली. या वंशाविषयीची माहिती मुख्यत्वे त्यांची नाणी, शिलालेख, रुद्रदामनचा जुनागढ येथील प्रस्तरलेख, आपस्तंब धर्मसूत्र, वायु, विष्णु, मत्स्य  आदी पुराणे जैन ग्रंथ वगैरेंतून मिळते. या वंशाच्या मूलस्थानाबद्दल आणि नावाबद्दलही विद्वानांत मतभेद आहेत. तसेच या राजवंशाच्या कालखंडाबद्दल आणि राजांच्या एकूण संख्येबद्दल विद्वानांत एकमत नाही. पुराणांतील राजांची काही नावे तत्कालीन कोरीव लेखांतल्या पुराव्याशी जुळत नाहीत तथापि सामान्यतः या वंशातील तीस राजांनी सु. ४५० वर्षे राज्य केले असे मानण्यास हरकत नाही. पुराणांत या राजांना आंध्र किंवा आंध्रभृत्य म्हटले आहे परंतु त्यांचे आरंभीचे लेख व नाणी महाराष्ट्रात उपलब्ध झाली, त्यांवरून त्याचा उदय महाराष्ट्रात झाला असावा. पुराणांतील वंशावळी लिहिल्या गेल्या त्यावेळी त्यांची सत्ता आंध्र प्रदेशावर पसरली होती म्हणून त्यांना पुराणांत आंध्र वा आंध्रभृत्य अशी नावे मिळाली असावीत. 

सम्राट अशोकाच्या निधनानंतर (इ. स. पू. २३२) हा वंश उदयाला आला असावा. या वंशाला कोरीव लेखात ‘सातवाहन कुल’ असे म्हटले आहे, त्यावरून त्याचा संस्थापक कोणी सातवाहन राजा असावा. या सातवाहन राजाची प्रारंभीची नाणी मराठवाड्यात व विदर्भात सापडली आहेत. नेवासे येथील उत्खननांतही ती सापडली आहेत. या पुराव्यांवरून त्यांची सत्ता इ. स. पू. तिसऱ्या-दुसऱ्या शतकांत होती असे दिसते.

  

सातवाहन हा या वंशाचा उत्पादक असला, तरी त्याचा नामनिर्देश पुराणांत आढळत नाही कारण आरंभी त्याचे राज्य बरेच मर्यादित असावे तथापि त्याने महाराष्ट्रातील महारठी व महाभोजी अधिपतींशी सख्य आणि वैवाहिक संबंध जोडून ते लवकरच वाढविले असावेत. त्याच्यानंतर बहुधा तिसऱ्या पिढीतील सिमुक (श्रीमुख) याचे नाव या वंशाचा उत्पादक म्हणून पुराणांत येते. तो इ. स. पू. २०० च्या सुमारास राज्य करू लागला असावा. जुन्नरजवळ नाणेघाटातील लेण्यात त्याचा पुतळा कोरून त्याखाली त्याचे नाव ‘सिमुक सातवाहन’ असे कोरले होते. तसेच त्याचा पुत्र सातकर्णी, सून नागनिका व काही राजपुत्र यांचेही पुतळे तेथेच कोरून त्यांच्या पीठांवर त्यांची नावे कोरली होती. सर्व पुतळे आता नष्ट झाले आहेत पण त्यांची नावे अवशिष्ट आहेत. 

सिमुकाने २३ वर्षे राज्य केले असे पुराणे सांगतात. त्याच्या राज्यात पुणे, नासिक, अहमदनगर आणि औरंगाबाद या जिल्ह्यांचा अंतर्भाव होता. त्याची राजधानी प्रतिष्ठान (औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण) येथे होती असे दिसते. 

सिमुकाच्या निधनाच्या वेळी त्याचा पुत्र प्रथम सातकर्णी (कार. इ. स. पू. २००–१७७ ) हा अल्पवयस्क असल्यामुळे सिमुकाचा भाऊ कृष्ण हा गादीवर आला. त्याच्या अमात्याने नासिकजवळच्या ‘पांडवलेण्यां’तील एक लेणे कोरवून ते बौद्घ भिक्षूंना अर्पण केले, असे तेथील कोरीव लेखावरून कळते. या लेखात कृष्णाचा निर्देश ‘सातवाहन कुलातील कृष्ण राजा राज्य करीत असता’ असा केला असल्याने तो सातवाहन राजाचा पुत्र नसून बहुधा तिसऱ्या पिढीतील त्यांचा वंशज असावा. 

कृष्णानंतर प्रथम सातकर्णी गादीवर आला. पुराणांत याला कृष्णाचा पुत्र म्हटले आहे तथापि नाणेघाटात सिमुक, सातकर्णी, त्याची राणी नागनिका, तिचे पुत्र वगैरेंचे पुतळे कोरले होते पण त्यांमध्ये कृष्णाचा पुतळा नव्हता. त्यावरून सातकर्णी हा सिमुकाचा पुत्र असावा. 

सातकर्णीने नर्मदा नदीच्या उत्तरेस आपल्या राज्याचा विस्तार केला. सांचीच्या तोरणावर त्याचा नामनिर्देश आहे. तत्कालीन कलिंगनृपती खारवेल याने त्याच्या राज्यावर स्वारी करण्याकरिता चतुरंग सेना पाठविली होती पण ती नागपूरजवळच्या कन्हान (कृष्णवेणा) नदीजवळ आल्यावर बहुधा सातकर्णीच्या सेनेच्या आगमनाची वार्ता मिळाल्यावर तिला परत फिरावे लागले. 

सातकर्णीने नागाधिपती महारठी कळलाय याची कन्या नागनिका हिच्याशी विवाह केला होता. त्याने दोनदा अश्वमेध करून दक्षिणेतील आपले सार्वभौमत्व प्रस्थापित केले. याशिवाय त्याने राजसूय, अग्न्याधेय, आप्तोर्याम, दशरात्र, त्रयोदशरात्र, अंगिरसत्रिरात्र, गवामयन इ. अनेक श्रौत याग करून बाह्मणांना हजारो गाई, हत्ती, घोडे, कार्षापणनामक तत्कालीन नाणी दान दिली. त्यांचा तपशील नागनिकेच्या नाणेघाटातील लेखांत दिला आहे. सातकर्णीच्या नाण्यांच्या प्राप्तिस्थानावरून त्याचे राज्य मध्य महाराष्ट्र, पश्चिम आंध्र व माळवा अशा विस्तृत प्रदेशांवर होते. तसेच नाणेघाट लेखाच्या आरंभी इंद्र, धर्म, संकर्षण, वासुदेव व चार लोकपालांचा उल्लेख आला आहे. त्यावरून सातकर्णी भागवत संप्रदायाचा अनुयायी असावा, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. 

सातकर्णीला वेदिश्री आणि शक्तिश्री असे दोन पुत्र होते. पुराणांत यांच्या ऐवजी पूर्णोत्संग आणि स्कंदस्तंभी अशी नावे आढळतात. अनेक विद्वानांनी वेदिश्री हा अल्पवयस्क असल्यामुळे नागनिका काही काळ राज्यकारभार पाहात होती असे म्हटले आहे पण ते बरोबर दिसत नाही. नाणेघाटातील लेखात तिचे वर्णन ‘महिना-महिना उपोषण करणारी, गृहतापसी, ब्रह्मचर्यव्रताचे पालन करणारी, दीक्षा, व्रत आणि यज्ञ यांच्या अनुष्ठानांत निपुण’ असे केले आहे. त्यावरून ती त्या काळी आपले जीवन धार्मिक वृत्तीने घालवीत होती, यात संशय नाही. त्या काळी तिचा ज्येष्ठ पुत्र वेदिश्री हा राज्य करीत होता. त्याचे वर्णन नाणेघाटातील लेखात ‘दक्षिणापथपति’ असे केले आहे. [⟶ नागनिका]. 

वेदिश्रीनंतर अनेक राजांनी राज्य केले. त्यांची नावे व शासनाची वर्षे पुराणांत दिली आहेत पण ती सर्वस्वी विश्वसनीय नाहीत. या वंशातील आठवा राजा आपीलक याचे मात्र एक तांब्याचे नाणे छत्तीसगढमध्ये महानदीच्या काठी बालपूर येथे सापडले आहे. सतरावा राजा ⇨हाल  हा गाथा सप्तशती नामक सुप्रसिद्घ प्राकृत भाषेतील सातशे गाथांच्या संग्रहाचा कर्ता म्हणून विख्यात आहे. 

हाल राजानंतरच्या पाच राजांच्या कारकीर्दीविषयी पुराणांत किंवा इतरत्र काहीच माहिती मिळत नाही. या कालात कुशाण सम्राटांच्या भूमक आणि नहपान या क्षत्रपांनी (प्रांताधिपतींनी) गुजरात व महाराष्ट्र जिंकून तेथे आपला अंमल बसविला. नहपान व त्याचा जामात ऋषभदत्त यांचे शक संवत् ४१ ते ४६ पर्यंतचे लेख महाराष्ट्रात नासिक, कार्ले वगैरे ठिकाणी सापडले आहेत. त्यांवरून नहपानाचे साम्राज्य दक्षिणेत कृष्णा नदीपासून उत्तरेत अजमीरपर्यंत पसरले होते असे दिसते. प्रभदत्त वा उषवदात याने बौद्घ भिक्षूंकरिता नासिकजवळ लेणी कोरविली, त्यांच्या चरितार्थाकरिता ग्रामदाने दिली, तसेच धर्मशाळा, उद्याने, तलाव इ. लोकोपयोगी कृत्ये केली आणि सहस्र ब्राह्मणभोजने घालून ब्राह्मणांनाही विविध प्रकारची दाने दिली. विदर्भातही रुपिअम्मनामक महाक्षत्रपाचा अंमल होता, हे पौनी (भंडारा जिल्हा) येथे अलीकडे सापडलेल्या छायास्तंभावरून माहीत झाले आहे. 

या काळात सातवाहन राजांची सत्ता प्रतिष्ठानजवळच्या प्रदेशात सीमित झाली असावी परंतु इ. स. दुसऱ्या शतकाच्या द्वितीय पादांत गौतमीपुत्र सातकर्णी (कार. इ. स. ६२–८६) या महाप्रतापी सातवाहन नृपतीने शकांचा उच्छेद करून दक्षिणेत विशाल साम्राज्य स्थापिले. त्याने प्रथम विदर्भ काबीज केला आणि नंतर पश्चिम महाराष्ट्रावर स्वारी केली. शकांवरील विजयानंतर लवकरच कोरविलेल्या लेखांत त्याने आपला उल्लेख ‘बेनाकटकस्वामी’ (वैनगंगा जिल्ह्याचा अधिपती) म्हणून केला आहे. त्याच्या राज्यांत ऋषीक (खानदेश), अश्मक (अहमदनगर आणि बीड), आकरावन्ती (पूर्व व पश्चिम माळवा), सुराष्ट्र आणि अपरांत (कोकण) हे देश अंतर्भूत होते, असा तत्कालीन लेखांत उल्लेख आहे. यांच्याही पलीकडे आंध्रादी प्रदेशांवर याचा अंमल होता, म्हणून कोरीव लेखांत त्याला ‘त्रिसमुद्राधिपती’ म्हटले आहे. त्याने निदान चोवीस वर्षे राज्य केले असे दिसते. 

गौतमीपुत्रानंतर त्याचा ज्येष्ठ पुत्र वासिष्ठीपुत्र पुळुमावी (कार. इ. स. १०६–१३०) हा गादीवर आला. याचेही राज्य बरेच विस्तृत होते पण शकक्षत्रप चेष्टनाने उत्तरेतील सुराष्ट्र आणि आकरावन्ती हे देश परत जिंकून घेतले होते. टॉलेमीने (इ. स. १४०) याचा ‘प्रतिष्ठानाधिपति’ म्हणून उल्लेख केला आहे. याने अठ्ठावीस वर्षे राज्य केले असे पुराणांत म्हटले आहे. 

वासिष्ठीपुत्र पुळुमावीनंतर त्याचा भाऊ वासिष्ठपुत्र सातकर्णी (कार. इ. स. सु. १३०–१५९) हा गादीवर आला. त्याने माळवा-काठेवाड या देशांचा अधिपती प्रथम रुद्रदामन याच्या कन्येशी विवाह केला होता, असे कान्हेरी येथील लेण्यांतील लेखावरून समजते. 

यानंतरचा बलाढ्य नृपती यज्ञश्री सातकर्णी हा होय.याचे कोरीव लेख व नाणी पश्चिमेत कोकणपासून पूर्वेस आंध्रापर्यंत सापडली आहेत. त्यांवरून त्याच्या विस्तृत साम्राज्याची कल्पना येते. याने क्षत्रपांकडून जिंकलेल्या प्रदेशाकरिता त्यांच्या नाण्यांसारखी चांदीची नाणी आणि पूर्वेच्या कोरोमंडल किनाऱ्यावरील प्रदेशाकरिता दोन शिडांचे जहाज असलेली शिशाची नाणी पाडली होती. 

यज्ञश्री सातकर्णीनंतर विजय सातकर्णी, चंडश्री (चंद्रश्री) आणि पुळुमावी यांची नावे पुराणांत येतात. याशिवाय स्कंद सातकर्णी, कुम्भ सातकर्णी, शक सातकर्णी वगैरे काही राजांची पोटिन धातूची नाणी अकोला जिल्ह्यात तऱ्हाळा येथे काही वर्षांपूर्वी सापडली होती तथापि यज्ञश्रीनंतर सु. ५० वर्षांत (इ. स. २५० च्या सुमारास) सातवाहन घराण्यास उतरती कळा लागली. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात आभीरांचे व विदर्भात वाकाटकांचे राज्य आले. दक्षिण महाराष्ट्रात कोल्हापूर-सातारा भागांत ‘कुर’ घराण्यातील सातवाहनांचे मांडलिक घराणे राज्य करीत होते, असे काही नाण्यांवरून ज्ञात झाले आहे. 


सातवाहन राजांच्या कारकीर्दीत महाराष्ट्रात विविध क्षेत्रांत प्रगती झाली. सातवाहनांचा धर्म आणि वाङ्‌मय यांना उदार आश्रय होता. आरंभीच्या काही राजांनी श्रौत यज्ञ करून ब्राह्मणांवर विविध दानांचा वर्षाव केला होता. त्याचा उल्लेख नाणेघाटातील लेखात आहे. त्यांचा बौद्घ धर्मालाही आश्रय होता. कृष्ण, गौतमीपुत्र सातकर्णी, पुळुमावी आणि यज्ञश्री सातकर्णी यांनी बौद्घ भिक्षूंकरिता लेणी कोरवून ग्रामदाने दिल्याचे उल्लेख कोरीव लेखांत आले आहेत. अशी अनेक लेणी महाराष्ट्रात भाजे, कोंडाणे, कऱ्हाड, बेडसा, कार्ले, नासिक, जुन्नर, पितळखोरे, अजिंठा वगैरे ठिकाणी अद्यापि विद्यमान आहेत. त्यांतील लेखांवरून राजांपासून सामान्य ग्रामिकांपर्यंत विविध श्रेणींच्या आणि धंद्यांच्या लोकांनी दाने देऊन ती कोरविली आणि शिल्पे, चित्रे इत्यादींनी ती भूषविली होती असे दिसते. कार्ले-भाजे ही लेणी शिल्पशैलीच्या दृष्टीने लक्षणीय असून येथील बौद्घ शिल्पे तसेच स्त्रीपुरुष नर्तकांची दंपती व मिथुन शिल्पे लक्षणीय आहेत. ही लेणी बौद्घ धर्माच्या हीनयान पंथाची आहेत. त्यांतील काही ‘चैत्य’ व इतर काही ‘विहार’ प्रकारची आहेत. त्यांतील काही चित्रांत गौतम बुद्घांच्या चरित्रातील प्रसंग आणि इतर काहींत जातककथा दाखविल्या आहेत.  

सातवाहनांचा प्राकृत वाङ्‌मयालाही उदार आश्रय होता. एका सातवाहन राजाने आपल्या अंतःपुरात प्राकृत भाषेचाच उपयोग केला पाहिजे, अशी आज्ञा काढली होती असे राजशेखर सांगतो. या कालातील हाल नृपतीने कोट्यवधी गाथांतून सातशे गाथा निवडून त्यांचा संग्रह गाहा सत्तसई (गाथा सप्तशती ) नावाने प्रसिद्घ केला होता. त्यांतील गाथा विविध दर्जाच्या कवींनी रचल्या होत्या. त्यांत कवींप्रमाणे काही कवयित्रीही होत्या. या कालातील दुसरा सुप्रसिद्घ प्राकृत ग्रंथ बृहत्कथा  हा होय. हा आता उपलब्ध नाही पण त्याची इ. स. अकराव्या शतकात सोमदेव आणि क्षेमेंद्र यांनी अनुक्रमे केलेली कथासरित्सागर  आणि बृहत्कथामंजरी   ही संस्कृत रूपांतरे प्रसिद्घ आहेत. त्यांतील कथेवरून गुणाढ्य हा विदर्भातील सुप्रतिष्ठ नगराचा रहिवासी असून राजाश्रयार्थ सातवाहनांच्या प्रतिष्ठान नगरीस गेला होता असे समजते. 

सातवाहन काळात दीर्घकाळ शांतता आणि समृद्घी नांदली. सातवाहन राजांनी यज्ञयागांप्रमाणेच लोककल्याणार्थ पूर्तकर्मे (वापी, कूप, तडाग इ.) केली. नासिकच्या देवी लेण्यातील लेखात ऋषभदत्त म्हणतो की, भरुकच्छ (भडोच), दशपूर (मंदसोर), गोवर्धन आणि शुर्पारक (सोपारा) येथे प्रवाशांकरिता धर्मशाळा बांधल्या. तसेच बगीचे, तलाव, पाणवठे निर्माण केले होते इबा, पारदा, दमण, तापी, करबेणा आणि दाहनुका या नद्या पार करण्याकरिता धर्मार्थ तरींची सोय केली होती. शिवाय या नद्यांच्या दोन्ही तीरांवर विश्रांतिगृहे उभारली होती आणि पाणपोया घातल्या होत्या. तत्कालीन आपस्तंब धर्मसूत्रावरून असे दिसते की, त्या काळच्या न्यायदानात पुरुषवध, चौर्य, भूमीचा अपहार या गुन्ह्यांबद्दल कठोर शिक्षा होत्या. अपराध्याची मालमत्ता जप्त करून त्याला देहान्ताची सजा दिली जाई. याशिवाय या आपस्तंब धर्मसूत्रात परिश्रमाचे मूल्यवर्णन केले असून परिश्रम न केल्यामुळे जमिनीतून उत्पन्न कमी आल्यास नुकसानभरपाई वसूल करावी, तसेच शेतावरील कर्मचाऱ्यांनी निष्काळजीपणा केल्यास त्यांना दंडताडन करावे असेही सांगितले आहे.

या काळात व्यापार भरभराटीत असल्याचे दाखले मिळतात. तत्कालीन राजधानी प्रतिष्ठान हे व्यापारी मार्गांचे मुख्य केंद्र झाले होते. कल्याण, चौल, सोपारा इ. महत्त्वाची बंदरे सागरी व्यापार हाताळीत होती. याउलट जुन्नर, नासिक, पैठण, तेर (तगर), भोकरदन आणि कोल्हापूर (ब्रह्मपुरी) ही महत्त्वाची व्यापारी व राजकीय केंद्रे होती. उत्तरेतील उज्जयिनी आणि पश्चिमेतील नासिक, कल्याण, शूर्पारक, भरुकच्छ इ. नगरे व बंदरे व्यापारी मार्गांनी जोडली होती. प्रतिष्ठान व तेर येथून विविध प्रकारचे मणी, मलमलीसारखे तलम कापड आणि विविध प्रकारचा माल गाड्यांतून पश्चिमेकडील बंदरांना पोहोचविला जात असे, असे पेरिप्लस ऑफ द एरिथ्रिअन सी  या ग्रंथावरून समजते. सातवाहनांच्या राज्यात तीस तटबंदीयुक्त नगरे होती, असे उल्लेख परदेशी प्रवाशांनी नोंदविले आहेत. व्यापाराबरोबरच सातवाहन साम्राज्यात कलाकेंद्रेही उदयास आली. या ठिकाणी झालेल्या उत्खननांत काही हस्तीदंती मूर्ती, रोमन मद्यकुंभ (ॲम्फोरा) व इतर अनेक वस्तू मिळाल्या. भोकरदन व तेर येथील उत्खननांत काही हस्तिदंती स्त्रीमूर्ती मिळाल्या असून त्या इटलीतील पाँपेई येथील स्त्रीमूर्तींशी साधर्म्य दर्शवितात. यांशिवाय काही रोमन नाणी आणि देवतांचे ब्राँझ पुतळे मिळाले. त्यांवरून सातवाहन साम्राज्याचा रोमन साम्राज्याशी व्यापारी संबंध होता, हे स्पष्ट होते. (चित्रपत्र).

पहा : कार्ले गौतमीपुत्र सातकर्णि तेर नागनिका पुळुमावि (यि) पैठण ब्रह्मपुरी (कोल्हापूर) भोकरदन.

संदर्भ : 1. Majumdar, R. C. Pusalker, A. D. Eds. The History and Culture of the Indian People, The Age of Imperial Unity, Vol. II, Bombay, 1998.  

            2. Sastri, Nilakanta K. A. Ed. A Comprehensive History of India, Vol. 2, Bombay, 1957.  

            3. Yazdani, Gulam, Ed. Early History of the Deccan, Vol. I and II, London, 1960.

           ४. मिराशी, वा. वि. सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास आणि कोरीव लेख, मुंबई, १९७९.

मिराशी, वा. वि.

नृत्यमग्न प्रणयी युगुल, कार्ले लेणे.वसुंधरेचे दान, नागार्जुनकोंडा, आंध्र प्रदेश.

शिल्पांकित प्रवेशद्वार, कार्ले लेणे, इ. स. पू. दुसरे शतक.स्त्री-शीर्षे, नेवासा, महाराष्ट्र.

अश्वारूढ प्रणयी दांपत्य, बेडसा लेणे, इ. स. पू. पहिले शतक.दंपतिशिल्पे, कान्हेरी.पितापुत्र शिल्प, अमरावती.