कुशाण वंश : इसवी सनाच्या सुरुवातीपासून इसवी सनाच्या तिसऱ्या शतकापर्यंत सिंधूचे खोरे, काश्मीर, अफगाणिस्तान ह्या भागांत राज्य करणारा एक परकीय वंश. मध्य आशियातील ⇨ यू-एची वंशाला स्थलांतर करावे लागले. त्यांच्या पाच शाखा निर्माण झाल्या. त्यांपैकी बाल्खच्या आसपास स्थायिक झालेल्या यू-एची  वंशाच्या एका शाखेला कुशाण असे नाव होते. कुजुल कडफिसस याने बॅक्ट्रिया प्रदेशातील यू-एची वंशाच्या इतर चार शाखांना जिंकून आपली सत्ता प्रबळ केली. नंतर त्याने पार्थियनांचा पराभव करून काबूल व वायव्य सीमाप्रांत यांवर आपले राज्य पसरविले. त्याच्या तांब्याच्या नाण्यांवर खरोष्ठी लिपीत त्याच्या नावामागे महाराज, राजाधिराज आणि सत्यधर्मस्थित अशा पदव्या लावलेल्या आढळतात. त्याने आपल्या पूर्वीच्या पार्थियन आणि ग्रीक राजांच्या नाण्यांचे अनुकरण केलेले दिसते.

कुशाणकालीन दोन स्त्रीशिल्पे

कुजुल कडफिसस हा वयाच्या ऐंशी वर्षांनंतर सु. ४० मध्ये निधन पावला. त्यानंतर त्याचा मुलगा वीम कडफिसस हा गादीवर आला. याने आपले राज्य तीन्शू (सिंधू) प्रदेशावर पसरविले. तसेच त्याने गंगेच्या खोऱ्यातही साकेत (अयोध्या) पर्यंत प्रदेश आक्रमिला होता, असा चिनी ग्रंथांत उल्लेख आहे. याच्या कारकिर्दीत पश्चिमेच्या देशांशी व्यापाराचे मार्ग खुले होऊन देशात सुबत्ता झाली होती. तिचे प्रतिबिंब याच्या सोन्याच्या नाण्यांत पडले आहे. याची तांब्याचीही नाणी सापडली आहेत. या नाण्यांवर याची सम्राट पदवी, तसेच त्याच्या शिवोपासनेची निदर्शक माहेश्वर पदवी आढळते. याची नाणी ऑक्सस नदीच्या काठचा प्रदेश, काबूल व कंदाहार येथे, तसेच भारतात भीटा, कौशाम्बी, वैशाली (बसाढ) अशा मोठ्या विस्तृत प्रदेशांत सापडली आहेत.

याच्यानंतर पहिला ⇨ कनिष्क  गादीवर आला. पण त्याचा वीम कडफिससशी कसा संबंध होता हे माहीत नाही. याने सर्व उत्तर भारतभर आपला अंमल बसविला. दक्षिण भारताचाही गुजरात, महाराष्ट्र, विदर्भ हा प्रदेश याने आक्रमिला असावा. याची नाणी ऑक्सस नदीचे खोरे, काबूल, कंदाहार, सिंध, बंगाल, बिहार, ओरिसा इ. विस्तृत प्रदेशांत सापडली आहेत. याचा बौद्ध धर्माला व विद्वानांना  उदार आश्रय होता. कनिष्क हा शक संवताचा संस्थापक संवताचा संस्थापक असावा.

कनिष्काने २३ वर्षे राज्य केले. त्याच्यानंतर वासिष्क गादीवर आला. याचा शक संवत् २४ चा लेख मथुरा येथे आणि संवत् २८ चा लेख सांची येथे सापडला आहे. त्यांवरून याच्या कारकिर्दीतील कुशाण साम्राज्याच्या विस्ताराची कल्पना येते. यानंतर हुविष्क गादीवर आला. त्याचे संवत् २८ ते ६९ चे (१०६ ते १३८) लेख मथुरा येथे व इतरत्र सापडले आहेत. याच्याबरोबर वासिष्क व त्याचा पुत्र दुसरा कनिष्क राज्य करीत होता. त्याने महाराज, राजाधिराज इ. सम्राटपद निदर्शक पदव्यांबरोबर कैसर ही पदवीही धारण केली होती. यानंतर पहिला वासुदेव राज्य करू लागला. त्याच्या कारकिर्दीतील शक संवत् ६४ ते ९८ पर्यंतचे लेख सापडले आहेत. यानंतर दुसऱ्या एका वासुदेव नामक राजाची नाणी पंजाब आणि काबूल या प्रदेशांत सापडली आहेत.

या दुसऱ्या वासुदेवानंतरही कुशाणांची सत्ता अफगाणिस्तान, वायव्य सीमाप्रांत व पंजाब प्रांतात चालू असावी. समुद्रगुप्ताच्या अलाहाबाद प्रशस्तीत दैवपुत्र शाही शाहानुशाही राजाने त्याचे स्वामित्व मान्य केल्याचा उल्लेख आहे, तो तत्कालीन कुशाण राजाचा असावा.

कला : कुशाणकाली बौद्ध धर्मात महायान व हीनयान हे दोन पंथ निर्माण झाले आणि महायान पंथास कनिष्कासारख्या थोर राजांचा आश्रय मिळाला. त्यामुळे हीनयान पंथात मूर्तिघडणीस असणारे बंधन संपुष्टात येऊन बुद्ध-बोधिसत्त्वादिकांच्या मूर्ती झपाट्याने बनविण्यात येऊ लागल्या. भारतीय मूर्तीकलेच्या विकासाच्या अभिवृद्धीस येथूनच सुरुवात झाली, असे मानण्यात येते. ह्यांतून गांधारशैली, मथुराशैली ह्यांसारख्या शैली निर्माण झाल्या. कुशाण हे परकीय असल्यामुळे वरील शैलींवर साहजिकच ग्रीक, रोमन, इराणी आदी छटांचा परिणाम झालेला दिसून येतो. हा परिणाम मुख्यत्वे गांधारशैलीवर अधिक प्रामाणात आढळतो, तर मथुराशैलीतील काही शिल्पे वगळता उरलेल्यांत भारतीय छटा जाणवते. दुसरी गोष्ट म्हणजे कुशाण राजे परकीय असूनही सहिष्णू होते. त्यामुळे बौद्ध धर्माबरोबरच हिंदू, जैन इ. धर्मांसही त्या काळी राजाश्रय मिळाला आणि बुद्धमूर्तीबरोबर जैनस्तूप, आयागपट्ट तसेच शिव, कार्तिकेय, मिहिर, वासुदेवकृष्ण इ. देवदेवतांच्या मूर्ती प्रचारात आल्या.

कुशाणांचे साम्राज्य उत्तर हिंदुस्थान आणि अफगाणिस्तान ह्या भागांत जरी मुख्यतः होते, तरी त्यांचे राजनैतिक संबंध दूरवर पसरले होते. त्यामुळे कुशाणकलेची अभिवृद्धी गांधार, मथुरा, श्रावस्ती, सारनाथ, राजगृह, बेग्रॅम (कपिशा), बाल्ख, शाह-जी-की-ढेरी, गझनीचे पठार वगैरे भागांबरोबरच इराण, बॅक्ट्रिया वगैरे इतर प्रदेशांतही झालेली आढळते. ह्या काळात बुद्ध आणि बोधिसत्त्वादिकांच्या मूर्तीबरोबरच बुद्धाच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांचे शिल्पांकन होऊ लागले. उलूकजातक, कच्छपजातक, छंदकिन्नरजातक, दीपंकरजातक वगैरेंमधील बुद्धाच्या पूर्व जीवनातील प्रसंग स्तूपांच्या सभोवतालच्या भागावर व कठड्यांवर शिल्पित केलेले दिसतात. बौद्ध मठ, स्तूप ह्यांमधून पूर्वी लाकडी कलाकुसरकामही केलेले असावे, असे अवशिष्ट अवशेषांवरून दृष्टोत्पत्तीस येते. काही बौद्ध मठांतून बामियानशैलीतील भित्तिचित्रांचे नमुने आढळते आहेत. काहींतून जडजवाहीर व नाणी ह्यांच्या पेट्या सापडल्या, तर काहींतून कोरीव लेख आढळते आहेत. बहुतेक वास्तूंच्या बांधणीत मातीची वीट किंवा गुळगुळीत दगड वापरलेला दिसतो. बौद्धमूर्ती, जातककथा ह्यांबरोबरच स्तूपांच्या भिंती व कठडे, इतर भौमितिक आकृत्या व रचनाबंध नक्षीने अलंकृत केलेले आहेत. काही ठिकाणी पंखयुक्त सिंह, हत्ती, समुद्रदेवता इ. आकृत्याही आढळतात. काही पुरुषाकार स्तंभ (ॲटलान्टीझ) असून बहुतेक ठिकाणची बुद्धमूर्ती कधी बैठी, तर कधी उभी व भिन्न मुद्रांत, दोन्ही खांदे वस्त्राने झाकलेले अशी आढळते. मूर्ती शक्यतो दगडाची घडविलेली आहे, परंतु एखादी चुनेगच्चीचीही मूर्ती दिसते. एकूण बुद्धमूर्ती विशाल, ओबडधोबड अशी असून तीत गुप्तकालीन कलाकाराचे सौष्ठव वा सौंदर्य दृष्टोत्पत्तीस येत नाही.

अवशेषमंजूषा धारण केलेली एका कुशाण राजाची विशीर्ष मूर्ती.

मात्र वरील काळात निर्माण झालेल्या यक्ष, यक्षी, अप्सरा, श्री, लक्ष्मी, कुबेर वगैरे मथुराशैलीतील मूर्तीमधून, मुख्यतः स्त्रियांच्या आकृत्यांमधून व त्यांनी ल्यालेल्या कंठी, एकावली, केयूर, कंठभूषणे, मेखला, कटीसुत्र इ. अलंकारांवरून तत्कालीन सांस्कृतिक प्रगतीची व समृद्धीची कल्पना येते. भूतेश्वर व कंकाली-तीला येथील स्त्री-आकृत्या पूर्णतः भारतीय भासतात मात्र हारितीची आकृती गांधारशैलीची छाप दर्शविते. कुंभ व आंब्याचा ढाळा धारण करणारी (घेऊन उभी असणारी) अप्सरा किंवा श्री व लक्ष्मी ह्या तत्कालीन आकृत्या अप्रतिम आहेत. ह्यांशिवाय ह्या काळातील बेग्रॅम येथे सापडलेल्या लघुचित्राकृतींत संवेदनाक्षम व प्रसाधनास रेंगाळत चाललेल्या काही हस्तिदंती स्त्री-आकृत्या सापडल्या आहेत. मथुरा येथील राजदरबारी पोषाखातील बूट व कोट  घातलेली कनिष्काची मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. ह्या काळात बुद्ध, देवदेवता यांबरोबरच अशा प्रसिद्ध पुरुषांच्याही आकृत्या निर्माण झाल्या, हे या काळाचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. शिल्पकलेबरोबरच कुंदुझ, हद्दा, तक्षशिला वगैरे ठिकाणी चुनेगच्चीचे कामही दिसते. त्यात आशिया व भूमध्यसामुद्रिक प्रदेश यांतील कलांची संमिश्र अभिव्यक्ती आहे. कुशाणकालीन बोधिसत्त्व किंवा बुद्धाच्या मूर्ती भव्य आहेत.

मृच्छिल्पांत प्रामुख्याने भारतीय व अभारतीय ह्या दोन छटा स्पष्ट दिसतात व बहुतेक मृच्छिल्पे मूर्तिका-स्वरूपात आहेत. ह्यांतील स्त्री-आकृत्य, यक्षी, भारतीय, त्यांचा पोशाख व संवेदनाक्षम हावभाव एतद्देशीय स्वरूप दर्शवितात, तर पुरुषाकृतींत सिथीअन पोशाख परकीय छटा दर्शवितो. हीच स्थिती नाण्यांवरील आकृत्यांत दिसते. ह्या मूर्ती प्रामुख्याने बेग्रॅम, बाल्ख वगैरे ठिकाणी विपुल प्रमाणात अलीकडे सापडल्या आहेत.

मृत्पात्रांच्या बाबतीत ह्या काळात फारशी प्रगती झालेली दिसत नाही किंवा त्यांवर परकी छटा पडलेली आढळत नाही. कुशाणकालीन बहुतेक मृत्पात्रे करड्या, काळसर रंगाची असून क्वचित पातळ थराची, गुळगुळीत, तांबडी अशी आढळतात. कदाचित विशिष्ट समारंभासाठी ती निर्माण केली असावीत. एकूण नेहमीच्या वापरातील मृत्पात्रांत वैविध्याचा अभाव व कलाकुसरीचा दर्जा सर्वसाधारणच दिसतो.

प्राचीन भारतीय इतिहासात कुशाण कालास महत्त्व आहे. या काळात कुशाणांचे साम्राज्य केवळ उत्तर भारतातच नव्हे, तर मध्य आशियापर्यंत पसरले होते. पश्चिमेच्या देशांशी व्यापाराचे मार्ग खुले होऊन त्या काळी राष्ट्राची संपत्ती वाढली होती. बौद्ध धर्मात महायान या नवीन पंथाचा उदय झाला. महायान पंथाबरोबर गांधार शिल्पकलेचा उदय होऊन अनेक बुद्ध-बोधिसत्त्वादिकांच्या मूर्ती बनविण्यात आल्या. संस्कृत विद्येला उत्तेजन मिळून तीत अश्वघोषादी कवींनी ग्रंथरचना केली. नागार्जुन हा बौद्ध तत्त्वज्ञ व चरक हा आयुर्वेद ग्रंथकार हेही याच काळात होऊन गेले. कुशाण साम्राज्याने मौर्य साम्राज्याची परंपरा चालविली यात संशय नाही.

संदर्भ : 1. Anand, Mulk Raj, Ed. Marg. Vol. XXIV, June, 1971, Bombay, 1971.

            2. Chattopadhyay, Bhaskar, The Age of Kushanas, Calcutta, 1967.

           3. Majumdar, R. C. Ed. The Age of Imperial Unity, Bombay, 1960.

           4. Puri, B. N. India under the Kushanas, Bombay, 1965.

मिराशी, वा. वि. देशपांडे, सु. र.