विल्यम द काँकरर

विल्यम द काँकरर : (१०२७/२८-९ सप्टेंबर १०८७). इंग्लंडचा पहिला नॉर्मन सम्राट. त्याचा जन्म फ्रान्समधील फलेझ येथे झाला. नॉर्मडीचा डेव्हिल ड्यूक पहिला रॉबर्ट आणि फ्रान्समधील फुलबर्ट या कातडी कमावणाऱ्या व्यावसायिकाची कन्या अर्लेट्टा यांचा तो अनौरस पुत्र. पवित्र धार्मिक यात्रेस (पॅलेस्टाइन) जाण्याअगोदर रॉबर्टने विल्पमला आपला विधिवत्‌वारस म्हणून राजाकडून मान्यता मिळविली (१०३४) परंतु त्यानंतर अनागोंदी माजली व तीतच रॉबर्टचे निधन झाले (१०३५).

सुरूवातीपासून विल्यमला आपत्तींशी झगडावे लागले. तथापि हळूहळू त्याने आपला अधिकार प्रस्थापित केला आणि व्हालेस-ड्यून्सच्या लढाईत शत्रूवर विजय मिळवून त्याने नॉर्मडी पादाक्रांत केली. १०५१-५२ मध्ये इंग्लंडचा निपुत्रिक राजा एडवर्ड द कनफेसर याची त्याने भेट घेतली. त्याने कदाचित आपला भावी वारस म्हणून त्यावेळी त्यास वचन दिले असावे. यानंतर विल्यमने फ्लँडर्सचा सरदार पाचवा बॉल्डविन या दूरच्या नातेवाईकाची कन्या मटिल्डा हिच्याशी विवाह केला (१०५३). त्यांना चार मुलगे व चार मुली झाल्या. त्यांपैकी रॉबर्ट, दुसरा विल्यम व पहिला हेन्रीं या राजांनी इतिहासात नाव मिळविले. लष्करी सामर्थ्य, राजकीय मुत्सद्देगिरी आणि कणखरपणा यांच्या जोरावर विल्यमने नॉर्मडीचे अधिकारक्षेत्र विस्तारले आणि आपल्या मूळच्या फ्रेंच राजापासून जवळजवळ तो स्वतंत्र रीत्या वागू लागला. त्याने मेन जिंकून घेतले (१०६३). यामुळे पुढील वर्षी ब्रिटनीचा राजा म्हणून त्यास मान्यता मिळाली (१०६४).

नॉर्मन इतिवृत्ताप्रमाणे अँग्लो-सॅक्सनांचा प्रमुख वेसेक्सचा सरदार हॅरल्ड जहाज फुटल्यामुळे अलगदच विल्यमच्या ताब्यात आला. त्याच्याकडून विल्यमने सक्तीचे इंग्लंसडच्या गादीसाठी आपला पाठिंबा असल्याची मान्यता घेतली. तथापि एडवर्डच्या निधनानंतर (६ जानेवारी १०६६) हॅरल्डने इंग्लंसडची गादी बळकावली आणि वचनभंग केला. तेव्हा विल्यमने आपल्या हक्कासाठी पोपची संमती मिळविली. युद्धासाठी लष्कर सुसज्जव केले आणि शेजारच्या प्रांतांची मदत घेतली. त्यातवेळी त्याने हद्दपारीतील हॅरल्डच्या भावाशी संधान बांधले. हॅरल्डच्या भावाने नॉर्वेच्या राजाच्या मदतीने उत्तर इंग्लंडवर स्वारी केली. परंतु हॅरल्डने त्यांचा स्टॅम्फर्ड ब्रिजच्या युद्धात पराभव केला (२५ सप्टेंबर १०६६). या युद्धात हॅरल्ड गुंतल्याच्या संधीचा फायदा घेऊन विल्यमने दक्षिण इंग्लंडमध्ये प्रवेश केला. हॅरल्डने त्याच्या चढाईस प्रतिकार केला पण निष्णात सेनापती असलेल्या विल्यमने हेस्टिंजच्या युद्धात त्याचा पराभव करून त्याला ठार मारले (१४ ऑक्टोबर १०६६). विल्यम लंडनमध्ये सन्मानाने आला व नाताळच्या दिवशी त्यास राजमुकुट प्राप्त झाला (१०६६). इंग्लंडच्या गादीवर आल्यानंतर पुढील चार वर्षात तो आणि त्याचे नॉर्मन अनुयायी यांनी आपले स्थान बळकट केले. त्याने यॉर्कशरमधील उठाव मोडले (१०६९), तसेच उत्तर इंग्लंडमधील प्रतिकार कठोरपणे मोडून काढला. हे करताना त्याने पिके, घरे, पशुधन इ. कशाचीही तमा बाळगली नाही. सॅक्सन सरदारांना त्याने सळो की पळो करून सोडले. परिणामतः विरळ लोकसंख्या असलेला जमीनजुमला त्याच्या हाती आला. सॅक्सन सरदारवर्गाच्या सर्व मिळकती जप्त करून त्याने त्या आपले सैनिक व अनुयायी यांमध्ये वाटल्या. त्यातूनच पुढे सरंजामशाहीपद्धत अस्तित्वात आली. देशातील जमिनीची मालकी राजाची असून, ती त्याने उर्वरित लोकांना काही अटींवर दिलेली आहे त्या अटी त्यांनी पाळल्या नाहीत, तर ती मिळकत राजा परत घेऊ शकतो, हे तत्व त्याने व्यवहारात आणले. लोकांच्या सर्व मिळकतींची नोंद ठेवण्यास त्याने सुरूवात केली. या नेंदवहीस डूम्झडे बुक म्हणतात.

एडवर्ड राजाचा विधिवत् वारस या नात्याने विल्यमने अँग्लो-सॅक्सन कायद्याचे सर्वसाधारणतः पालन केले आणि नवीन असे फारसे कायदे केले नाहीत परंतु ह्या सर्व कायद्यांची संहिता पुढे बाराव्या शतकात ‘विल्यमचे विधी’ (नियम) म्हणून प्रसिद्ध झाली. विल्यमची शासनपद्धती फ्रान्सपेक्षा प्रागतिक होती तद्वतच स्थानिक स्वराज्य संस्थाही त्याच्या अखत्यारीत होत्या. तेथील सरदार व शेरीफ हे त्याचे अधिकारी होते. त्यांना तो केव्हाही नोकरीवरून कमी करू शकत होता. त्याने प्रचलित भूमिकराचा सदुपयोग केला तसेच लष्करी सेवा प्रत्येकास सक्तीची केली.

विल्यमने इंग्लंडमधील चर्चच्या व्यवस्थेत हस्तक्षेप करून लॅनफ्रँग्क ह्याची तेथील कँटरबरीच्या आर्चबिशपदी नियुक्ती केली (१०७०). पुढे तो विल्यमचा विश्वासू सल्लागार व मध्यस्थ झाला. इंग्लंडमधील उच्चपदस्थ पाद्री, बिशप आणि अँबट यांच्या जागी परदेशीय व्यक्तींची विल्यमने नियुक्ती केली. थोडक्यात, त्याने धार्मिक संस्था आणि त्यांचे पोपबरोबरचे संबंध यांवर आणला हक्क प्रस्थापित केला. १०७६ मध्ये सातवा पोप ग्रेगरी याने विल्यमला इंग्लंडच्या वतीने रोमन चर्चबद्दल स्वामिनिष्ठा व्यक्त करावी असे कळविले, तेव्हा त्याने याच हक्कतत्त्वावर नकार दिला.

आयुष्यभर विल्यम हा अविश्रांत संघर्ष व लढाया यांत गुंतला होता. त्याने इंग्लंड-नॉर्मंडी येथील उठाव शमविले, फ्रान्समधील शत्रूंना खडे चारले आणि वेल्स व स्कॉट यांना नमविले. स्कॉटिश राजाला त्याने १०७२ मध्ये खंडणी देण्यास भाग पाडले. अखेरच्या दिवसांत त्याने फ्रान्सशी युद्ध पुकारले (१०८६). या युद्धात घोड्यावरून पडल्यामुळे त्याला जबर दुखापत झाली. त्यातच पुढे काही दिवसांनी फ्रान्समधील रूआन शहरी त्याचे निधन झाले.

विल्यम वेळोवेळी घेत असलेले राजकीय निर्णय, चर्च-सुधारणांबाबतची त्याची आस्था, स्वतःचा नियमबद्ध खाजगी जीवनक्रम तसेच सुव्यवस्था राखण्याकरिता तो करीत असलेले अथक प्रयत्नत या सर्व गोष्टींमुळे त्याच्याबद्दल जनमानसात आदर निर्माण झाला होता. तो धार्मिक व नेमस्त वृत्तीचा तथापि कठोर होता. शूर लढवय्या, उत्तम सेनापती, श्रेष्ठ व कुशल प्रशासक असलेल्या विल्यमने इंग्लंकडला सुव्यवस्थित आणि शांततामय प्रशासन दिले.

संदर्भ : 1. Brooke, C. The Saxon and Norman King, New York, 1967.

            2. Brown, R. A. The Normans and the Norman Conquest, New York, 1970.

            3. Douglas, David C. William the Conqueror, London, 1969.

           4. Hollister, Charles Warren, Ed. The Impact of the Norman Conquest, New York, 1969.

गायकवाड, कृ. म.