प्रबोधनकाल : यूरोपच्या इतिहासाची स्थूलमानाने प्राचीन युग, मध्ययुग व आधुनिक युग अशा तीन कालखंडांत विभागणी करतात. ग्रीक आणि रोमन संस्कृतींचा कालखंड म्हणजे प्राचीन युग होय. यूरोपमध्ये रोमन बादशाह कॉन्स्टंटीन याने ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेतल्यापासून प्रबोधनकालापर्यंतचा म्हणजे तेराव्या शतकापर्यंतचाकालखंड हे मध्ययुग होय. आधुनिक युगाचा प्रारंभ चौदाव्या शतकापासून होतो. चौदावे शतक हा प्रबोधनकालाचा प्रारंभ आणि पंधरावे व सोळावे अशी दोन शतके प्रबोधनाचा उत्कर्षकाळ समजतात.

रिनेसन्स म्हणजे प्रबोधन. या फ्रेंच व इंग्लिश शब्दाचा व्युत्पत्यर्थ पुनर्जन्म किंवा नवजन्म असा आहे. पुनर्जन्म कशाचा? प्राचीन युगातील म्हणजे ग्रीक व रोमन काळातील ख्रिस्ती धर्माच्या उदयापूर्वीच्या संस्कृतीचा पुनर्जन्म आणि ती संस्कृती नव्याने स्वीकारलेल्या, त्या संस्कृतीच्या अध्ययनाने स्फूर्ती घेतलेल्या, बुद्धिमंत, प्रतिभाशाली, कर्तृत्ववान आणि परंपरागत ख्रिस्ती धर्मसंस्थेच्या म्हणजे चर्चच्या मानसिक बंधनातून मुक्त झालेल्या माणसांचा जन्म, असा याचा अर्थ होतो. परंतु इतिहासाची पुनरावृत्ती होत नसते. प्राचीन युगातील परिस्थिती निराळी होती. त्यानंतर सुमारे एक सहस्र वर्षांचा काळ लोटला होता भोवतालचे जग बदलले होते. म्हणून प्राचीन युगातील मानवी कर्तृत्वाकडे आकर्षिलेल्या या नव्या माणसांनी त्या युगाचे अनुकरण करीत जे जीवन घडविण्यास सुरुवात केली, ती प्राचीन युगाची प्रतिकृती नव्हती. अगदी काही नवेच घडू लागले. या प्रबोधनकालाची बीजे मध्ययुगात तयार होत होती. त्या मध्ययुगाचा प्रचंड वारसा जिवंत होता. म्हणून मध्ययुग व प्रबोधनकाल यांच्या सीमारेषा प्रथम अस्पष्ट राहिल्या होत्या. पुढे पंधराव्या व सोळाव्या शतकांत त्या स्पष्ट झाल्या.

या तीन शतकांच्या अवधीत आधुनिक संस्कृतीचा पाया घातला गेला. यूरोपातील सामान्य माणसांची संस्कृती या तीन शतकांमध्ये मध्ययुगीन धार्मिक ख्रिस्ती संस्कृतीच होती परंतु काही मोजक्या माणसांना मानवी जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी लाभली. ही माणसे विशेषतः इटलीमध्ये प्रथम उदयास आली. ही माणसे स्वतंत्र व्यक्ती म्हणजे जात, जमात, धर्म इत्यादींची सामाजिक गच्च बंधने शिथिल झालेल्या व व्यापकदृष्टी लाभलेल्या व्यक्ती म्हणून वावरू लागल्या. म्हणून प्रबोधनकालाच्या स्फूर्तीचे मुख्य केंद्र इटली हा देश ठरला. प्रबोधनाची स्फूर्ती केवळ इटलीपुरतीच मर्यादित राहिली नाही तिच्या प्रवाहांनी पंधराव्या व सोळाव्या शतकांत फ्रान्स, स्पेन, नेदर्लंड्स, जर्मनी व अखेर ब्रिटन या देशांनाही वेढले. माणसाच्या बुद्धीला, प्रतिमेला आणि वर्तनक्रमाला नवी दिशा दिली. विश्वाची आणि जीवनाची नवी रहस्ये उलगडण्याची प्रेरणा लाभली. प्रतिमेची, बुद्धीची आणि कृतीची एका विशिष्ट क्षेत्रात डांबून ठेवणारी जुनी बंधने नष्ट झाली. मानवी महिम्याचे, त्याच्या अपरंपार सर्जनशक्तीचे दर्शन झाले. कारण मनुष्य अनंत प्रसवशक्तीच्या निसर्गाच्या प्रत्यक्ष दर्शनात रमू लागला. त्यामुळे नवे काव्य, नवे नाटक, नवे साहित्य प्रकार, नवी रूपण कला, तंत्रविज्ञान, अभियांत्रिकी व नवे विज्ञान यांना अखंड बहर येऊ लागला. मानवी जीवन हे मुख्य मूल्य होय सर्व विश्वाचा, ‘अस्तित्वाचा मानदंड मनुष्य होय’, हा प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञ ⇨ प्रोटॅगोरसयाचा सिद्धांत पुन्हा आधुनिक मनुष्याचे अस्तित्वाकडे पाहण्याचे मूलतत्त्व ठरले. यालाच मानवतावाद म्हणतात. ⇨ मानवतावाद हा प्रबोधनकालाची आधारभूत विचारसरणी होय. याच काळात माणसाचा भोवतालच्या भौतिक विश्वाच्या सीमा विस्तारू लागल्या भूगोल कह्यात आला आकाशाच्या दिशा विस्तारू लागल्या.

या प्रबोधनाच्या उत्कर्षकाळात धाडसी दर्यावर्दी यूरोपीय लोकांनी दूरदूर पर्यटने करून पृथ्वीवरचे नवे नवे देश शोधण्यास सुरुवात केली. कोलंबसने अमेरिकेजवळील वेस्ट इंडीज बेटांना आपले जहाज नेले (१४९२). १४९७ मध्ये जॉन कॅबटला लॅब्रॅडॉरचा शोध लागला व तेथून तो अमेरिकेच्या विस्तृत खंडावर उतरला. वास्को द गामाने सागरमार्गाने आफ्रिकेला प्रदक्षिणा करून कालिकतचा किनारा (१४९७-९८) गाठला आणि भारत व यूरोप यांच्यातील दळणवळण करण्यास योग्यअशा सागरपथाचे उद्‌घाटन केले. ⇨ फर्डिनंड मॅगेलन (१४८०-१५२१) या पोर्तुगीज दर्यासारंगाने पहिली पृथ्वीप्रदक्षिणा (१५१९-२२) पुरी केली. प्रदक्षिणा करताना तो मारला गेला परंतु त्याचे जहाज स्पेनहून निघाले व पृथ्वीप्रदक्षिणा संपवून स्पेनला परतले. तेव्हापासून पृथ्वी वाटोळी आहे, हे माणसाला प्रत्यक्ष अनुभवाने निश्चित करता आले. नव्या देशातील, यूरोपीय मनुष्यांना अपरिचित अशा विलक्षण वनस्पती, फळे, फुले, झाडे, नवनवे प्राणी, देशोदेशींची जीवनाची उपकरणे-अवजारे, हत्यारांचे प्रकार यांचा संग्रह करून हे धाडसी लोक यूरोपचा किनारा परत गाठत. तरुण व म्हातारे स्त्री-पुरुष त्यांच्या स्वागतार्थ जमत व आश्चर्याने भारावून जात. पृथ्वीचा आकार, पृथ्वीवरची विविध प्रकारची अपार साधनसंपत्ती यांच्या दर्शनाने यूरोपीय माणसांचा अनुभव संपन्न होऊ लागला. त्याबरोबरच अनंत आकाशाचाही अंत मनुष्य पाहू लागला. सामान्य माणसांना जाणवेल असा आकाशातील ताऱ्यांच्या व्यूहातला बदल लक्षात आला. ट्यूको ब्राए या खगोलज्ञाला १५७२ मध्ये नवा तेजस्वी तारा आढळला. दुसरा असाच मोठा तारा याच शतकाच्या अखेरीस ⇨ योहानेस केप्लर या खगोलज्ञाला दिसला. खगोलाची परंपरागत मांडणी अमान्य होण्यासारखी परिस्थितीत उत्पन्न झाली. पोलिश खगोलज्ञ ⇨निकोलेअस कोपर्निकसने १५४३ मध्ये पृथ्वीकेंद्रित विश्वकल्पनेला धक्का दिला. ह्या कल्पनेला बायबलचा आधार होता. पृथ्वी, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनी इ. ग्रहमाला ही सूर्यकेंद्रित आहे, हा शोध त्याने प्रत्यक्ष अवलोकन व गणित यांच्या आधाराने सिद्ध केला. याच सुमारास देल्ला पॉर्ता (१५४०-१६०२) याने दुर्बिण निर्मिली. केप्लरने त्याची प्रशंसा केली. ⇨ गॅलिली गॅलिलीओने दुर्बिणीत सुधारणा केली. तिचा खगोलविज्ञानात उपयोग केला व सूक्ष्मदर्शकयंत्रही निर्मिले. माणसाच्या साध्या डोळ्यांनी जेवढे तारे आजपर्यंत दिसत होते, त्यापेक्षा दसपट तारे गगनमंडलात दुर्बिणीने प्रथमच दिसू लागले.कोपर्निकस व केप्लर यांनी सिद्ध केलेल्या खगोलज्ञानाला १६०० मध्ये गॅलिलीओने वैज्ञानिक पद्धती शोधून तिचा आधार दिला आणि तेव्हापासून भौतिक विज्ञान हे सरळ मार्गाने अखंड गतीने विकसित होऊ लागले.

नवीन नवीन साधने वा यंत्रे निर्माण करण्यातसुद्धा प्रगती होऊ लागली. चौदाव्या शतकात बंदुकीची दारू तयार करण्यात यश आले. मानवी शिक्षणाचे एक श्रेष्ठ साधन म्हणजे पुस्तके भराभर छापणारा छापखाना होय. ⇨ योहान गूटेनबेर्क (१३९८?-१४६८) या तंत्रज्ञ कारागीराने १४४० मध्ये नव्या प्रकारचा छापखाना शोधून काढला. चिंध्यांपासून कागद बनू लागला. इटलीमध्ये १४५१ पासून व्हेनिस इ. शहरांमध्ये हे भराभर छापणारे छापखाने उभारले जाऊ लागले. या छापखान्यांनी पंधराव्या शतकात सु. दोन कोटी पुस्तके छापली. भराभर छापणारा छापखाना ही प्रबोधनकालाची माणसाला मिळालेली श्रेष्ठ देणगी होय. बौद्धिक लोकशाहीची स्थापना छापखान्याने केली. ⇨ डेसिडीअरिअस इरॅस्मसचा मित्र योहेनस फ्रोबीनियस (१४६०-१५२७) याने स्वित्झर्लंडमध्ये छापखाना काढून प्रमाणित ग्रंथांच्या सुंदर आवृत्त्या छापल्या. हिपॉक्राटीझचा वैद्यकावरील फ्रोबीनियसने छापलेला ग्रंथ अत्यंत सुंदर छपाईसाठी प्रशंसिला गेला.


मानवतावादी आंदोलनाचा आरंभ म्हणजेच प्रबोधनाचा उषःकाल होय. मानव्यविद्यांचे शिक्षण धार्मिक व्यवसाय न करणाऱ्या शासकीय, औद्योगिक, न्यायालयीन, वैद्यकीय व अन्य प्रकारच्या धंद्यांतील माणसांना मिळावे म्हणून प्रयत्‍न सुरू झाले. समाजाच्या जीवनाची धार्मिक बैठक तयार करून ठेवणाऱ्या ख्रिस्ती गुरूंच्या शिक्षणाच्या चौकटीत न बसणारा हा मानव्यविद्यांचा शिक्षणक्रम ठरविला गेला. ऐहिक जीवन जगणाऱ्या सामान्य माणसाच्या मानव्याचा योग्य विकास करण्यास आवश्यक व माणसाच्या ऐहिक जीवनमूल्यांवर भर देणाराअसा शिक्षणाचा कार्यक्रम अंमलात आणणे, हे या आंदोलानाच्या पहिल्या पर्वाचे वैशिष्ट्य होय. माणूस शिक्षणानेच पाशवी अवस्थेतून वर येतो व त्याचे वास्तव स्वरूप प्रकट होते, हा प्रबोधनीय मानवतावादाचा प्रास्ताविक विचार होय. हा विचार ग्रीक व रोमन जगापासून मिळाला. मानवतावादी तत्त्वज्ञान या पर्वात आकार घेऊ लागले. या शिक्षणक्रमातील मानव्यविद्या म्हणजे ख्रिस्तपूर्व प्राचीन युगातील साहित्य व कला होत. प्राचीन युगातील ग्रीक व लॅटिन या भाषांमधील अधिक प्रमाणात उपलब्ध होऊ लागलेली प्रमाणित ग्रंथसंपत्ती, ⇨ होमर आणि ⇨ व्हर्जिल यांची महाकाव्ये, ग्रीक नाटके, ⇨ टलिअस सिसरो, सेनीका इत्यादिकांची भाषणे, अभिव्यक्तिसंपन्न आणि वक्तृत्वपूर्ण बोधवाङ्‌मय व ललित साहित्य, चित्र, मूर्ती, मंदिर, अनेक प्रकारचे स्थापत्य इ. रूपण कला, संगीत, नीतिशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास इत्यादिकांचा या शिक्षणक्रमात आवर्जून अंतर्भाव केला. माणसाचे जग उभारणाऱ्या मानवी कृतींना आणि त्या कृतींच्या द्वारे प्रत्ययास येणाऱ्या निसर्गाला महत्त्व दिले.

चर्चचे वर्चस्व क्षीण होण्याचा हा काळ होता कारण चर्चमध्ये अवनतीची कुलक्षणे दिसू लागली होती. चर्चसंस्थेची फुटीरपणाने व भांडाभांडीने वाताहत होऊ लागली होती व समाजातील विचारवंत व प्रतिष्ठित जनांच्या मनात त्यांच्या अप्रामाणिक व भ्रष्टाचारी जीवनाची शिसारी उत्पन्न होऊ लागली होती. धर्मगुरूंची जीवनपद्धती वैराग्यसिद्धांताच्या विरुद्ध होती. संपत्तीच्या लोभाने त्यांची मने दूषित झाली होती. मोठमोठी इनामे, जमीनदाऱ्या मिळविण्याच्या व राबवण्याच्या खटाटोपात त्यांचे पारमार्थिक जीवन दूषित झाले होते. दानधर्माची लालसा अनिर्बंध रीतीने सामान्य जनांची फसवणूक करण्यात गर्क होती. देव व ख्रिस्तमाता यांच्या नावाने आज्ञापत्रे काढून सामान्य जनांची आर्थिक पिळवणूक सतत चालू होती धर्मपीठाचा वारसाहक्क मिळविण्याकरिता वरिष्ठ धर्मगुरूंनी भरविलेल्या धार्मिक संमेलनांमध्ये निरनिराळे मठपती जेव्हा जमत, तेव्हा प्रत्येकजण स्वतःची खाण्यापिण्याची तरतूद स्वतःच्याच देखरेखीखाली करीत असे वा आपली शिदोरी जवळ बाळगत असे. धर्मपीठाचा वारसा मिळविण्यासाठी कोणीतरी विषप्रयोग करील अशी शंका मनात घर करून बसली होती. गुप्त रीतीने खूनही पडत. सामान्य जनांना फसविण्याचे अनेक मार्ग योजले जात. त्यात चर्चच्या प्रार्थनांच्या चमत्कारांच्या अद्‌भुत रसभरित कथाही सांगण्यात येत असत. स्वतंत्र विचारांना बंदी होती. बायबलमधील चमत्कार खोटे आहेत, येशू ख्रिस्त देव नव्हता, चर्च, पोप व अन्य धर्मगुरू ढोंगी आहेत, प्रभुभोजनात ख्रिस्ताचा देह नसतो, मृत्यूबरोबर आत्माही मरतो असे प्रतिपादन करणारा विचारवंत किंवा नागरिक देहान्त शिक्षेस पात्र होत असे.

इटलीमध्ये पोपचे वर्चस्व आपापसातल्या फाटाफुटीमुळे क्षीण झाले होते. लहानलहान चाळीस-पन्नास राज्ये व घटक राज्ये यांमध्ये इटलीचे तुकडे झाले होते. पवित्र रोमन साम्राज्याचा अंत झाल्यामुळे इटलीची राजकीय विभागणी अनेक राज्यांमध्ये झाली होती. सरंजामशाह जाऊन स्वतंत्र व्यापारी श्रीमंतवर्गाची विशेषतः दर्यावर्दी व्यापार करणाऱ्या व्यापारी पेठांची भरभराट होऊ लागली. त्यांचा राजकीय, धार्मिक व सामाजिक जीवनावर प्रभाव पडू लागला होता. या सामाजिक पार्श्वभूमीवर नवशिक्षित मंत्री व दिवाण, सत्ताधारी, अमीर-उमराव, राजपुत्र, कलाकार, कवी, उत्तम कारागीर असे तरुण व मध्यमवयीन अशा बुद्धिवंतांचा व प्रज्ञावंतांचा संख्येने लहान पण गुणवत्तेने श्रेष्ठ असा लहानसा वर्ग उदयास आला. या स्वतंत्र व्यक्ती होत्या. काही चर्च, धर्ममठ, नगरराज्ये व गणराज्ये यांच्या आश्रयाने निरनिराळ्या पदांवर काम करणाऱ्या आणि काही निरनिराळ्या विद्यापीठांमध्ये अध्ययन व अध्यापन करणाऱ्या व्यक्ती होत्या. याव्यक्तींची विचारपद्धती एक नव्हती पण दिशा मानवकेंद्रित होती. या विद्यापीठांपैकी फ्लॉरेन्समधील ‘प्लेटॉनिक अकादमी’ ही प्लेटोच्या अध्ययनाचे मुख्य केंद्र बनली.

चौदाव्या शतकात प्रबोधनाचा प्रथम प्रतिनिधी व प्रबोधनाचा पिता ⇨ पीत्रार्क (१३०४-७४) जन्मला. तोपर्यंत सामान्य लोकांची बोलभाषा उपेक्षित राहिली होती. त्याला अपवाद म्हणजे ⇨आलिग्येअरी दान्ते (१२६५-१३२१). याने इटालियन भाषेला साहित्याचा आकार देण्याचा उपक्रम केला. हा महाकवी होता.⇨ दिव्हीना कोम्मेदीआ (इं. शी. डिव्हाइन कॉमेडी) हे महाकाव्य ऐहिक मानवी अनुभवांना आणि भावनांना उत्कट व समर्पक आकार देण्यात अत्यंत यशस्वी झाले. ऐहिक इंद्रियजन्य अनुभवांच्या प्रतीकांच्या द्वारेच दान्ते याने ख्रिस्ती धर्माचे त्रैलोक्य चित्रित केले. धार्मिक वेशात ऐहिक अनुभव उभा केला ⇨जोव्हान्नी बोकाचीओ (१३१३-७५) हा पीत्रार्कचा समकालीन होय. इटालियन भाषेला साहित्याचे सुरेख रूप देणारा हा कथालेखक होता. जोव्हान्नी बोकाचीओने मनुष्याचे भोगप्रधान जीवन आणि त्या जीवनाची आसक्ती असलेल्या पण ती आसक्ती लपविणाऱ्या धार्मिकांचा दंभ उघडकीस आणला. पीत्रार्क हा मानवाच्या अंतरंगाचे म्हणजे रागद्वेष, आशानिराशा इ. द्वंद्वात्मक अनुभूतीचे वा वैचारिक चिंतन व भावासक्ती यांच्या द्वंद्वाचे काव्याच्या वा प्रसन्न संवादांच्या रूपाने व अन्य साहित्य प्रकारांनी आविष्करण करून त्याच्या समकालीनांमध्ये श्रेष्ठ ठरला. जनभाषेची उत्कृष्ट गद्यशैली त्याने निर्मिली. तो आधुनिक सुनीतांचा पहिला प्रतिभावंत कवी ठरला, तो तत्त्वज्ञ होता परंतु त्याच्या तत्त्वज्ञानात भौतिक विश्वाचा अर्थ शोधण्यापेक्षा माणसाच्या भौतिक जीवनावर भर होता. जगण्याची कला म्हणजेच नैतिक जीवन, असे तो मानत होता. ॲरिस्टॉटलपेक्षा त्याने ⇨ प्लेटोला अधिक मान्यता दिली. मध्ययुगात ⇨ ॲरिस्टॉटलज्या स्वरूपात तत्त्ववेत्त्यांनी मांडला तो ॲरिस्टॉटल खरा नव्हे, असे त्याचे मत होते. ॲरिस्टॉटलचे ⇨तत्त्वमीमांसाव भौतिकी त्याला अमान्य होती. सबंध यूरोपभर त्याची ख्याती झाली. त्याच्यानंतर झालेल्या पश्चिम यूरोपातील व जर्मनीतील महाकवींवरही त्याची छाप पडली. रोमनकालीन लॅटिनमधील ग्रंथसंपत्ती जी यूरोपातील अनेक धार्मिक मठांमध्ये धूळ खात पडली होती, ती साफ झटकून तुलनात्मक अध्ययनार्थ संशोधित आवृत्त्या त्याने काढल्या. लॅटिनचे व्याकरण आणि कोष यांचा आधार घेऊन चांगली भाषांतरे, विवरणे, टीका, जुन्या जगातील वक्त्यांची व्याख्याने, पत्रव्यवहार, ऐतिहासिक, व्याकरणविषयक आणि वक्तृत्वविषयक ग्रंथ यांचे संपादन मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात पीत्रार्कने पुढाकार घेतला. ही लॅटिनमधील साहित्यसंपत्ती मध्ययुगीन पंडितांना फारशी माहीत नव्हती. त्यामुळेच मध्ययुगीन वातावरणात रमलेल्या मठस्थ पुरोहितांकडून ही संपत्ती हस्तगत करण्यास मदत होऊ शकली नाही. १४५३ मध्ये कॉन्स्टँटिनोपल तुर्कांच्या सत्तेखाली आले. तोपर्यंत कॉन्स्टँटिनोपल हे ग्रीक पंडितांचे विद्यापीठच बनले होते. तुर्कांच्या हाती कॉन्स्टँटिनोपल पडल्यामुळे ग्रीक पंडितांनी ते शहर सोडले व ते भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावरील देशांमध्ये पसरले. विशेषतः इटलीतील फ्लॉरेन्स, पॅड्युआ, व्हेनिस, मिलान, नेपल्स, ऊर्बीनो, फेरारा, मँट्युओ, रोम इ. शहरांतील गणराज्यांत किंवा नगरराज्यांमध्ये त्यांचे स्वागत झाले. त्यांना आश्रय मिळाला. प्लेटो, ॲरिस्टॉटल, ⇨प्लोटायनस इत्यादिकांचा प्रभाव ⇨सेंट ऑगस्टीनपासून⇨टॉमस अक्वाय्‌नपर्यंतच्या मध्ययुगीन ख्रिस्ती धर्मावर आणि धार्मिक तत्त्वज्ञानावर खोलपणाने पडला होता ऑगस्टीनने प्लेटोच्या विचारांशी ख्रिस्ती विचारांची सांगड घातली टॉमस अक्वाय्‌नसने ॲरिस्टॉलशी ख्रिस्ती विचारांचा सांधा साधला. परंतु प्लेटो व ॲरिस्टॉटल यांचे मूळ ग्रंथ वाचनातून व अध्ययनातून नाहीसे झाले होते, होमरसारखे महाकवी व ग्रीक नाटककार यांचा तर पत्ताच नव्हता. पीत्रार्कच्या नेतृत्त्वाखाली या ग्रीक पंडितांच्या मौलिक ज्ञानाचा पुरेपूर उपयोग करण्यास सुरुवात झाली. प्रथम इटालियन सुशिक्षितांना उत्तम प्रकारे अभ्यासिलेल्या ग्रीक वाङ्‌मयाची आणि शास्त्रीय व तत्त्वज्ञानात्मक ग्रंथांची भाषांतरे होऊ लागली आणि व्हेनिस इ. नगरांमध्ये वेगाने छापणारे छापखाने ही भाषांतरे आणि त्यावरील विवरणे छापून देऊ लागले. त्यामुळे तात्त्विक विचाराला, धर्मचिंतनाला नव्या प्रेरणा मिळू लागल्या. त्यामुळे इटालियन जनभाषेची प्रकृती बदलली तिचे अंतरंग पालटले जनभाषेच्या रूपात विश्वाचा वेध घेणारी मानवी प्रज्ञा आकारास आली.


इटालियन प्रबोधनातील तात्त्चिक विचारांचे तीन प्रवाहांमध्ये वर्गीकरण करता येते : मानवतावाद, प्लेटोची मानवतावादाशी संवादी अशी नवी मांडणी आणि ॲरिस्टॉटलच्या विचारांची अधिक संशोधनपूर्वक केलेली विज्ञानपोषक मांडणी. प्लेटो व ॲरिस्टॉटल यांची विचारसरणी मानवतावादाशी सुसंगत अशाच रीतीने यात समर्थित झाली.

पीत्रार्क आणि ⇨लोरेंत्सो व्हाल्ला (१४०६-५७) याने धार्मिक मानवतावादाचा पुरस्कार केला आणि चर्चचे वैचारिक अधिपत्य नाकारले. मुख्यतः ऐहिक जीवनातील पापमयतेबद्दल घृणा व पश्चाताप, मृत्यूनंतरच्या पारलौकिक जीवनाबद्दलची चिंता व मुक्तीची ओढ यांनी भरलेला, मानवी बुद्धिबद्दल व विचारशक्तीबद्दल अविश्वास व्यक्त करणारा अतएव वैराग्यप्रधान, ऐहिक जीवनाकडे पाठ फिरविलेला आणि चर्च व धर्मगुरूंच्या संस्थेने परिष्कृत केलेला ख्रिस्ती धर्मच मध्ययुगीन यूरोपीय समाजावर अधिराज्य गाजवत होता. या अधिराज्याची पकड धार्मिक मानवतावादाने क्रमाक्रमाने ढिली केली. सेंट ऑगस्टीन ते टॉमस अक्वाय्‌नसपर्यंत झालेल्या मध्ययुगीन अनेक ख्रिस्ती साधूंनी व विचारवंतांनी प्रकटित शास्त्रावरील श्रद्धा आणि मानवी बुद्धीचे स्वातंत्र्य यांचा मेळ बसवून मानवी बुद्धीला प्रकटित शास्त्राची मर्यादा अनुल्लंघनीय आहे, ही गोष्ट सिद्ध केली. परंतु सेंट ऑगस्टीन व टॉमस अक्वाय्‌नस या दोघांची तुलना करता असे आढळून येते, की मानवी बुद्धी ही पापदूषित, ढगाळलेली व पूर्ण असमर्थ आहे, असे ऑगस्टीनने प्रस्थापित केले. त्याच्या उलट टॉमस अक्वाय्‌नसने असा सिद्धांत प्रतिपादिला, की मानवी बुद्धिचे एक व धर्मश्रद्धेचे दुसरे अशी विभिन्न क्षेत्रे असून मानवी बुद्धि पारलौकिक मानवी हिताच्या क्षेत्रात धर्मशास्त्राचे शब्दप्रामाण्य मानून निर्णय घेऊ शकते. ऐहिक वास्तव विश्व व जीवन यांच्याबद्दल मानवी बुद्धीला स्वातंत्र्य आहे. सेंट ऑगस्टीनच्या मते मानवी बुद्धीने सामर्थ्य गमावले, ते आदिमाता-पित्यांच्या पतनामुळे. मानवी बुद्धी मांसविकारमय ऐहिक जीवनात भौतिक विश्वात गुंतल्यामुळे तिचे सत्यदर्शनाचे सामर्थ्य लोपले. श्रद्धेच्या आधारानेच ईश्वरास शरण जाऊन बुद्धीत ईश्वराचा प्रकाश प्रतिबिंबित होऊ शकतो. ख्रिस्ती धर्माच्या तत्त्वज्ञानाची मांडणी ऑगस्टीनने प्लेटो व प्लोटायनस यांच्याशी बायबलमधील विचारांची सांगड घालून केली. उलट टॉमस अक्वाय्‌नसने ॲरिस्टॉटलचा आश्रय घेऊन मानवी बुद्धीला जास्तीतजास्त अवसर देण्याचा प्रयत्‍न केला. पीत्रार्क आणि व्हाल्ला यांनी चर्च व धर्मगुरू यांचा अंतिम निर्णयाचा हक्क नाकारला आणि त्याबरोबर मध्ययुगीन धार्मिक तत्त्वज्ञानालाही बगल दिली. [⟶ मानवतावाद].

मानवतावादाच्या प्रभावाखाली प्लेटोच्या विचारांना निराळा आकार देऊन जोव्हानी देल्ला मिरांदोला पीको (१४६३-९४) व मार्सील्या फिचीनो (१४३३-९३) यांनी ख्रिस्ती धर्माच्या तत्त्वज्ञानाची मांडणी केली. ख्रिस्ती देवविद्या, प्लेटोचे तत्त्वज्ञान आणि मानवी ऐहिक मूल्ये यांचा समन्वय यांनी केला. प्लेटोचे बुद्धिगम्य शाश्वत व मंगलमयसत्य आणि मनुष्याच्या मनातील आदर्शाची ओढ यांचा अतूट संबंध त्यांना दिसला. कलापूर्ण जीवनाचे समर्थन या अतूट संबंधातून मिळाले. ख्रिस्ती धर्मातील ऐहिक जीवनाची पापमूलकता आणि पापमयता त्यामुळे नाकारता आली. या आदर्शाच्या ओढीच्या सिद्धांताचाच उपसिद्धांत म्हणजे मानवी स्वातंत्र्य होय. स्वातंत्र्याचा विस्तार व विकास करण्याची बौद्धिक शक्ती ईश्वरापासून माणसाला मिळाला आहे, असा विचार पीकोने ओरेशन ऑन द डिग्निटी ऑफ मॅन या मानवाच्या महिम्यावरील प्रवचनात मांडला.प्लेटो व ॲरिस्टॉटल या दोन्ही परंपरेतील निष्कर्ष सुसंगत आहे, या मुद्याची मांडणी याने केली. तो म्हणतो – ”आदमला देव म्हणतो, माणसा, तुला निश्चित असे स्थान, तुलाच उचित असा आकार किंवा विशिष्ट दायभाग मी दिलेला नाही. त्यामुळे तुला पाहिजे ते स्थान, पाहिजे तो आकार, पाहिजे त्या देणग्या तुझ्या इच्छेप्रमाणे आणि निर्णयाप्रमाणे मिळू शकतात. उलट विश्वातील सर्व वस्तू आणि प्राणी यांना ठराविक निश्चित स्वभावधर्म प्राप्त झालेला आहे आणि त्यांना अगदी निश्चित नियमांच्या बंधनानुसारच राहवे लागते. तुलाच केवळ मर्यादा नाहीत. तुझ्या इच्छेप्रमाणे तू स्वतःला बंधन घातले तरच बंधन आहे. ही अशी स्वतंत्र इच्छा मी तुला दिली आहे. विश्वाच्या केंद्रस्थानी मी तुला स्थापिले आहे. त्यामुळे भोवताली कष्टाशिवाय तू नजर सहज टाकू शकतोस आणि इष्ट ते सर्व बघू शकतोस. तुला मी दिव्यरूपात वा पार्थिवरूपात निर्मिले नाही. मर्त्य किंवा अमर बनविले नाही. त्यामुळे तुला पाहिजे त्या स्वरूपात स्वतःची निर्मिती करून आणि वाटेल तो आकार धारण करून तुझे स्वामित्व प्रस्थापित करू शकतो. तू स्वतःला पशुत्वापर्यंत अवनत करू शकतो किंवा दिव्य स्वरूपापर्यंत पोहोचू शकतो. आकाशस्थ पित्याने माणसाला जन्मापासूनच जीवनाचा कोणताही आकार निर्मिण्याला योग्य अशी बीजे प्रदान केली आहेत. तो जी बीजे जपून वाढवितो त्या बीजांप्रमाणे फळे येतात. ती वनस्पतींची बीजे असतील, तर तो वनस्पतींसारखा स्वस्थानीच कायम रुतून राहील. इंद्रियसंवेदनांची बीजे वाढविली, तर पशू बनेल. विवेकबुद्धीची मशागत केली, दिव्य जीवन जगणारे दैवत बनेल आणि प्रज्ञेची बीजे पोसली, तर देवदूत किंवा देवपुत्र बनेल”.

द सिव्हिलायझेशन ऑफ रिनेसन्स इन इटलीया आपल्या प्रबोधनाच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट ग्रंथात ⇨ याकॉप बुर्कहार्ट म्हणतो, की पीकोचे हे प्रवचन प्रबोधनाच्या संस्कृतीने ज्या अत्यंत उदार अशा देणग्या दिल्या, त्यांतील एक आहे. या प्रवचनात प्रबोधनाचे सर्व सार आणि संपूर्ण ज्ञानसंकल्पना गर्भित आहे. प्रबोधनात मनुष्य ऐहिक जीवनाशी अभिमुख झाला आहे.

पोंपोनाझी प्येअत्रो (१४६२-१५२५) हा ॲरिस्टॉटलचा पुरस्कर्ता होता. माणसाला उच्च जीवनमूल्ये किंवा आदर्श तत्त्वे यांचा बुद्धीने स्वतंत्रपणे साक्षात्कार होत नाही कारण त्याची बुद्धी व ज्ञान इंद्रियाधीन आहे. आत्मा अमर आहे, हा केवळ श्रद्धेय सिद्धांत आहे. अमर आत्माचे अस्तित्व सिद्ध करण्यास बुद्धीपाशी निश्चित पुरावा नाही. नैतिक जीवनाचे मृत्यूनंतरचे फलित निश्चित करण्याकरिता अनेकांनी आत्म्याचे अमरत्व स्वीकारले आहे परंतु ऐहिक नैतिक जीवन हेच मानवाचे श्रेय व कृतार्थता आहे. सद्‌गुणाचे इष्ट फळ सद्‌गुणच होय आणि दुर्गुणाचे अनिष्ट फळ दुर्गुणच होय.

ॲरिस्टॉटलप्रेरित निसर्गवादावर आधारलेली मानवतावादी विचारसरणी धार्मिक मानवतावादानंतर पुढे आली. ही विचारसरणी लोरेंत्सो व्हाल्ला याने पुढे मांडली. त्याने मानवी इच्छा स्वातंत्र्याचा सिद्धांत भरपूर युक्तिवादाने सिद्ध केला. ईश्वर हा सर्वज्ञ-सर्वशक्तिमान आहे, जगात जे जे घडले, घडत आहे व घडणार आहे त्या सर्वांचेईश्वराला ज्ञान आहे, त्या ज्ञानाला कालाची मर्यादा नाही, हा ख्रिस्ती धर्माचा सिद्धांत व मानवाच्या इच्छा स्वातंत्र्याचा सिद्धांत यांच्यातला तार्किक विरोध अमान्य करता येत नाही हे जरी खरे असले, तरी इच्छा स्वातंत्र्य हे अनुभवसिद्ध आहे आणि ते मानले नाही, तर मानवाच्या सर्जनशीलतेचा अर्थ करता येत नाही आणि वर्तनाबद्दल त्याला जबाबदार धरता येणार नाही. त्याच्या इच्छेचा विषय सुख हा आहे. सुख हे अंतिम नैतिक मूल्य आहे. ज्या नियमांनी नगरांचे जीवन नियमित करावे लागते, ते नियम नगरांना अधिक सुख मिळावे म्हणूनच केलेले असतात. न्यायतत्त्व, काव्य, कला इत्यादिकांचे मूल्य सुख हेच आहे. जीवनाच्या गरजा पुरविणे हेच त्यांचे उद्दिष्ट आहे. धार्मिक वैराग्यवाद हा सामान्य मनुष्याचा जीवनाचा मार्ग नव्हे. ख्रिस्ताच्या जीवनाचा आदर्श हा वैराग्यवादी धर्मगुरूंपुरता मर्यादित नाही. तो सर्व मानवांना लाभदायक आहे. ॲरिस्टॉटलची तत्त्वमीमांसा आणि भौतिकी यांच्यापेक्षा ॲरिस्टॉटलच्या नीतिशास्त्रालाच प्रबोधनकालातील विचारवंतांनी अधिक महत्त्व दिले. ॲरिस्टॉटलचे तत्त्वमीमांसा आणि भौतिकी यांचे अध्ययन चालू होते. बुद्धिगम्य वस्तुतत्त्वे व इंद्रियगम्य भौतिकी पदार्थ यांची अभेद्यता ॲरिस्टॉटलने प्रतिपादिली. त्यांतून वास्तवविश्वाला नवे नवे आकार देणारे प्रबोधनकालीन कलाकार व वैज्ञानिक यांनी प्रत्यक्ष अनुभवांच्या आधारे गणित व तर्क यांच्या साहाय्याने विश्वाचे ज्ञान होते वैज्ञानिक विचारांची व कलांची निर्मिती करणारी एकच मानवी प्रज्ञा आहे, अशी विचारसरणी प्रबोधनकालात प्रस्थापित केली.


तोम्मोझो कांपानेल्ला (१५६८-१६३९) याने पंधराव्या शतकातील जर्मन तत्त्वज्ञानी निकोलेअस क्यूसेनस (१४०१-६४) याच्या तत्त्वज्ञानाच्या प्रभावाखाली तत्त्वमीमांसा व ज्ञानमीमांसा सांगितली. वयाच्या सोळाव्या वर्षी तो इटली येथील पॅड्युआ विद्यापीठामध्ये ग्रीक तत्त्वज्ञानाच्या अध्ययनार्थ गेला. तेथील प्रबोधनाची प्रेरणा त्याने आत्मसात केली. सर्वधर्मसमन्वयवादी तत्त्वज्ञानाची मांडणी याने प्रथम केली. ख्रिस्ती व इस्लाम धर्म यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्‍न केला व त्याने आपले नवे तत्त्वज्ञान अनेक निबंधांच्या स्वरूपात मांडले. त्याचा प्रभाव प्रबोधनकालातील ⇨ लिओनार्दो दा व्हींची (१४५२-१५१९), ⇨ जोर्दानो ब्रूनो (१५४८-१६००) इ. इटालियन तत्त्वचिंतकांवरही पडल्याशिवाय राहिला नाही. माणूस, निसर्ग आणि ईश्वर यांच्या संबंधाची क्यूसेनसची मीमांसा प्रबोधनकालातील इहवादाला अत्यंत पोषक आणि स्फूर्तिदायक ठरली. निसर्ग व माणूस हे ईश्वरी दिव्य शक्तीचेच आविष्कार होत, हा मूळ सिद्धांत क्यूसेनसने मांडला. बायबलमधील माणसाच्या पापमय जीवनाची मीमांसा मध्ययुगीन ख्रिस्ती विचाराचा पाया होता हा पाया प्रबोधनकालात ढासळला. त्यास क्यूसेनसचेही योगदान कारण झाले. ईश्वराने माणूस स्वतःची प्रतिमा म्हणून निर्मिला या सिद्धांताला महत्त्व आले. त्याचा उत्कृष्ट परिष्कार प्रबोधनकालातील क्यूसेनसने व अन्य विचारवंतांच्या धार्मिक मानवतावादाने केला. क्यूसेनस म्हणतो, ‘की ईश्वरी चैतन्य मानवी बुद्धीच्या रूपाने मानवात वास करीत आहे. मानवाची सर्जनशक्ती ही ईश्वरी शक्तीच आहे. ईश्वराचे निर्माणस्वातंत्र्य मानवामध्ये या शक्तीच्या रूपाने प्रकट झाले आहे, ईश्वर हा सर्व तंत्र स्वतंत्र असा कलाकार आहे. त्याची प्रतिमाच माणूस. म्हणून माणूस हा स्वतःच्या विश्वाचा म्हणजे संस्कृतीचा मुक्त कलाकार बनला’.

बायबल हे ईश्वराने प्रकटित केलेले शास्त्र आहे, म्हणून बायबलमधील सत्य हे अंतिम सत्य मानले पाहिजे, हा मध्ययुगीन विचार क्यूसेनसने मर्यादित अर्थानेच मान्य केला. क्यूसेनसच्या सांगण्याप्रमाणे देवाने केलेली दोन प्रकटने : एक बायबल व दुसरे निसर्ग. निसर्ग हे ईश्वराचे मुख्य पवित्र पुस्तक होय निसर्ग ईश्वराची सातत्याने सुरूअसलेली कृती आहे व बायबल ही जुनी, एका विशिष्ट काळातील मर्यादित उक्ती आहे. उक्तीचे अनेक अर्थ व विरुद्धही अर्थ होऊ शकतात, तसे प्रत्यक्ष कृतीचे नसते. उक्तीच्या द्वारे अर्थ व्यक्त होतो, तर कृती हा प्रत्यक्ष दिसणारा अर्थ असतो. म्हणून विश्वाचा अर्थ समजून घेणे म्हणजेच ईश्वरी अबाधित सत्याचे ज्ञान करून घेणे होय. अशा रीतीने मानवाच्या ऐहिक जीवनाचे धार्मिक प्रवित्र मूल्य प्रबोधनयुगात स्वीकारले गेले.

मानव हा ईश्वराची प्रतिमा असल्यामुळे ईश्वराचे सृष्टिनिर्मितीचे कर्तृत्व मानवातही उतरले आहे. ईश्वराच्या ज्ञानात जसे सर्व अनंत विश्व सामावले आहे, तसे ते मानवाच्या बुद्धीतही सामावले आहे. मानवी पिण्डात ब्रह्मांडाची सर्व तत्त्वे उतरली आहेत. माणसाच्या बुद्धीला गणिताच्या द्वारे विश्वाचे आकलन निश्चितपणे होते. या बुद्धीच्या द्वारे मनुष्याने आपले सांस्कृतिक विश्व निर्मिले आहे. ब्रह्मांड अनंत आहे त्या अनंताचे आकलन मानवी बुद्धी करते.

मध्ययुगातील अखेरचा प्रज्ञावंत महाकवी दान्ते याने मानवी जीवनातील कल्याण व अकल्याण उत्कर्ष व अपकर्ष वैभव व अकिंचनता हे सर्व दैवगतीच नियंत्रित करते, असे गृहीत धरले आहे. प्रबोधनकालात मानव हा देवाची प्रतिमा होय, या कल्पनेला महत्त्व आल्यामुळे आणि अनंताचा वेध घेण्याची त्याची शक्ती सिद्ध झाल्यामुळे मानवी भवितव्याचा कारागीर मानवच ठरला. ही गोष्ट प्रथम पीकोने सुप्रसिद्ध वक्तृत्वपूर्ण भाषणात सुरेख रीतीने मांडली आहे. याचाच मागोवा घेत ब्रूनोने दैवगती नव्हे तर मानवी शौर्यच मानवी भवितव्य घडविते, हा सिद्धांत स्थापित केला. ब्रूनोने ग्रीक कथेच्या वेषात हा सिद्धांत मांडला : “ देवाधिदेव झ्यूसच्या समोर दैवगती उभी राहते आणि तेथे जमलेल्या ऑलिंपियन देवगणांच्या सभेत झ्यूसला विनविते, की या स्वर्गीय सभेमध्ये महावीर हर्क्यूलीझला जे स्थान आहे ते मला मिळावे. तेव्हा देवाधिदेव तिला सांगतो की, ‘नाही. या देवसभेत तू कोठेही इतरत्र बैस, कोणतेही स्थान पाहिजे तेव्हा तुला मिळेल तू तशी चंचलच आहेस परंतु हर्क्यूलीझचे स्थान मिळणार नाही’. हर्क्यूलीझचे स्थान आता शौर्याला दिले आहे. सत्य, नियमबद्धता आणि न्याय यांचे शासन चालायचे ता शौर्य हे उपस्थितच पाहिजे. प्रत्येक सद्‌गुणाचा आधार, न्यायाची ढाल आणि सत्याचे उत्तुंग शिखर म्हणजे शौर्य होय. दुर्गुणांपुढे शौर्य वाकत नसते. दुःख आणि व्यथा शौर्याला जिंकू शकत नाहीत. शौर्याची यात्रा नेहमी धोक्यातूनच सुरू असते. भोगवासनेला शौर्यापुढे वाकावे लागते. संपत्तीची शौर्याला पर्वा नसते. दैवगतीला कब्जात आणण्याचे कार्य शौर्य करीत असते ”. ब्रूनो हा प्रबोधन-तत्त्वज्ञानाची जीवनाकडे पाहण्याची मूलभूत प्रवृत्ती स्पष्टपणे मांडणारा हुतात्मा वीर पुरुष होय. त्याने प्रबोधनकालातील माणसाचा आत्मविश्वास दृढ केला परंतु दैवगती आणि शौर्य यांच्यासंबंधी ⇨नीक्कोलो मॅकिआव्हेली (१४६९-१५२७) याने ब्रूनोपेक्षा अधिक समतोल मांडणी केली आहे. त्याच्या मते माणसांच्या पन्नास टक्के कृतींवर दैवगतीचे नियंत्रण असते परंतु जो दृढतेने प्रयत्‍नशील होतो, तोच अविश्रांत रीतीने खंड पडू न देता साहसाने दैवगतीवर ताबा मिळवितो. ⇨लेओन बात्तीस्ता आल्बेर्ती (१४०४-७२) म्हणतो, की जो तरुणपटू मनुष्य आपल्या सामर्थ्यावर विश्वासून नदीच्या पुरातून मार्ग काढतो, त्याला दैवगती खेचून नेऊ शकत नाही. प्रबोधनकालातील मुत्सद्दी व कर्तृत्ववान अशा माणसांची भावना यात व्यक्त होते परंतु तत्त्वचिंतकही या भावनेचे भागीदार झालेले दिसतात. देला मिरांदोला पीको हीच भावना अधिक मुक्त व धाडसी उद्‌गाराने व्यक्त करतो – ‘मानवी मनाचे चमत्कार स्वर्गीय चमत्कारापेक्षा मोठे आहेत. या भूपृष्ठावर माणसापेक्षा श्रेष्ठ काही नाही. माणसाचे मन व माणसाचा आत्मा याशिवाय जगात काही श्रेष्ठ नाही. तुम्ही मनव आत्मा यांच्यापर्यंत पोहचाल तेव्हा तुम्हाला आढळेल, की तुम्ही स्वर्गाच्याहीवर जाऊन पोहोचला आहात.’

निकोलेअस क्यूसेनस, मार्सील्या फिचीनो आणि प्रबोधनकालातील धार्मिक मानवतावादाचे शिखर गाठलेला डेसिडीअरिअस इरॅस्मस यांनी सर्वधर्मसमभाव किंवा सर्वधर्मसहिष्णुता अंतर्भूत करणारे धार्मिक तत्त्वज्ञान मांडून मानवी ऐक्याचा तात्त्विक पाया रचला. मध्ययुगीन ख्रिस्ती धर्म व तत्त्वज्ञान यांचा मानवी प्रज्ञेवर विश्वास नव्हता. ईश्वराने सर्व जीवात्म्यांचे भवितव्य अगोदरच निश्चित केलेले असते. माणूस पूर्ण परतंत्र त्याचे भवितव्य पूर्वनिश्चित ऐहिक जीवन हे पापमय असून पश्चाताप होऊन त्यापासून पराङ्‌मुख झालेल्या आत्म्यासच दुर्गतीतून मुक्ती मिळू शकते. या विचाराच्या नेमका विरुद्ध असा हा विचार आहे. येशू ख्रिस्त ही केवळ ऐतिहासिक व्यक्ती नसून पृथ्वी आणि स्वर्ग यांचा दुवा असलेल्या मनुष्याचे मानव्य म्हणजेच येशू ख्रिस्त होय. या मानव्याचा नैतिक विकास म्हणजेच ख्रिस्ती चैतन्याचा आविष्कार होय, अशा जाणिवेने भरलेले प्रबोधनकालीन कवी, साहित्यकार, कलाकार, तत्त्वज्ञ आणि अनेक पराक्रमी पुरुष होते. क्यूसेनसने हा विचार थोडक्यात असा मांडला आहे : “ जगातील सर्व राष्ट्रांचे व सर्व धार्मिक संप्रदायांचे प्रतिनिधी परमेश्वरापुढे उपस्थित होऊन प्रार्थना करतात, की राष्ट्रा-राष्ट्रांतील आणि भिन्न धर्मांतील विरोध आणि मतभेद अंतिम निर्णय देऊन देवा तू मिटव कारण सगळेच धर्म एकाच श्रेयस्कर श्रेष्ठ उद्दिष्टाप्रत पोहोचण्याचा प्रयत्‍न करीत आहेत व ते उद्दिष्ट म्हणजे शुद्ध सत्य, शुद्ध सत्ता म्हणजे ईश्वर होय. सगळेच जीवनाची मागणी करतात आणि तू तर जीवनाचा मूळ स्रोत आहेस. अनेक प्रकारचे धार्मिक संप्रदाय व कर्मकांड, तुझी नाना प्रकारची अभिधाने ही सर्व अप्रमेय व अवर्णनीय अशा तुझ्या प्रीत्यर्थ असतात. कोणतेही मूर्त, मर्यादित वा सान्त जे जे आहे ते ते तूच निर्मिलेले आहेस. तू अनंत अशी शक्ती आहेस. तू सर्वसमर्थ असल्यामुळे तू असा आकार निर्माण करू शकतोस की ज्याच्यातून तुझे दर्शन होऊ शकेल. तू गुप्त राहू नकोस. कृपा कर, प्रकट हो. त्यामुळे सगळ्यांचे तारण होईल. तू आमची प्रार्थना ऐकलीस तर द्वेष, मत्सर आणि तलवार आणि जे जे काही घातक वा अनिष्ट आहे ते नष्ट होईल आणि सगळ्यांच्या लक्षात येईल की कर्मकांडाचे व उपासनेचे विविध संप्रदाय असले, तरी धर्म एकच आहे. उपासनामार्ग व विविध कर्मकांडे यांचा त्याग कोणी करू शकत नाही परंतु कोणताही एक उपासनामार्ग अथवा कर्मकांड नीट तपासले, तर ते अपुरेच आहे हे सिद्ध होते. तू त्याच्या पलीकडे आहेस. ते अंतिम सत्य किंवा ती अंतिम सत्ता एक असली, तरी ती पलीकडेच राहते. कोणताही एक संप्रदाय सर्वांना बंधक म्हणून श्रद्धेने स्वीकारला तर किंवा सगळ्या प्रकारच्या पंथांना मान्यता दिली, तर पुन्हा ते सत्य व ती सत्ता दूरच राहते. ती विचारांच्या किंवा जाणिवांच्या पलीकडेच राहते. कारण प्रत्येक धर्मात, संप्रदायात, कर्मकांडात दुसऱ्या धर्माशी, संप्रदायाशी, कर्मकांडाशी विरोधी असे काहीतरी मूलभूत म्हणून मानलेलेच असते. त्यामुळे मतभेद झाला म्हणजे त्याच्या पाठीमागून एक धर्मसंप्रदाय भिन्न मतवाल्याचा छळ केल्याशिवाय राहत नाही. म्हणून अखेरीस द्वेष आणि युद्धे अटळ ठरतात. म्हणून सर्व धर्मपंथ आणि कर्मकांडे, विविध प्रकारच्या संज्ञा आणि नावे ही केवळ प्रतीके आहेत. त्या प्रतीकांतून मनुष्य त्या अप्रमेयाकडेच पाहत असतो. प्रत्येक व्यक्ती साक्षात ईश्वराभिमुख असते परंतु व्यक्ती व व्यक्तीची धार्मिक प्रतीके यांच्या मर्यादा टाळता येत नाहीत. व्यक्ती अगणित आहेत म्हणून त्या अनंताकडे पाहण्याचे दृष्टिकोनही अनंत आहेत. हे अगणित दृष्टिकोन म्हणजे मानवी जीवनाचे मोठे वैभवच होय. सर्व विश्व हे त्या अनंताचे प्रतीक आहे.


या व्यापक धर्माचे मुख्य पवित्र पुस्तक ईश्वरनिर्मित निसर्ग ठरला. गणिती, तंत्रज्ञ, कलाकार यांनी परंपरागत पुस्तकी ज्ञानाला महत्त्व न देता प्रत्यक्ष निसर्गाचा अनुभवच प्रमाण मानला. हा अनुभव घेण्याची शक्ती असलेले मन हे ईश्वराच्या मनासारखेच सर्जनशील आहे, हे ध्यानात आले. हे मानवी मन इंद्रियगम्य निसर्गाच्या आधारे आकार निर्मिते, आकार बदलते असा प्रबोधनकालातील कलेचा महत्त्वाचा आशय बनला. कलेचा व सौंदर्याचा संप्रदाय इहवादी आणि इंद्रियानुभवप्रधान झाला. इंद्रियांनी मिळणारा आनंद हा बंधमुक्त झाला. परंतु सौंदर्याच्या कलेच्या आकृतिबंधाची किंवा निर्मितीची चमत्कृती तेवढ्याने उलगडत नाही. म्हणून निसर्ग आणि माणूस यांचा मूळ निर्माता हाच सौंदर्याची परिपूर्ण मूर्ती व मुक्त कलाकार असल्यामुळे निसर्गात आणि मानवमनोनिर्मित कलेत चमत्कारमयता आहे, असा विचार पुढे आला.

प्रबोधनकालातील कलाकार हे सौंदर्याला केवळ मानसिक अधिष्ठान आहे असे मानत नव्हते. त्याला निसर्गाइतकीच वास्तवता आहे, असे मानू लागले. आकृतिबंध, मोजमाप, उचित संबंध आणि संवादिता हे वास्तवांचे गुणधर्म होत. परंतु मन हा वास्तवाचा गुण स्वतःच्याच स्वभावधर्मातून निर्माण होतो, असे मानते. कारण अशिक्षित मनालादेखील सुरूप आणि कुरूप यांतील भेद स्पष्ट जाणवतो. ओबडधोबड अस्ताव्यस्त पसारा, व्यवस्था आणि रचना या द्वंद्वातला फरक संस्कार नसलेले मनही स्पष्ट लक्षात घेते. कोणताही गोलाकार सर्वांना प्रशस्त वाटतो. एखाद्या मंदिराच्या भिंतीची व त्यांतील पाषाणांची नीट मांडणी, दरवाजे आणि खिडक्या यांची जेथल्या तेथे रचना असल्यास कोणालाही पसंत पडतात. मनुष्याच्या शरीरातील अंगोपांगांची प्रमाणबद्धता, स्वरांचा सुसंवाद आणि माधुर्य यांचे आकर्षण सामान्यांच्या नेत्रांना व कानांना असतेच. त्याच्या पाठामागे युक्तिवाद शोधावा लागत नाही. याचे कारण असे, की विश्वरचनेची सगळी मूलतत्त्वे मनुष्याच्या मनामध्ये सुसंगत रीतीने भरलेली असतात. माणूस हा विश्वाचा प्रतिनिधी आणि विश्वातील तत्त्वांचा मूर्ताकार आहे. बुध्दिगम्य आणि इंद्रियगम्य अशा विश्वाच्या स्थिर आणि चंचल अस्तित्वाचा तो मध्यबिंदू आहे. ईश्वराने निर्मिलेल्या विश्वाला व विश्वातील वस्तूंना सुसंगत असे आकृतिबंध आहेत हे लक्षात आले म्हणजे माणसाला जिथे जिथे अव्यवस्था, गोंधळ व गुंतागुंत दिसते, तिथे तिथे व्यवस्था व सुसंगतीही सापडू शकते. याकरिता त्याला स्वतःचे दिव्यत्व सापडून स्वतःवरचा विश्वास मात्र बळावला पाहिजे. तो बळावला म्हणजे विश्वावरचा विश्वास बळावतो. त्यामुळे इंद्रियगम्य जगाला आकार देण्याची सर्जनशक्ती माणसात आहे, ती प्रकट होते. लिओनार्दो दा व्हींची सांगतो, की निसर्गाने स्वाभाविक रीतीने तुमच्या पुढे मांडलेल्या वस्तूंचे तुम्हाला आकलन होते, ज्ञान होते. एवढ्याचमुळे तुम्ही स्वतःवर खूष होऊ नका. तुमच्या मनाने त्या वस्तूंच्या मध्ये जे इष्ट आकार आणि उद्दिष्टे कल्पिलेली असतात, त्यांच्यापासून आनंद झाला पाहिजे. मानवी प्रज्ञेमध्ये बुद्धी व प्रतिभा हे दोन घटक आहेत ते एकमेकांचे पूरक आहेत. बुद्धी आणि प्रतिभा यांचे कार्य एकच ते म्हणजे वस्तूंना आकृतिबंध देणे. बुद्धीने विज्ञान आणि प्रतिभेने कला निर्माण होते.

मूळ अस्सल ग्रीक व लॅटिन ग्रंथांच्या प्लेटो, ॲरिस्टॉटल, सिसरो, सेनीका, व्हर्जिल इत्यादिकांच्या अध्ययनाने संस्कारलेल्या प्रबोधनाच्या उत्कर्षकाळात बुद्धिगम्य सामान्य नियमांच्या रूपातील सत्य व इंद्रियगम्य अनंत विशेषांनी भरलेला निसर्ग यांची एकरूपता लक्षात आली. धार्मिक मानवतावादाने निसर्ग हेच ईश्वरी प्रकटन ठरविले. त्यानंतर ॲरिस्टॉटलच्या प्रेरणेने नैसर्गिक मानवतावाद या उत्कर्षकाळात काही विशेष व्यक्तींनी पुरस्कारिला. ज्ञानेंद्रियांनी घेतलेला व मनात भरलेला अनुभव आणि मनातील सर्जनशील प्रतिभा व विवेकबुद्धी यांच्या संगमात सत्याचे यथार्थ ज्ञान होते आणि चमत्कृतिपूर्ण असे सौंदर्य अनुभवास येते त्या सौंदर्याची कलात्मक निर्मिती करता येते. या सिद्धांताने हा उत्कर्षकाळ भारावला गेला. निसर्गनिष्ठ मानवतावादाची पताका उंचावली. आधुनिक विज्ञानयुगाचा हाच पाया होय. येथूनच विज्ञानाचा राजमार्ग सुरू होतो.

बुद्धिगम्य नियती हे सत्याचे शाश्वत रूप होय. या सत्याची अनुभवगम्य अनियत अशा नैसर्गिक विशेष पदार्थांशी अविभाज्य समवाय आहे, हा विचार यावेळी दृढ झाला. बुद्धिवाद व इंद्रियानुभववाद यांच्या संगमाचे चित्र हे प्रबोधनाच्या विचारप्रवाहाचे चित्र होय. नियतिबद्ध संकल्पनांचे स्वरूप गणिताच्या तर्कशास्त्रामध्ये स्पष्ट होते. हे गणिताचे तर्कशास्त्र केवळ विज्ञानपद्धतीच निश्चित करीत नाही, तर ते कलेची तत्त्वप्रणालीही निश्चित करते. विज्ञान व कला यांच्या तत्त्वप्रणाली एकमेकांच्या हातात हात घालून प्रवास करीत असतात, असा एक विचार यावेळी उदयास आला. कारण कलेचा आकृतिबंध मोजमापाने निश्चित होत असतो. अशा रीतीने दोघांचा साधनमार्ग एकरूप होतो. ही गोष्ट गॅलिलीओने आपल्या सुप्रसिद्ध संवादनिबंधात स्पष्ट केली आहे. मानवी बुद्धीबद्दची स्वतःची संकल्पना स्पष्ट करताना अनुभवनिष्ठ ज्ञानाच्या रचनेत बुद्धीचे कार्य चालूच असते, याची उदाहरणे म्हणून ⇨ मायकेलअँजेलोरॅफेएल व ⇨ तिशन या कलाकारांचा उल्लेख करतो आणि विषयवस्तू व ज्ञान यांचा परस्परसंबंध दाखवून देतो. त्याच्या मते मानवाचे स्वातंत्र्य व त्याची मूलभूत सर्जनशीलता ही निसर्गात सामावलेल्या नियतीशी संबद्ध आहे.

लिओनार्दो दा व्हींची हा आपल्या टिपणीमध्ये प्रत्यक्ष अनुभव व गणिताचा अनुप्रयोग यांचा अविच्छेद संबंध निश्चित करतो आणि म्हणतो, की परंपरागत पुस्तकी ज्ञानावर भरवसा ठेवू नका पोथ्यापुस्तकांपेक्षा निसर्गाकडे वळा. निसर्ग सांगतो तेच बरोबर असते. आपले नेत्र निसर्गावर रोखा, फलज्योतिष, जादू, किमया इ. निसर्गविद्या या स्वप्नांचा खेळ आणि फसवे भ्रमजंजाल आहे. याचे कारण प्रयोगसिद्ध अनुभव व गणिताचा अनुप्रयोग यांच्याशी त्यांचा संबंध नाही. प्रयोग चुकत नसतो प्रत्यक्ष अनुभव चुकत नसतो गणिताचा अनुप्रयोग न केल्यामुळे प्रयोगाचा व अनुभवाचा कल्पिलेला अर्थ चुकत असतो. आपल्या शक्तीबाहेरच्या अपेक्षांमुळे ही फसवणूक होत असते. अनुभवांचे गणिती भाषेत योग्य वर्णन हेच अनुभवाचे खरे फलित होय. गणित व अनुभव एकमेकांची पूरक अंगे होत. दृश्याचा अनंत पसारा आहे. गणिताच्या बौद्धिक व्यवस्थेत त्याची रचना केल्याने सत्य हाती लागते. अगणित नियम निसर्गात लपलेले आहेत. लिओनार्दोच्या टिपण्यांमध्ये आधुनिक गतिविज्ञानाचे अनेक निष्कर्ष टिपलेले आढळतात. त्यात गॅलिलीओने सिद्ध केलेली गतीची उपपत्तीदेखील सूचित केलेली आढळते. निसर्ग ही प्रत्यक्ष नियतीच होय. हा लिओनार्दोचा विचारच गॅलिलीओने स्वीकारला आहे. तो म्हणतो, की ॲरिस्टॉटल व मध्ययुगीन तत्त्ववेत्ते यांनी जे निसर्गतत्त्वज्ञान सांगितले आहे, ते निसर्गाला प्रत्यक्ष भेटून व विचारून सांगितले नाहीत. तो शुद्ध कल्पनाविलास आहे. खरे पाहता निसर्ग हे तत्त्वज्ञानाचे उघडे पुस्तक आहे ते आपल्या नेत्रांसमोर कायम असते परंतु ते सुसंबद्ध गणिताक्षरांमध्ये लिहिले आहे हे गणित सोडवा म्हणजे निसर्ग समजेल. गॅलिलीओचे हे अनुभवनिष्ठ गणित म्हणजेच विज्ञानातील गृहीतक होय. अस्तित्व व घटना यांचे संबंध म्हणजे कार्यकारणभाव होय. कार्याचे कारणांशी व कारणांचे कार्याशी असलेले संबंध तार्किक व गणिती स्वरूपाचेच असतात.


वरील विवेचनावरून लिओनार्दो व गॅलिलीओ यांचा विचार एकमेकांशी जुळता असला, तरी या निर्णयास ते एकाच मार्गानेपोहोचले नाहीत. कारण गॅलिलीओने निसर्गाचे वास्तव जग आणि कल्पनातरंगातील कथा किंवा गोष्टी यांचे कल्पित जग यांच्यात भेदक रेषा काढून काव्य व कला यांना कल्पित जगात समाविष्ट केले. उलट लिओनार्दोच्या मते काव्य व कला ही अस्सल वास्तवाच्या ज्ञानाचे साधन आहे केवळ मानसिक कल्पनातरंग एवढाच कलेचा अर्थ नाही विज्ञानातील सत्याचे मूल्य जेवढे आहे, त्यापेक्षा कलेत कमी नाही दोन्हीतील सत्य सारख्याच तोलाचे आहे. कलाकारांची वैयक्तिक रीती व अस्सल कलाशैली यांच्यात दोघेही मौलिक फरक मानतात. कलाशैलीचे मूळ, त्यांच्या मते, ज्ञानाच्या अत्यंत खोल अशा अधिष्ठानावर, वस्तुतत्त्वावर रुजलेले असते. ते वस्तुतत्त्वच आकृतिबंधात व्यक्त व दृग्गोचर होते. हा आकृतिबंधच संकल्पनेची, ज्ञानाची कक्षा व मर्यादा होय. अंतश्चक्षू व बाह्यचक्षू यांचा व विज्ञानाचा हाच विषय होय. लिओनार्दो वैज्ञानिक, अभियंता, तंत्रज्ञ व कलाकार होता. या सर्व नात्यांनी तो नेत्रविषयक विश्वालाच मुख्य स्थान देतो. नेत्रविषय विश्व अर्धवट नव्हे तर समग्र व सुसंगत रूपातच त्याच्या पुढे उभे राहते. त्याच्या मते संशोधन्याच्या प्रगतीकरिता कला व विज्ञान ह्या दोन्ही क्षेत्रांत प्रत्यक्ष इंद्रियजन्य अनुभव व निश्चित इंद्रियगम्य कल्पनातरंग यांचे साहचर्य लागते. या कल्पनातरंगाला स्वगत मोजमाप असते. कल्पनातरंग व निष्कर्षण (ॲब्‌स्ट्रॅक्शन) वस्तुदर्शनाला मार्ग दाखवितात आणि पूर्णता आणतात. निसर्गदर्शनाला गणितान्वित केलेल्या आकाराच्या विचारांची जोड द्यावी लागते. तेव्हा विज्ञान व कला यांची परिणती होऊ लागते. मनातील बुद्धीचा व्यापार म्हणजे गणितान्वित आकाराचा विचार होय. लिओनार्दोच्या दृष्टीने निसर्ग आकार घेऊनच अस्तित्वात येतो निराकारता हा त्याचा स्वभाव नव्हे. कलेच्या माध्यमातूनदेखील साकार निसर्गाचेच दर्शन होते. निसर्ग हे पूर्ण आकाराचे क्षेत्र आहे ते नियतीचे राज्य आहेत. शुद्ध प्रमाणबद्धता म्हणजे नियती होय ती मनाशी निगडित असते. प्रमाणबद्धता ही संख्या व परिमाण यातच नसते तर स्वर, ध्वनी, रंग, वजन, स्थल, काल किंवा कसलीही शक्ती यांना ती लागू आहे. निसर्ग माणसाशी स्वतःला प्रमाणबद्धतेने जुळवून घेतो. त्यामुळे माणूस व निसर्ग यांच्यातील सामंजस्याची स्थापना होते. वस्तुतः निसर्ग हा अपरंपार व अनंत आहे. तरी त्याची अनंतात गणितगत आहे. निसर्गाच्या पसाऱ्याला गवसणी घालणे अशक्य असले, तरी निसर्गाच्या अंतिम आधारभूत तत्त्वांचे आकलन शक्य होते. गणित मनाला उच्चतम स्थरावर नेऊन पूर्णतेला नेते. दिव्य ज्ञान व मानवी बुद्धी यांच्यात मध्ययुगाने अडथळा निर्माण केला होता, तो यामुळे दूर होतो.

गॅलिलीओने ज्ञानाचे दोन प्रकार सांगितले : निसर्गातील अगणित विशेष वस्तूंचे ज्ञान आणि पायाभूत व्यापक तत्त्वांचे ज्ञान. पहिला प्रकार अशक्य व दुसरा प्रकार शक्य होय, असे त्याने मानले. कारण दुसऱ्या प्रकारात गणित ज्ञान येते. ते निरपवाद व निःशंक असते. त्याची दिव्य ज्ञानाशी तुलना होऊ शकते.

लिओनार्दोच्या मते कला निर्माण करणारी लोकोत्तर प्रतिमा व निसर्ग यांचा मूलभूत संबंध व दुसऱ्या ज्ञानप्रकारामुळे स्थापित होतो. कलात्मक प्रतिभा निसर्गाला उल्लंघून अवास्तव कल्पनाविलासात न रमता निसर्गाचा स्वाभाविक नियम पकडते आणि हा नियम वास्तव सौंदर्याचा आविष्कार करतो. कलाकाराची प्रतिभा जेव्हा नवा दुसरा कलात्मक निसर्ग घडविते तो शून्यातून घडवीत नाही, तर स्वाभाविक नियमातून घडविते. कारण आगंतुक, प्रासंगिक वा असंगत असे जे जे असेल त्याला निवडून, बाजूला सारून नियत, आवश्यक व सुसंगत तेवढेच ठेवते. हे करताना तत्त्व हे दृश्य आकारास येते. केप्लर आणि गॅलिलीओ यांनी हीच अनुभवाची वैज्ञानिक उपपत्ती स्वीकारली आहे. प्रबोधनाचा उत्कर्षकाल कला व विज्ञान अशा तऱ्हेने एकाच मार्गाचे पथिक बनले. गॅलिलीओ म्हणतो, की निसर्गात सर्वत्र सुसंगत नियतीचे राज्य आहे. याची मनाशी पक्की गाठ बांधून वैज्ञानिक प्रयोग करीत गेले तर योग्य निर्णयाला पोचता येते. प्रयोगाने इंद्रियांचे अनुभव गोळा करीत आणि त्यांची तुलना करीत जात असता एक व्यापक रूपरेषा मनाशी बाळगावी लागते. किंबहुना न विसरता सामान्य रूपरेषा प्रयोगाच्या आरंभी गृहीत धरायची असते आणि अनुभवाच्या कसोटीवर तपासायची असते. तत्त्वविचार व अनुभव यांची सतत सांगड असावी लागते. प्रबोधनकालीन चित्रकारदेखील प्रतिभेने निर्मिलेला आकार व वास्तवाचे स्वरूप यांचा संबंध सुटू देत नाही. त्यात उच्छृंखलता व स्वैरता नसते. ते निसर्गानुभवाचे फलित असते कारण कलाविश्वही निसर्गच असतो आणि निसर्ग नियतीतच जन्मतो व जगतो नियमरहित असे काहीच नसते नियमरहित म्हणजे गोंधळ व संभ्रम.

वरील विवेचनावरून हे लक्षात येईल, की सौंदर्य व नियमबद्धता यांच्या तादात्म्याची उत्कट संवेदना प्रबोधन संस्कृतीवर अंमल गाजवीत होती. कला व विज्ञान यांचे अधिष्ठान ही संवेदनाच बनली. निकोलेअस कोपर्निकसच्या सूर्यकेंद्रित ग्रहमालेच्या सिद्धांतात तत्कालीन गणितज्ञांना सौंदर्य दिसले. कोपर्निकसने आपले उच्च शिक्षण इटालियन विद्यापीठांमध्ये पुरे केले. त्याचा शिक्षणक्रम मानवतावादी होता. त्याच्या सिद्धांताप्रमाणे सूर्यापासून ग्रहमालेकडे पाहिले तर एक प्रकारचा सुसंगत भव्य आकार लक्षात येतो. आपल्या सिद्धांताच्या सौंदर्याचे वर्णन करीत असता तो म्हणतो, की दिव्य रचनाकाराची सूर्यकेंद्रित कृती परिपूर्ण आहे. गणितज्ञांना कोपर्निकसच्या सिद्धांतामध्ये निसर्गाचे नियम साधे, सोपे, सरळ आहेत हे पटले. सौंदर्य व सत्य एकच आहे हे ध्यानात भरले.

कोपर्निकस, केप्लर व गॅलिलीओ यांच्या प्रबोधनकालीन खगोल विज्ञानाने प्राचीन युग आणि मध्ययुग यांच्यामध्ये मान्य झालेले विश्वरचनाशास्त्रच कोलमडले. मध्ययुगाच्या अखेरच्या तीन शतकांत ॲरिस्टॉटल, टॉलेमी व बायबल यांचा समन्वय करून टॉमस अक्वाय्‌नसने विश्वरचनाशास्त्र सांगितले, तेच कोलमडले. त्यामुळे परंपरागत ग्रंथावरची श्रद्धाच ढासळली.

लिओनार्दो आधुनिक युगाच्या प्रारंभीचा पहिला निसर्गविज्ञानी होय, तर मॅकिआव्हेली हा पहिला समाजविज्ञानी होय. समाजविज्ञानाचा नवा मार्ग मी सांगतो असे तो म्हणतो. अनुभवावर आधारलेले राज्यशास्त्र त्यानेच प्रथम सांगितले. तोपर्यंत राज्यकर्त्यांनी कसे वागावे व कसे वागू नये, समाज कसा चालावा आणि कसा चालू नये, असे सांगणारे उपदेशपर विचार पूर्वीच्या राज्यविषयक ग्रंथांमध्ये आले आहेत. समाज कसा चालतो आणि लोक कसे वागतात यांवर म्हणजे अनुभवावर आधारलेले राज्यशास्त्र मॅकिआव्हेलीने प्रथम निर्माण केले. आधुनिक अनुभवनिष्ठ वैज्ञानिक तर्कशास्त्राचा प्रणेता फ्रान्सिस बेकन मॅकिआव्हेलीबद्दल म्हणतो, की माणसे कसे वागतात यावर मॅकिआव्हेलीची राजकीय उपपत्ती आधारलेली आहे माणसांनी कसे वागावे या नैतिक सिद्धांतावर आधारलेली नाही. याचा अर्थ असा, की समाज ही नैसर्गिक व्यवस्था आहे. म्हणून निसर्गाचे नियम जसे ठरवायचे तसेच समाजाचेही नियम ठरविले पाहिजेत. मॅकिआव्हेलीने अनुभवाचा आधार घेतला त्याचबरोबर काही महत्त्वाची गृहीतकृत्येही ठरविली आणि त्यांच्या आधारावर त्याने आपला सुप्रसिद्ध द प्रिन्स (इं. शी.) हा निबंध लिहिला. पहिले गृहीतकृत्य म्हणजे मनुष्यस्वभाव सदासर्वकाळ व सर्वत्र सारखाच असतो. मनुष्य हा मुळात शुद्ध आहे परंतु संस्कृतीमुळे तो भ्रष्ट झाला आहे, हा रूसोचा विचार मॅकिआव्हेलीच्या डिस्कोर्सेस या पुस्तकात गृहीत धरला आहे.


इहवादी किंवा निधर्मी राजकारणी विचार पश्चिमेत स्थिरावले–वाढू लागले. त्याचे पहिले उदाहरण मॅकिआव्हेलीचा द प्रिन्स हा निबंध होय. धर्माकडे वास्तववादाच्या दृष्टीने त्याने पाहिले. धर्म, नीती आणि पोप यांच्याकडे राज्याच्या हिताचे काय आहे आणि काय नाही, याच दृष्टीने राजाने पहावे कारण राजा राज्याच्या हिताचे मूर्तिमंत रूप होय, असे त्याने सांगितले. राज्याचे हित हेच राजाचे हित होय हे त्याचे दुसरे गृहीतकृत्य. यासंबंधी त्याच्या विचारांचे सार असे : राज्य हे अंतिम उद्दिष्ट धरून सत्ता मिळविणे व बळकट करणे, याकडे सर्वस्वी राजाने आपले लक्ष व कर्तृत्व केंद्रित केले पाहिजे. राज्य हे उद्दिष्ट किंवा साध्य होय त्याकरिता कोणतेही साधन वापरणे हे समर्थनीयच ठरते. दुष्ट, हिंसात्मक व वंचक साधने वापरण्यास मागेपुढे पाहू नये कारण राज्य ही एक कला आहे आणि राजा किंवा सत्ताधारी हा कलाकार आहे. राजाने नैतिक विचार दुय्यम ठरवावा. राज्य ही मानवनिर्मित कला आहे. तिच्या मुळाशी ईश्वरी अधिष्ठान असते किंवा ईश्वराने दिलेले अधिकार असतात, ही कल्पना टाकावी. डिस्कोर्सेस या ग्रंथात तो म्हणतो, की राजेशाही, अभिजनसत्ता आणि लोकशाही या तिन्ही चांगल्या म्हणून वाखाणल्या आहेत व सुलतानशाही (टिरनी), स्वल्पतंत्र शासन आणि तत्त्वशून्य राजवट या तीन दुष्ट म्हणून समजल्या आहेत परंतु प्रत्येक राज्यपद्धतीमध्ये काही दोष असतात व काही गुण असतात. म्हणून दूरदर्शी घटनाकारांनी किंवा संविधानप्रणेत्यांनी राजा, अभिजन आणि लोक या तीन शक्तींचा मेळ बसविला पाहिजे. हे करीत असताना जास्तीतजास्त दृढ राज्यपद्धती उभारण्याचा प्रयत्न करावा परंतु काही जरी झाले, दैवगती आणि गुणविशेष हेच माणसाचे राजकीय भवितव्यावर प्रभाव गाजवीत असतात. परिस्थितीवर ताबा मिळविणे हे सत्ताधाऱ्याचे मुख्य कर्तव्य होय. दैवगतीशी गुणविशेषांचा मेळ बसविण्यातच यश अवलंबून असते.

मॅकिआव्हेलीचे ग्रीक व रोमन गणराज्यांचा अभ्यास केला होता. त्यावरून त्याने आपले निष्कर्ष काढले. सुलतानशाही त्याला मान्य नव्हती. नागरिकांची संपत्ती आणि पत्नी यांच्याबद्दल मोहाला बळी पडू नये कारण त्यामुळे लोकांचा पाठिंबा नाहीसा होतो. क्रूर साधनांचा उपयोग केवळ संकटकाळीच करणे समर्थनीय ठरते, अन्यथा नव्हे असे त्याने सांगितले.

मॅकिआव्हेली म्हणजे कुटिल हुकूमशाही, निरंकुश शासन वा दंडुकेशाही राजकारणाचा पुरस्कर्ता होता, असे त्याच्याबद्दल इतिहासामध्ये वारंवार मोठमोठ्या विचारवंतांनी, कवींनी आणि लोकनेत्यांनी म्हटलेले आढळते परंतु काही मोठ्या विचारवंतांनी सत्तेच्या राजकारणाचा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन सांगणारा म्हणून त्याची प्रशंसा केली आहे ही गोष्ट मात्र लक्षात ठेवली पाहिजे, की जागतिक राज्यशास्त्राच्या इतिहासात मॅकिआव्हेलीबद्दल जितके व जितक्या वेळा लिहिले गेले, तितके व तितक्या वेळा कोणत्याही राज्यशास्त्रकाराबद्दल लिहिले गेले नाही. त्याला एकच अलीकडचा अपवाद तो म्हणजे कार्ल मार्क्स होय. मॅकिआव्हेलीनंतर पाच वर्षांनी जन्मलेला दुसरा प्रसिद्ध मानवतावादी राज्यशास्त्रकार ⇨टॉमस मोर (१४७८–१५३५) याने मॅकिआव्हेलीपेक्षा अगदी विरुद्ध प्रकारचे आदर्शवादी राज्यशास्त्र लिहिले. त्याच्या ग्रंथाचे नाव यूटोपिया. मॅकिआव्हेलीला शेकडो राज्यांत व घटकराज्यांत विभागलेले आपले इटली हे राष्ट्र एकात्मक राष्ट्र म्हणून कसे उभारता येईल, याची चिंता होती. बेबंदशाहीतूनच इटली वर आणायचा होता. या दृष्टीने राष्ट्रवादाचा पहिला द्रष्टा म्हणूनही मॅकिआव्हेलीची गणना होते. टॉमस मोर मॅकिआव्हेलीप्रमाणेच शासनसंस्थांचा अनुभव घेतलेला राजकारणी मुत्सद्दी होता. त्याच्या वेळी त्याची जन्मभूमी इंग्लंड हे राष्ट्र हे प्रगतिपथावर होते. मानवजातीचा ऐहिक संसार संघर्षरहित, वर्गरहित, विद्रोहरहित व शांततापूर्ण असा कसा निर्माण व्हावा, याची त्याला चिंता लागली होती परंतु एका अर्थी तो वास्तववादीच होता. परंपरागत राजकीय दृष्टिकोन व राजकीय प्रथा तपासून त्यांच्यातील राजकीय दुःस्थितीची कारणे शोधून सत्तेच्या राजकारणातून मुक्त असा मानवी समाज कसा निर्माण होईल, हा प्रश्न त्याला सोडवायचा होता त्याकरिता आवश्यक असा कार्यक्रम त्याने आपल्या ग्रंथात सांगितला. सामान्य माणसाच्या दुःखाबद्दल त्याला सहानुभूती होती व राज्य हे केवळ नागरिकाच्याच हिताकरता असते, असा सिद्धांत त्याने मनाशी बाळगला. सामान्य माणसाबद्दल कळवळा नसल्यामुळे नागरिकाचे हित व स्वातंत्र्य या दोन्ही गोष्टींकडे मॅकिआव्हेलीने लक्ष दिले नाही. हा या दोघांतील महत्त्वाचा फरक. सामाजिक व्यथा व दोष यांना ईश्वरेच्छा किंवा दैव हे कारण नाही तर मानवानेच निर्माण केलेली समाजरचना त्यास जबाबदार आहे, ही गोष्ट त्याने मनाशी पक्की बाळगली होती. बायबलमधील ख्रिस्ताने केलेला पर्वतावरील उपदेश आणि सेंट ऑगस्टीन याचे ईश्वराची नगरी (म. शी.) हे पुस्तक या दोन गोष्टींचा त्याच्या मनावर निरंतर प्रभाव होता. त्याला ईश्वननगरी निर्माण करायची नव्हती, तर ‘आदर्श मानवी नगरी,’ निर्माण करायची होती. अशा मानवनगरीत ईश्वरालाही विश्रांती घेण्यास संकोच किंवा लाज वाटू नये [⟶ यूटोपियावाद].

 या नोंदीमध्ये प्रबोधनकालातील मूलभूत तात्त्विक संकल्पनांचा ऐतिहासिक परामर्श घेतला आहे. इटलीनंतर फ्रान्स, नेदर्लंड्स, स्पेन, इंग्लंड व जर्मनी या राष्ट्रांमध्ये प्रबोधनाचे आंदोलन पसरून नवी कला, काव्य, साहित्य, तंत्रविज्ञान व विज्ञान यांचे नवनवे सतत आविष्कार होऊ लागले ही प्रबोधनाची प्रेरणा विविध रूपाने यूरोपच्या पश्चिमी देशांत आकारास आली आणि ती मोठमोठ्या ऐतिहासिक क्रिया-प्रतिक्रियांच्या संक्रमणातून आधुनिक विज्ञानयुगाचे स्थिर असे अधिष्ठान बनले.

 पहा : इटलीतील कला धर्मसुधारणा आंदोलन भारतीय प्रबोधनकाल मुद्रण विज्ञानाचे तत्त्वज्ञान वैज्ञानिक पद्धति.

संदर्भ : 1. Burckhardt, Jacob, The Civilisation of the Renaissance in Italy, Bombay,1929.

            2.Cassirer, Ernst Kristeller, Paul Oskar Randall, J. H. Ed. The Renaissance Philosophy of man, Chicago. 1961. 

            3. Cassirer, Ernst, The Individual and the Cosmos in Renaissance Philosophy, New York, 1963.

            4. Cassirer, Ernst, The Myth of the State, London,1963. 

            5.Durant, Will, The Renaissance, New York, 1953. 

            6.Giorgio De Santillana, The Age of Adventure, New York, 1964.

            7. Gundersheimer, W. L. Ed, The Italion Renaissance, Englewood Cliffs, 1965. 

            8.Haydn, Hiram, The Counter-Renaissance, New York, 1960. 

            9.Jacob, E. F. Ed, Italian Renaissance Studies, London, 1960. 

          10.Sypher, Wylie, Four Stages of Renaissance Style, New York,1955.

 

जोशी, लक्ष्मणशास्त्री