कॅनिंग, लॉर्ड चार्ल्स जॉन : (१४ डिसेंबर १८९२–१७ जून १८६२). ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील १८५६ ते १८६२ ह्या दरम्यानच्या काळातील गव्हर्नर जनरल व व्हॉइसरॉय. पंतप्रधान जॉर्ज कॅनिंगच्या या कनिष्ठ पुत्राचा जन्म लंडन येथे झाला. ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर १८३६ मध्ये हुजूर पक्षातर्फे ब्रिटिश पार्लमेंटवर तो निवडून आला. १८३७ मध्ये आईच्या मृत्यूनंतर तिची सरदारकी (पिअरेज) त्याच्याकडे आली, त्यामुळे तो साहजिकच हाऊस ऑफ लॉर्ड्सचा सभासद झाला. १८४१ ते १८५३ च्या काळात त्याने परराष्ट्र खात्यात उपसचिव, जंगल खात्यात आयुक्त व नंतर पोस्ट मास्टर जनरल या जबाबदारीच्या उच्च पदांवर काम केले. त्याचा ह्या पदांतील अनुभव व जॉर्ज कॅनिंगच्या निस्सीम व श्रेष्ठ सेवेचा विचार करून इंग्‍लंडचा पंतप्रधान पामर्स्टन याने त्याची भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्ती केली. तो भारताच्या गव्हर्नर जनरल पदावर येताच दुसऱ्या वर्षी _अठराशे सत्तावनचा उठाव  झाला. सर्व देशभर गोंधळ माजला. अशा परिस्थितीत अत्यंत संयमाने व निर्धाराने हा उठाव त्याने मोडून काढला. दिल्ली व लखनौ ही शहरे उठाववाल्यांकडून जिंकली  व चीनकडे आगेकूच करणारी फौज परत बोलावून त्याने ब्रिटिशांची कुमक वाढविली. उठावानंतर हिंदुस्थानात गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती, अशा वेळी दूरदृष्टी ठेवून त्याने अनेक सुधारणा केल्या व शक्य तो बचावाचे धोरण स्वीकारले.

लॉर्ड चार्ल्स जॉन कॅनिंग

प्रथम त्याने ब्रिटिश लष्कराची पुनर्रचना केली. ह्यापूर्वी हिंदुस्थानच्या लष्करात ब्रिटिशांचे प्रमाण कमी होते, ते त्याने वाढविले. २ ऑगस्ट १८५८ रोजी नवीन कायद्यानुसार कॅनिंग पहिला व्हॉइसरॉय झाला आणि हिंदुस्थानची सत्ता ईस्ट इंडिया कंपनीकडून काढून घेऊन ब्रिटिश पार्लमेंटकडे देण्यात आली व हिंदुस्थानच्या राजकीय प्रशासनासाठी भारतमंत्री हे पद निर्माण करण्यात आले._राणीचा जाहीरनामा भारतीयांपुढे प्रकट करण्यात आला आणि त्यात विदित केलेली आश्वासने कॅनिंगने अंमलात आणण्यासंबंधी अभिवचन दिले. १८५९ मध्ये बंगाल रेंट ॲक्ट संमत झाला. १८५७ साली लंडन विद्यापीठाच्या धर्तीवर भारतात मुंबई, कलकत्ता व मद्रास येथे विद्यापीठे स्थापण्यात येऊन वुडच्या शिफारशींप्रमाणे शैक्षणिक सुधारणा करण्याचे कॅनिंगने ठरविले. १८६१ साली इंडियन पीनल कोडला ब्रिटिश सरकारची अनुमती मिळाली व इंडियन हायकोर्ट कायद्यानुसार मुंबई, मद्रास व कलकत्ता येथे उच्च न्यायालये स्थापण्यात आली तसेच इंडियन कौन्सिलच्या कायद्यानुसार व्हाइसरॉयच्या कौन्सिलमध्ये सभासदांची संख्या वाढविण्यात आली आणि त्यात तीन हिंदी सभासद समाविष्ट करण्यात आले. कॅनिंगने काही नवीन कर बसविले व हिंदी संस्थानिकांशी अत्यंत सबुरीचे धोरण अवलंबिले. थोडक्यात कॅनिंगने सर्व चिघळलेली परिस्थिती आपल्या धूर्त, शांत व संयमी धोरणाने आटोक्यात आणून ब्रिटिशांची सत्ता अधिक दृढतर केली. १८६२ मध्ये तो इंग्‍लंडला परत गेला व त्याच वर्षी लंडन येथे मरण पावला. मरण्यापूर्वी त्यास ‘नाइट ऑफ द गार्टर’ ही बहुमानाची पदवी बहाल करण्यात आली. १८५६ मध्ये त्यास ब्रिटिश पार्लमेंटने ‘अर्ल’ हा किताब दिला होता व दयाळू कॅनिंग अशी त्याची ख्याती झाली होती.

संदर्भ : 1. Kulkarni, V.B. British Statesmen in India, Bombay, 1961.

     2. Maclagan, Michael, Clemency Canning, London, 1962.

देवधर, य. ना.