पुराभिलेखविद्या : इतिहासकाली लिहिलेला मजकूर म्हणजेच पुराभिलेख. असे लेखन इतिहासकालात राजवंश, सरंजामदार, धार्मिक संस्था, व्यापारी, प्रवासी, धर्मगुरु इत्यादींनी केले असून त्यांनी व्यवहार लिहून ठेवले आणि त्याचे रक्षण केले. त्यांच्या जतनास व अभ्यासास पुराभिलेखविद्या ही संज्ञा देतात. यूरोपमधील बहुतेक देशांत अशा कागदपत्रांच्या संग्रहास रेकॉर्ड (दप्तर) आणि रेकॉर्ड ऑफिस (दप्तरखाना) ह्या संज्ञा आहेत. दप्तरखान्यास अभिलेखागार या नावानेही संबोधिले जाते. हे जुने लेख सुरक्षित ठेवण्याची पद्धती, असुरक्षित लेखांना सुरक्षित करण्याची पद्धती, सुरक्षित ठेवलेले लेख वाचून त्यांचे सारांश काढणे आणि अन्य तऱ्हेने ते लेख रोजचा कारभार किंवा इतिहासलेखन यांस कसे उपयोगी पडतील, याचा विचार करून त्याप्रमाणे व्यवस्था करणे, या अनेक गोष्टींचा पुराभिलेखविद्या या विषयात समावेश होतो. हे काम ज्या ठिकाणी चालते त्याला पुराभिलेखागार किंवा अभिलेखागार असे म्हमतात. क्वचित काही ठिकाणी यास लेखागार असेही म्हटले आहे. कोणतेही राज्य किंवा कंपनी वा संस्था अगर दक्षतापूर्वक काम करणारी एखादी व्यक्ती या सर्वांना आपले व्यवहार नीट चालावे, म्हणून आपापली अभिलेखागारे उभारावी लागतात. अशी लेखागारे आधुनिक काळात अनेक आहेत. पूर्वीही अशी लेखागारे असावीत.

 

जुन्या काळातील लेखागारे राज्यक्रांत्या, जाळपोळी, नैसर्गिक प्रकोप इ.कारणांनी कालोदरात नष्ट झाली आहेत. यामुळे जुने लेख जपून ठेवणारे फार थोडी आगारे अवशिष्ट आहेत. लेखनासाठी कागद, ताडपत्र, भूर्जपत्र, वशपत्र, कापड, निरनिराळ्या धातूंचे पत्रे, शिलाखंड, अभ्रक वगैरे अनेक प्रकारच्या माध्यमांचा वापर करीत. आधुनिक लेखागारांत अशा प्रकारच्या माध्यमांवर लिहलेले लेख जपून ठेवले असले, तरी लेखागारात मुख्य भरणा-कागदपत्र, ताडपत्र, कडिते, काळ्या मेणकापडासारखे कापड यांवरील लेखांचा आढळतो. एवढेच नव्हे, तर अशा वस्तूंवरील लेखांचे संग्रह ज्या ठिकाणी असतात, त्यांना पुराभिलेखागार किंवा अभिलेखागार म्हणण्याची पद्धती आहे. अशा लेखागारांत सामान्यतः हस्तलिखित ग्रंथांचा समावेश करीत नाहीत.

 

लेखागारातील कागदपत्रादी साहित्य जपण्याच्या काही विशिष्ट पद्धती आहेत. त्यासर्व ठिकाणी सारख्या निरपवाद लागू करता येत नसल्याने त्यांचा अधिकाधिक उपयोग निरनिराळ्या अभिलेखागारांत यथातथ्य करतात. कोणतेही लेख-कागदपत्र सापडले, की ते सुरक्षित करण्यासाठी प्रथम निर्जुंतक करतात. कागदपत्रांतील वाळवी (व्हाइट अँट्स), कसर (सिल्व्हर फिश), झुरळे, उंदीर व इतर कीटक हे मोठे शत्रू आहेत. त्यांपासून त्यांचा बचाव करण्यासाठी डीडीटी, गॅमेक्झिन नेप्यॉल, थायमॉल, पॅराडायक्लोरेट, बेंझीन इ. अनेक प्रकारची जंतुनाशके वापरतात. निर्वात पोकळीत अभिलेख ठेवून किंवा तीव्र जंतुनाशकांची वाफ देऊनही अभिलेख निर्जंतुक करतात. या जंतुनाशकांनी निर्जंतुक केलेले कागदपत्रही त्यावर धूळ बसल्याने जंतुयुक्त होतात. म्हणून कागदपत्रांवरील धूळ काढून टाकणे आवश्यक असते. एवढेच नव्हे, तर ज्या ठिकाणी अशा कागदपत्रांचा संग्रह ठेवतात, त्या जागाही निर्जंतुक व निर्धूल करतात. कागदपत्रांचे आयुष्य वाढण्यासाठी थंड व थोडे सार्द्र हवामान आवश्यक असते. तसेच जास्त आर्द्र हवामानात कागद लवकर विरतो, म्हणून लोखागारातील तापमान नियमित करावे लागते. साधारणतः २२ते २२.५ सें. तापमान व ४४-४५ टक्के आर्द्रतामानात जुने कागद शेकडो वर्षे टिकू शकतात, असे आढळले.

 

तसाच कागद जपण्यासाठी त्यावर करावी लागणारी दुसरी प्रक्रिया म्हणजे कागद शक्यतो घडीविरहित करणे. ज्या देशात फार पूर्वीपासून कागद फाईल करण्याच्या स्वरूपात ठेवलेले असतात, तेथे त्यांना घड्या प्रायः नसतात. पण भारतात आणि इतर देशांत अनेक ठिकाणी जेथे कागद घड्या घातलेल्या रूपात किंवा गुंडाळीच्या रूपात सापडतात, तेथे असे कागद कधीकधी ३०-४० मी. लांबीचेही असू शकतात. असे कागद किंवा गुंडाळ्या अथवा कडिते पसरून ठेवणे जागेचा विचार करता शक्यच नसते. म्हणून त्यांच्या घड्या वा गुंडाळ्या तशाच ठेवाव्या लागतात.

 

कागदपत्रांच्या संरक्षणाचा पुढील उपाय म्हणून कागद दुरुस्त करणे. त्यासाठी जंतू निर्माण होणार नाहीत, अशा प्रकारची खळ वापरावी लागते. तिला इंग्रजीत डेक्स्ट्रीन पेस्ट म्हणतात. ही खळ वापरली तरी कागदावरील लिखाण सुरक्षित राहण्यासाठी कालांतरानेही काळा न पडणारा पारदर्शक कागद वापरावा लागतो. पूर्वी कागदाऐवजी  झिरझिरीत रेशमी कापड (शीफॉन) वापरीत. पण आता त्यासाठी नवीनच प्रक्रिया शोधून काढली आहे. तिला लॅमिनेशन हे नाव आहे. या लॅमिनेशनसाठी अत्यंत पातळ व पारदर्शक टिश्यू पेपर, तसेच ॲसिटोनमध्ये विरघळणारा कागद (सेल्युलोज फॉइल) वापरतात. दुरुस्त करावयाच्या कागदावर हा सेल्युलोज कागद ठेवून त्यावर टिश्यू पेपर ठेवतात  व त्यावर ॲसिटोनचा बोळा फिरविला म्हणजे तो कागद विरघळून त्याचा एक अत्यंत पातळ थर कागदावर बसतो व टिश्यू पेपर त्यास चिकटतो आणि हा थर व टिश्यू पेपर त्या कागदाचे संरक्षण करतो. मात्र अशा लॅमिनेशन केलेल्या कागदांना घड्या घालणे किंवा त्यांची गुंडाळी करणे (विशेषतः घड्या घालणे) शक्य नसते.

 

अशा तऱ्हेने कागद दुरुस्त केले म्हणजे ते ठेवण्यासाठी त्यांच्या आकाराहून जास्त मायेच्या पेट्या कराव्या लागतात. या पेट्यांत हे कागद एकावर एक ठेवले तर वरच्या कागदांच्या भाराने खालचे कागद खराब होण्याचा संभव असतो. म्हणून हे कागद एकावर एक न ठेवता पुस्तकाप्रमाणे उभे ठेवावे लागतात. तसे ठेवले म्हणजे मग त्यांचे रक्षण अधिक चांगल्या तऱ्हेने होते.

 


कागदांचे संरक्षण : पुराभिलेखागाराचे हे महत्त्वाचे काम असून ते इतिहासाभ्यासूंना उपलब्ध करून देणे त्याकरिता लेखागारातील एकूण कागदपत्रांची विषयवार संदर्भ सूची, सामग्रीची लहान मोठी मार्गदर्शके इ. तयार करणे हे दुसरे प्रमुख कार्य होय.

 

मोठ्या पुराभिलेखागारात आणखी एक काम असते. लेखागारांच्या कामात तंत्रज्ञान वाढल्यामुळे ते शिकविण्याचे वर्ग काढून तंत्रज्ञ तयार करावे लागतात. तसेच जीर्णशीर्ण कागदपत्रांचे सूक्ष्मपटाच्या साहाय्याने जतन करणे, याचा लहान लेखागारांना उपयोग होतो. कोणत्याही एका लेखागारात संशोधकाला हवी असलेली सर्व सामग्री पूर्णांशाने मिळेल, असे निश्चयाने कधीच सांगता येणार नाही. संशोधकाला अनेक वेळा निरनिराळ्या लेखागारांत बसून संशोधन करावे लागते. तसेचकाही लेखागारे आपल्या जवळील अपूर्ण सामग्री पूर्ण करण्याकरिता देशी आणि परदेशी लेखागारातून कागदपत्रे आणवितात. कोणतेही लेखागार आपल्याकडील मूळ कागदपत्र सहसा दुसरीकडे हलवीत नाहीत वा दुसऱ्या संस्थेकडे देत नाहीत. सामान्यतः ३५ मिमी. फिल्मवर पाहिजे असलेल्या सामग्रीची छायाचित्रे घेतात. अशा छायाचित्रातील मजकूर सहज वाचता येईल, इतकी मोठी करणारे सूक्ष्मपटवाचक नावाचे यंत्र आहे. यामुळे संशोधकांची सोय झाली आहे. जेथे सूक्ष्मपटवाचक उपलब्ध आहे तेथे जगातील कोणत्याही लेखागारातील लेख त्यांचे सूक्ष्मपट घेतले असता वाचता येतात. या सुविधेमुळे संशोधकाचा वेळ, श्रम आणि पैसाही वाचतो. म्हणून मोठ्या लेखागारात जरूर असलेल्या सामग्रीचे सूक्ष्मपट घेण्यासाठी तसेच सूक्ष्मपटवाचकाची व्यवस्था केलेली असते. एवढेच नव्हे, तर काही लेखागारे कागदपत्रांच्या झेरॉक्स किंवा फोटोस्टॅट प्रती पुरवितात.

 

लेखागारात असलेल्या सामग्रीपैकी कोणती सामग्री संशोधकाला दाखवावी, याविषयी निरनिराळ्या लेखागारांत निरनिराळे नियम असतात. भारतात गुप्त सामग्री वगळून बाकीची तीस वर्षांपूर्वीची सर्व सामग्री संशोधकास पहावयास व अभ्यासास देण्यास हरकत नाही, असा संकेत आहे. यूरोपीय देशांत या दोन्ही अटी अधिक सैल केलेल्या आढळतात.

 

ऐतिहासिक कागदपत्रे जतन करण्याची व घटनांची नोंद करण्याची पद्धत ग्रीस आणि इटली या देशांत प्रथम सुरू झाली असावी. अथेन्समधील लेख इ. स. पू. ३६० मध्ये मदर ऑफ द गॉड्स या प्रार्थनामंदिरात एकत्र करून ठेवले होते. प्राचीन आणि मध्ययुगीन यूरोपातील खाजगी व्यक्तींनी अगर संस्थांनी लिहिलेले कोरीव लेख यांचे जतन रोमन व ग्रीक दोन्ही शासनांनी केले. नगरपालिकांसाठी केलेले कायदे, त्यांच्याकडील आर्थिक व्यवहाराचे अभिलेख तसेच जन्मनोंदी, दत्तकनोंदी, राजांच्या वंशावळी, मिळकती व इतर व्यवहार यांसंबंधीचे अभिलेख इ.स.५३० पासून जपून ठेवलेले आढळतात. धार्मिक संस्था, व्यक्ती किंवा अधिकारी यांना दिलेले दानलेख, दान घेणाऱ्यांच्या वंशावळी, दानभूमीचा तपशील ह्या नगरपालिका व प्रांतिक शासने यांनी जपून ठेवलेल्या आढळतात. दहाव्या व अकराव्या शतकांपासून यूरोपातील चर्चकडून पुराभिलेखांचे संरक्षण पद्धतशीर रीत्या होऊ लागले. पुष्कळशा चर्चमधील पुराभिलेखसंग्रहांत आठव्या व नवव्या शतकांतील जुने अभिलेख सापडतात. सतराव्या शतकाच्या सुरुवातीस पाचवा पोप पॉल याने प्रिव्ही व्हॅटिकन पुराभिलेखागाराची स्थापना केली, तर इटलीमध्ये ती अकराव्या शतकापूर्वीच झाली होती. इंग्लंडमधील सर्वांत जुना पुराभिलेख ११३० चा आहे. उपलब्ध अभिलेखांची पहिली सूची १३२३ मध्ये तयार झाली. सतराव्या शतकात पुराभिलेख प्रशासनावर अनेक पुस्तिका निघू लागल्या.

  

जागतिक अभिलेखागारे : इंग्लंड : इंग्लंड येथील प्रजेने राजांपासून आपले हक्क कसे मिळविले, ते तेराव्या शतकापासून ठेवलेल्या सूचींमध्ये (रजिस्टरच्या गुंडाळ्या) संक्षिप्त किंवा विस्तृत रूपात लिहिलेले आहेत. त्यांना पुरावा म्हमून कायदेशीरपणा आला होता. ज्या कागदपत्रांमुळे त्या सूची तयार झाल्या, त्या कागदांची तादृश आवश्यकता लोकांना वाटत नव्हती. तथापि हा कागदपत्रांचा संभार सारखा वाढत चालला होता. यामुळे मूळ कागदपत्रांकडे इंग्लंडमध्ये सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंत दुर्लक्ष झाले. पुढे विल्यम प्रिन याने सरकारी कागदपत्रांची व्यवस्था लावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यास आढळले की, सरकारी कागदपत्र व्हाइट टॉवरमधील सीझर चॅपलेच्या एका अत्यंत अंधाऱ्या खोलीत अस्ताव्यस्त पडले होते. ते कागद स्वच्छ करण्यासाठी लावलेली माणसे काम तसेच टाकून निघून गेली. नंतर कित्येक वर्षांनी काही कागद व्हाइट हॉलच्या दरवाज्याजवळच्या एका खोलीत अस्ताव्यस्त पडलेले आढळून आले. पण १७३२ मध्ये कॉटन ग्रंथालयाला भयंकर आग लागली. तिचे इतिवृत्त तयार झाले. त्यांत निरनिराळ्या ठिकाणी असलेले कागदपत्र आगीसारख्या एखाद्या आकस्मिक आपत्तीमुळेच नष्ट होतील असे नव्हे, तर अव्यवस्थेमुळेही नष्ट होतील, असे नमूद केले होते. १८०० मध्ये लंडनमध्ये सु. ५० ठिकाणी सरकारी कागदपत्र पडलेले होते. हे समजल्यामुळे पार्लमेंटच्या सिलेक्ट कमिटीने सरकारी कागदपत्रांविषयी चौकशी केली आणि तीसाठी सहा वेळा अभिलेख आयोग नेमले .पण प्रशासकीय दिरंगाईमुळे हाऊस ऑफ कॉमन्सने शेवटच्या अभिलेख आयोगाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली. १८३६ मध्ये त्या समितीने आपले इतिवृत्त सादर केले. त्यात तिने नमूद केले की, एके ठिकाणच्या अभिलेखागारातील कागद ओलसर हवेमुळे ओले झाले होते. काही कागद दगडी भिंतींना चिकटले होते. कागदांचे तुकडे वाळवी व कसर यांनी बहुतांशी खाऊन टाकले होते आणि कित्येक कागद नष्ट होण्याच्या अवस्थेत होते. कितीतरी कागद हात न लावण्याइतके जीर्ण झाले होते. विशेषतः कागदांच्या गुंडाळ्या न उलगडण्याच्या अवस्थेत चिकटलेल्या होत्या आणि म्हणून शेवटी पार्लमेंटने १८३८ साली सार्वजनिक अभिलेख कार्यालय कायद्याने स्थापन केले. पुढे त्याचे एक स्वतंत्र खाते बनविले. इतिहासवेत्त्यांनी अभिलेख संग्रहाचे सांस्कृतिक महत्त्व पटविण्याचा प्रयत्न केला पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही.

फ्रान्स : फ्रेंच क्रांतीच्या काळात फ्रान्समध्ये अनेक जुन्या संस्था नष्ट झाल्या. तसेच मालमत्तेचे हक्क व इतर अधिकार हेही नष्ट करण्यात आले. क्रांतीच्या आरंभीच्या काळात राष्ट्रीय सभेने एक अभिलेख संस्था स्थापन केली होती. तीमध्ये राष्ट्रीय सभेच्या हालचालींचे कागद ठेवून त्यांचे प्रदर्शन करावे, असा ती स्थापण्यामागे हेतू होता. १७९० मध्ये त्या संस्थेला राष्ट्रीय अभिलेखागार हे नाव देण्यात आले. तीमध्ये आरंभी फक्त क्रांतीनंतरचे कागदपत्र ठेवावयाचे असे ठरले होते. तत्कालीन जहाल क्रांतिकारकांच्या मनात बाराव्या-तेराव्या शतकांपासून जमलेले व सरंजामशाहीचे द्योतक असणारे सर्व कागद नष्ट करावे, असा आग्रह होता. कारण त्यांत जुन्या समाजरचनेतील हक्क व अधिकार यांची माहिती होती. पण सनातन क्रांतिकारकांना असे करणे पसंत नव्हते. त्यांचे म्हणणे असे की, आता ते कागद सार्वजनिक मालमत्ता झाल्यामुळे जपून ठेवावे व लोकांना ते अभ्यासू द्यावेत. अखेरीस हे मत गृहीत धरून १७९४ मधील एका कायद्याने राष्ट्रीय अभिलेखागाराचे क्षेत्र वाढविण्यात आले. त्यात पॅरिसमधील केंद्रीय विविध खात्यांचे अभिलेख संग्रह, प्रांतिक आणि जिल्हावार अभिलेख संग्रह, तसेच निरनिराळे व्यापारी, सामाजिक संघ, चर्चे, रुग्णालये, विद्यापीठ व सरदार घराणी यांजकडील कागदपत्र या सर्वांचा समावेश झाला. १७९६ मध्ये अभिलेख कारभारास अधिक बळकटी आली आणि त्यामुळे निरनिराळ्या शहरांतील शासकीय अभिलेखागारे त्यांच्या अखत्यारीत आली. फ्रेंच क्रांतीमुळे जुन्या संस्था कशा होत्या व नवीन संस्था अस्तित्वात कशा आल्या हे समजण्याचे अभिलेखागार हे एक महत्त्वाचे साधन आहे हे लक्षात आले.

 

अमेरिकेची संयुक्त संस्थाने : येथे १९३४ मध्ये एका कायद्याने सार्वजनिक अभिलेख कार्यालय स्थापन झाले. यापूर्वी एकोणिसाव्या शतकात सरकारने आपल्या कागदपत्रांची चांगली काळजी घ्यावी, म्हणून प्रयत्न झाले. उदा.,१८१० मध्ये काँग्रेसने नेमलेल्या एका समितीच्या ध्यानात आले की, सरकारी कागदपत्र असुरक्षित व राष्ट्राला लाजिरवाण्या अशा परिस्थितीत अव्यवस्थित पडलेले आहेत १८७७ पर्यंत लागलेल्या विविध आगींत मूल्यवान कागदपत्रे नष्ट झाली. तेव्हात्या वर्षी सार्वजनिक अभिलेखागारांची चौकशी करण्यासाठी राष्ट्राध्याक्षांनी एक आयोग नेमला. परिणामी राष्ट्राध्यक्षांनी तत्काल राष्ट्रीय अभिलेखागारांच्या स्थापनेची शिफारस केली. यामुळे पुढील दोन दशकांत अभिलेखांची अधिक चांगली व्यवस्था लावण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान १८८४ साली स्थापन झालेल्या अमेरिकी इतिहास संस्थेने राष्ट्रीय अभिलेखागार स्थापण्यविषयी फार प्रचार केला. तिने प्रथम सार्वजनिक अभिलेख आयोग स्थापन केला आणि १९१२ पर्यंत राज्य व केंद्र सरकारांच्या तसेच यूरोपमध्ये अमेरिकी इतिहासाविषयी असलेल्या अभिलेखांच्या अनेक सूचि-मार्गदर्शिका प्रसिद्ध केल्या. १९१० मध्ये काँग्रेसकडे राष्ट्रीय अभिलेखागार स्थापण्याची विनंती केली काँग्रेसने १९१३ मध्येच राष्ट्रीय अभिलेखागारांच्या जुन्या हलक्या वास्तूच्या विस्तारास संमती दिली. तथापि १९३३ पर्यंत या विस्तार विभागाची बांधणी सुरू झाली नव्हती. १९३४ मध्ये कायद्याने राष्ट्रीय अभिलेखागार अस्तित्वात आल्यानंतर सार्वजनिक अभिलेखांची चांगली देखभाल होत आहे.


पोर्तुगाल :पोर्तुगालमध्ये एकूण लहानमोठी दहा अभिलेखागारे आहेत. त्यांपैकी चार मोठी असून त्यांतील  ‘आर्कीव्हु नासिओनाल् दा तोऱ्ही दु तोम्बु’ हे राष्ट्रीय अभिलेखागार लिस्बन येथे आहे. परंतु भारताशी संबंधित बहुसंख्य कागदपत्र लिस्बन येथील ‘रपार्तिसांव् दु आर्कीव्हु ई बिब्लिऑतॅक् दु मिनिस्तॅरिउ दुश् नगॉसिउश्’ इश्त्रांजैरूश अभिलेखागारात आहेत. येथील कागद पूर्वी वसाहतींचे अभिलेखागार, राष्ट्रीय ग्रंथालयाचा परराष्ट्र-विभाग आणि लिस्बनच्या अन्य तीन संस्थांत ठेवले होते. पोर्तुगीजांच्या आशिया, आफ्रिका व दक्षिण अमेरिका या तीन  खंडांत पसरलेल्या साम्राज्यासंबंधीचे हे कागद आहेत. भारतविषयक कागद ‘कोंसेल्यु उल्त्रामारीनु’ (स्थापना १६४३-वसाहत नियामक मंडळ) या संस्थेत आहेत. त्यांतील बऱ्याच कागदांचे मूळ कागद गोव्याच्या दप्तरखान्यात आहेत पण तेथे मंडळाची टीका-टिप्पणी मिळत नाही. म्हणून ते महत्त्वाचे आहेत. सतराव्या शतकाच्या काही कागदांचे बांधीव संच असून उरलेले एका पेटीत १५० फायली यांप्रमाणे ३२ पेट्यांत ते ठेवले आहेत. नंतरच्या शतकातले बस्त्यात बांधले आहेत. आशियाच्या आणि विशेषतः भारताच्या आर्थिक इतिहासासाठी ते उपयुक्त आहेत. शिवाय पोर्तुगीजांचा इंग्रज, डच, भारतातले राजेरजवाडे यांच्याशी झालेल्या संघर्षाचा राजकीय इतिहासही त्यात आहे. गोव्याच्या चार शतकांच्या सर्व प्रकारच्या इतिहासाची साधने तेथील अभिलेखागारात आहेत त्याला पूरक असे हे कागदपत्र आहेत. साहजिकच छत्रपती शिवाजी, संभाजी, वसईची मोहीम, कोल्हापूर-सावंतवाडीसारखी गोव्याजवळची राज्ये यांची पूरक माहिती या कागदांतून मिळते. अभिलेखागारात नकला करून घेण्याची सोय आहे. आ. ईरिअ यांनी सूची छापली आहे (१९५८).एम्. ए. हेडविग् फिझलर यांच्या ‘अ सॅक्सांव् उल्त्रामारीन दा बिब्लिऑतॅक् नासिओनाल्’ (१९२८) या मार्गदर्शिकेत गोव्यातील पोर्तुगीज सत्तेच्या अभिलेखांचे विवरण आढळते.

नेदर्लंड्स : येथे एकूण अकरा लहानमोठी अभिलेखागारे असून मुख्य अभिलेखागार द हेग येथे Algemeen Rijksarchiefte’s Gravenhage या नावाचे आहे. डच ईस्ट इंडिया कंपनीचे सर्व कागदपत्र तेथे शास्त्रशुद्ध रीत्या जतन केले जातात. त्यांपैकी दोन लाखांहून जास्त पृष्ठे भारतविषयक आहेत. बहुसंख्य कागदांचे बांधलेले खंड आधुनिक डच भाषेतील सूचीसकट संशोधकासाठी खुले आहेत. सोळाव्या-सतराव्या शतकांत युरोपीयांच्या आशियातील व्यापारस्पर्धेत डच उतरले. त्यांना भारताच्या समुद्रकिनाऱ्यावर आणि प्रसिद्ध बाजारपेठांजवळ पुलकित-नागिपट्टिनम्(मद्रास किनारा), सुरत, चिन्मुरा (बंगाल), कोकणपट्टीत राजापूर-वेंगुर्ला अशा अनेक ठिकाणी वखारी उघडल्या. त्यांच्या बटेव्हिया (सध्याचे जाकार्ता-इंडोनेशिया) येथील मुख्य ठाण्याशी झालेला पत्रव्यवहार, हिशोब अहवाल यांतून भारताचा परदेशी व्यापार व अंतर्गत अर्थव्यवस्था यांबद्दल महत्त्वाची माहिती मिळते. आशियाई व्यापारात भारत यूरोपशी स्पर्धा करी. भारतीय मालवाहू जहाजे जगभर जात. औरंगजेब, मोगल सरदार, इतकेच काय छत्रपती शिवाजी, संभाजी यांचीसुद्धा व्यापारी जहाजे असत, असे दिसते. Memories Remonstranties अशा प्रकारच्या कागदांतून भारतविषयक मुख्यतः आर्थिक तसेच राजकीय आणि सामाजिक माहिती मिळते. Corte Verhaelen हे छोटे अहवाल. त्यांतले काही शंभर पृष्ठांपेक्षा मोठे आहेत. सतराव्या शतकातील बंगाल, विजयानगरचा अस्त, गोवळकोंड्याची भरभराट, मीरजुम्ला, शहाजी यांचे कार्य हे राजकीय इतिहासाचे नमुने. सतराव्या शतकाच्या अखेरीस डचांचा भारताशी संबंध संपुष्टात आल्याने पुढील कागदांचे महत्त्व उरत नाही. भाषा व लिपी या दोन्हींच्या अडचणींमुळे फारसा उपयोग झालेला नाही. एफ्. सी. डॅनव्हर्सने इंग्रजीत अनुवादलेले शिवाजीशी संबंधित कागद बाळकृष्णांच्या शिवचरित्रात आहेत. डच भाषेतील डाग रजिस्टारचे अनेक खंड आणि कोएन या डच गव्हर्नर जनरलच्या कागदांचे आठ खंड छापलेले आहेत. बाकी सामग्रीसूची…. अप्रकाशित आहेत. डच ईस्ट इंडिया कंपनीच्या सर्व कागदांचा सूक्ष्मपट भारताच्या राष्ट्रीय अभिलेखागाराने मिळविला आहे, त्यात भारतविषयक नकाशांचाअंतर्भाव नाही.

भारत : भारतात काही राज्ये पूर्णतः नव्यानेच अस्तित्वात आल्यामुळे त्यांमध्ये अभिलेखागारे अद्याप स्थापन व्हावयाची आहेत. तर काही अभिलेखागारांच्या एकापेक्षा अधिक शाखा आहेत. अशा लेखागारांची त्यांच्या शाखांच्या संख्येसह नावे पुढीलप्रमाणे: केंद्रशासन (२), उत्तरप्रदेश (२), केरळ (३), गुजरात (२), महाराष्ट्र (५), मध्यप्रदेश (५), राजस्थान (२१). बाकीच्या राज्यांत प्रत्येकी एक अभिलेखागार आहे. उपर्युक्त लेखागारे मोठी असून तेथील कागदपत्रही जुने व महत्त्वाचे आहेत. पत्रसंख्येच्या दृष्टीने राजस्थानचे बिकानेर येथील अभिलेखागार सर्वांत मोठे असून केंद्राचा क्रमांक दुसरा लागतो.

 

दिल्ली येथील राष्ट्रीय अभिलेखागारात १८५७ च्या उठावापूर्वीचे व नंतरचे असे कागदपत्रांचे दोन भाग आहेत. यांत ईस्ट इंडिया कंपनी व ब्रिटिश सरकार या दोघांचेही कागद आहेत. हे कागद मुख्यतः फार्सी, उर्दू, हिंदी, मराठी, संस्कृत, बांगला या भाषांत आहेत. पैकी फार्सी भाषेतील काही कागदपत्रांची बृहत्सूची कॅलेंडर ऑफ पर्शियनकॉरेस्पाँडन्स् या मालेच्या ११ खंडांत प्रकाशित झाली आहे. तसेच संस्कृत, हिंदी, बांगला या भाषांतील कागद प्रकाशित झाले असून मराठी भाषेतील कागदही प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. यांखेरीज या राष्ट्रीय अभिलेखागाराने फोर्ट विल्यम कॉरेस्पाँडन्स, काही यूरोपीय प्रवासवृत्ते व काही भारतीय भाषांतील कागदपत्रांच्या सूचि प्रकाशीत केल्या आहेत. या राष्ट्रीय अभिलेखागाराची भोपाळ येथे एक शाखा असून तीमध्ये पूर्वीच्या मध्य प्रांतातील काही कागद सुरक्षित ठेवले आहेत.

 

आंध्र प्रदेश : हे अभिलेखागार हैदराबाद संस्थानने सुरु केले असून ते दफ्तरे दीवानी, माल-मुलकी या नावाने प्रसिद्ध होते. हैदराबाद संस्थान शेजारच्या तीन राज्यांत विलीन झाल्यानंतर याच अभिलेखागारांस आंध्र प्रदेश राज्य अभिलेखागार असे नाव मिळाले.

 

अभिलेखागारात शाहजहानपासूनचे फार्सी. मराठी, काही उर्दू व तेलुगू कागदपत्र आहेत. या अभिलेखागाराने आजवर एक उर्दू, दहा फार्सी-इंग्रजी व चार मराठी कागदपत्रांचे खंड प्रसिद्ध केले आहेत.

 

आसाम : आसाम येथील अभिलेखागार १९२१ मध्ये स्थापन झाले असून येथे जुने कागदपत्र प्रायः नाहीत. येथील कागदपत्र १९२० नंतरची आहेत.

उत्तर प्रदेश : येथील अभिलेखागाराची सुरुवात साधारणत १७५० मध्ये अलाहाबाद येथे झाली. परंतु १८५७ पूर्वीचे कागद आगीत भस्मसात झाले. विद्यमान प्रमुख अभिलेखागार लखनौ येथे असून त्याची शाखाअलाहाबाद येथे आहे. दोन्ही अभिलेखागारांनी कागदपत्रांच्या काही सूची प्रकाशित केल्या आहेत.

ओरिसा : येथील अभिलेखागाराची स्थापना १९४८ मध्ये भुवनेश्वर येथे झाली. या अभिलेखागारात कटक, बलसोर, संबळपूर इ. विभाग आणि धैकनाल, पर्लाकिमिडी इ. संस्थाने यांचे कागदपत्र संरक्षित ठेवले आहेत.

 

कर्नाटक : येथील अभिलेखागाराची स्थापना  १८५८ मध्ये झाली. हे सध्या बंगलोर येथे विधान सौदच्या तळमजल्यावर आहे. यात फार्सी, मराठी, कन्नड या भाषांतील कागदांचा भरणा फार मोठा आहे. हे कागद मुख्यतः पूर्वीचे म्हैसूर संस्थान आणि त्याच्या लगतचे पाळेगार व नायक यांजकडील आणि अग्रहारासंबंधीचे आहे.

केरळ : येथील अभिलेखागार १९६२ मध्ये अस्तित्वात आले. याचे मुख्य कार्यालय त्रिवेंद्रम येथे असून एर्नाकुलम व कोझिकोडे येथे त्याची शाखा-कार्यालये आहेत. येथील कागदपत्र ताडपत्रे व कागद या स्वरुपांत असून ते मुख्यतः मल्याळम्, तमिळ भाषांत व क्वचित मोडी-देवनागरी लिप्यांत आहेत. यात सु. १,३०० लेख वेळुपत्रांवर लिहिलेले आहेत.

 


गुजरात : येथील अभिलेखागाराचे मुख्य कार्यालय अहमदाबाद येथे असून एक शाखा-कार्यालय बडोदे येथे आहे. अहमदाबादचे कार्यालय गुजरात राज्य स्वतंत्र झाल्यानंतर स्थापन झाले असून बडोदे येथील कार्यालय त्याच्या फार पूर्वी सयाजीराव गायकवाडांनी स्थापन केले होते. यामुळे बडोद्याच्या शाखा-कार्यालयातच अधिक जुने कागदपत्र आहेत. हे मराठी, गुजराती व इंग्रजी या तीन भाषांत असून  बडोद्याच्या कार्यालयाने तेथील कागदपत्रांचे ८ खंड मराठीत व १० खंड इंग्रजीत प्रकाशित केले आहेत.

 

गोवा, दमण, दीव : या केंद्रशासित प्रदेशाचे पणजी येथे अभिलेखागार असून ते केव्हा स्थापन झाले हे निश्चित ज्ञात नाही. येथील कागदपत्रे पोर्तुगीजांनी वसाहत स्थापनेपासून जपून ठेवलेली आहेत. त्यावेळी हे पूर्वेकडील पोर्तुगीजांचे प्रमुख स्थळ होते. पोर्तुगीजांना ऐतिहासिक कागदपत्रांचे महत्त्व चांगले माहीत होते. त्यामुळे येथे गोव्यासह आशियातील सर्व पोर्तुगीज प्रदेशांचे कागदपत्र जपून ठेवले आहेत. येथील कागद मुख्यतः पोर्तुगीज व मराठी या दोन भाषांत आणि अगदी थोडे फार्सी भाषेत आहेत. यांतील काही थोडे कागद सुटे असून इतर कागदांची कातडी बांधणीची सु. ७० हजार पुस्तके करून ठेवली आहेत. अभिलेखागाराने अशेताँश नावच्या मालेमध्ये आतापर्यंत ५ खंड प्रसिद्ध केले असून त्याशिवाय मिस्टर बेकर, फादर विकी पा. स. पिसुर्लेकर यांनी येथील कागदपत्रांचा पुरेपुर उपयोग करून ट्रीटीज, एंगेजमेंट्स अँड सनद्स या मालेत १५ खंड व पोर्तुगीजमराठाज् या मालेत ५ खंड प्रकाशित केले आहेत. पैकी पिसुर्लेकर यांच्या ग्रंथमालेची इंग्रजी मराठी रुपांतरेही प्रकाशित झाली आहेत. पेरेइरच्या एका पुस्तकाचे मराठी रुपांतरही प्रसिद्ध झाले आहे. या बांधीव पुस्तकात सोळाव्या शतकातील गोव्यामधील हिंदू समाजसंस्थेची माहिती देणारे हजारो कागद आहेत.

 

जम्मू व काश्मीर : या राज्याचे श्रीनगर येथे मुख्य कार्यालय असून जम्मू येथे शाखा-कार्यालय आहे. या अभिलेखागारात १७२४ पासूनची फार्सी, काश्मीरी, इंग्रजी या भाषांतील कागदपत्रे आहेत.

तामिळनाडू : येथील पूर्वीचे कागदपत्र प्रारंभी फोर्ट सेंट जॉर्ज येथे होते. आरंभी येथील व्यवस्थापक प्रायः इंग्रज होते. मद्रास एगमोर भागात एक स्वतंत्र इमारत बांधून तीमध्ये १९०९ साली हे सर्व कागदपत्र आणून ठेवले आहेत. मलबार व कोरोमांडल या किनाऱ्या वरील इंग्रज वखारींतील तसेच ईस्ट इंडिया कंपनीच्या वेळचे मद्रास सरकार व मद्रास इलाखा या संबंधीचे लक्षावधी कागदपत्र इथे आहेत. त्यांतील इंग्रजी कागद मुख्यतः फाईल रूपात असून तमिळ, तेलुगू, मराठी इ. भाषांतील कागद बस्त्यांच्या रूपात ठेवले आहेत. यांत शेकडो ताडपत्रावरीलही आभिलेख आहेत. पत्रप्रकाशनाच्या बाबतीत या अभिलेखागाराने आघाडी मारलेली आहे. आतापर्यंत या अभिलेखागाराने लहान-मोठी सु. २५० च्यावर पुस्तके प्रकाशित केली आहेत. प्रा. डॉडवेल व डॉ. बालिगा हे या अभिलेखागाराचे उल्लेखनीय अभिरक्षक होत.

पंजाब : पंजाबचे अभिलेखागार १९४७ मध्ये अस्तित्वात आले. फाळणीपूर्वीचे पंजाबचे लेखागार लाहोर येथे होते. विद्यमान अभिलेखागार पतियाळा येथे आहे. येथील कागदपत्रांत सिमला येथील विविध ब्रिटीश कार्यालयांचे कागदपत्र आहेत. यांशिवाय येथे जुनी चित्रे, हस्तलिखिते, शस्त्रादी वस्तू इत्यादींचा संग्रह आहे.

पश्चिम बंगाल कलकत्ता हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे राजधानीचे ठिकाण होते. त्यामुळे येथे ईस्ट इंडिया कंपनीचे सुरूवातीचे  सर्व कागद मूळ वा नक्कल स्वरूपात संग्रहीत होते. ते सर्व कागद राष्ट्रीय अभिलेखागारामध्ये नेले असून आता फक्त पश्चिम बंगालसंबंधीचे कागद येथे आहेत. ते सर्व रॉयटर्स बिल्डिंग व प्रेसिडेन्सी कॉलेजजवळील एका वास्तूमध्ये १९१३ मध्ये एकत्र केले असून त्यांना हिस्टॉरिकल रेकॉर्ड्स हे नाव दिले आहे. येथील कागदांत मुख्य भरणा बंगालसंबंधीच्या कागदांचा आहे.पूर्वीच्या ईस्ट इंडिया कंपनीचे थोडेसेच कागद येथे अविशष्ट आहेत.

 

पाँडिचेरी : येथे फ्रेंचांची वसाहत असताना पुष्कळ फ्रेंच कागद होते पण वसाहत सोडताना ते फ्रेंचांनी फ्रान्समध्ये नेल्याने तौलनिक दृष्ट्या महत्त्वाचे कागद आता येथे नाहीत. अवशिष्ट कागदांत काही फ्रेंच व तमिळ यांचा भरणा आहे. येथील फ्रेंच कागदांचे काही सूचिखंड प्रसिद्ध झाले आहेत.

 

बिहार : या अभिलेखागाराची स्थापना पाटणा येथे १९१२ मध्ये झाली. पण त्याला अभिलेखागाराचे वास्तव स्वरुप १९५४ मध्ये आले.

मध्यप्रदेश : येथील अभिलेखागाराची स्थापना १९५४ मध्ये भोपाळ येथे झाली. येथील अभिलेखागारात इंदूर, ग्वाल्हेर, देवास, रतलाम, धार, जावरा, बढवानी इ. संस्थानांचे व पूर्वीच्या मध्य प्रांतातील काही कागदपत्रांचा संग्रह ३३ हजार बस्त्यांच्या रूपात बांधून ठेवला आहे. तर इतर कागद १६ लक्ष १६ हजार फायलींच्या रूपात आहेत. जुन्या मध्य प्रांतातील लेखागाराने त्यांचे ५ इंग्रजी खंड प्रसिद्ध केले आहेत.

 

महाराष्ट्र : या राज्यात शासनाची मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद व नागपूर येथे अभिलेखागारे आहेत.

मुंबई :येथील अभिलेखागार एल्फिन्स्टन कॉलेज इमारतीच्या पश्चिम भागात आहे. हे १८२० मध्ये स्थापन झाले. यांत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने हुबळी, धारवाड, कारवार, राजापूर, ठाणे इ. ठिकाणी ज्या वखारी स्थापिल्या तेथील पत्रव्यवहार आहे. तसेच नंतरच्या काळात मुंबई, बंगाल व मद्रास हे तीन इलाखे स्थापून हिंदूस्थानातील सत्ताधीश-मऱाठे, म्हैसूरकर, निजाम, राजपूत आदींशी सत्ता संपादनासाठी कलह केले त्यासंबंधीचा व ह्या सत्ताधिशांस अंकित करून केलेल्या राज्यकारभाराचा सर्व इंग्रजी पत्रव्यवहार आहे. या अभिलेखागारात ९८,००० हस्तलिखित कागदांचे पुठ्ठा बांधणीचे ग्रंथ (फाईल्स), ४,००,९९९ हस्तलिखित फाईल्स व साध्या बांधणीचे ८०,००० छापीलग्रंथ आहेत. यांतील पहिला अभिलेख १६३० चा आहे. यांपैकी काही कागदांचा एक इंग्रजी सूचिग्रंथ प्रकाशित झाला असून एक जुनी मार्गदर्शिकाही आहे.

 

पुणे : मराठेकालीन पुराभिलेख पुण्याचे अन्यक्रामण कार्यालयात ठेविले आहेत. शिवाजी महाराजांचा दप्तरखाना रायगडवर होता. तो औरंगजेबाच्या दक्षिणेतील स्वारीत नष्ट झाल्यवर शिवकालीन सरकारी पत्रसंभार दृष्टिआड झाला. इंगजी अमदानीत पेशवे दप्तर राखण्यासाठी नवीन दगडी दुमजली इमारत बांधण्यात आली व तीत हे मराठी राज्याचे दप्तर व्यवस्थितपणे मांडण्यात आले. या दप्तरखान्यात एकूण दप्तरे ३९ हजार असून त्यांत मुख्यतः मराठी-मोडी कागद आहेत. त्यांची संख्या सु. ३½कोटी होईल. मोडी कागदपत्रांशिवाय ह्यांत फार्सी, गुजराती, हिंदी व इंग्रजी अभिलेख आहेत. ह्या दप्तरातील कागदपत्रांचे एकूण ३६ विभाग आहेत. शाहू दप्तर, पेशव्यांच्या रोजकिर्दी, घडणी, प्रांत अजमास, चिटणीशी, जमाव, सातारा महाराज दप्तर, इनाम कमिशन, पैमाश, पाहणी खर्डे,डेक्कन कमिशनर दप्तर, एजंट दप्तर, रेसिडेंसी दप्तर हे त्यांपैकी काही विभाग होत. अशा अनेक विभागांत  कागद विभागलेले असून ते विभागवार जपून ठेविले आहेत. या कागदपत्रांतून काही इतिहासोपयोगी कागदपत्र निवडून ते पुस्तकरूपाने प्रसिद्ध केले आहेत. पेशवे दप्तरातील निवडलेल्या कागदपत्रांचे (जुनी व नवी माला) सु. ५० ग्रंथ व रेसिडेंसी रेकॉर्डस् आणि डेक्कन कमिशनर्स पत्रव्यवहार यांतून निवडलेल्या कागदांचे सु. २० ग्रंथ आतापर्यंत प्रसिद्ध झाले आहेत. ह्या कागदपत्रांचे सूचिकरण चालू असून आतापर्यंत सु. चार लाख अभिलेखांचे चार वर्णनात्मक सूचिग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. याच्या दोन मार्गदर्शिकाही उपलब्ध आहेत. यांशिवाय वाड यांचे शाह-पेशवे रोजकिर्दीतील उताऱ्याचे ९ खंड, द. ब. पारसनीसांचे चार खंड व इतिहास संग्रहांतील काही प्रकरणे, अशा प्रकाशने आहेत, ती निराळीच.

 


कोल्हापूर: येथील अभिलेखागारात मराठेकालीन मराठी व फार्सी कागदांचा भरणा अधिक आहे. याचे पारसनिशी, निवडी, चिटणीशी, जमेनिशी, हुजूर खाजगी इ, विभाग आहेत. हे सर्व कागदपत्र मोडीत असून ते सु. तीन हजार दप्तरांत बांधून ठेविलेले आहेत. ह्यांत कोल्हापूर छत्रपतींचे पेशवे, पटवर्धन, सावंतवाडीकर, निजाम, पोर्तुगीज, इंग्रज, कर्नाटकचे पाळेगार यांच्याशी झालेला पत्रव्यवहार सापडतो. गगनबावडा, विशाळगड, इचलकरंजी, तोरगल, कागल आदी संस्थाने विलीन झाल्यावर त्यांच्याकडील अभिलेख ह्या दप्तरखान्यात जतन करून ठेवले आहेत. तसेच १८४४ ते १९४९ पर्यंतचे सर्व अभिलेख ह्याच कार्यालयाच्या नियंत्रणाखाली आले असून ते इतिहास संशोधनासाठी उपलब्ध आहेत. संशोधकांच्या उपयोगासाठी निवडी, पारसनिशी आणि चिटणीशी दप्तरांतील ऐतिहासिक अभिलेखांची वर्णनात्मक सूची तीन खंडांत प्रसिद्ध केली आहे. तसेच राजर्षी शाहू छत्रपतींच्या कारकीर्दींतील सु. पन्नास हजार कागदपत्रांची वर्णनात्मक इंग्रजी सूची दोन खंडांत प्रसिद्ध होत आहे.

नागपूर : येथील अभिलेख मध्य प्रदेश शासनाकडे गेल्यानंतर महाराष्ट्र शासनाने विदर्भ विभागातील कागदपत्र एकत्र आणण्यासाठी पुराभिलेखागाराची येथे स्थापना केली.

औरंगाबाद: येथे मराठवाड्यातील पुराभिलेख एकत्र आणून त्यांचे जतन होण्यासाठी मराठवाडापुराभिलेख विभागाची स्थापना केली आहे. या दोन्ही विभागात जिल्हा व तालुका पातळींवरील ऐतिहासिक अभिलेख जपून ठेवण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात वरील राज्यशासकीय अभिलेखागारांशिवाय काही ऐतिहासिक संशोधन करणाऱ्या खासगी वा निमखाजगी संस्थांनी हजारो ऐतिहासिक कागदपत्र आणि साधने जतन केली आहेत. त्यांत भारत इतिहास संशोधक मंडळ (पुणे), अहमदनगर जिल्हा वस्तुसंग्रहालय (अहमदनगर), समर्थ वाग्देवता मंदिर (धुळे), राजवाडे इतिहास संशोधन मंडळ. (धुळे), विदर्भ संशोधन मंडळ (नागपूर), गोदातीर संशोधन मंडळ (नांदेड) इ. संस्था महत्त्वाच्या आहेत. भारत इतिहास संशोधक मंडळात सु. ४०,००० पोथ्या, १५ लाख फार्सी, मोडी, मराठी इ. ऐतिहासिक कागदपत्र असून जुन्या मराठे व मुसलमान सरदारांची दुर्मिळ चित्रे आहेत. या मंडळाचे एक त्रैमासिक प्रस्तुत कागदपत्र व नवीन संशोधन यांविषयीची माहिती प्रसिद्ध करते.

नागपूर येथील विदर्भ संशोधन मंडळात अल्पसा कागदसंग्रह आहे पण धुळ्याचे राजवाडे संशोधन मंडळ आणि समर्थ वाग्देवता मंदिर या दोन ठिकाणी संख्येने व गुणांनी अधिक असे कागद आहेत. नांदेडच्या गोदातीर इतिहास संशोधन मंडळातही काही कागदपत्र आहेत.

राजस्थान : दिल्लीचे सुलतान व मोगल बादशाह यांची लेखागारे त्या काळी असली पाहिजेत पण त्यांच्या लेखागारांचा अद्यापि शोध लागलेला नाही. तथापि राजस्थानमधील बरेच राजपूत मांडलिक राजे यांची अभिलेखागारे मात्र कमीअधिक प्रमाणात ज्ञात झाली. या संस्थानांचे पूर्वज प्राय प्रथमपासूनच मोगलांचे मांडलिक व नतालग बनल्यामुळे त्यांच्या संस्थानांत सांगण्याजोगी घालमेल झाली नाही. परिणामत त्यांजकडील कागदपत्रांचा संग्रह सुरक्षित राहिला. जयपूरकर मोगलांचे सर्वांत मोठे मांडलिक असल्यामुळे मोगली दरबरात त्यांना एक विशिष्ट स्थान होते. त्यांचा वकील मोगल दरबारात नेहमीच उपस्थित असे. दरबारात जे काही घडे ते सर्व हा वकील त्या शासनाने प्रसृत केलेली अधिकृत दैनंदिन वार्तापत्रे (अखबार) आणि त्याने स्वत नक्कल करून घेतलेले वृत्तांत आपल्या माललाकडे पाठवी. याशिवाय संस्थानांसंबंधीचे हजारो कागदपत्र  संस्थानांत जपून ठेवलेले होते. हे सर्व कागद त्यांची पहिली राजधानी आंबेर व नंतरची जयपूर या ठिकाणी होते. जयपूरप्रमाणे उदयपूर, जोधपूर, बिकानेर, कोटा इ. ठिकाणी इ. ठिकाणी अशा प्रकारचे कागदपत्र आढळतात.

 

राजस्थान हे स्वतंत्र राज्य होण्यापूर्वी म्हणजे सर्व संस्थाने राजस्थआन राज्यात विलीन होण्यापूर्वी प्रत्येक संस्थानाचे स्वतंत्र अभिलेखागार होते. पण सर्व संस्थाने राजस्थान ह्या एका राज्यात विलीन झाल्यानंतर ह्या राज्याचे एक प्रचंड अभिलेखागार तयार झाले. या अभिलेखागारातील सर्व कागदपत्र एकाच अभिलेखागारात ठेवणे अशक्य झाल्यामुळे बिकानेर येथे मुख्य अभिलेखागार कार्यालय करून जयपूर, जोधपूर, कोटा इ. वीस ठिकाणी विभागीय अभिलेखागारे स्थापन करण्यात आली. या सर्व अभिलेखागारांत सु. ८० लाख बस्ते (रुमाल) व फायली  असून त्यांतील सर्व कागदपत्रांची संख्या दोन ते तीन अब्ज भरेल. मुख्य अभिलेखागारात नकला करून देणे, छायाचित्रे काढून देणे इ. सर्व व्यवस्था असून शेकडो हस्तलिखित सूची तयार केल्या आहेत. त्यांपैकी फर्माने वगैरे व वकील-अहवाल यांच्या तीन सूची प्रकाशित झाल्या असून बाकीच्या प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.एवढे मोठे अभइलेखागार भारतात दुसरे नाही.

भारतातील राष्ट्रीय अभिलेखागार आपली वार्षिके प्रसिद्ध करीत असते. तसेच इतर प्रादेशिक लेखागारेही आपली नियतकालिके प्रसिद्ध करतात. याशिवाय आर्काइव्गज ऑफ इंडिया१९१९१७५ न्युअल रिपोर्ट्स ऑफ नेशन प्रेसिडिंग्ज ऑफ द इंडियन हिस्टॉरिकल रेकॉर्ड्ज कमिशन यांमधून या अभिलेखागारांतील कागदपत्रांची सामान्य तसेच अभ्यासू वाचकांस माहिती मिळते.

आंतरराष्ट्रीय अभिलेख परिषद : सर्व देशांतील अभिलेखांचे संरक्षण, व्यवस्थापन आणि उपयोग व अभिलेखापालांच्या व्यावसायिक विकासासाठी स्थापन झालेली जगपर्सिद्ध संस्खा. ही युनेस्कोशी संलग्न असून १९४८ मध्ये स्थापन झाली. तिची वार्षिक वर्गणी राष्ट्रीय उत्पन्नानुसार७५ ते २,००० डॉलर्स (अमेरिकेन) पर्यंत असते. एप्रिल १९७८ मधील एकूण ७२९ सदस्यांपैकी १९१ देशांतील १३९ प्रमुख अभिलेखागारे आणि संस्था तिच्या सदस्य आहेत. तिच्या शाखा आग्नेय आशिया, मध्य व पूर्व आफअरिका (१९६८), वेस्ट इंडिज बेटे (१९७५), लॅटिन अमेरिकन देश (१९७६), दक्षिण व पश्चिम आशिया (यातच भारत-१९७६) व पश्चिम आफ्रिका (१९७७ या प्रदेशांत आहेत. चार वर्षांतून एकदा सर्वसाधारण सभा होते. दरवर्षी १७ वेगवेगळ्या राष्ट्राचे सदस्य असलेल्या कार्यकारिणीची सभा व अभिलेखविषयक गोलमेज परिषद भरते. संरक्षण, प्रकाशन, अभलेखपालांचे प्रशिक्षण, उद्योगधंद्यांचे अभिलेख, सक्ष्मपट यांचे यांत्रिकीकरण तसेच जागतिक इतिहास-साधनांची मार्गदर्शिका, शिक्के-मोहरे इत्यादींसाठी अलग समित्या आहेत. परिषदेचे वार्षिक (१९५१) आणि अर्धवार्षिक वार्तापत्र (१९७३) ही नियतकालिके असून समित्यांची वेगळी नियतकालिके प्रसिद्ध होतात. परिषद यूरोपीय अभिलेखागारातील अन्य खंडांची इतिहाससाधने क्रमश छापत आहे. संरक्षण, सूक्ष्मपट, इमारती, प्रशिक्षणादी विषयांवर मानक ग्रंथ लिहून घेतले जातात. जेम्स रोड्झ (अमेरिका)-अध्यक्ष जेफ्री इड (इंग्लंड) व श्रीनंदन प्रसाद (भारत)- उपाध्यक्ष हे अनुक्रमे संस्थेचे पदाधिकारी होत (१९७६-८०).

 

पहा  कोरीव लेख.

संदर्भ 1. Bhargava, K. D. An Introduction to National Archives, New Delhi, 1958. 2. Saletore, B. A. Inspection Reports … on the Central and State Records, New Delhi, 1957. 3. Schellenberg, T. R. Modern Archives  Pinciples and Techniques, Chicago, 1956. 4. Sen, S. N. Indian Historical Records Commission a Retrospect, 1919-48, New Delhi, 1948.

 

. खोबरेकर, वि. गो. महाराष्ट्रातील दप्तरखाने, मुंबई, १९६८.

 

खोबरेकर,वि.गो.खरे,ग.ह. कुलकर्णी,ना.ह.