राजपुतांचा इतिहास : मध्ययुगात राजस्थान आणि त्याच्या आसपासच्या भागात वर्चस्व प्रस्थापित करणारे बहुविध राजवंश. राजस्थानात उदयास आलेल्या राजवंशांना राजपुत्र अशी संज्ञा आहे. राजपूत हा तिचा अपभ्रंश होय. संस्कृतातील ‘राजन्य’ शब्दासारखाच राजपूत याचा क्षत्रिय या अर्थी उपयोग होतो. राजपुतांच्या वंशाविषयी विद्वानांनी भिन्न मते व्यक्त केली आहेत. टॉडच्या मते राजपूत हे मध्य आशियातील शकांचे वंशज होत. व्हिन्सेन्ट स्मिथचे मत होते, की राजपूत हे इसवी सनाच्या पाचव्या-सहाव्या शतकांत भारतात घुसलेल्या परकी टोळ्यांतून उत्पन्न झालेले गुर्जर होत. देवदत्त भांडारकरांनी असे दाखविण्याचा प्रयत्न केला, की गुर्जर हे हूणांबरोबर भारतात येऊन स्थायिक झालेले खिजर होत. चंद बरदईच्या पृथ्वीराज रासोमध्ये असे म्हटले आहे, ‘की जेव्हा पृथ्वी म्लेच्छांच्या छळाने त्रस्त झाली, तेव्हा वसिष्ठाने आपल्या होमकुंडातून परमार, चालुक्य, परिहार (प्रतीहार) आणि चाहमान या चार वीरपुरुषांना एकामागून एक उत्पन्न केले’. म्हणून या राजपूत कुलांना अग्निकुले असे म्हणतात. या गोष्टीचा अर्थ देवदत्त भांडारकरांनी असा लावला, की हे राजवंश परकी असल्यामुळे त्यांना होमहवनाने शुद्ध करून घेऊन क्षत्रिय मानण्यात आले. प्रतीहारराजे स्वतःस गुर्जर म्हणवत याचा ही त्यांनी निर्देश केला. याच्या उलट चिंतामणराव वैद्यांनी असे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला, की ही चारी कुले अस्सल क्षत्रिय जातीची होती. काही विद्वानांनी प्रतीहारांना गुर्जर म्हणण्याचे कारण ते मूळचे राजस्थानातील गुर्जरच्या प्रदेशांतून आले हे होय, असे प्रतिपादिले आहे. तेव्हा राजपुतांच्या उत्पत्तीचा प्रश्न  अत्यंत वादग्रस्त झाला आहे.

               

सातव्या शतकाच्या आरंभी राजस्थानात नवीन राज्ये उदयास आलेली दृष्टीस पडतात. भिल्लमाल आणि अबू येथे चापोत्कट (चावडा), मांडव्यपुर (मंडोर) येथे प्रतीहार, मेवाडात गुहिलपुत्र (गुहिलोत), चितोड आणि कोटा येथे मौर्य राजवंश राज्य करीत असल्याचे तत्कालीन कोरीव लेखांवरून आढळते. ७११ मध्ये अरबांनी सिंधवर स्वारी केली आणि लवकरच सर्व सिंध पादाक्रांत करून मुलतान जिंकून घेतले कनौज आणि काश्मीरला शह दिला. ७२६ च्या सुमारास सिंधचा राज्यपाल जुनैद याच्या नेतृत्वाखाली त्यांनी सौराष्ट्र, राजस्थान, माळवा आणि गुजरात या प्रदेशांवर स्वाऱ्या करून सैंधव, कच्छेल्ल, मौर्य आणि गुर्जर राजांचा उच्छेद केला आणि दक्षिणापथ जिंकण्याच्या उद्देशाने गुजरात नवसारीपर्यंत धडक मारली, पण तेथे तरुण चालुक्य वंशी अवनिजनाश्रय पुलकेशी याने त्यांच्याशी घनघोर युद्ध करून त्यांचा पुरा मोड केला आणि त्यांच्या टोळधाडीपासून दक्षिण भारताचे संरक्षण केले. सिंधमध्ये अरबांनी घातलेला धुमाकूळ आणि सौराष्ट्र, राजस्थान आणि माळवा येथे त्यांनी मिळविलेले विजय तसेच त्यांची क्रूर आणि विध्वंसक कृत्ये, बळजबरीचे धर्मपरिवर्तन आणि जनतेचा छळ ही लक्षात घेता पुलकेशीच्या या विजयाचे महत्त्व ध्यानात येईल. त्यायोगे हर्षनिर्भर होऊन बादामीच्या चालुक्य सम्राटाने पुलकेशीवर ‘दक्षिणापथसाधार’, ‘चलुक्किकुलालंकार’, ‘पृथिवीवल्लभ’ आणि ‘अनिवर्तकनिवर्तयिता’ अशा पदव्यांचा वर्षाव केला. या युद्धाचे रोमहर्षक वर्णन पुलकेशीच्या ताम्रपटात आले आहे.

               

राजस्थानातील चाप व मौर्य राजवंश या आपत्तीतून वर येऊ शकले नाहीत. पण प्रतीहार, चाहमान आणि गुहिलपुत्रांनी अरबांना लवकरच पिटाळून लावले आणि उत्तर हिंदुस्थानचे त्यांच्या अत्याचारांपासून रक्षण केले. पुढे तर त्यांनी विशाल आणि सुसमृद्ध अशी साम्राज्ये स्थापून अरबांप्रमाणेच तुर्की आणि मोगल आक्रमकांशी शतकानुशतके लढा दिला आणि स्वधर्म व स्वदेश यांचे रक्षण केले.

               

राजपुतांच्या सर्वच कुळ्या अस्सल भारतीय क्षत्रिय वर्णाच्या होत्या असे नाही. भारतात यवन, शक, पल्हव, कुशाण, हूण इ. अनेक परकी जमातींची आक्रमणे झाली, कालांतराने त्यांनी भारतीय धर्म व संस्कृती स्वीकारली आणि ते भारतीयांत मिसळून गेले. विदिशेजवळ तक्षशिलेल्या यवनराजाचा दूत हेलिओडरस याने उभारलेला गरुडध्वज आहे. त्यावरील लेखात तो आपला भागवत (भगवान विष्णूचा उपासक) असा निर्देश करतो. मनुस्मृतीत (१०,४३-४४) म्हटले आहे की कांबोज, यवन, पल्हव, दरद, खश इ. लोक पूर्वी क्षत्रिय होते. पण संस्कार न झाल्यामुळे त्यांना वृषलत्व किंवा शूद्रत्व प्राप्त झाले आहे. धार्मिक संस्कार न केल्यामुळे या परकी जाती मूळच्या क्षत्रिय असताही शुद्रत्वाप्रत गेल्या, हे मत संमत झाल्यावर ते संस्कार त्यांच्याकडून करवून घेऊन त्यांना क्षत्रियत्वाचा दर्जा प्राप्त करून देणे कठीण नव्हते आणि तसे झालेही. परकी आक्रमकांमध्ये हूण हे प्रसिद्ध आहेत. भारतात आल्यावर त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला. हूण राजा ⇨मिहिरकुल हा शिवोपासक होता. हूणांनी भारतात राज्ये स्थापल्यावर ते हळूहळू भारतीयांत मिसळून गेले आणि पुढे त्यांची गणना राजपुतांच्या श्रेष्ठ अशा कुळांत होऊ लागली. त्यांचे शरीरसंबंध भारतातील उच्च क्षत्रिय कुळांशी झाले. उदा., कलचुरी आपणास चंद्रवंशी म्हणवत. त्या कुलातील महाप्रतापी कर्णनृपतीचा विवाह हूण राजकन्या आवल्लदेवी हिच्याशी झाला होता आणि त्यांचा पुत्र यशःकर्ण हा पित्यानंतर गादीवर आला. तेव्हा हूण हे भारतीय क्षत्रियांत गणले जात होते, यात संशय नाही.

               

राजपुतांची छत्तीस कुळे आहेत, असे कान्हडदे प्रबंधात (सर्ग ३, श्लो. ३८ इ.) म्हटले आहे. पण त्यात खालील कुळांचाच नामनिर्देश आहे-चौहान, वाघेल, देवडा, सोळंकी, राठोड, परमार, बारड, हूण, हरियडा, चावडा, दोडिया, यादव, हूल, निकुंभ आणि गुहिल. याशिवाय तत्कालीन वाङ्मय आणि कोरीव लेख यांच्यावरून आणखी काही राजपूत कुळांची – उदा., भाटी, जोहिय, कच्छपघात, चंदेल्ल यांची माहिती होते. पृथ्वीराज रासोत छत्तीस नावे दिली आहेत. त्यामध्ये कलचुरी, सैन्धव इ. नावे आहेत. पण तो ग्रंथ पुष्कळ नंतरचा आहे. यातील हूणांसारखे एखादे कुल परकी असले, तरी इतर तशी आहेत असे म्हणण्यास पुरावा नाही. प्रतीहार, चाहमान (चौहान), परमार, गुहिलपुत्र यांच्या काही कोरीव लेखांत तर त्यांचे मूळ पुरुष ब्राह्मण होते असे म्हटले आहे. राजपूत राजे हिंदू धर्माचे आणि संस्कृतीचे कट्टर अभिमानी होते आणि त्यांनी त्याच्या रक्षणाकरिता प्राणही वेचण्यास कधी मागे पुढे पाहिले नाही.

               

राजपुतांनी भारताच्या इतिहासात मोठी महत्त्वाची कामगिरी बजावली. गुर्जरवंशी पहिला नागभट याने आठव्या शतकाच्या मध्याच्या सुमारास सिंधमधील मुसलमानांच्या पूर्वेकडील आक्रमणास पायबंद घालून उत्तर भारताचे त्यांच्या टोळधाडीपासून संरक्षण केले. त्याच्या वंशातील वत्सराज, दुसरा नागभट, भोज, महेन्द्रपाल इ. राजांनी उत्तर भारतात विस्तृत साम्राज्य स्थापले आणि मुसलमानांशी सतत युद्धे करून हिंदू धर्म आणि सुस्कृती यांचे रक्षण केले. प्रतीहार भोजाने सूलतानवर अनेकदा स्वारी करून ते घेण्याचा प्रयत्न केला, पण तेथील सूर्यमूर्तीच्या नाशाचा अरबांनी धाक घातल्यामुळे पुजाऱ्यांच्या विनवणीवरून त्याला परत फिरावे लागले. मुसलमानांच्या छळापासून भारताला मुक्त केल्याची द्योतक अशी ‘आदिराह’ पदवी त्याने धारण करून त्या छापाची चांदीची ‘आदिवराह द्रग्म’ नाणी पाडली होती. गुहिलोत वंशातील प्रख्यात राजा ⇨ बाप्पा रावळ याचीही अशाच कामगिरीविषयी ख्याती होती पण तत्कालीन लेख न मिळाल्यामुळे तिचे निश्चित स्वरूप सांगता येत नाही.


              

प्रतीहारांप्रमाणेच चंदेल्ल, कलचुरी आणि परमार वंशांनीही उत्तर भारतात विशाल आणि सुसमृद्ध अशी राज्ये स्थापिली, धर्म, संस्कृती, विद्या आणि कला यांना उदार आश्रय दिला आणि आपल्या प्रजेला शांती आणि समृद्धी प्राप्त करून दिली. प्रतीहार सम्राट भोज याच्या काळी सुलेमाननामक व्यापारी भारतात आला होता.  त्याने त्याच्या घोडदळाची आणि त्याच्या राज्यातील शांतता व समृद्धी यांची प्रशंसा केली आहे. [⟶ कलचुरी वंश परमार घराणे प्रतीहार घराणे].

               

सबक्तगीन याने ९७७ च्या सुमारास गझनीचे राज्य बळकावून पूर्वेस आपली सत्ता पसरविण्यास आरंभ केला. त्याला पंजाबच्या शाहीवंशी ब्राह्मण राजा जयपाल याने अटकाव केला, पण ऐनवेळी हिमवर्षावामुळे त्याला माघार घेऊन सबक्तगीनाशी तह करावा लागला. सबक्तगीनाने नंतर कुरापत काढून जयपालाच्या राज्यावर स्वारी केली. तेव्हा जयपालाने मदतीकरिता प्रतीहार सम्राटाची याचना केली. तो सम्राट आपल्या चाहमान आणि चंदेल्ल सामन्तांसह त्याच्या साहाय्यास गेला. अफगाणिस्तानात कुर्रम नदीच्या काठी घनघोर युद्ध होऊन त्यात जयपालाचा पराभव झाला. त्यानंतर जयपालाचा पुत्र आनन्दपाल याला मुहम्मदाच्या आक्रमणास तोंड द्यावे लागले. याही खेपेस त्या शाही राजाच्या हाकेस साद देऊन परमार, चंदेल्ल, चाहमान वगैरे सामन्तांच्या सेवेसह राजपाल मुहम्मदाच्या विध्वंसी आक्रमणाला पायबंद घालण्याकरिता पेशावरजवळ आनंदपालाला जाऊन मिळाला. पण ऐनवेळी शाही राजाचा हत्ती बुजून रणांगणातून बाहेर पडला आणि त्यामुळे राजपुतांच्या विशाल सैन्याचे धैर्य खचून त्यांनी युद्धात ढिलाई केली. तेव्हा मुहम्मदाने आपल्या निवडक घोडदळासहित त्यावर हल्ला केला आणि त्याची लांडगेतोड केली. ही लढाई १००८ मध्ये झाली.

               

याप्रमाणे दहाव्या-अकराव्या शतकांत भारताचे परचक्रापासून संरक्षण करण्यात राजपूत राजांनी संघशक्तीने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. दुर्दैवाने त्यांना यश आले नाही, पण शत्रूपूढे मान लवविणे त्यांच्या रक्तातच नव्हते आणि कोणी तसे केल्यास त्यांना त्याचा संताप येत असे. मुहम्मदने कनौजवर स्वारी केली, तेव्हा तेथील प्रतीहार राजा राजपाल याला राजधानीतून पळ काढावा लागला. त्याचा सामंत चंदेल्ल नृपती विद्याधर याला या भ्याडपणाची चीड येऊन त्याने आपला कच्छपघात (कच्छवाडा) सामंत अर्जुन याला राजपालावर पाठवून त्याचा शिरच्छेद करविला. पुढे मुहम्मदाने चंदेल्लांच्या प्रदेशावरच आक्रमण केले, तेव्हा विद्याधराने दग्धभूमिनीतीचा अवलंब करून त्याला हैराण केले आणि त्याला मैत्रीचा तह करण्यास भाग पाडले.

               

राजपुतांचा प्रदेश पंजाबजवळ असल्यामुळे त्यांना अनेकवार मुसलमानांच्या आक्रमणास तोंड द्यावे लागले. ११९१ ते ११९२ मध्ये मुहम्मद घोरीने स्वाऱ्या केल्या तेव्हा चाहमानवंशी पृथ्वीराजाने जोराचा प्रतिकार केला. पहिल्या स्वारीत मुहम्मदाला पराभव पावून रणांगणातून पळ काढावा लागला. दुसऱ्या खेपेस मात्र त्याने युक्तीने राजपुतांना गाफील करून त्यांच्यावर विजय मिळविला [⟶ चाहमान घराणे].

               

याप्रमाणे इसवी सनाच्या आठव्या शतकापासून बाराव्या शतकापर्यंत प्रतीहार, चंदेल्ल व चाहमान राजांनी भारतीयांचे नेतृत्व स्वीकारून परकी आक्रमणांविरुद्ध निकराचा लढा दिला. चौदाव्या ते सोळाव्या शतकांत या नेतृत्वाची माळ चितोडच्या गुहिलोतांच्या गळ्यात पडली. त्यांनीही आपली कामगिरी प्राणपणाने पार पाडली. १३०२ मध्ये अलाउद्दीन खल्जीने मेवाडवर स्वारी करून चितोडला वेढा दिला. तेव्हा गुहिलोतांच्या शिसादिया शाखेच्या लक्ष्मणसिंहाने शौर्याची पराकाष्ठा करून तो दीर्घ काळ लढविला आणि शेवटी पराजय अटळ आहे असे दिसताच, आपल्या सातही पुत्रांसह आक्रमकांशी झुंजून धारातीर्थी देह ठेवला. राजपूत स्त्रियांनी जोहार करून आपल्या पातिव्रत्याचे रक्षण केले.

               

यापुढेही मेवाडच्या गुहिलोतांना माळवा आणि गुजरातच्या मुसलमान अधिपतींशी सतत युद्धे करून आपल्या स्वातंत्र्यांचे रक्षण करावे लागले. १५२६ मध्ये मोगलवंशी बाबराने दिल्लीच्या इब्राहीम लोदीचा पानिपत येथे पराभव केल्यावर त्याला गुहिलोतवंशी राणा संगाशी निकराचा सामना द्यावा लागला. संगाने मारवाड, अंबर, ग्वाल्हेर, अजमेर आणि चंदेरी यांच्या राजपूत राजांचे नेतृत्व पतकरून खानुआ (किंवा कानवा) येथे १५२७ मध्ये बाबराशी घनघोर युद्ध केले. राजपूत जीवावर उदार होऊन लढले. इब्राहीम लोदीचा मुलगा महमूद लोदी हाही त्यांना येऊन मिळाला होता. तेव्हा एका दृष्टीने हे भारतीय राजांचे मोगल आक्रमकांविरुद्ध युद्ध होते. पण या लढाईतही राजपुतांचा पराभव होऊन आक्रमकांची सरशी झाली आणि उत्तर भारतात मोगल साम्राज्याचा पाया घातला गेला.

               

पुढे अकबराच्या काळी पुन्हा राजपुतांना मोगलांशी लढावे लागले. अकबराने १५६७ मध्ये चितोडवर स्वारी केली. राणा संगाचा पुत्र उदयसिंह किल्ला सोडून गेला पण जयमल्ल आणि पन्ना या दोन राजपूत वीरांनी तो चार महिने लढवून शत्रूची अपरिमित हानी केली आणि स्वतः धारातीर्थी पडल्यावरच शत्रूला तो काबीज करू दिला.

               

अकबराच्या कूट नीतीमुळे अनेक राजपूत राजांनी त्याचे स्वामित्व स्वीकारले आणि आपल्या मुली देऊन मोगलांशी शरीरसंबंध जोडले, पण उदयसिंहाचा मानी आणि शूर पुत्र प्रतापसिंह त्याच्यापुढे नम्र झाला नाही. अकबराशी त्याचे हळदीघाटात तुमुल युद्ध झाले. त्यात अपयश आले, तरी त्याने राजस्थानच्या दरीखोऱ्यांतून मोगलांशी झगडा चालू ठेवला. त्याच्या प्रतिकाराने अनेक राजपूत योद्ध्यांना स्फूर्ती मिळून त्यांनी मोगलांशी लढून आपले किल्ले परत मिळविले.

               

औरंगजेबाच्या काळी राजपुतांचे नेतृत्व जोधपूरचा शूर आणि धर्मनिष्ठ मंत्री दुर्गादास याच्याकडे आले. आपला अल्पवयस्क राजकुमार अजितसिंग याला पकडून मुसलमान करण्याचा औरंगजेबाचा प्रयत्न हाणून पाडण्याकरिता दुर्गादासाने राजपुतांचे संगठण केले. मेवाडचा राणा राजसिंह त्याला येऊन मिळाला. औरंगजेबाने त्यांच्यावर आपला मुलगा अकबर याला पाठविले. पण राजपूतांनी दग्धभूमिनीतीचा अवलंब करून त्याला हैराण केले. तेव्हा तो स्वतःच राजपुतांना येऊन मिळाला. शेवटी औरंगजेबाला राजपुतांशी तह करून आपले सैन्य मेवाडातून काढून घ्यावे लागले.

    


           

मेवाडने औरंगजेबाशी तह केला तरी मारवाडच्या बाल राजपुत्राचा संरक्षक शूर सेनापती दुर्गादास याने मोगलांशी झगडा चालूच ठेवला. औरंगजेब स्वतः मराठ्यांचे पारिपत्य करण्याकरिता विशाल सेनेसह दक्षिणेत गेला, तरी त्याने मारवाडच्या राठोडांचा नायनाट करण्याकरिता प्रचंड सेना देऊन मोगल सेनापतींना त्या प्रदेशावर रवाना केले. आता राजपुतांचे नेतृत्व मारवाडच्या राठोडांकडे आले होते. त्यांचा राजा अल्पवयस्क होता तरी त्यांचा सेनापती दुर्गादास, त्याचा बंधू सोनिग आणि पुत्र रामसिंग यांनी ते उत्तम प्रकारे सांभाळले. उत्तरेत राजपुतांचे हे स्वातंत्र्ययुद्ध दक्षिणेतल्या मराठ्यांच्या राजारामकालीन स्वातंत्र्ययुद्धासारखे तीस वर्षांपर्यंत चालले. दुर्गादासाच्या नेतृत्वाखाली राजपुतांनी गनिमी काव्याने सतत युद्ध चालू ठेवून मोगलांना हैराण केले. तेव्हा त्यांनाच या आपत्तीतून सुटण्याकरिता आपला कट्टर शत्रू राजपुतांना आपल्या प्रदेशांतून चौथ द्यावा लागला. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर बहादूरशाहाने १७०९ मध्ये राजपुतांशी तह करून अजितसिंहाला मारवाडचा राजा म्हणून मान्यता दिली.

               

राजपुतांच्या भिन्न भिन्न शाखांनी आपले स्वातंत्र्य टिकविण्याकरिता मोगलांशी केलेल्या दीर्घकालीन युद्धाचा हा आढावा होय. पण सर्वच राजपूत राजे मोगलांशी असे फटकून वागत होते असे नाही. उदा., अंबर (ऊर्फ जयपूर) च्या राजांनी मोगलांशी सहकार्य करून त्यांच्या साम्राज्यविस्तारास मदत केली. अकबराचा समकालीन भगवानदास याने त्याची मैत्री संपादन करून त्याला आपली मुलगी दिली. भगवानदासाच्या नंतर त्याचा पुतण्या मानसिंह याने पश्चिमेस काबूलपासून पूर्वेस आसामपर्यंतचा मुलूख मोगल साम्राज्यास जोडण्यात आपल्या शौर्याने साहाय्य केले. अकबराच्या आज्ञेने त्याने प्रतापसिंहास पकडण्याकरिता हळदीघाटात घनघोर युद्ध केले. औरंगजेबाच्या शासनकाळी त्याच्या आज्ञेने मिर्झा राजा जयसिंगाने शिवाजी महाराजांस पकडून आणण्याकरिता दक्षिणेत स्वारी केली. शिवाजीनी त्याच्या धर्मप्रीतीला आवाहन करण्याकरिता लिहिलेले पत्र प्रसिद्ध झाले आहे, पण कित्येकांच्या मते ते बनावट आहे. तथापि जयसिंहाने शिवाजींचा विश्वास संपादन करून औरंगजेबाच्या भेटीस जाण्याविषयी त्यांचे मन वळविले होते यात संशय नाही. त्याचा पुत्र रामसिंह याने आग्ऱ्यास औरंगजेबाच्या कैदेत असताना शिवाजींस साहाय्य केले, असा मुसलमान इतिहासकारांचा आरोप आहे यात तथ्य असावे.

               

यानंतरच्या काळात सवाई जयसिंह हा विशेष प्रसिद्धीस आला. त्याने जयपूरची स्थापना करून तेथे आपली राजधानी नेली. त्याच्या काळी मोगली सत्ता दुर्बळ झाली होती. त्याचा फायदा घेण्यात त्याने मराठ्यांस साहाय्य केले. पहिल्या बाजीरावाच्या आक्रमणास पायबंद घालण्याच्या कामगिरीवर त्याची नेमणूक झाली होती पण त्याने त्याच्याबरोबर एकही लढाई न लढता उलट आपल्या मुत्सद्देगिरीने माळवा प्रांत मराठ्यांस मिळवून दिला. मेवाडच्या राण्याचेही साहाय्य मिळावे म्हणून बाजीरावाने त्याच्या मुलखातून चौथ व सरदेशमुखी वसूल करण्याच्या अमिषाने मेवाडवर स्वारी केली. शिवाजी आणि बाजीराव यांच्या मनोरथाप्रमाणे राजपूत आणि मराठे यांचे ऐक्य झाले असते, तर मोगल साम्राज्य लौकरच नष्ट झाले असते, पण मेवाडच्या जगत्सिंहाने बाजीरावाला साथ दिली नाही.

               

पुढे तर राजपूत-मराठ्यांचे संबंध फारच बिघडले. राजपुतान्यात घोर यादवीला आरंभ होऊन होळकर आणि शिंदे यांनी कधी या पक्षाला तर कधी त्या पक्षाला साहाय्य करून अतोनात पैसा उकळला. त्यांच्या मुलखावर वरचेवर स्वाऱ्या करून लुटालूट केली आणि इतक्या जबर खंडण्या बसविल्या, की त्या देण्याकरिता राजपूत राजांस आपले जडजवाहीर विकून त्यांची रक्कम पुरी करून द्यावी लागली. राजपुतांच्या चारित्र्याचेही अधःपतन झाले. पूर्वी जे राजपूत आपल्या स्त्रियांच्या व कन्यांच्या शीलरक्षणार्थ त्यांच्या जोहारास संमती देत, ते मेवाडच्या राणा भीमसिंहाच्या कृष्णाकुमारीनामक कन्येच्या सौंदर्याने वेडे होऊन रणकंदन करू लागले. परिस्थिती इतकी बिघडली की राणा भीमसिंहाला कृष्णाकुमारीस विषप्राशन करवून तो संहार थांबवावा लागला. शेवटी त्याने इंग्रजांचे आधिपत्य स्वीकारावयाचे ठरविले.

               

बहुतांशी मेवाडसारखीच परिस्थिती इतरही राजपूत राज्यांत होती. म्हणून ती संस्थाने पुढीलप्रमाणे एकामागून एक इंग्रजांच्या स्वामित्वाखाली आली. कोटा २६ डिसेंबर १८१७, उदयपूर १६ जानेवारी १८१८, बुंदी १० फेब्रुवारी १८१८, किशनगढ आणि बिकानेर मार्च १८१८, जयपूर २ एप्रिल १८१८इत्यादी.

               

धार्मिक जीवन: राजपूत राजे आणि त्यांचे प्रजाजन बहुतांशी हिंदू धर्माचे अनुयायी होते. त्यांच्या उदयाच्या काळात वैदिक यज्ञयाग मागे पडून पौराणिक देवतांची पूजा प्रचलित झाली होती. हिंदू धर्माच्या सर्वसंग्राहक धोरणामुळे एकाच कुटुंबात अनेक देवतांचे भक्त असत. प्रतीहार राजे आपळा वंश लक्ष्मणापासून निघाला असे मानीत, पण त्यातील पहिला भोज हा दुर्गा भगवतीचा भक्त होता तर इतर काही आदित्योपासक होते. याशिवाय सूर्य, गजानन, रैवत यांची पूजा प्रचारात होती. मदनाचा उत्सव चैत्रशुद्ध त्रयोदशीस केला जात असे. त्याचे उल्लेख तत्कालीन संस्कृत नाटकांत आढळतात. याशिवाय कुबेर, यक्ष, राक्षस, पिशाच्च, किन्नर, गरुड, नाग इ. उपदेवतांना नवस करून सामान्यजन भजत असत.

               

यज्ञयागांचे अनुष्ठान मागे पडल्यामुळे मूर्तधार्माकडे-देवालये, वापी, कूप, तडाग इ. बांधणे, आराम उपवनादी निर्माण करणे, दानधर्म करणे याकडे जनतेचे लक्ष अधिकाधिक जाऊ लागले.

               

तांत्रिक धर्माचाही प्रसार होता. कापालिक आणि शाक्त पंथांच्या आचारविचारांचे वर्णन तत्कालीन वाङ्मयात-गौडवध काव्यात आणि उपमितिभवप्रपंचकथेसारख्या ग्रंथात येते. त्यांचे मुख्य पीठ विंध्यवासिनीचे देवालय होते.


              

राजपूत काळाच्या आरंभी बौद्ध धर्म राजस्थानात काही ठिकाणी प्रचलित होता, पण नंतर तो लौकरच नष्ट झाला. जैन धर्म मात्र चांगलाच भरभराटला. हरिभद्र, उद्योतनसूरी आणि सिद्धर्षिसूरी यांनी आपल्या ग्रंथांनी त्यात पुष्कळ सुधारणा घडवून आणल्या.

               

समाजजीवन: राजपुतान्यात शबर, किरात, खश, ओडू, भिल्ल इ. आदिवासींची बरीच वस्ती होती. मेद लोकांवरून त्यांच्या प्रदेशाला मेदपाट (मेवाड) असे नाव पडले. वाङ्मयात त्यांना म्लेंच्छ असे म्हटले आहे. हल्लीप्रमाणे चंबळ खोऱ्यात त्यांचा मोठा उपद्रव होत होता असे धोलपूरच्या शिलालेखावरून दिसते. याशिवाय मातंग, डोंब, रजक, चर्मकार इ. अत्यंत हीन स्थितीत होते, असे तत्कालीन वाङ्मयात दिसते. हिंदूंमध्ये वर्णाश्रमधर्म प्रचलित होता. शूद्रांमध्ये हलकी कामे करणाऱ्या अनेक जातींचा समावेश झाला होता. वैश्यवर्ग शेती आणि व्यापार उदीम यांमुळे समृद्ध होता. राजस्थानात माहेश्‍वरी, जायसवाल, खंडेलबाल आणि ओसवाल असे वैश्यांचे चार मुख्य वर्ग आहेत. आपण पूर्वी क्षत्रिय होतो, पण अहिंसा तत्त्वाचा स्वीकार करून मांसाहार सोडल्यामुळे आपली गणना वैश्यात होऊ लागली असे ते म्हणतात. राजपूत काळाच्या आरंभी अनुलोम विवाह प्रचलित होते. म्हणून मंडोरचे प्रतीहार, चाहमान आणि परमार या वंशांचे मूळ पुरुष ब्राह्मण होते, असे कोरीव लेखांत वर्णन आले आहे. तसेच जातिव्यवस्था लवचिक असल्यामुळे परदेशी मगांना ब्राह्मणांत स्थान मिळाले पण नंतर मुसलमानांच्या आक्रमणामुळे जातिव्यवस्था अपरिवर्तनीय झाली आणि रोटी-बेटी व्यवहारात तसेच स्पृश्यास्पृश्य विचारात अनेक निर्बंध घालण्यात आले.

स्त्रियांच्याही स्वातंत्र्यावर त्यांच्या रक्षणाच्या हेतूने अनेक निर्बंध घालण्यात आले होते तथापि स्त्रीला कुटुंबव्यवस्थेत मानाचे स्थान होते. राजपुतांनी तिच्या शीलरक्षणार्थ प्राणांची पर्वा केली नाही. स्त्रियांना पती देवाप्रमाणे पूज्य वाटे. या काळात विशेषतः क्षत्रियांच्या स्त्रिया सती गेल्याची अनेक उदाहरणे कोरीव लेखांत नमूद आहेत. राजस्थानाच्या इतिहासात स्त्रियांच्या सामुदायिक जोहाराची अनेक उदाहरणे आहेत. पडद्याची चाल प्रचारात येऊ लागली होती. धनिक वर्गात बहुपत्नीकत्वाची पद्धत होती. विधवाविवाह शूद्रांशिवाय इतर जातीत निषिद्ध होता. क्षत्रिय मांसाहारी तर वैश्य शाकाहारी होते. समराइच्चकहातील वर्णन खरे असेल, तर आठव्या शतकातही मनुस्मृतीतल्या आदेशाप्रमाणे ब्राह्मण श्राद्धाच्या प्रसंगी मत्स्यमांसाशन करीत असत. उपवास व उत्सवाचे दिवस बहुतांशी भारताच्या इतर देशांतल्याप्रमाणेच होते पण रक्षाबंधनाला विशेष महत्त्व होते. राणा संगाची विधवा राणी कर्मवती हिने मोगल बादशाह हुमायून याला राखी पाठवून गुजरातच्या बहादूरशाहाने चितोडवर स्वारी केली असता संरक्षणाची विनंती केली आणि त्यानेही तिचा आदर केला ही गोष्ट सुप्रसिद्ध आहे.

               

आर्थिक जीवन : राजस्थानात चितोड, अजमेर, जालोर, सांभर, जैसलमीर, मंडोर, अघाट इ. प्रमुख नगरे आणि सत्यपूर, भिनमाल, एकलिंगजी, जहाजपूर इ. तीर्थक्षेत्रे प्रसिद्ध होती. याशिवाय नागौर, रणथंभोर, मांडलगढ, शिरसा इ. संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाची स्थाने होती. त्यातील प्राकार (तट), परिखा (खंदक), राजमार्ग, पाटक (वॉर्ड), चतुष्क (चौक), वीथी (बाजार), देवालये, प्रासाद, प्रपा (पाणपोई) यांचे वर्णन उपमितिभवप्रपंचकथेसारख्या तत्कालीन ग्रंथात येते.

               

राजस्थानातील उत्पाद्य वस्तूंत सांभरच्या तलावातील मीठ, मेवाड, जोधपूर आणि बिकानेरच्या तांब्याच्या खाणी, जैसलमीर वगैरे ठिकाणचे संगमरवरी आणि लाल दगड यांचा प्रामुख्याने निर्देश केला पाहिजे. राजस्थानातील व्यापारी कोशल, उत्तरापथ, द्वारका इ. भारतीय प्रदेशांशीच नव्हे तर सुवर्णद्वीप (मलाया), चीन वगैरे परदेशांशीही व्यवहार करीत असत, असे कुवलयमाला, तिलकमंजरी आणि समराइच्चकहा इ. ग्रंथांतील वर्णनावरून दिसते. देशातील मार्ग चोर, लुटारू इत्यादिकांमुळे सुरक्षित नसल्यामुळे व्यापारी सार्थवाह (तांडे) जमवून प्रवास करीत. त्यांच्या समुद्रातील प्रवासाचीही वर्णने वरील ग्रंथांत येतात. इतर प्रदेशांतल्याप्रमाणे व्यापाऱ्यांच्या श्रेणी असत. त्यांना देशी म्हणत. दीनार, सुवर्ण, निष्क, पारूत्थ द्रम्म, रूपक, कार्षापण आणि काकिणी या नाण्यांची नावे कोरीव लेखांत येतात. त्यांतील पहिली तीन सोन्याची, नंतरची दोन चांदीची आणि शेवटची दोन तांब्याची होती. काही द्रम्म राजांच्या नावाने प्रसिद्ध होते. उदा., आदिवराह द्रम्म (भोज), अजयप्रिय द्रम्म, वीसलप्रिय द्रम्म इत्यादी. मुसलमानी काळात टंक व जितल नाणी प्रचारात आली.  ४८ जितलांचा चांदीचा एक तोळ्याचा द्रम्म होत असे.

               

कला आणि वाङ्मय: राजपुतांनी अनेक हिंदू व जैन देवालये बांधली आणि त्यांना शिल्पांनी भूषित केले. खजुराहो, ओसिया, अबू या ठिकाणची मंदिरे नागर (इंडो-आर्यन) वास्तुशैलीत बांधलेली असून वास्तू व शिल्पकला या दृष्टींनी प्रसिद्ध आहेत. खजुराहोची मंदिरे कामशिल्पांमुळे सुविख्यात झाली असून ते पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. राजपूत लघुचित्रशैली सतराव्या-अठराव्या शतकांत लोकप्रिय झाली. [⟶ राजपूत कला लघुचित्रण]. बाप्पा रावळने सुप्रसिद्ध एकलिंग महादेवाचे देऊळ बांधले होते. त्याच्या जवळच शिवाच्या लकुलीश अवताराचे देवालय आहे. त्याच्या पाशुपतपंथाचे राजस्थानात बरेच वर्चस्व होते. मुसलमानांपासून संरक्षण करण्याकरिता मथुरेहून कृष्णाची मूर्ती आणून नाथद्वार येथे बसविली होती. ब्रह्मदेवाची देवालये, विष्णू व शिव यांच्या मानाने कमी होती. पण त्यांमध्ये पुष्करचे अत्यंत प्रसिद्ध होते. चंदेल्लांच्या राज्यात खजुराहो येथेही ब्रह्मदेवाचे देवालय आढळले. शाकंभरी, दाधीमती या देवींची देवालये प्रसिद्ध आहेत. जैन धर्माला उदार राजाश्रय होता. त्यामुळे राजस्थानात अनेक भव्य आणि सुंदर जिनालये ओसिया, अजमेर, अबू वगैरे ठिकाणी निर्माण झाली. त्यांमध्ये वस्तुपाल आणि तेजपाल यांनी बांधलेली अबूच्या पहाडावरची अत्यंत बारीक कलाकुसरीची कामे असलेली संगमरवरी जिनालये विख्यात आहेत. त्यांनी संस्कृत, प्राकृत आणि अपभ्रंश वाङ्मयाला उत्तेजन दिले. अनेक कवी त्यांच्या आश्रयाला होते. भिनमाल येथे शिशुपालवध या संस्कृत काव्याचा कर्ता माघ हा तेथील राजाच्या आश्रयास होता. त्याच्या वंशातील माहुकाने हारमेखला हे प्राकृत काव्य आणि धाहिल याने पउमसिरिचरिउ हे अपभ्रंश काव्य रचले. जैन ग्रंथकार हरिभद्रसूरी याला पहिल्या नागभटाचा आश्रय होता. त्याचे समराइच्चकहा, धुत्तकखाण, यशोधररचित इ. संस्कृत-प्राकृत ग्रंथ प्रसिद्ध आहेत. त्याचा शिष्य उद्योतनसूरी याने ७७९ मध्ये जालोर येथे आपले कुवलयमाला हे प्राकृत काव्य लिहिले. भिल्लमालच्या सिद्धर्षिसूरी या जैन कवीने उपमितिभवप्रपंचकथा संस्कृतात लिहिली. जिनेश्वर, त्याचे जिनचंद्रादी शिष्य, आशाधर, अप्पमट्टि इत्यादींनी जैनधर्मासंबंधी उत्कृष्ट ग्रंथ लिहिले. भोज, महेन्द्रपाल इ. प्रतीहार नृपतींचा राजशेखर, आर्यक्षेमीश्‍वर इ. संस्कृत नाटककारांस आश्रय होता. राणा कुंभ स्वतः अनेक शास्त्रांत आणि कलांत प्रवीण होता. त्याने साहित्य, शिल्प, संगीत या विषयांवर अनेक ग्रंथ लिहिले व लिहवून घेतले होते. चाहमान विग्रहराजाने हरकेलि नाटिका आणि त्याचा समकवी सोमेश्‍वर याने ललितविग्रहराज नाटक लिहिले. त्याचे उत्कीर्ण शिलाखंड अजमेर येथे सापडले आहेत. तृतीय पृथ्वीराजाचा समकवी जोनराज याचे त्रुटित पृथ्वीराजविजय काव्य ऐतिहासिक दृष्ट्याही महत्त्वाचे आहे. परमारवंशी मुंज, सिंधुराज व भोज यांचा अनेक कवींना व विद्वानांना उदार आश्रय होता. मुंज स्वतः उत्कृष्ट कवी होता. भोजाचे व्याकरण, अलंकार, शिल्पशास्त्र, तत्त्वज्ञान इ. विषयांवर अनेक ग्रंथ प्रसिद्ध आहेत. नंतरच्या काळात जैनांनी अपभ्रंश या जनपदभाषेत विपुल ग्रंथरचना केली. पुढे गुजराती व राजस्थानी भाषांचा उद्गम होऊन त्यात रासा ग्रंथ रचण्यात आले. जिनालयात धार्मिक उत्सवाच्या प्रसंगी रास नामक नृत्याबरोबर ते गायिले जात म्हणून त्यांस हे नाव पडले. राजस्थानातील चारणांनीही वीरस्तुतिपर अनेक कवने रचली होती आणि रणांगणावर ती गाऊन ते योद्धयांना स्फूर्ती देत असत.

               

राजपुतांच्या ऱ्हासाची कारणमीमांसा: इसवी सनाच्या आठव्या शतकापासून सतराव्या शतकापर्यंत सु. हजार वर्षे राजपुतांनी अनेकदा परकी आक्रमणांपासून आपल्या मातृभूमीचे रक्षण केले. सुसमृद्ध साम्राज्ये स्थापिली व धर्म, विद्या आणि कला यांना उदार आश्रय दिला.

               

राजपुतांच्या पराभवाचे मुख्य कारण एकीचा अभाव हे होय. इतर भारतीय राजांप्रमाणे राजपूत राजेही सदैव एकमेकांशी युद्धे करीत असत. आठव्या शतकापासून कट्टर धर्मवेड्या मुसलमानांशी संबंध आला, तेव्हा पराजयाचे पर्यवसान धर्मपरिवर्तन, जाळपोळ, मूर्तिभंग व क्रूर कत्तली यात होऊ लागले. ते पाहूनही या राजांनी संघ स्थापून परकी शत्रूशी निकराचा सामना करण्याऐवजी आपापसांत लढाया करून परस्परांची शक्ती क्षीण करण्यात वृथा अभिमान दाखविला. उदा., घोरीच्या स्वारीच्या वेळी पृथ्वीराज चाहमानाने चंदेल्ल, परमर्दी, अबूचे परमार इत्यादिकांवर स्वाऱ्या करून त्यांचे शत्रुत्व संपादन केले आणि गाहडवाल जयचंद्राशी वैमनस्य वाढविले. परिणामतः या कठीण प्रसंगी त्याच्या साहाय्यास कोणीही आले नाही आणि घोरीने या सर्वांनाच एकामागून एक पराभूत केले.

  


             

दुसरे कारण सरंजामशाही. राज्यातील बराचसा प्रदेश सामंत व सरदार यांमध्ये विभागलेला होता. युद्धप्रसंगी सामंतांनी आपल्या सम्राटांच्या साहाय्यास जावयाचे असे पण केंद्रसत्ता दुर्बल होताच हे सरदार स्वतंत्र राज्ये स्थापण्याच्या प्रयत्नात मग्न झाले. त्यामुळे कोणतेही राज्य चिरकाल टिकत नसे.

               

तिसरे कारण गाफीलपणा, अति औदार्य आणि लष्करी डावपेचांचा अभाव. तराईच्या पहिल्या लढाईत मुहम्मद घोरीचा पराभव होऊन त्याच्या सैन्याने पळ काढला होता. तेव्हा पृथ्वीराज आक्रमक वृत्तीपासून च्युत झाला आणि परत फिरला. कदाचित हे धर्मयुद्ध होणार नाही असे त्याला वाटले असेल. याचा मुहम्मद घोरीने फायदा उठवून पृथ्वीराजाला गाफील ठेवले. तराईच्या दुसऱ्या लढाईत त्याने गाफील राजपूत सैन्यावर सूर्योदयापूर्वी दुसऱ्या बाजूने हल्ला केला. त्यावेळी पृथ्वीराज झोपला होता आणि राजपूत सैनिक आन्हिक कृत्यांत गुंतले होते. अशा परिस्थितीत त्यांचा पराभव करणे मुहम्मदाला कठीण गेले नाही. पृथ्वीराजाला पकडून त्याने त्याचा निर्दयपणे शिरच्छेद केला. चौथे कारण योग्य नायकाचा अभाव हे होय. राजपुतांच्या पडत्या काळात त्यांना धीर देऊन त्यांच्यात वीरश्री उत्पन्न करण्यास नागभट, प्रतापसिंह किंवा दुर्गादास यांसारख्या नायक उत्पन्न झाला नाही.

               

राजपुतांनी आपल्या कर्तबगारीने भारतीय इतिहासात मानाचे स्थान मिळविले आहे. त्यांनी आपल्या पराक्रमाने अरबांना सिंधमध्ये थोपवून धरले, तुर्की व मोगल शत्रूंशी दीर्घकाल झगडा करून आपले स्वातंत्र्य अबाधित राखले आणि इतरांना स्वातंत्र्ययुद्धाची स्फूर्ती दिली. त्यांनी विशाल साम्राज्ये स्थापून धर्म, विद्या आणि कला यांना उदार आश्रय दिला आणि त्यांना परमोत्कर्षांस पोचविले. त्यांनी उभारलेल्या मंदिरांनी, राजप्रासादांनी, खोदलेल्या तलावांनी, आश्रय दिलेल्या कवींच्या संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश आणि राजस्थानी ग्रंथांनी त्यांची कीर्ती चिरकाल टिकेल. भारताच्या कीर्तिशाली राजवंशांमध्ये त्यांची गणना सदैव होईल. पहा: राजपूत कला चित्रकला.

संदर्भ: 1.Majumdar, R.C. Ed.The History and Culture of the Indian People, Vols. 3 to 5, Bombay,197०.

           2.Sharma, Dasbarath, Ed, Rajastan Through the Ages, Bikaner, 1966.

           3.Tod, James, Annals and Antiquities of Rajasthan, 2 Vols, London, 1957.

           ४. गहलोत, जगदीशसिंह, राजपूतानेका इतिहास, दोन भाग, जोधपूर, १९६०.

           ५. जोशी, महादेवशास्त्री, राजस्थान, पुणे, १९६३,

          ६. देशपांडे, हरिहरराव, राजपूत राज्यांचा उदय आणि ऱ्हास, पुणे, १९६२.

मिराशी, वा. वि.