भोसले, चतुरसिंग: (? – १५ ऑगस्ट १८१८). उत्तर पेशवाईतील एक तडफदार सेनानी. त्याचे घराणे मूळ शिवाजीच्या वंशातील. मालोजी भोसल्याचा धाकटा भाऊ विठोजी याच्या खापर पणतूचा मुलगा. याचा मोठा भाऊ विठोजी सातारच्या रामराजास १७७७ मध्ये दत्तक गेला. तोच पुढे दुसरा शाहू छत्रपती (कार. १७७७-९८) म्हणून प्रसिद्धीस आला. त्यामुळे चतुरसिंग बालपणापासून राजकीय वातावरणात वाढला. दुसऱ्या बाजीरावच्या वेळी (कार. १७९५-१८१८) सातारच्या गादीची होत असलेली अवहेलना त्यास सहन झाली नाही. त्याच्या मते पेशव्यांकडून सत्ता काढून घेऊन छत्रपतीचे हात बळकट करावेत, असे होते. पुढे चतुरसिंगाने मराठी राज्याचा खरा स्वामी सातारचा राजा आहे, त्याने आपल्या हाती सर्व सत्ता घ्यावी, असा दावा मांडून तसेच सर्व मराठ्यांनी एकत्र येऊन इंग्रजांशी मुकाबला करावा, म्हणून त्याने मराठी राज्याच्या एक टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत हिंडून हा विचार प्रसृत केला तथापि नागपूरकर भोसल्यांशिवाय त्याला कोणीच फारसा प्रतिसाद दिला नाही. अखेर त्यांच्या मदतीने त्याने इंग्रजांशी असई व अशीरगड या ठिकाणी मातब्बर मुकाबला दिला परंतु इंग्रजांनी त्याचा पाडाव करून त्याला कैद केले (१८०९). या त्याच्या उद्योगास काही इतिहासाकारांनी बंडखोरी असे म्हटले आहे.

तो अत्यंत धाडसी, स्वाभिमानी व पराक्रमी होता. १८०१ मध्ये सर्जेराव घाटग्याने त्यास सरदारकी द्यावी, अशी शिफारस दुसऱ्या बाजीरावाकडे केली होती पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. त्याला दुसऱ्या बाजीराव पेशव्याचे एकूण धोरण नापसंत होते, म्हणून त्याने पुणे सोडले. पुढे यशवंतराव होळकराने जेव्हा पुणे लुटले, तेव्हा दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांची मदत घेतली (१८००). ही गोष्ट त्यास मानहानीकारक वाटली. मराठी राज्याची विस्कटलेली घडी नीट बसावी व मराठा राजमंडळाचा उत्कर्ष व्हावा, म्हणून त्याने शिंदे, होळकर, नागपूरकर भोसले आदी मातब्बर सरदारांच्या भेटी घेतल्या. त्यांची मदत मिळावी, म्हणून तो चंबळ, अजमीर, दिल्ली वगैरे भागांत फौजफाटा घेऊन गेला तथापि याच वेळी यशवंतरावास वेडाचे झटके आल्यामुळे त्याचे प्रयत्न निष्फळ झाले. दुसऱ्या शाहूच्या मृत्यूमुळे तर तो हताश झाला. पुढे काही वर्षे तो धार येथे राहिला आणि अखेर इंग्रजांशी मुकाबला करताना त्यांचा कायमचा कैदी बनला. सुमारे तेरा वर्षांचा तुरुंगवास सोसून तो तुरुंगातच मरण पावला.

संदर्भ : सरदेसाई, गो. स. मराठी रियासत, उत्तर विभाग तीन, मुंबई, १९४७.

कुलकर्णी, गो. त्र्यं.