ईजिप्त संस्कृति : उत्तर आफ्रिका खंडात ईशान्येस नाईल नदीच्या खोर्‍यात इ. स. पू. ५००० ते इ. स. ६४० च्या दरम्यान अस्तित्वात असणारी एक प्राचीन समृद्ध संस्कृती. तिचा विस्तार मुख्यत्वे नाईल नदीच्या खोर्‍यात उत्तरेकडील पहिल्या प्रपातापर्यंत व नाईलच्या त्रिभुज प्रदेशात झाला होता. या संस्कृतीने एकूण २६,००० चौ. किमी. प्रदेश व्यापला होता. डायोडोरस सिक्युलस ह्या प्राचीन लेखकाच्या मते हा प्रदेश निसर्गत:च सुरक्षित होता कारण त्याच्या दक्षिणेस अनेक प्रपात असून पूर्वेस व पश्चिमेस वाळवंट आणि उत्तरेस समुद्र आहे. साहजिकच येथील संस्कृती इतर प्राचीन संस्कृतींपासून अलिप्त राहिली. नाईल हीच ईजिप्तची अन्नदात्री आहे आणि प्रागैतिहासिक काळापासून ईजिप्तचे जीवन हिच्या भोवतीच गुंफले गेले, म्हणून त्याला नाईलची देणगी हे नाव प्राप्त झाले.

त्याकाळी तत्कालीन लोकांनी वर सांगितलेले ईजिप्तचे उच्च अथवा दक्षिण व निम्‍न अथवा उत्तर असे दोन प्रादेशिक विभाग कल्पिले होते. आरंभी राजकीय दृष्ट्याही हे दोन स्वतंत्र प्रदेश होते व त्यांच्या एकीकरणानंतर ईजिप्तचे साम्राज्य स्थापन झाले.

ईजिप्तच्या संशोधनात्मक अभ्यासाला आधुनिक काळात नेपोलियनच्या स्वारीनंतर आरंभ झाला. त्यानेईजिप्तच्या स्वारीत लष्कराबरोबर अनेक चित्रकार, सर्वेक्षक व विद्वान अभ्यासक आणले होते. त्या सर्वांनी तेथील वास्तुशिल्पांची, मूर्तींची चित्रे काढली आणि वर्णने लिहिली. ह्याशिवाय ऐकीव माहिती संग्रहित करून ठेविली. नेपोलियनच्या पराभवानंतर यांपैकी बराच मोठा भाग ब्रिटिशांच्या ताब्यात आला व यूरोपला अज्ञात अशा एका प्राचीन संस्कृतीचा परिचय झाला. साहजिकच ईजिप्तविषयक संशोधनास अठराव्या शतकात चालना मिळाली. अद्यापि हे संशोधन चालू असून नवी नवी माहिती उपलब्ध होत आहे. ईजिप्तसंबंधीच्या संशोधनास व अभ्यासास ईजिप्तविद्या असे म्हणतात. या संशोधनास रिंड व मायेट यांनी सुरुवात केली. पुढे या संस्कृतीचा सर्वांगीण अभ्यास एद्‌वार नाव्हील, गास्ताँ मास्परो, फ्लिंडर्झ पेट्री, जेम्स ब्रेस्टेट, अर्नेस्ट बज वगैरे विद्वानांनी केला. त्यांच्या कामाचा प्रमुख उद्देश थडगी, मंदिरे व प्राचीन शहरे ह्यांचे उत्खनन आणि पपायरसेवर लिहिलेल्या मजकुराचे भाषांतर करून तत्कालीन सर्वांगीण जीवनाचे समालोचन करणे हा होता.

ईजिप्तच्या प्राचीन इतिहासाची माहिती मुख्यत्वे पुढील साधनांद्वारे उपलब्ध होते : (१) प्राचीन स्मारके–उदा., प्राचीन मंदिरे, थडगी, शिलालेख, गिरिलेख इ. (२) उत्खननाद्वारे उपलब्ध झालेले अनेक प्रकारचे अवशेष (३) अभिजात प्राचीन लेखकांचे वृत्तांत. कितीतरी प्राचीन अवशेष ईजिप्तच्या कोरड्या हवेत अद्यापि टिकून राहिले आहेत. उदा., पपायरसेची दोन दोन हजार वर्षांची बाडे जशीच्या तशी टिकून आहेत. त्याचप्रमाणे मृतांचे अवशेषही उत्तम स्थितीत आहेत. लेखनाचा आरंभ होण्यापूर्वी येथे अस्तित्वात असणाऱ्या नवाश्मयुगीन व ताम्रपाषाणयुगीन समाजाची माहिती उत्खननाद्वारे मिळविण्यात आली आहे. उत्खननांतून उपलब्ध झालेल्या वास्तू व वस्तू यांवरून तसेच थडग्यांवरून व मृत्पात्रांवरून या समाजाच्या सर्वांगीण विकासाची माहिती मिळते. याशिवाय ⇨ पिरॅमिडचे गूढ उकलण्यासाठी विशिष्ट पद्धतीच्या उत्खननाचा वापर केला आहे. या प्रकारच्या संशोधनातून विसाव्या शतकात उजेडात आलेले सर्वांत प्रसिद्ध अवशेष म्हणजे ⇨ तूतांखामेनचे थडगे. या व अशा प्रकारच्या थडग्यांतून मृतांचे परलोकातील आयुष्य सुखासमाधानाने जावे, म्हणून  त्यांच्याभोवती कित्येक वस्तू पुरण्याची चाल होती शिवाय त्यांच्या नोकरचाकरांनाही त्यासोबत पुरीत. ह्या सर्वांच्या प्रतिकृतींमुळे तत्कालीन प्रगतीची कल्पना येते. पुढे ह्या वस्तूंऐवजी त्या ठिकाणी त्या त्या वस्तूंची चित्रे काढण्यात येत.

नवाश्मयुगाच्या शेवटी येथे लेखनास आरंभ झाला. हायरोग्‍लिफिक लिपीतील शेकडो लेख आज उपलब्ध झाले आहेत. त्यांपैकी बहुतेक शिलालेख असून ते मंदिरे, थडगी किंवा ऑबेलिस्क यांवर कोरलेले आहेत. यांत हायरोग्‍लिफिक, डेमॉटिक व ग्रीक या तीन लिप्यांत असणारा ⇨ रोझेटो  शिलालेख फार प्रसिद्ध आहे. या लेखावरून १८२१ मध्ये हायरोग्‍लिफिक लिपीचे वाचन शक्य झाले. त्याचे श्रेय झां फ्रांस्वा शांपॉल्याँ ह्या फ्रेंच ईजिप्तविद्या-तज्ञास व टॉमस यंग ह्या ब्रिटिश पदार्थविज्ञानशास्त्रज्ञास द्यावे लागेल. शिलालेखांशिवाय थडग्यांतील भिंतींवर लिहिलेले लेखही आहेत. या लेखांत राजांची नावे, त्यांची कुळे व तत्संबंधी माहिती मिळते. पपायरसेच्या भेंडोळ्यांवर लिहिलेले हरतऱ्हेचे ग्रंथ व नोंदी, विशेषत: इ. स. पू. १५०० नंतरच्या काळातील, मिळतात. ह्या व्यतिरिक्त हिरॉडोटस (४८४–४२४ इ. स. पू.) व दुसरा मॅनेथो (३०० इ. स. पू.) यांनी लिहिलेला इतिहासही महत्त्वाचा आहे. मॅनेथोचा मूळ ग्रंथ आज अस्तित्वात नाही. तथापि त्याच्या नंतरच्या फ्लेव्हिअस जोसेफस, ज्यूल्यस सेक्स्टस आफ्रिकेनस, युसीबिअस इ. वृत्तलेखकांनी आपापल्या ग्रंथांत त्याच्या ग्रंथातील अनेक उतारे उद्धृत केले आहेत.

राजकीय इतिहास : स्थूल मानाने ईजिप्तच्या प्राचीन इतिहासाचे अभ्यासाच्या सोयीसाठी खालीलप्रमाणे विभाग करण्यात येतात

(१) प्रागैतिहासिक काल : याचे तीन पोटविभाग : (अ) नवाश्म युग : यास फायूम अ असेही संबोधितात. याचा काळ इ. स. पू. सु. ५००० ते ४०००. यात टासियन संस्कृती अंतर्भूत होते. (आ) ताम्रपाषाणयुग : इ. स. पू. सु. ४००० ते ३६००. या बॅदारियन, मरिम्डा व अम्रेशियन संस्कृती येतात. (इ) राजवंशपूर्वयुग :इ. स. पू. सु. ३६०० ते ३२०० या काळात पूर्व गर्झियन व उत्तर गर्झियन संस्कृती उदयास आल्या.

(२) प्राचीन काळ : इ. स. पू. सु. ३२०० ते २६६० : पहिला व दुसरा राजवंश.

(३) प्राचीन साम्राज्यकाळ : इ. स. पू. सु. २६६० ते २१८० : राजवंश ३ ते ६.

(४) पहिला मध्यकाळ : इ. स. पू. सु. २१८० ते २०८० : राजवंश ७ ते १०

(५) मध्यसाम्राज्यकाळ : इ. स. पू. सु. २०८० ते १६४० : राजवंश ११ ते १३.

(६) द्वितीय मध्यकाळ : इ. स. पू. सु. १६४० ते १५७० : राजवंश १४ ते १७.

(७) नवसाम्राज्यकाळ : इ. स. पू. सु. १५७० ते १०७५ : राजवंश १८ ते २०.

(८) उत्तर साम्राज्यकाळ : इ. स. पू. सु. १०७५ ते ३३२ : राजवंश २१ ते ३०. या काळाच्या विभागणीबद्दल एकमत नाही. काही विद्वान २१ ते २५ राजवंश असा एक कालखंड मानतात व त्यानंतर सेत काळ (सव्विसावा राजवंश) आणि अस्तकाळ (राजवंश २६ ते ३०) योजतात. यांच्या कालनिश्चितीबद्दलही दुमत आहे.

(९) ग्रीक अंमल व टॉलेमी शासन : इ. स. पू. ३३२ ते ३०.

(१०) रोम व बायझंटिन यांचा अंमल : इ. स. पू. ३० ते इ. स. ६४०.

प्रागैतिहासिक काळ : या काळात इ. स. पू. ५००० च्या सुमारास ईजिप्तमध्ये आर्थिक क्षेत्रात पहिली क्रांती घडून आली. अन्न गोळा करण्याच्या अवस्थेतून मानव अन्न उत्पादन करण्याच्या अवस्थेत येऊन पोहोचला. ह्या क्रांतीला पॅलेस्टाइनपासून स्फूर्ती मिळाली असावी. त्यामुळे ठिकठिकाणी वस्ती होऊन काही राजकीय संघटना उत्पन्न झाल्या. या काळात फायूम, टासा, बॅदारी, अम्रा, मरिम्डा, गर्झा ही ठिकाणे प्रगतिपथावर होती. त्यातच लिबियातून व नंतर मेसोपोटेमियातून दुसऱ्या वंशाचे लोक येऊन मिसळले. प्रत्येक ठिकाणच्या संस्कृतीची स्वतःची अशी काही खास वैशिष्ट्ये होती. आरंभीचे लोक शेतीवर काही प्रमाणात अवलंबून असत बहुतेक शिकार, मेंढपाळी व मच्छीमारी करीत. उत्तर गर्झियन काळात शेती व मेंढपाळीवरच लोक उदरनिर्वाह करू लागले. इमर गहू व बार्ली ही मुख्य धान्ये पिकवीत. धान्य कापणीसाठी लोक गारगोट्यांची पाती व खोबणीत बसविलेले लाकडी विळे वापरीत तर शिकारीसाठी छोटे भाले व बाण वापरीत. दोहोंनाही दगडी पातीच लावलेली असत. दोन टोकांवर शेपूट असलेले फाळ हे अम्रेशियन संस्कृतीचे वैशिष्ट्य. याशिवाय दगडी गदाशीर्षे व रंगविलेली मृत्पात्रे या काळात वापरात आली असावीत.

प्राचीन काळ (आर्केइक) : इतिहासकाळाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या ईजिप्तमध्ये या काळात उत्तरेचे व दक्षिणेचे अशी दोन स्वतंत्र राज्ये होती. त्यांतील उत्तरेची राजधानी ॲलेक्झांड्रियाजवळ मेंफिस येथे होती, तर दक्षिणेची आबायडॉस येथे होती. त्यांची अनुक्रमे लाल मुकुट व पांढरा मुकुट अशी चिन्हे होती. त्यांचे एकीकरण झाल्यावर दोन्हींची चिन्हे एक झाली व एकमेकांत बसविलेले पांढरे-तांबडे मुकुट ईजिप्तचे फेअरो राजे वापरू लागले. पुढे पुन्हा हीलिऑपोलिस ह्या नगरीच्या नेतृत्वाने ही राज्ये एकसंध करण्याचा झालेला प्रयोग फारसा यशस्वी झाला नाही. दक्षिण व उत्तर अशी शकले झाली. या दोघांना पुन्हा एकछत्री अंमलाखाली आणण्याचा मीनीझ या सम्राटाने प्रयत्‍न केला व राजधानी  मेंफिस येथे हलविली. मॅनेथोच्या इतिहासात त्याचा आद्य सम्राट असा उल्लेख आढळतो.

प्राचीन साम्राज्यकाळ : तिसऱ्या घराण्याच्या राजांनी मेंफिस येथेच राजधानी ठेवली. पिरॅमिडच्या बांधकामाला येथपासूनच आरंभ होतो. म्हणून ह्यास पिरॅमिडचा काळ असेही म्हणतात. चौथ्या घराण्याचे कूफू, कॅफ्रे आणि मेंकूरे (मायसरीनस) यांनी गीझाची अनुक्रमे पहिली तीन प्रचंड पिरॅमिडे उभारली. पाचव्या घराण्याच्या राजांच्या काळात अंत:स्थ यादवी माजल्याची चिन्हे दिसतात. सहाव्या घराण्याने हा डोलारा सांभाळण्याचा यत्‍न केला. तथापि राज्याच्या अंतर्गत संघटनेत मोठाच बदल घडून येत होता. एकतंत्री सत्ता कमकुवत बनून मोठाल्या प्रांतिक प्रशासकांचे व जहागीरदारांचे महत्त्व प्रमाणाबाहेर वाढत होते. सरंजामशाही पद्धतीस यामुळे आरंभ झाला. एकीकडे अंतर्गत राजकारणात असे दूरगामी बदल घडून येत असतानाच व्यापारवृद्धीसाठी जोराचे प्रयत्‍न करण्यात आले. नाईलच्या दक्षिण प्रदेशात काही ठाणी वसविण्यात आली, मात्र ही तात्पुरतीच ठरली. पहिल्या साम्राज्यकाळाचा शेवट खालील शब्दांत एका इतिवृत्तलेखकाने वर्णिला आहे : “संपन्न माणसे देशोधडीला लागली असून कफल्लक माणसे धनाढ्य झाली आहेत. ज्यांच्या अंगावर शेलेशालू असावयाचे, ते लक्तरे घालून फिरत आहेत आणि ज्यांच्या कंबरेला धडोतेही नसे, ते उंची वस्त्रे मळवीत आहेत… हसण्याखिदळण्याचा आवाज बंद झाला असून विव्हळणे व कोल्हेकुई सर्वत्र कानावर येते.

पहिला मध्यकाळ : सात ते दहा राजवंशांच्या या काळात ईजिप्तमध्ये मध्यवर्ती सत्ता कोलमडून पडली आणि हेराक्लीऑपोलिस येथे एक आणि थीब्झ येथे दुसरे अशी दोन स्वतंत्र राज्ये निर्माण झाली. शिवाय कोणासच न जुमानणारे जहागीरदार देशभर सर्वत्र पसरले होतेच. काही काळ स्वतंत्रपणे राज्य केल्यावर थीब्झ घराण्याचा जोर पुन्हा वाढू लागला. विशेषत: मेंतूहोतेप या राजाने आपली सत्ता वाढवून इतर राज्ये खालसा केली व पुढे हेराक्लीऑपोलिसचे राज्यही जिंकले.

मध्यसाम्राज्यकाळ : अकरा ते तेरा राजवंशांतील या राजांना प्रथम ईजिप्तमध्ये शांतता व सुव्यवस्था निर्माण करता आली नाही. तथापि त्यांनी ईजिप्तचे राजकीय एकीकरण घडवून आणले. बाराव्या घराण्याच्या वेळी मध्यसाम्राज्यकाळास खरा आरंभ झाला. थीब्झ येथेच अधिकारपदावर असणाऱ्या एखाद्या पुरुषाने हे घराणे स्थापन केले असावे. त्याचा पहिलाच राजा प्रथम आमेनेमहेत याने अकराव्या घराण्याने एकत्र आणलेल्या  प्रदेशात शांतता प्रस्थापित केली आणि त्यापाठोपाठ आर्थिक सुबत्ताही निर्माण झाली. मात्रमध्यंतरीच्या काळात शिरजोर झालेल्या जहागीरदारांना जरब बसविण्याचा धीर त्याला झाला नाही. ते काम त्याचे वंशज दुसरा व तिसरा सीसॉस्ट्रिस यांनी केले. त्यांनी वेतने व जहागिरी खालसा करून सरंजामशाहीचा पायाच मोडून टाकला. अंतर्गत शांतता व सुबत्ता आल्याबरोबर पुन्हा व्यापाराच्या निमित्ताने परप्रांतांवर आक्रमणास आरंभ झाला. ईशान्येकडे सिनाई वाळवंटातील तांब्याच्या खाणी पुन्हा सुरू करण्यासाठी त्या प्रांतावर प्रथम कबजा बसविण्यात आला. पश्चिम आशियातील व्यापाराला सोयीचे होते, म्हणून पॅलेस्टाइनच्या दक्षिण भागावर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष राजकीय वर्चस्व स्थापन करण्यात आले. फिनिशियन बंदरांशी तसेच ऊगारीट राजधानीशी घनिष्ट संबंध जोडण्यात आले. पूर्वेकडे वाडी हम्मात येथून इमारतीचे दगड आणण्यासाठी मोहिमा निघाल्या. दक्षिण नाईलमधील व्यापाराला होणारा न्यूबियन लोकांचा उपद्रव बंद करण्यासाठी चार-पाच सम्राटांनी ओळीने स्वाऱ्या करून सबंध न्यूबिया ताब्यात घेतला व सरहद्दीच्या बंदोबस्तासाठी किल्ले बांधले. बाराव्या घराण्याने आपली राजधानी थीब्झ येथून मेंफिस येथे नेली. तेथे मोठी मंदिरे व प्रासाद उभारण्यात आले. कला, वाङ्‌मय व शास्त्र या सर्व क्षेत्रांत या काळामध्ये प्रगती झाली. म्हणून या काळाला अभिजात निर्मितीचा काळ मानतात. बाराव्या राजघराण्याचा व पर्यायाने मध्यसाम्राज्यकाळाचा  अस्त ईजिप्तवरील एका मोठ्या परचक्रामुळे झाला. इ. स. पू. १७८० च्या सुमारास सिरिया व पॅलेस्टाइनमधून ⇨ हिक्सॉस  लोकांनी ईजिप्तवर स्वारी केली.

द्वितीय मध्यकाळ : चौदा ते सतरा राजवंशांच्या ह्या कालावधीत ईजिप्तवर मुख्यत्वे हिक्सॉस ह्या रानटी लोकांचे वर्चस्व होते. ईजिप्शियन इतिवृत्तलेखकांनी हिक्सॉस अत्यंत रानटी लोक होते, त्यांनी जित समाजाची धुळधाण उडविली व जाळपोळ आणि लुटालूट केली असे वर्णन केले असले, तरी ईजिप्तच्या प्राचीन देवदेवता व देवस्थाने त्यांनी तशीच ठेवली. त्यांच्या काळीही कला, साहित्य यांचे प्रवाह पूर्ववत चालू राहिले. हिक्सॉस लोकांनी ईजिप्तमध्ये हत्यारे व आयुधे तयार करण्यासाठी ब्राँझचा वापर प्रथम केला. तसेच युद्धात चांगली हत्यारे असल्यानेच त्यांनी ईजिप्शियन सैन्यावर सहज विजय मिळविला. दुसरी गोष्ट म्हणजे ते घोडे जोडलेल्या रथांचा युद्धात उपयोग करीत. ती विद्या त्यांनी ईजिप्तमध्ये प्रथम आणली. या दोन विद्यांवर प्रभुत्व मिळवून ईजिप्शियन लोकांनी या परकी राजांवर अखेर विजय मिळविला. ईजिप्तच्या उत्तर भागावर हिक्सॉस अंमल काही दिवस असला, तरी इतर भागांतस्थानिक राजघराणीच राज्य करीत होती. न्यूबिया व सिरिया येथून ईजिप्तच्या सत्तेचे उच्चाटन झाले. हिक्सॉस काळाच्या शेवटी ईजिप्तचे सर्व साम्राज्य जवळजवळ लयाला गेले होते. सतराव्या घराण्याच्या राजांनी हिक्सॉस लोकांचे उच्चाटन केले. त्यातील आमोस याने सरंजामशाहीचा मोड करून एकतंत्री राज्य स्थापन केले.

नवसाम्राज्य काळ अठराव्या घराण्याचा प्रथम थटमोझ याजपासून नवसाम्राज्यकाळ सुरू होतो. पहिल्या व दुसऱ्या दोघांही थटमोझ राजांनी न्यूबियावर सत्ता पुन्हा स्थापन केली आणि सिरियात थेट युफ्रेटीसपर्यंत मजल मारून खंडणी वसूल केली. दुसऱ्या थटमोझनंतर त्याची राणी ⇨ हॅटशेपसूट हिने गादी बळकाविली. तिने आपला जन्म आमोस राणीच्या पोटीच, पण ॲमन देवापासून, झाल्याचे सांगावयास सुरुवात केली. ही कर्तबगार व राजकारणकुशल स्त्री असून तिच्या अंमलात कित्येक वर्षांत नव्हती अशी आर्थिक भरभराट झाली. थीब्झजवळ व राज्यात इतरत्र मोठमोठी बांधकामे हाती घेण्यात आली. तिचा सावत्र मुलगा व जावई तिसरा थटमोझ राजपदाची वाट पहात बरेच दिवस थांबला. शेवटी राणीचा व तिच्या साहाय्यकांचा निकाल लावून तो गादीवर आला. त्याने अनेक वर्षे राज्य केले. साम्राज्याचा हा शिल्पकार होय. याच्यानंतर आलेल्या पहिल्या आमेनहोतेपच्या कारकीर्दीत ईजिप्तची उत्तरसीमा युफ्रेटीसला जाऊन भिडली होती. दक्षिणेस न्यूबियाच्या हद्दीत पुढे तिसऱ्या प्रपाताच्याही खाली त्याचा अंमल होता. त्याच्या लष्करी मोहिमांनी ईजिप्तचा दरारा सर्वत्र वाढविला. हा साम्राज्यविस्ताराचा सुवर्णकाळ होय. यानंतर लष्करी मोहिमा काढण्याची जरूरच भासली नाही. ईजिप्तच्या साम्राज्याच्या बाहेरील ॲसिरिया, बॅबिलोनिया, हिटाइट व मितानी यांत विवाह-संबंधांनी राजनैतिक संबंध दृढ करण्याचे यत्‍न पुढे झालेले दिसतात. ह्या सुमारास दुसऱ्या व तिसऱ्या आमेनहोतेप (इ. स. पू. १४४५–१३७२) राजांनी बेदुईन, हिटाइट वगैरे टोळ्यांचा उपद्रव थांबवून एकदा तर न्यूबियाही उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्‍न केला. ह्या स्थिर राजवटीत मूर्तिकला व वास्तुकला ह्यांची भरभराट झाली. लक्सॉर, कारनॅक व थीब्झ ह्या ठिकाणी अनेक भव्य वास्तू तिसऱ्या आमेनहोतेप राजाने बांधल्या. ह्या राजावर त्याची राणी ती हिचे बरेच वर्चस्व होते. ईजिप्तमध्ये याकाळी प्रगतीची व वैभवाची सोनेरी पावले सर्वत्र उमटलेली दिसतात. पुढे त्यांचा मुलगा चौथा आमेनहोतेप हा गादीवर आला व त्याने ⇨ आक्‍नातन  हे नाव धारण केले. त्याच्या स्वत:च्या धार्मिक कल्पना भिन्न होत्या. त्याने थीब्झच्या ॲमनऐवजी हीलिऑपोलिसच्या ॲतनची उपासना प्रस्थापित करण्याचा यत्‍न केला. या धर्मक्रांतीतून उत्पन्न झालेल्या असंतोषात त्याचा व त्याच्या वारसाचा बळी पडला. फक्त राणी नेफरतीती व जावई तूतांखामेन वाचले. राणीने स्वत: राज्यपद स्वीकारण्याचा यत्‍न केला व त्याला साहाय्य व्हावे म्हणून हिटाइट राजपुत्राशी विवाहाचा बेत आखला. पण त्या राजपुत्राचे आगमन उशिरा झाले व तोपर्यंत तूतांखामेन प्रबळ झाला होता. त्याने गादी मिळवून ॲमन देवतेची पूजा पुन्हा सुरू केली व पॅलेस्टाइन-सिरियाकडे लक्ष द्यावयास सुरुवात केली. पण नऊ वर्षांतच त्याची राजवट संपून अठरावे राजघराणे संपुष्टात आले. त्यानंतर सैन्यातील एक तरुण अधिकारी पहिला रॅमसीझ हा गादीवर आला. ह्याचे घराणे एकोणिसावे. केवळ एका वर्षातच हा मेला व त्याचा मुलगा पहिला सेती याने राज्यपद स्वीकारून आक्रमक परराष्ट्रीय धोरण स्वीकारले. अरबस्तानातून पॅलेस्टाइनच्या पूर्व सीमेवर अतिक्रमण करणाऱ्या टोळ्यांचा मोड केला व दक्षिण सिरियावर आपला अंमल बसविला. याच्याच काळात सिरियावर वर्चस्व स्थापन करण्यासाठी सुरू झालेल्या ईजिप्त-हिटाइट स्पर्धेतील पहिली फेरी झडली.

⇨ दुसरा रॅमसीझ याने उत्तर सिरियाशी मैत्री संपादण्याचे प्रयत्‍न चालू ठेवून, प्रचंड युद्धाची तयारी चालू ठेवली. सिरिया, पॅलेस्टाइन या भागातील कारकेमिश-नहारिनविरोधी संघ स्थापन केला. कादेश येथील हिटाइटांशी झालेल्या घनघोर युद्धात रॅमसीझचा जवळजवळ पराभव झाला. उरलेले सैन्य घेऊन तो कसाबसा परत येऊन पोहोचला. यापुढे पंधरा वर्षे कुरबुरी चालू होत्या. शेवटी ईजिप्त व हिटाइट यांच्यात इ. स. पू. १२८० मध्ये तह होऊन उत्तर सिरियावर हिटाइट अंमल असावा व दक्षिण सिरियावर ईजिप्तचा अंमल असावा असे ठरले. रॅमसीझच्या बळापेक्षा ॲसिरियाच्या वाढत्या धोक्यामुळे हिटाइट राजे समझोत्यास तयार झाले. रॅमसीझने पुढे इ. स. पू. १२६७ मध्ये हिटाइट राजकन्येशी विवाह करून मैत्रीचे संबंध दृढतर केले. त्याच्या कारकीर्दीत ईजिप्तची आणखी भरभराट झाली. त्याने कारनॅक येथे रॅमसीझीयम नावाचे समाधिमंदिर बांधले. ह्याशिवाय लक्सॉर व ⇨ अबू सिंबेल ह्या ठिकाणी शैलमंदिरे खोदविली. गुलामगिरी व भाडोत्री सैनिक ह्यांत रॅमसीझने वाढ केली. रॅमसीझनंतर त्याचा मुलगा मीर्नीप्ता गादीवर आला. याच्या कारकीर्दीतील सर्वांत महत्त्वाची घटना म्हणजे, त्याने सिरियातील बंड मोडून लिबियन टोळ्यांचे आक्रमण परतवून लावले. ह्याच्या कारकीर्दीनंतर ईजिप्तच्या अवनतीस सुरुवात झाली. विसाव्या घराण्याच्या संस्थापकाचा मुलगा तिसरा रॅमसीझ हा मोठा कर्तबगार निघाला. याच्या कारकीर्दीतही लिबियन स्वारी झाली. तिचा मोड करून त्याने सरहद्दीच्या रक्षणासाठी पश्चिम सीमेवर ठिकठिकाणी किल्ले बांधले. पूर्व सीमेवरील फिलिस्टीन्झ टोळ्यांच्या आक्रमणास पॅलेस्टाइनमध्येच त्याने पायबंद घातला तथापि त्यांच्या पॅलेस्टाइनच्या दक्षिण किनाऱ्यावर वसाहती झाल्या. त्यामुळे हिटाइट साम्राज्याचा नाश झाला. रॅमसीझच्या कारकीर्दीत अनेक लढाया व बंडे झाली. तसेच अनेक मोठ्या इमारतींचे बांधकाम झाले आणि देवस्थानांना देणग्या मिळाल्या पण यामुळे त्याची सांपत्तिक स्थिती खालावली. सर्वत्र असंतोष पसरला. त्याविरुद्ध काही अधिकाऱ्यांनी व सेनापतींनी कट रचला. या कटाचा सुगावा युवराजाला लागला, तथापि रॅमसीझचा जीव त्याला वाचविता आला नाही. पण स्वत:च्या बाजूला काही राजनिष्ठ सेवक जमवून त्याने त्या सगळ्या कटवाल्यांना पकडले. त्यानंतर राजधानी आव्हेअरिस येथे नेण्यात आली. याचे सात वंशज गादीवर आले.

उत्तरसाम्राज्य काळ : एकवीस ते पंचवीस राजवंशांच्या या काळात ॲसिरिया प्रबळ झाला होता आणि हिटाइटांशी झालेल्या तहामुळे जी शांतता लाभली, ती ढळण्याच्या मार्गावर होती. या राजांनी ईजिप्तमधील आपले स्थान सांभाळले व काही अंशी न्यूबियावरील अंमलही टिकविला. या काळाच्या शेवटी थीब्झच्या पुरोहितांची सत्ता एवढी वाढली, की या धर्मोपदेशकांच्याच हातात राजसत्ता गेली. अशा रीतीने साम्राज्यकाळ संपला. धर्मनिरपेक्ष शासनाऐवजी प्रत्यक्ष धर्मसत्ता स्थापन झाली. या पुरोहित वंशाच्या अंमलाचा आवाका थीब्झच्या आसमंतातच मर्यादित असला, तरी लवकरच त्यांनी उत्तर ईजिप्तमधील टेनिस येथील राजघराण्याशी संधान जुळविले. यातून उत्पन्न झालेल्या विवाहसंबंधामुळे प्रथम टेनाइट वंशास दोन्ही गाद्यांचा वारसा मिळाला. त्यांनी टेनिस हीच पुढे मुख्य राजधानी केली. थोड्याच अवधीत पुन्हा फाटाफूट होऊन इ. स. पू. ९४५ मध्ये ब्यूबॅस्तिस व सेइस येथे स्वतंत्र राज्ये स्थापन झाली. ही घराणी लिबियन होती. ब्यूबॅस्तिस येथे पहिला शीशाँक गादीवर आला. याच काळात ईजिप्तच्या दुर्बलतेचा फायदा उठवून न्यूबियाने नॅपाता येथे इ. स. पू. आठव्या शतकात स्वतंत्र राज्य स्थापले. पंचविसाव्या राजवंशातील तिर्‌हेक राजाने थीब्झ येथे अनेक मंदिरे बांधली. त्याने सेनॅकरिबवर चढाई केली, पण त्याच्या वेळी मेंफिस व ईजिप्तचा काही भाग ॲसिरियाने  घेतला. ॲमन याचीच उपासना आरंभिली आणि थोड्याच अवकाशात न्यूबिया किंवा इथिओपियातील राजे ईजिप्तवर अंमल गाजवू लागले. ॲसिरियाच्या वर्चस्वाखालील सिरियन प्रांतात न्यूबियन राजांनी बंड सुरू केले, तेव्हा ॲसिरियाने ईजिप्तवर स्वारी करून हे घराणे नष्ट केले. पुन्हा एकदा ईजिप्तवर परकी आक्रमणे झाले, ते म्हणजे  नेबुकॅड्‌नेझर याचे. सव्विसाव्या घराण्यातील सेइस येथील आमेसिस, ॲप्रिएझ वगैरे राजांनी काहीकाळ शांतता प्रस्थापित केली आणि फिनिशिया व ग्रीस यांच्याशी व्यापार वाढविण्याचे प्रयत्‍न केले. ईजिप्तला भरभराटीचा काळ येणार असे दिसू लागले, परंतु पुढे काही वर्षांतच तिसऱ्या सॅमटिकच्या वेळी पुन्हा संकट कोसळले आणि परकी सत्तेच्या अंमलाखाली सबंध देश गेला.

खाल्डियन सत्तेच्या मागोमाग सबंध पश्चिम आशियाला ग्रासून टाकणाऱ्या इराणी सत्तेची लाट इ. स. पू. ५२५ मध्ये ईजिप्तपर्यंत येऊन पोहोचली. तृतीय सॅमटिकच्या वेळी कॅम्बायसीझ ईजिप्तमध्ये घुसला आणि त्याने सबंध ईजिप्त पादाक्रांत केला. त्याच्यानंतर आलेल्या डरायसने अंतर्गत बाबतीत, विशेषत: धार्मिक क्षेत्रांत, ईजिप्शियन लोकांना पूर्ण स्वातंत्र्य दिले, इतकेच नव्हे तर ॲमनचे देवालयही स्वत: उभारले. नाईल ते तांबडा समुद्र हा कालवा खोदून काही सुधारणा केल्या. यानंतरच्या झर्क्‌सीझ व आर्टक्झर्क्‌सीझ या राजांनी ईजिप्तवर करडा अंमल बसविला कारण अथेन्सच्या मदतीने इराणी फौज हाकलण्याचे कारस्थान जवळजवळ यशस्वी झाले होते. याच काळात हिरॉडोटस ईजिप्तमध्ये आला होता. त्याने तत्कालीन जीवन पाहिले, ते नमूद केले. पुन्हा एकदा ईजिप्तमध्ये बंड होऊन स्वातंत्र्य मिळाले. परंतु तिसरा आर्टक्झर्क्‌सीझ याने पुन्हा एकवार इराणी सत्ता स्थापन केली. त्याच्या नित्याच्या धोरणाला अनुसरून इराणी सम्राटांनी ईजिप्शियन प्रशासक नेमून कारभार चालविला, परंतु आचारविचार व रूढी यांत फारसे बदल केले नाहीत.

ग्रीक अंमल व टॉलेमींचे राज्य :  इ. स. पू. ३३२ मध्ये अलेक्झांडरने ईजिप्त जिंकला. आरंभी त्यानेही ईजिप्तवर प्रशासनासाठी प्रशासकच नेमले होते. त्याच्या मृत्यूनंतर साम्राज्याची वाटणी झाली. त्यात ईजिप्तचे राज्य इ. स. पू. ३०४ मध्ये टॉलेमींचे नियंत्रणाखाली गेले. टॉलेमी हे बिरुद धारण करणारे सु. पंधरा राजे येथे झाले. त्यांच्या अमदानीमध्ये ॲलेक्झांड्रिया हे मोठे व्यापारी व आर्थिक केंद्र होते. या तीनशे वर्षांच्या दीर्घ कालखंडात अनेक जुन्या मंदिरांचे जीर्णोद्धार झाले, तसेच काही नवीन मंदिरे बांधण्यात आली. टॉलेमी हे ग्रीक होते व अलेक्झांडरमुळे ईजिप्तचे सम्राट झाले तरी ते कोणत्याही परकीय सत्तेचे हस्तक वा प्रशासक नव्हते. त्यांच्या काळी ग्रीकांश संस्कृतीचा प्रभाव वाढला, तरी ते पूर्णत: ईजिप्तचेच राजे राहिले, असे त्यांच्या कारभारावरून दिसते. आपल्या राज्याच्या आर्थिक व राजकीय भरभराटीसाठी त्यांनी शक्य ते सर्व प्रयत्‍न केले. तसेच स्थानिक संस्कृतीविषयी त्यांची वृत्ती उदारच होती. टॉलेमींपैकी शेवटची व्यक्ती म्हणजे ⇨ क्‍लीओपात्रा राणी होय. हिला सीझरपासून झालेला मुलगा म्हणजे पंधरावा टॉलेमी. त्याला ऑक्टेव्हिअन याच्या हुकूमाने ठार करण्यात आले व अशा रीतीने टॉलेमींची राजवट समाप्त झाली.

रोम व बायझंटिन अंमल : इ. स. पू. ३० मध्ये ऑगस्टसने ईजिप्तवर ताबा मिळविला. त्यामुळे ईजिप्तचे स्वातंत्र्य नष्ट होऊन तो रोमन साम्राजाचा एक भाग बनला. टॉलेमींची प्रशासनव्यवस्था कायम ठेवण्यात आली, तरी त्या जागी रोमन अधिकारी नेमण्यात आले. सम्राटांनी नेमून दिलेली वार्षिक खंडणी रोमला पोहोचविणे, हेच त्यांचे मुख्य काम होते. यासाठी सर्व तऱ्हेची जुलूमजबरदस्ती करण्यात येई. शेती वा व्यापार यांद्वारे ईजिप्तचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्‍न कोणत्याच राज्यपालाने केला नाही. या सतत शोषणामुळे जमिनी ओस पडल्या व व्यापार बसला. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सेप्टीमस याने जिल्हामंडळे नेमली. पण उत्पन्न वाढीसाठी प्रयत्‍न केले नाहीत. धार्मिक व सामाजिक क्षेत्रांत ईजिप्शियन जनतेला परंपरागत चाकोरीतून जाण्याची मुभा होती. परंतु त्यांच्या देवतांची मंदिरे बांधून किंवा अन्य मार्गाने धर्मसाहाय्य करण्याचे इराणी सम्राटांसारखे कोणतेच प्रयत्‍न रोमन काळात झाले नाहीत. मात्र सांस्कृतिक दृष्ट्या रोमला जवळ असलेल्या ॲलेक्झांड्रियास पुष्कळच राजाश्रय मिळत असे. राज्यकारभारासाठी ग्रीक भाषाच कायम ठेवण्यात आली.

चौथ्या शतकात ईजिप्तचा समावेश पूर्व रोमन साम्राज्यात झाला. पश्चिम व पूर्व अशा दोन भागांत ते विभागले गेले पण राज्यकारभार पूर्वीप्रमाणे राहिला. ईजिप्तवरील बायझंटिन अंमलास सुरुवात झाली, त्याआधी ख्रिस्ती धर्माखेरीज इतर सर्व धर्मांना बंदी घालण्यात आली. काही मिशनरी लोक ख्रिस्ती धर्मप्रचारार्थ ईजिप्तमध्ये दाखल झाले. ॲलेक्झांड्रिया व सामान्यपणे उत्तर ईजिप्तमधील बऱ्याच गावांनी हा धर्म स्वीकारला. परंतु दक्षिणेकडे प्राचीन धर्मच इस्लामी आक्रमणापर्यंत अस्तित्वात होता.

रोमन साम्राज्याची ईजिप्तवरील सत्ता हळूहळू कमकुवत झाली. त्यानंतर बायझंटिन अंमलातही ह्यात विशेष फरक पडला नाही. साहजिकच या परिस्थितीमुळेच खलीफा उमर याने ईजिप्तवर स्वारी केली. ६४१ मध्ये सबंध ईजिप्त खलीफांच्या ताब्यात गेला आणि राजकीय, धार्मिक व सामाजिक क्षेत्रांत आमूलाग्र बदल झाले.

शासनव्यवस्था : प्राचीन ईजिप्तमध्ये सर्वसत्ताधारी राजेशाही अस्तित्वात होती आणि राजा हा स्वत:स ईश्वराचा अवतार मानीत असे. त्याच्या हाताखाली मुख्यप्रधान, राज्यपाल व राजकुमारांव्यतिरिक्त इतर अनेक अधिकारी असत. उत्तर आणि दक्षिण ईजिप्तमध्ये ऐक्य प्रस्थापित झाल्यावर आणि मुख्यत: नवसाम्राज्य काळामध्ये सबंध देशभर एकाच प्रकारची प्रशासनव्यवस्था अस्तित्वात होती. तिचे नोम्स (प्रांत वा मोठे जिल्हे), नगरे, खेडी आणि मोठाल्या जहागिरी असे सोयीस्कर रीत्या भाग पाडले होते. तत्कालीन शासनाची कर गोळा करणे, कर भरणे, मोठे सैन्य ठेवणे व इमारती बांधणे ही महत्त्वाची कामे होती. आणखी महत्त्वाचे काम म्हणजे नाईल नदीच्या पाण्याचे कालव्यांच्या द्वारे योग्य वाटप करून कालव्यांची दुरुस्ती व कालव्यातील गाळ काढणे. साम्राज्यविस्ताराबरोबर उत्पादन आणि व्यापार वाढला. व्यापारी, त्यांचे लमाणी तांडे वा नौका यांचे रक्षण करणे व त्यासाठी जकात वसूल करणे, हीही पुढे शासनाचीच कामे झाली. वर सांगितलेले प्रशासकीय विभाग, एका खाली एक असे असत म्हणजे सर्वांत वर राज्यशासन, त्याखाली प्रांतिक वा जिल्हाशासन आणि त्याही खाली नगर वा ग्रामशासन असा क्रम होता. प्रवासाच्या साधनांच्या अभावी स्थानिक शासनयंत्रणा खूपच स्वातंत्र्य उपभोगू शके. शासनयंत्रणेच्या अग्रभागी उत्तर व दक्षिण ईजिप्तचा राजा असे. हा परमेश्वराचा (रेचा) पुत्र. तसेच मुख्य साहाय्यकर्ता म्हणजे प्रधान. सर्व प्रांतिक प्रशासकांवर लक्ष ठेवणे हे ह्याचे मुख्य काम असले, तरी राजाचे सर्व अधिकार त्याला गाजविता येत. प्रांतांवरील बहुतेक राज्यपाल हे कुमार असत. मुख्य न्यायाधीशाचे तसेच कोषाध्यक्षाचे काम प्रधानाकडेच असे. सर्व बांधकामावर त्याची देखरेख असे. त्याला जसे कायदेकानूंचे उत्तम ज्ञान, तसा राजकारणाचा उत्तम अनुभवही लागे. आरंभीच्या काळात राजघराण्यातीलच एखाद्या व्यक्तीला मुख्य प्रधानाच्या जागेवर नेमण्यात येत असे. यानंतर काही काळ ते पद वंशपरंपरेने चालत राहिले. मात्र राज्याचा पसारा वाढत गेल्यावर लायकीप्रमाणे निरनिराळ्या माणसांना या पदावर नेमण्यात येऊ लागले. तिसऱ्या थटमोझच्या काळापर्यंत सबंध राज्याला फक्त एकच मुख्य प्रधान होता. परंतु त्याच्या कारकीर्दीत उत्तर व दक्षिण विभागांसाठी दोन स्वतंत्र मुख्य प्रधान नेमण्यात येऊ लागले. त्यांचे अधिकार पूर्वीच्या मुख्य प्रधानाइतकेच विस्तृत होते. या प्रधानांच्या हाताखाली निरनिराळे खातेप्रमुख नेमलेले असत. या मध्यवर्ती शासनाचे हुकूम अंमलात आणण्याचे काम प्रांताधिकाऱ्यांकडे असे. ईजिप्तमध्ये नाणी अथवा चलनव्यवस्था नसल्यामुळे कर आणि जकाती मालाच्या स्वरूपात गोळा करीत. पगारवाटपही मालाच्या स्वरूपातच करावे लागे. जमा झालेला हा कर साठवून ठेवण्यासाठी राज्यात जिकडेतिकडे मोठाली कोठारे असत. सर्व प्रकारच्या आर्थिक व सामाजिक व्यवहारांचे नियंत्रण करणारे कायदे अस्तित्वात असल्यामुळे आणि या कायद्यांची अंमलबजावणी करणारी अनेक न्यायालये असल्यामुळे राज्य कारभार अत्यंत गुंतागुंतीचा असे. ही सर्व यंत्रणा सुरळीत चालू ठेवण्यासाठी सर्व व्यवहारांची कागदोपत्री नोंद करण्याची प्रथा होती. स्वाभाविकच आजच्यासारखाच लेखनिकांचा प्रचंड ताफा कारभारासाठी लागे आणि आजच्यासारखाच पांढरपेशा व्यवसाय इतरांपेक्षा कसा श्रेष्ठ आहे, हे दाखविणारी वचने लिहून ठेवण्याचा मोह तत्कालीन लेखकांनीही आवरत नसे.

ज्या ज्या वेळी राजसत्ता ही प्रबळ असे आणि राजा कारभारात सतत भाग घेई, त्या त्या वेळी ही यंत्रणा सुरळीतपणे काम करीत असे. परंतु एरव्ही ठिकठिकाणचे जहागीरदार व देवस्थानांचे वतनदार मध्यवर्ती सत्तेला जुमानीत नसत.

टॉलेमींच्या काळात प्रांतिक प्रशासकांची सत्ता मोठी असे. आपापल्या जिल्ह्याचे ते राजेच असत. रोमन काळामध्ये सर्वसामान्य लोकांच्या हितसंबंधांकडे अथवा समाजाच्या आर्थिक समृद्धीकडे लक्ष न देता केवळ कर आणि जकात यांची वसुली यांवरच या जिल्हाधिकाऱ्यांनी भर दिला. यांतून उत्पन्न झालेल्या हलाखीच्या स्थितीला तोंड देण्यासाठी रोमन सम्राट ऑगस्टस याने जिल्हामंडळे नेमली. परंतु त्या त्या जिल्ह्यावरील खंडणीचे ओझे कमी न केल्यामुळे याचा काहीही फायदा झाला नाही. रोमन साम्राज्याच्या काळात प्राप्त झालेली अवकळा ईजिप्तच्या आर्थिक जीवनावरही दिसून येते.

लोक व समाजजीवन : प्राचीन ईजिप्तमध्ये सु. आठ ते दहा लाख लोक रहात असावेत, असे इतिहासज्ञांचे मत आहे. त्यांपैकी बहुतेक वस्ती नाईल नदीच्या काठी होती. ईजिप्शियन लोक हे काळे, बुटके आणि किरकोळ शरीरयष्टीचे असावेत. पुढे जसेजसे त्यांच्यात आशिया व आफ्रिका खंडांतून आलेले लोक, विशेषत:निग्रो मिसळले, तसतसा त्यांचा मिश्र समाज निर्माण झाला. ईजिप्शियन समाजाचे चार वर्ग पडतात : (१) राजे व अमीर-उमराव, (२) कलाकार, व्यापारी व कारागीर, (३) कामगार आणि (४) गुलाम. सैन्याचा एक स्वतंत्र वर्ग होता आणि ते सैन्य प्रशिक्षण घेणारे धंदेवाईक असे. ईजिप्तमध्ये जातिव्यवस्था किंवा वर्गव्यवस्था अस्तित्वात नव्हती. एखादा अत्यंत गरीब आपल्या कर्तृत्वाने वरची जागा किंवा स्थान मिळवण्यास योग्य ठरे.

प्राचीन ईजिप्शियन मिश्र भाषा बोलत. त्यात सेमिटिक व हॅमिटिक भाषासमूहातील शब्द असत. तिचे उच्चार कसे होते, ह्याविषयी काही माहिती नाही. तथापि ही भाषा हजार-दीडहजार वर्षांपूर्वी नष्ट झाली. पुढे ईजिप्शियन लोकांनी हायरोग्‍लिफिक नावाची लिपी रूढ केली. तिचे हिअरेटिक व डेमॉटिक असे दोन भाग पुढे पडले. त्यांचे वरील लिपीतील वाङ्‌मय आज उपलब्ध झाले आहे. प्राचीन संस्कृतीच्या अवशेषांत सापडलेल्या कित्ते व खर्ड्यांवरून त्यावेळची शिक्षणव्यवस्था कशी असावी ते दिसते. अर्थात ही शिक्षणव्यवस्था धर्मगुरूकडेच असे आणि बहुतेक पाठशाळा मंदिरांच्या आवारांतच असत. येथे मृत्पात्रांवर अक्षरे घोटलेली दिसतात. त्यावेळच्या पाट्यांत पुढे प्रगती झालेली दिसून येते. विद्यार्थी शिक्षणात जसा पुढे जाईल, त्याप्रमाणे त्यास कागद (पपायरसे), शाई इ. सामग्री मिळे. शिक्षण, अध्यापक व विद्यार्थी, त्यांचे अभ्यास, त्यांची शिस्त यांविषयी अप्रत्यक्षपणे माहिती देणारे अनेक उतारे प्राचीन पपायरसेमध्ये दिसून येतात. संथा देणाऱ्या गुरूंची चित्रे भित्तिचित्रांत पहावयास सापडतात.

ईजिप्शियन हे कुटुंबवत्सल लोक होते. सुरुवातीस कुटुंबाचा प्रमुख पुरुष हाच होता, पण पुढे स्त्रियांना महत्त्व प्राप्त झाले व मातृ-पितृसत्ताक अशी दुहेरी कुटुंबपद्धती अस्तित्वात आली. स्त्रियांना संपत्तीमध्ये सारखाच हक्क प्राप्त झाला. मुलगे हे आपल्या पूर्वजांच्या थडग्यांची निगा ठेवीत. ईजिप्शियन समाजात रक्तशुद्धतेसाठी सख्ख्या बहिणीशी विवाह करण्यास परवानगी होती एवढेच नव्हे तर काहींनी मुलींशीही विवाह केलेले आढळतात. ह्याशिवाय बहुपत्‍नीकत्वही रूढ होते. ईजिप्तच्या बहुतेक फेअरोंनी आपल्या बहिणींशीच विवाह केलेले दिसून येतात. ईजिप्तमध्ये शिकार करणे, मासे पकडणे हे महत्त्वाचे खेळ समजत. त्यांची काही भित्तिचित्रे सापडली आहेत. याशिवाय व्यायामी खेळ, सेनित (एक विशिष्ट प्रकारचा खेळ) इ. खेळही खेळत. इ. स. पू. १५०० नंतर रथांच्या शर्यती आल्या. काही नृत्यप्रकारही रूढ होते, परंतु त्यांस धार्मिक बैठक होती.

टासा व मरिम्डा येथील घरे बांबूंची, लव्हाळ्याची, कुडाची आणि मातीची असत. उत्तर गर्झा काळापर्यंत सर्वत्र अशाच झोपड्या उभारीत. या कधी गोल तर कधी लंबगोल असत. अशा अनेक झोपड्या व मध्यभागी सामुदायिक धान्य कोठारे ही खेडेगावांची सर्वसाधारण रचना असे. गर्झा काळात कच्च्या विटांच्या बांधकामास आरंभ झाला असावा. या काळातील मेसोपोटेमियाशी संबंध दर्शविणाऱ्या आहत मुद्रा, खंजिराची हस्तिदंती मूठ इ. वस्तू सापडल्या आहेत. नंतरच्या काळात गरीब ईजिप्शियनांची घरे साधी कच्च्या विटांची असत, तर श्रीमंतांची भाजलेल्या विटांची व लाकडाची असत. श्रीमंतांच्या घरांत कलाकुसरीचे फर्निचर असे. त्यांच्या घरासमोर बागबगीचेही असत.

हे लोक प्रथम कातडी वस्त्रप्रावरणे तयार करीत तथापि लव्हाळ्याच्या चटया विणण्याची विद्या त्यांना ज्ञात होती. त्यामुळे पुढे त्यांना अंबाडी-तागाचे कापड विणण्याची कला आत्मसात करण्यास फार काळ लागला नसावा. या चटया जमिनीत केलेल्या खड्ड्यांना अस्तरासारख्या लावून ते धान्याची साठवण करीत. हातांनी तयार केलेली मृत्पात्रे टासा काळापासूनची उपलब्ध झाली आहेत. परंतु बॅदारी व अम्रा येथेच मुख्यत्वे ह्या विद्येची जास्त प्रगती झालेली दिसते. बॅदारीची मृत्पात्रे पातळ व सुबक आहेत, तर अम्रा येथील भांड्यांत दगडी भांड्यांचा जास्त भरणा आढळतो. त्यावरून दगडी भांडी तयार करण्याची कला परिणत अवस्थेला पोहोचली होती. मरिम्डा येथे या आधी दगडी भांडी प्रचलित होती, परंतु अम्रा येथील वैविध्य व डौल त्यांत नव्हता. गर्झा काळात भांड्यांना झिलई देण्यात येऊ लागली आणि नंतरच्या काळातील रंगीबेरंगी व नक्षीदार मृत्पात्रे ईजिप्तच्या तत्कालीन प्रगत अवस्थेची ग्वाही देतात. अशी असंख्य मृत्पात्रे व दगडी भांडी सापडलेली आहेत.

ईजिप्तच्या प्राचीन समाजात मृतांना विधिपूर्वक चटयांत वा कातड्यांत गुंडाळून पुरीत. प्रेताबरोबर हस्तिदंती किंवा मातीच्या स्त्रीमूर्ती व भांडीकुंडी पुरलेली आढळली आहेत. यांवरून मरणोत्तर जीवनाची कल्पना अस्तित्वात असावी. ईजिप्तच्या सुवर्णकाळात पुरण्याच्या पद्धतीत खूपच फरक पडलेला दिसतो. त्यावेळी वैद्यकीय दृष्ट्या सर्व रासायनिक क्रिया करून प्रेत जतन करण्यात येई. त्यास ⇨ ममी असे म्हणत. मृतांची भव्य मंदिरे व त्यांच्याबरोबर पुरलेल्या अनेक वस्तू अलीकडच्या उत्खननांत आढळून आल्या आहेत. ह्याशिवाय सुंदर शवपेटिका हे एक पुढील काळातील वैशिष्ट्य होय.

प्राचीन ईजिप्तच्या जीवनात ग्रामीण व नागरी असे दोन भाग होते. बहुतेक मोठी शहरे नद्यांच्या काठी वसलेली होती आणि ती राजधान्यांकरिता, मंदिरांसाठी किंवा मृतांच्या थडग्यांसाठी प्रसिद्ध होती. त्यांतील थीब्झ, मेंफिस, आव्हेअरिस, कारनॅक, लक्सॉर वगैरे प्रसिद्ध होती. वरील स्थळांच्या उत्खननांत बहुविध अवशेष मिळाले आहेत.

प्राचीन ईजिप्तमध्ये बहुसंख्य लोकांचा धंदा शेती होता. तथापि काही खाणींतून काम करीत, तर काही कसबी होते. तरुणांचा ओढा सैन्यात भरती होण्याकडे असे. बार्ली, ताग (अंबाडी), इमर जातीचा गहू ही प्रमुख पिके शेतकरी काढीत असे. ह्यांशिवाय भाजीपाला व फळे यांचीही पैदास करीत. ईजिप्तने काचेचा शोध लावला असावा, असे काही तज्ञांना वाटते. त्यावेळी ईजिप्तमध्ये अनेक कलाकुसरीच्या वस्तू व मृत्पात्रे तयार होत. खाणींतून काढलेल्या तांब्याचा तसेच सुवर्णाचा ईजिप्शियन लोकांनी भरपूर उपयोग केलेला दिसतो. प्राचीन काळी ईजिप्तचा सागरी व्यापार मोठ्या प्रमाणावर असावा, असे त्यांनी खोदलेल्या कालव्यांवरून दिसून येते. कोणत्याही प्रकारची चलनव्यवस्था अस्तित्वात नव्हती.

साहित्य, विज्ञान इ. : राजवंशपूर्वकाळातच ज्यास लिपी म्हणता येईल, अशी अर्थवाही चित्रे काढण्यास ईजिप्तमध्ये आरंभ झाला होता. चौथ्या घराण्याच्या सुरुवातीस सर्वपरिचित असणारी ईजिप्शियन भाषा प्रगत झालेली दिसते. पुढे हीच अभिजात भाषा वाङ्‌मयीन कृतींसाठी वापरण्याचा अट्टाहास झालेला आढळतो. या भाषेचा खुद्द ईजिप्शियन लोकांनासुद्धा ख्रिस्ती शकाच्या आरंभी विसर पडत गेला. सर्वांत प्राचीन लेख हे दगडांवर कोरलेले शिलालेख असून त्यानंतर पपायरसेवर लिहिण्यास आरंभ झाला. यावर काळ्या शाईने लेखन होई. अशी लांब पपायरसेची भेंडोळी म्हणजे पुस्तके होत. याच पपायरसेचे लहानलहान तुकडे पत्रव्यवहारात वापरीत. ग्रीसला हे ज्ञान ईजिप्तकडूनच मिळाले.

ईजिप्तच्या भाषेत तीनचार प्रकार आढळतात. सबंध लिपीला हायरोग्‍लिफिक म्हणतात. याचे मुख्य प्रकार उच्च हिअरेटिक व कनिष्ठ डेमॉटिक असे असून पहिला धर्मग्रंथाच्या लेखनासाठी वापरीत, तर कनिष्ठ प्रकार सर्वसाधारण लेखनासाठी योजीत. प्राचीन ईजिप्शियन समाजाने अनेक प्रकारचे वाङ्‌मय निर्माण केले होते. यांपैकी फक्त काही भागच उपलब्ध झाला आहे. यांत नीतिकथा, काव्य, महाकाव्ये, नाटके किंवा संगीतिका, इतिवृत्ते इत्यादींचा समावेश आहे. तसेच पुराणे किंवा मृतांचा मार्गदर्शक अशांसारख्या धार्मिक स्वरूपाच्या वाङ्‌मयाचाही समावेश आहे. मध्यसाम्राज्यकाळात, इतर कलांप्रमाणे वाङ्‌मयासही नवे रूप चढले होते. या वेळेपर्यंत लिपी, लेखनपद्धती, व्याकरणे तयार झाली होती. त्यामुळे मनोरंजनपर वाङ्‌मयाचा आता प्रसार होऊ लागला होता. नवसाम्राज्यकाळात हा वृक्ष आणखीनच वाढला. महाकाव्यासारखा काही वाङ्‌मयप्रकारांची निर्मिती या काळात प्रथमच झाली. मध्य व नवसाम्राज्यकाळातील साहित्यात एक महत्त्वाचा फरक आढळतो. मध्यसाम्राज्यकाळातील लेखक व कवी हे अंतरंगावर तसेच बाह्य घाटावरही लक्ष देत असत. याउलट नवसाम्राज्यकाळातील कवी बाह्य घाटाकडे व स्वरूपाकडे जवळजवळ दुर्लक्षच करून अर्थावरच जास्त भर देत. तेथून पुढच्या काळात पूर्वीचे कथाविषय व घाट निरनिराळ्या तर्‍हेने वापरून पहाणे यापलीकडे साहित्यिकांची मजल गेली नाही. ईजिप्तच्या साहित्यामध्ये लेखकाचे नाव फारसे कोठे पहावयास सापडत नाही.

नीतिकथा किंवा म्हणींची व वचनांची पुस्तके प्राचीन साम्राज्यकाळापासून पुढे सापडतात. यांत काही वयोवृद्ध व अनुभवी पंडित प्रधानांची वचने प्रामुख्याने सापडतात. या तपस्व्यांनी प्रथम जगराहटीचे दर्शन घडवून, त्यात आपण कसे वागावे, याचा उपदेश केलेला आहे. यांपैकी बऱ्याच कथा व वचने पूर्वीपासून चालत आलेली असावीत, हे उघड आहे. हे सर्व वाङ्‌मय मौखिक परंपरेने मध्यसाम्राज्यकाळापर्यंत येऊन पोहोचले व त्याच काळात ते लिहिले गेले. निदान प्राचीन साम्राज्यकाळातील असे साहित्य अद्याप मिळालेले नाही. पाचव्या राजवंशाच्या भाटांनी सर्व राजघराण्यांच्या वंशवेली व छोट्या बखरी तयार केल्या. त्यांत केवळ एकामागोमाग घडत गेलेल्या घटनांची जंत्री असे. राजांच्या जोडीला सरदारांनी व जहागीरदारांनीही थडग्यांतून स्वत:ची वंशावळ व क्वचित चरित्रेही कोरून ठेवण्यास आरंभ केला. त्याच्या पुढच्या काळातही ज्याला इतिहास असे म्हणता येईल असे लेखन झाले. प्रत्येक वर्षीच्या सगळ्या महत्त्वाच्या घटनांची नोंद दरवर्षी करून ठेवण्यात येई. ही नोंद पपायरसेवर तशीच शिलालेखांतही सापडते. अशा बखरींपैकी काही थोडेच भाग आज उपलब्ध आहेत. यात पालेर्मो येथील शिलालेखांचा मुख्यत्वे समावेश होतो. मध्य साम्राज्यकाळात भविष्यवाणी स्वरूपाचे वाङ्‌मय पुढे आले. प्रथम मध्यकाळातील अंदाधुंदीचे सविस्तर वर्णन देवून यातून सोडविण्यासाठी कोणकोण राजे पुढे सरसावणार आहेत आणि ते काय पराक्रम करणार आहेत, याचे वर्णन केले आहे. अशी भविष्यपुराण काव्ये इतरही समाजांच्या वाङ्‌मयात सापडतात. म्हणून त्यांचा समावेश बखरी किंवा इतिहास या स्वरूपाच्या वाङ्‌मयात करणेच योग्य ठरते. इतिहासविषयक अशा वाङ्‌मयात सगळ्यात महत्त्वाची कृती म्हणजे मॅनेथोची बखर होय.

येथील लोककथा व इतर कथा ह्या वैचित्र्यपूर्ण आणि पुष्कळदा चमत्कृतिजन्य आहेत. बऱ्याच लोककथा राजवंशपूर्वकाळापासून चालत आलेल्या आहेत, पण त्यांना नंतरच्या काळात निरनिराळे साज चढविण्यात आले. तसेच यांत मनोरंजक प्रवासकथाही आहेत. प्रथम आमेनेमहेतच्या मृत्यूनंतर झालेल्या आणि बऱ्याच काळाने पुन्हा राजदरबारी अवतीर्ण झालेल्या एका सरदाराची कथा फार लोकप्रिय होती. विशेषत: अज्ञातवासाच्या काळात त्याने पाहिलेले देश व त्याला आलेले अनुभव मोठे सुरस होते. सुसरी, साप, कुत्री यांच्या वेढ्यांतून आत जाऊन एका उंच मनोऱ्यावर ठेवलेल्या राजकन्येला सोडवून आणणरा राजपुत्र येथे भेटतो तशी दोघा भावांच्या परस्पर प्रेमात बिब्बा घालणारी आसक्त ज्येष्ठ भावजय आणि तिला झिडकारणारा धाकटा दीर यांचीही गाठ पडते. ही सर्व मंडळी निरनिराळ्या स्वरूपांत पुढील वाङ्‌मयात पुन:पुन्हा आढळतात.

ॲसिरसचा मृत्यू आणि पुनर्जन्म या कथानकावर आधारलेले एक संगीत नाटक किंवा संगीतिका मध्य साम्राज्याकाळात फारच लोकप्रिय झाली असावी असे दिसते. आज मात्र ती उपलब्ध नाही.

वरील कथांपैकी पुष्कळशा पद्यस्वरूपातच प्रचलित आहेत. काही ऐतिहासिक प्रसंगांवर काव्ये रचण्यात आली होती. विशेषत: तिसरा थटमोझ याच्या लष्करी मोहिमा आणि त्याला मिळालेले विजय यांवर प्रदीर्घ काव्ये किंवा पोवाडे त्याच्या दरबारी कवींनी रचलेले होते. पण ज्याला महाकाव्य म्हणता येईल, अशी एकच रचना अस्तित्वात आहे. दुसरा रॅमसीझ याचे हिटाइट लोकांशी सिरियातील कादेश येथे जे युद्ध झाले, त्यावर त्याच्या भाटांनी एक मोठे काव्य तयार केलेले आहे. याप्रमाणे ईजिप्तच्या प्राचीन वाङ्‌मयात विविधता आढळते.

ईजिप्तमधील शास्त्रप्रगतीविषयी सांगता येण्यासारखी महत्वाची गोष्ट म्हणजे विज्ञानाचा मक्ता पुरोहितवर्गाकडेच होता. ते सुशिक्षित असल्याने त्यांना हे काम सुलभही झाले असावे. प्राचीन परंपरा असे सांगते, की सर्व ज्ञानाचा पाया वीस हजार वर्षांपूर्वी थॉथ याने घातला. पृथ्वीवर तीन हजार वर्षे राज्य करून त्याने वीस ते छत्तीस हजार ग्रंथ रचले व त्यांत सर्व विज्ञानशाखांचे रहस्य सामावलेले होते. हे ग्रंथ प्रत्यक्षात मात्र सापडत नाहीत.

ज्योतिषाच्या अभ्यासास व पंचांगरचनेस गणिताचे व भूमितीचे ज्ञान आवश्यक होते. गणित व विशेषत: भूमिती या विद्या सुमेरियातून ईजिप्तकडे आल्या असाव्यात. इ. स. पू. २००० च्या सुमाराचा आमोस पपायरस  हा ग्रंथ सामान्यपणे ईजिप्शियनांच्या या क्षेत्रातील प्रगतीची कल्पना देतो. यात दशमानपद्धती, गुणाकार व भागाकार ही अंगे असणाऱ्या गणिताची, तसेच बीजगणिताची, भूमितीची व थोड्याफार प्रमाणात त्रिकोणमितीची सुरुवात झालेली दिसते.

पंचांगाला मूळ आधार असणारी गोष्ट म्हणजे ठराविक मुदतीने पुन:पुन्हा घडणारी एखादी नैसर्गिक गोष्ट. ईजिप्तमध्ये अशी नियमित घडणारी गोष्ट म्हणजे नाईलचा वार्षिक पूर. याच वेळी पहाटे व संध्याकाळी सिरीअस हा तारा उगवू लागतो. त्यास डॉगस्टार असेही म्हणतात. जुलैच्या मध्याला या दोन्ही गोष्टी एकदमच घडत. तेव्हा वर्षारंभाला या गोष्टी पक्क्या झाल्या. याशिवाय शुक्लपक्ष व कृष्णपक्ष तितक्याच नियमाने होणारे तेव्हा त्यांवर महिने बसविलेले असत. अशा तीस दिवसांच्या बारा महिन्यांचे फक्त ३६० दिवस होतात. खगोलाच्या म्हणजे ग्रहांच्या भ्रमणाची माहिती ते चांगल्या प्रकारे मिळवीत असल्याने नाईलचा पूर केव्हा येणार, याचे भाकीत त्यांस बरोबर सांगता येई. अशा प्रकारे तयार केलेली प्राचीन पंचांगे आढळली आहेत. मात्र या निरीक्षणाला वा त्याच्या नोंदीला ईजिप्तमध्ये ॲसिरियाइतके शास्त्रीय महत्त्व देण्यात आलेले नव्हते. फलज्योतिषाचाही ईजिप्शियन लोकांना परिचय असावा.

इतर विज्ञानशाखांत ईजिप्तमध्ये फारशी प्रगती ह्यावेळी झालेली नसावी, असे उपलब्ध पुराव्यांवरून दिसते. उद्योगधंद्यांसाठी काचकाम, धातुकाम, झिलई चढविणे, यांसाठी तसेच मृताच्या अंत्यविधीसाठी लागणारे रसायनाचे ज्ञान ईजिप्शियन लोकांना होते. तसेच प्रसाधनासाठी लागणाऱ्या व चित्रलेखमाला आवश्यक अशा पदार्थांची व त्यांच्या प्रक्रियांचीही माहिती त्यांना होती. मात्र वैद्यकशास्त्रात ईजिप्तने सर्वांत जास्त प्रगती केलेली होती. वैद्यकशास्त्राचा पाया म्हणजे मानवी शरीररचनेचे ज्ञान. त्या बाबतीत ईजिप्तचे लोक इतर समकालीन समाजांच्या मानाने फारच प्रगत होते. मृतांना पुरण्यापूर्वी त्यांजवर रासायनिक प्रक्रिया करण्याची म्हणजे ममी तयार करण्याची पद्धत सर्वत्र प्रचलित होती. यासाठी प्रेताचे पोट फाडून सर्व आतडी बाहेर काढून पोटात रसायने भरून ठेवीत. या शल्यकर्मामुळे त्यांना शरीरातील वेगवेगळ्या स्‍नायूंची व अवयवांची चांगली माहिती झाली होती. इ. स. पू. १६०० च्या स्मिथ पपायरसेमध्ये अनेक अवयवांचे वर्णन दिले असून त्यांवर मेंदूचे कसे नियंत्रण चालते, हे विशद केले आहे. शारीरविज्ञान माहीत असल्याने शस्त्रक्रिया आणि अस्थिचिकित्सा या गोष्टी शक्य झाल्या. स्मिथ पपायरसेमध्ये अठ्ठेचाळीस निरनिराळ्या शस्त्रक्रियांचे सविस्तर वर्णन दिलेले आहे. रोगलक्षणे आणि औषधयोजना यांची सविस्तर माहिती दिलेले पपायरसेचे ग्रंथही बरेच उपलब्ध आहेत. यांपैकी बहुतेक सर्व मध्य-साम्राज्यकालीन असले, तरी त्यांत प्राचीन साम्राज्यकाळातील ग्रंथांचे बरेच उतारे आढळतात. एबरस पपायरस किंवा कहून पपायरस (इ. स. पू. १८००) यात जवळजवळ सातशे प्रकारचे रोग व त्यांची लक्षणे दिली आहेत. सध्या माहीत असलेले बहुतेक रोग व दुखणी यांचे त्यांत उल्लेख आणि उपाय सांगितले आहेत. औषधात खनिज, वनस्पतिजन्य व प्राणिजन्य अशा सर्व प्रकारच्या पदार्थांचा समावेश केलेला आहे. यांपैकी फक्त काहीच उपयुक्त ठरण्यासारखी औषधे आहेत, तर काही अपायकारक आहेत, असे आधुनिक शास्त्रज्ञांचे मत आहे. सर्व रोगराई ही रक्तदोषातूनच उद्‌‌भवते, असा समज होता. शरीरातील रुधिराभिसरणव्यवस्था त्यांना माहीत असल्याने शरीरात सर्वत्र आढळणारा हा एकमेव द्रव जसा जगण्यास तसाच रोगासही कारणभूत असावा, अशी समजूत होणे फारसे अस्वाभाविक नव्हते. या कारणमीमांसेखेरीज व तीतून उत्पन्न होणाऱ्या औषधयोजनेखेरीज आणखीही एक पद्धत जारी असे. आजारीपणाला शारीरिक व्याधी कारणीभूत होतात तशी भुतेखेते, किन्नर अशांसारख्यांमुळेही रोग होतात, असा समज असे. अशा भुताखेतांच्या मारक व तारक देवदेवतांचा व शक्तींचा प्राचीन ईजिप्तमध्ये सुकाळ होता. यांवर उपाय म्हणून मंत्रतंत्र, गंडेदोरे, ताईत यांचा जोराचा मारा होत असे. प्रत्येक वैद्य हा जरा रोगलक्षणे व औषधयोजना जाणणारा, तसा मंत्रतंत्रविद्येतही प्रवीण असावा लागे.

शहरांतून सांडपाण्याचा निचरा करून सार्वजनिक आरोग्यरक्षणाचे प्रयत्‍न प्राचीन ईजिप्तमध्ये करण्यात आले होते. वैयक्तिक आरोग्य राखण्यासाठी उपासतापास, रेचके व बस्ती यांचा उपयोग करीत.

काही पपायरसेमध्ये संततिप्रतिबंधासाठी औषधे नमूद केलेली आहेत.

वैद्यकशास्त्राच्या या ज्ञानाचे प्रत्यक्ष फळ हिरॉडोटसने पाहिले होते. तो लिहितो,व्यवस्थित वागणुकीमुळे ईजिप्तमधील लोक इतर कोणत्याही देशातील लोकांपेक्षा जास्त निरोगी दिसतात. हे निरीक्षण सूचक आहे.

धर्म : इतर प्राचीन धर्मांप्रमाणे ईजिप्तचाही धर्म बहुविध स्वरूपाचा होता. एकाच विशिष्ट वेळी एकाच माणसाने काही धर्मसूत्रे सांगावयाची वा संघटना निर्माण करावयाची व मग इतरांनी ती मानून त्याप्रमाणे आचरण करावयाचे, असे येथे घडले नाही. निरनिराळ्या वेळी निरनिराळे विचारप्रवाह उत्पन्न झाले देवदेवता, समजुती व श्रद्धा यांत फेरबदल होत गेले. काही कल्पनांचा पगडा कित्येक शतके कायम राहिला.

आरंभीच्या काळात ईजिप्तमध्ये ज्या अनेक तर्‍हेच्या देवदेवता आढळतात, त्यांत ग्रामदेवतांना महत्त्वाचे स्थान होते. प्रत्येक वस्तीची व ग्रामाची अधिष्ठात्री देवता असे. देवदेवतांना पशुपक्ष्यांचे, अर्धमानव, अर्धप्राणी असे रूप मिळे. पुढे अनेक प्राणी पूज्य मानण्यात येऊ लागले. ग्रामदेवतांबरोबर निसर्गदेवतांची उपासना प्रचलित होती. पृथ्वी, भूदेवी, नाईल नदी, आकाश, सूर्य, चंद्र यांची ते पूजा करीत. राजकीय व व्यापारी संबंधांतून खेडी व नगरे निकट आल्यावर सगळ्या स्थानिक देवदेवतांचा एकमेकांशी काही संबंध असणे निकडीचे वाटू लागले. बहुतेक देवदेवतांना कुटुंबप्राप्ती व अपत्यप्राप्तीही झाली. ही नाती कालानुरूप पालटतही गेली.

देवतांची उपासना, प्रार्थना यांजबरोबर पूजा-अर्चा व बलिदानेही प्रचलित होती. मेंफिस, कारनॅक, थीब्झ वगैरे स्थळी मंदिरे अस्तित्वात आली. या प्रत्येक देवस्थानावर शेकडो पुरोहित पोसले जात. देवस्थानच्या संपत्तीच्या जोरावर हा पुरोहितवर्ग इतका संपन्न बनला, की त्याने पुढे राजाची गादीही बळकावली. तत्पूर्वी राजा हाच प्रमुख पुरोहित असे. ईजिप्शियन पुराणांत अत्यंत अद्‌भुत घटना वाचावयास मिळतात. यांत आकाश व पृथ्वी ही  पुरुष-प्रकृती कल्पून त्यांपासून सर्व सृष्टीची निर्मिती झाल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. यांची नावे व स्वरूपे बदलत असत, पण कल्पना तीच. याशिवाय ईजिप्तच्या जीवनात घट्ट रुजलेली ओसायरिस, आयसिस, होरस व सेत यांची कथा महत्वाची  व मनोरंजक आहे. वृक्षादी उद्‌भिज्ये यांचा देव ओसायरिस याचा सेतमुळे मृत्यू आणि त्याचा पुत्र होरस आणि पत्नी आयसिस यांच्या यत्‍नामुळे पुनरुज्‍जीवन, हा या कथेचा गाभा असून वार्षिक पूर व पीक आणि उन्हाळ्यातील त्यांचा अस्त यावरचे हे रूपक होते. ईजिप्तमध्ये रा (रे-) म्हणजे सूर्यदेवाची पूजा ही सर्वश्रेष्ठ होती, कारण तत्कालीन फेअरो राजांची ती देवता होती तथापि ओसायरिस आणि आयसिस ह्यांनाही तेवढाच, किंबहुना अधिक, मान होता. दुसरी गोष्ट म्हणजे राजा स्वत:स देव समजत असे, कधी तो स्वत:स होरस समजे, तर कधी ओसायरिस समजे एवढेच नव्हे, तर स्थानिक देवतेचा तो अवतारच मानण्यात येई.

ईजिप्शियन लोकांत मरणोत्तर जीवनाची कल्पना रूढ होती. त्यांनी मानवी शरीराचे तीन घटक कल्पिले होते. एक शरीर, दुसरा आत्मा व तिसरा मानवाची छोटी प्रतिकृती. मृत माणसाला पुढच्या प्रवासात उपयोगी पडण्यासाठी सर्वसामान्य रोजच्या उपयोगाच्या गोष्टी ते थडग्यांत ठेवीत. पुढे त्याची चित्रे काढीत व ती जिवंत व्हावीत, यासाठी मंत्र लिहून ठेवीत. रात्री भुताखेतांचा जोर होतो, तेव्हा आत्मा शरीरात आश्रयाला परततो, एरव्ही पक्ष्याच्या रूपाने तो फिरतो असे ते मानीत. जन्ममरणाच्या फेऱ्यांतून मुक्त होण्याची किंवा केलेल्या कृत्याच्या पापपुण्याची कल्पना अस्तित्वात होती. या प्रवासात मार्गदर्शक म्हणून ताईत, मंत्र, तसेच मृतांचे रक्षण आयसिस, नेफ्थीस, नीइथ वगैरे देवता करतात अशी समजूत होती. यांपैकी नीइथ ही युद्धाची व शिकारीची देवता मानीत. तिला मातृदेवताही म्हटले असून अनेक वेळा तिचे आयसिस ह्या देवतेशी सादृश्य दाखविले आहे. हरतऱ्हेच्या देवदेवतांनी गजबजलेल्या ईजिप्तच्या देव्हाऱ्यात शिस्त उत्पन्न करण्याचा प्रयत्‍न चौथा आमेनहोतेप किंवा आक्‍नातन याने केला. आक्‍नातनच्या काळापर्यंत थीब्झचा ॲमन याला श्रेष्ठत्व लाभले होते आणि पुरोहितवर्ग प्रबळ झाला होता. हीलिऑपोलिसचा सूर्यदेव, क्षितिजावरचा होरस-रे या नावाने ओळखला जाई व उत्तर दिशेवर किंवा उत्तर ईजिप्तवर त्याचे अधिराज्य असे. कालांतराने सूर्याचे राज्य सर्व देवदेवता, प्राणिमात्र व दिशा यांवर आहे, असे सांगण्यात येऊ लागले. या देवतेची खूण पूर्वीप्रमाणे गरुड किंवा ससाणा न राहता प्रत्यक्ष सूर्यबिंब झाली. आक्‍नातनने गादीवर आल्यानंतर पुढे सहा वर्षांनी वरील सर्व देवदेवतांची पूजा रद्द करून फक्त ॲमन ह्या देवतेची पूजा स्वीकारली. त्यासाठी त्याने पुरोहितवर्गाचे उच्चाटन केले व एकेश्वरवादाचा प्रसार केला, पण त्याचा हा एकेश्वरवाद त्याच्या पश्चात फार दिवस टिकला नाही.

कला : ईजिप्तने इ. स. पू. ३१०० ते ४०० च्या दरम्यान वास्तुकला, मूर्तिकला, चित्रकला व इतर कनिष्ठ कला ह्यांत उल्लेखनीय प्रगती केलेली दिसते. या कालखंडांतील कलेचे शेकडो नमुने आज उपलब्ध आहेत. येथील वैशिष्ट्यपूर्ण कोरड्या हवामानामुळे या नमुन्यांचे निसर्गत:च जतन झाले आहे. त्यांत मंदिरे, समाध्या, त्यांतील चित्रकाम, मूर्तिकाम, मंचकादी वस्तू, दागदागिने, मुद्रा आदींचा समावेश होतो. नजरेत मावणार नाही इतक्या टोलेजंग वास्तूंपासून तळहातावरही सुस्पष्ट दिसणार नाहीत, अशा अतिसूक्ष्म वस्तू उपलब्ध झाल्या आहेत. अडीच ते तीन हजार वर्षांच्या काळातील प्रत्येक वस्तू मूलत: ईजिप्शियनच आहे. नाईल नदीसारखाच हा कलाप्रवाहही अत्यंत समृद्ध आहे. येथे कलात्मक प्रतिमांचे आणि कल्पनांचे वैपुल्य आहे. त्या साकार करण्यास जरूर ती प्रतिभा व तंत्रज्ञानही होते. याशिवाय दृष्टीपथात येणारी दुसरी गोष्ट म्हणजे ईजिप्शियन कलेत, भव्य व अवाढव्य आकार आणि सूक्ष्म तपशील यांच्यात साधलेला समतोल हे होय. सामान्यपणे सबंध कलाकृतीची प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडावयाची असेल, तर फार बारीक तपशील अडचणीचा ठरतो, लक्ष द्विधा होते. तथापि स्थूल आणि सूक्ष्म यांच्यातील हा समतोल सांभाळून सर्व कलाकृती निर्माण केल्या आहेत.

ईजिप्तमधील प्रत्येक वास्तू वा मूर्ती ही जरी राजाश्रयाखाली अथवा धार्मिक प्रेरणेने निर्माण झाली असली, तरी ती एका अर्थाने लोककलाच होय. येथील भिंतींवरील चित्रकाम वा शिल्पकाम यांचा वर्ण्यविषय राजसभेच्या चाकोरीत बांधलेला नाही. येथे देवदेवता, राजे, प्रधान, सेनानी, राजपुत्र, राण्या, दासी इत्यादींच्या बरोबरीने धान्यगुदामावरचे लेखनिक, मंदिरांवर काम करणारे पाथरवट तसेच सुतार, गावाबाहेर मृत्पात्रे घडविणारा कुंभार आणि मळ्यांत काबाडकष्ट करणारा शेतकरी या सर्वांना स्थान आहे. राजगृहातील तसेच सामान्य लोकांच्या जीवनातील हरतर्‍हेचे प्रसंग येथे चित्रित केलेले आहेत.

प्रागैतिहासिक काळापासून येथे मूर्तिपूजा रूढ होती. राजांचा अंमल सुरू झाल्यावर मृत राजेराण्यांना देवस्वरूप प्राप्त झाले ह्या कल्पनेतून त्यांच्याही मूर्ती प्रचलित झाल्या. एका चौकोनी गृहाच्या मधल्या दालनात मूर्ती ठेवीत. हे दालन खोल दगडी बांधणीचे असे, तर बाकी इमारत लाकूड-विटांची असे. शेजारच्या खोलीत जहाज असे. त्याचा आपल्याकडील पालखी वा रथाप्रमाणे उत्सवप्रसंगी देवाची मिरवणूक काढण्यासाठी उपयोग करीत. भोवतालच्या दालनात भांडारगृह आणि नजीकच स्वतंत्र अशा वास्तूत पुरोहिताचा निवास असे. मंदिराच्या समोर मंडपाची इमारत. बाजूंनी मोकळी अशी ही इमारत, स्तंभ व तुला यांजवर उभारीत. मंडपापासून थोड्या अंतरावर गोपुर उभारीत. या सर्व इमारतींभोवताली मोठी भिंत असे व या प्राकाराचे प्रवेशद्वार म्हणजे हे गोपुर. गोपुराची रचना साधी असे. गोपुर व मंडप यांना जोडणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा स्फिंक्सच्या मूर्तींच्या रांगा असत. गोपुरासमोर ऑबेलिस्कच्या जोड्या उभारण्यात येत. मंडपाचे स्तंभ तीनचार प्रकारचे आढळून येतात. संपूर्ण गोल, काट्यांच्या जुडग्यासारखे दिसणारे व क्वचित चौरस. यांवर उमलत्या वा मिटत्या कमलकलिकेसारखी दिसणारी स्तंभशीर्षे आहेत. एखादे वेळी यांवर नारळाच्या झावळ्या किंवा मानवाकृतीही कोरीत. स्तंभ बहुधा एकाच पाषाणातून कोरलेले असले, तरी पुढे संख्या व आकार वाढल्यावर ते बांधून काढावयास आरंभ झाला. बहुतेक मंदिरांना जोडून प्रशस्त तलाव असत. मंदिराला देणगी द्यावयाची म्हणजे आणखी काही मंडप, प्राकार वा गोपुरे बांधून द्यावयाची पद्धत रूढ होती. कारनॅक येथील मंदिराला दहा गोपुरे व १३४ स्तंभ आहेत आणि भिंतींवर सर्वत्र रंगीत मूर्तिकाम आहे. तसेच हायरोग्‍लिफिक लिपीत काही लेखही आहेत. लक्सॉर, कारनॅक, एल् अमार्ना, अबू सिंबेल, हॅटशेपसूट राणीचे डेर-एल्-बाहरी इ. ठिकाणची मंदिरे प्रसिद्ध आहेत. ह्यांतील राणीचे मंदिर हा स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना असून एका अर्धवर्तुळाकार दरीत डोंगराच्या उताराचे टप्पे तासून त्यावर ओळीने तीनचार प्राकार तयार करण्यात आले आहेत. अगदी वरच्या प्राकाराच्या शेवटी खुद्द मंदिर आहे. देवांची मंदिरे आणि मृतांची मंदिरे यांत वास्तुदृष्ट्या फारसा फरक आढळत नाही. फक्त मृतमंदिराला देवमंदिराचा आकार व भव्यता नव्हती एवढेच. तत्कालीन ईजिप्तमध्ये इमारतींच्या बांधणीकरिता भाजलेल्या किंवा कच्च्या विटांचा उपयोग करीत तसेच वालुकाश्म, चुनखडी आणि ग्रॅनाइट ह्यांचाही वापर ते करीत.

डोंगरात खोल्या कोरून मृतांना तेथे पुरण्यात येई. त्यांच्या आत्म्यासाठी तेथे मंदिरे असत. राजाचे वा राजकुटुंबाचे प्रचंड पुतळे मंदिरांच्या दर्शनी भागावर ठेवीत. अबू सिंबेल येथील दुसरा रॅमसीझ याचे समाधिमंदिर प्रसिद्ध असून त्यातील स्तंभांनाही मानवाकार देण्यात आले आहेत.

ईजिप्तमधील बहुतेक राजांनी पिरॅमिड बांधलेली आढळतात. मृतांसाठी घर बांधण्याची पद्धत पिरॅमिडच्या आधी ईजिप्तमध्ये प्रचलित होती. पुढील काळात म्हणजे इ. स. पू. २६८०–२५६५ च्या दरम्यान टेकड्या उभारण्यात येऊन विटांऐवजी दगड वापरून त्यांच्या आकारात प्रचंड बदल करण्यात आले. पिरॅमडमध्ये शवपेटिकेची खोली व आवश्यक ती इतर दालने बांधण्यात आलेली होती. पिरॅमिडपासून थोड्या अंतरावर मृतांचे मंदिरही असे. चौथ्या राजघराण्यातील राजांनी आकारात फेरफार करून लहान आकाराची अनेक पिरॅमिड बांधली. याच घराण्यातील कूफू याने सु. पाच हेक्टर क्षेत्र व्यापणारे आणि सु. १२६ मी. उंचीचे भव्य पिरॅमिड उभारले. बहुसंख्य पिरॅमिडमध्ये दालनांच्या भिंतींवर आणि मृतांच्या मंदिरांच्या भिंतींवर मूर्तिकाम व चित्रकाम आहे. ह्यांशिवाय भिंतींवर हायरोग्‍लिफिक लिपीत काही मजकूर कोरलेला आहे.

एल् अमार्ना येथील अपवाद सोडला, तर राहत्या घरांचे वा राजप्रासादांचे फारच थोडे अवशेष आज सुस्थितीत पहावयास सापडतात. याचे कारण म्हणजे राजप्रासाद लाकूड व विटा यांचेच बांधलेले होते. त्यांत दगडांचा क्वचित उपयोग केलेला असे. नवे राजे नवीन प्रासाद उभारीत, त्यामुळे जुन्यांकडे दुर्लक्ष होऊन ते पडून जात. ईजिप्तच्या राजवाड्यांचे खाजगी व सार्वजनिक उपयोगासाठी असे दोन स्पष्ट भाग पडलेले दिसतात. राजप्रासादातील चित्रकामात जी चित्रे दिसतात, त्यांवरून पाहता त्यांचे बहिरंग साधे, कलाहीन असावे.

प्रागैतिहासिक काळापासून मंदिरांच्या द्वारांच्या दोन्ही बाजूंना स्तंभ उभे करीत. हा ऑबेलिस्क स्तंभ वास्तकलेचा एक नमुना असून त्यावर चारही बाजूंना लेख कोरलेला असे. प्रत्येक ईजिप्शियन मंदिरासमोर हे ऑबेलिस्क उभे असत.

मूर्तिकलेच्या बाबतीत ईजिप्तची प्रगती उल्लेखनीय आहे. देवदेवता, राजे-महाराजे, राण्या व दासी, गुडघे पोटाशी घेऊन बसलेले गुरू व लेखनिक, लढाईवर निघालेले सैनिक, पशुपक्ष्यांपैकी सिंह, पाणघोडे, कुत्री, मांजरे, गरुड, नाग इत्यादींच्या मूर्ती ईजिप्तमध्ये पहावयास सापडतात. हस्तिदंत, लाकूड, माती व दगड या सर्वांचा व नंतर तांबे, ब्राँझ, सुवर्ण इ. धातूंचा सारख्याच कौशल्याने माध्यम म्हणून उपयोग केलेला आहे. सर्वांवर रंगकाम तर आहेच, पण काहींवर फिआन्स व काच यांची झिलई आणि जडावाचेही काम आहे. कोरीव कामातील सफाई वाखाणण्यासारखी आहे. कलाकारांची दृष्टी वस्तुनिष्ठ असून कित्येक ठिकाणी त्या त्या मूर्तींचे गुण व्यक्त करण्यातही मूर्तिकार यशस्वी झाला आहे. वस्तुनिष्ठ शिल्पकाम असूनही काही मूर्तींच्या चेहर्‍यांवर भावहीनता दिसते.

समाध्यांच्या व शैलगृहांच्या प्रवेशद्वारांशी असणारे प्रचंड पुतळे सांकेतिक कलेचे उत्कृष्ट नमुने होत. गुडघ्यावर तळहात टेकून, किंचित पुढे झुकलेला सिंहासनावर बसलेला एक पुतळा व रॅमसीझ आणि आमेनहोतेप यांचे पुतळे यांतील पद्धत एकच आहे. अबू सिंबेल येथील रॅमसीझ अथवा कैरो वस्तुसंग्रहालयातील तिसरा आमेनहोतेप व राणी नेफरतीती यांचे पुतळेही अवाढव्य असून पुतळ्यांच्या मालिकेतील ही उत्कृष्ट व्यक्तिचित्रणे होत. लहान पुतळ्यांत राणी नेफरतीती हिची मूर्ती लक्षवेधक आहे. गीझा पिरॅमिडनजीक असणाऱ्या स्फिंक्सच्या उल्लेखावाचून मूर्तिकलेचा आढावा पुरा होत नाही. हा सगळ्यात मोठा स्फिंक्स असून मंदिराच्या प्राकांरात अनेक प्रकारचे स्फिंक्स पहावयास सापडतात.

वास्तूंच्या भिंतींवर हरतऱ्हेच्या चित्रमालिका दिसतात. प्राणी व पक्षीही सहसा सन्मुख दाखविलेले नाहीत. दुसरे म्हणजे येथे त्रिमितिचित्रणपद्धती वापरलेली नाही. दूरच्या वस्तू लहान होत गेलेल्या किंवा पुढच्या वस्तूंच्या आड गेलेल्या दिसत नाहीत. त्या सर्व एका शेजारी, खालीवर अशा बसविलेल्या आहेत. तिसरे, रंगांच्या छटांतून छायाप्रकाश फारसा कोठे सूचित केलेला नाही. रंग एकसारखे भरलेले आहेत, पण छायाप्रकाशाची कल्पना, कोरीव कामाच्या उंचसखलपणामुळे आपोआपच उत्पन्न होते. रेखाकृती सफाईदार आहेत आणि चित्रविषयाची हालचालही जखडलेली वाटत नाही. चित्रकामाचे वर्ण्यविषय वैविध्यपूर्ण आहेत. ईजिप्तच्या तत्कालीन जीवनाच्या सर्व अंगांचे त्यात प्रतिबिंब दिसते. राजाचे इहलोकातील विजयी जीवन जितक्या आत्मीयतेने हाताळले आहे, तितक्याच साक्षेपाने त्याचा परलोकातील प्रवासही रंगविला आहे. तांत्रिक कौशल्य, सफाई, सूक्ष्म निरीक्षण हे सगळे गुण असूनही ह्या कलाकृतींवर काहीशी निर्जीवपणाची छटा का दिसावी, हे उमगत नाही.

चित्रकलेप्रमाणेच ईजिप्तने इतर कनिष्ठकलांतही खूप प्रगती केलेली आढळते. राजांच्या समाध्यांतून रोजच्या वापरातील हरतऱ्हेच्या वस्तूंचा प्रचंड संग्रह सापडलेला आहे. यांत फर्निचर, मुख्यत्वे मंचक, लाकडी वा दगडी आसने तसेच भांडीकुंडी, दागदागिने अशा वस्तू आहेत. विशेषत: तूतांखामेनच्या समाधीतील संसार फारच समृद्ध आहे. सोन्याचे जडावाचे काम, रंगकाम आणि अचूक घडण ही यांतील खास वैशिष्ट्ये होत. यांचा उल्लेख करावयाचा तो प्रामुख्याने कलाकुसरीचे नमुने म्हणूनच. ईजिप्तमधील मृत्पात्रे रंगविलेली व चितारलेली असत, तर लहानमोठ्या मूर्ती कलाकुसरीने कोरलेल्या व रंगविलेल्या आढळल्या आहेत.

प्राचीन ईजिप्तच्या या समृद्ध संस्कृतीचे सूचक दर्शन तिने मागे ठेवलेल्या भव्य वास्तू आणि विविध माध्यमांतील लेखन यांतून आजही घडते. (चित्रपत्रे ५९, ६०, ६१).

संदर्भ : 1. Aldred, Cyril, The Egyptians, London, 1962.

2. Breasted, J. H. Ancient Records of Egypt, 5 Vols., Chicago, 1906-1907.

3. Gardiner, A. H. Egypt of The Pharaohs, London, 1961.

4. Murray, Margaret A. The Splendour That Was Egypt, London, 1961.

5. Petrie, W. M. F. Egyptian Architecture, London, 1938.

6. Petrie, W. M. F. History of Egypt, 6 Vols., London, 1898-1905.

7. Smith, W. S. The Art &amp Architecture of Ancient Egypt, London, 1958.

8. Rachewiltz, B. D.; Trans. Boothroyd, R. H. Egyptian Art, London, 1960.

9. White, J. M. Everyday Life in Ancient Egypt, New York, 1965.

माटे, म. श्री.

खाई राजाच्या थडग्यात सापडलेले एक रंगीत मृत्पात्र
आरीनेफर राजाच्या थडग्याच्या प्रवेशद्वारावरील पक्षीरूपातील आत्मा आणि मृत माणसाची छाया यांचे चित्र
नेफरतीती राणीचा शिलाशिल्पित चेहरा
नख्त राजाच्या थडग्यावरील चित्रमालिकेतील एक चित्र : मेजवानीच्या प्रसंगी वादन-नर्तन करणाऱ्या युवती.
नख्त राजाच्या थडग्यावरील अंधवादकाचे चित्र
सामाजिक बहिष्कारासाठी वापरण्यात येणाऱ्या चुनखडी मतपत्रिकेवरील नर्तकीचे वेधक चित्र, इ.स.पू. १५७०-१३४२.
सिंहासनाधिष्ठित ओसायरिस देवता
तूतांखामेनच्या थडग्यातील मृतांच्या पुस्तकातील एक रंगीत चित्र, इ.स.पू. १३५०.
सेनेड्जेमच्या थडग्यातील भित्तिचित्रे, इ.स.पू. १३ वे शतक.
तिसऱ्या रॅमसीझच्या पुत्राच्या थडग्यातील वरदहस्ता ‘प्ता’ देवतेचे भित्तिचित्र, इ.स.पू.सु. ११७०.
सोंगट्या खेळणाऱ्या नेफरतीती राणीचे तिच्या थडग्यातील उत्थित शिल्प, इ.स.पू. १३ वे शतक.
मार्जारमुखी बॅस्ट देवतेचे ब्राँझचे शीर्ष
मेजवानीच्या समारंभासाठी साजशृंगाराची पूर्वतयारी, उत्थित शिल्प, इ.स.पू.सु. १४१०.
अतेतच्या थडग्यातील रंगीत चित्रपट्टात असलेले हंसीचे चित्र, इ.स.पू. २५७०.
मृतांचा देव अन्यूबिस याचा पुतळा
हायरोग्लिफिक अक्षरवाटिकेतील पक्ष्याची रंगीत आकृती, इ.स.पू. २६८०.
सामाजिक बहिष्कारासाठी वापरण्यात येणाऱ्या मातीच्या मतपत्रिकेवरील बैलांच्या झुंजीचे चित्र
तूतांखामेनच्या थडग्यातील सिंहिणीचे शिल्प, इ.स.पू. १३५०.
हिप्पोपोटॅमसची मृत्स्नामुद्रा, इ.स.पू. २२५८ ते १७८६.