ख्मेर संस्कृति : आग्नेय आशियातील प्राचीन कंबुज – कंबोज किंवा ख्मेर साम्राज्य म्हणजेच आधुनिक कंबोडिया (ख्मेर प्रजासत्ताक) व लाओसचा प्रदेश होय. या प्रदेशात ५५० ते १४५० च्या दरम्यान मेकाँग नदीच्या खोऱ्यात एक प्रगत संस्कृति नांदत होती. तेथील ख्मेर लोकांमुळे या संस्कृतीस ख्मेर संस्कृती, हे नाव रूढ झाले. भारतीयांचे बृहद्भारतातील साम्राज्य म्हणजे ख्मेर संस्कृती. म्हणून या संस्कृतीचे महत्त्व भारतीय संस्कृतीच्या इतिहासात अनन्यसाधारण आहे. येतील प्राचीन अवशेषांवर भारतीय संस्कृतीची छटा आजही दृष्टोत्पत्तीस येते. मात्र कंबोडियातील हेच पहिले भारतीय राज्य नाही, तर यापूर्वी या भागात फुनानचे दुसरे मोठे हिंदू राज्य होते. तथापि हे राज्य सहाव्या शतकाच्या मध्यावर नाहीसे झाले. फुनानचे चेन – ला हे मांडलिक राज्य बलवान झाल्यामुळे फुनानची सत्ता नामशेष झाली, अशी माहिती चीनच्या ‘सुई’ वंशाच्या इतिहासात नमूद केली आहे.

ख्मेर संस्कृतीसंबंधीची माहिती मुख्यत्वे प्राचीन कोरीव लेखांतून, तसेच चिनी बखरींतून मिळते. याशिवाय प्राचीन प्रवाशांचे वृत्तांत, तत्कालीन वाङ्मय व प्राचीन अवशेष देखील या दृष्टीने महत्त्वाची साधने आहेत.

राजकीय इतिहास : ख्मेरच्या पहिल्या राज्याविषयी अनेक दंतकथा प्रचलित आहेत. ख्मेर राज्याच्या स्थापनेची हकिकत एका ख्मेर शिलालेखात दिली आहे. भारतातील कंबु स्वयंभू नावाचा राजा, त्याच्या मेरा (मीरा) या राणीच्या मृत्यूने फार दुःखी झाला तो राज्य सोडून कंबोडियामध्ये जीव देण्याच्या हेतून गेला. तो शिवभक्त होता. त्याला अरण्यात एक नागराज भेटला. त्याने कंबूला जीव देण्यापासून परावृत्त करून आपल्या कन्येशी त्याचा विवाह लावला. नंतर त्या दोहोंनी एक नवा वंश स्थापन केला परंतु कंबोडियाचा संस्थापक म्हणून अद्यापि कौण्डिण्य नावाच्या एका इसमास महत्त्व दिले जाते. कौण्डिण्य व त्याची नागपत्नी यांनी कंबोजची स्थापना केली, अशी दंतकथा कंबोडियात प्रचलित आहे. याविषयी अधिक माहिती उपलब्ध नाही. कदाचित कंबोज देशाचे नाव सार्थ करण्याकरिता ती योजलेली असावी.

देवताशिल्प, अंकोरवात, १२ वे शतक.

चेन – लाच्या ज्या दोन भावांनी फुनानविरुद्ध बंड पुकारले, त्यांपैकी थोरला भाऊ भाववर्मन् पुढे चेन – लाच्या गादीवर आला व त्यानेच ख्मेर साम्राज्याचा पाया घातला, असे बहुतेक इतिहासकारांचे मत आहे. त्याने ख्मेर साम्राज्याच्या सीमा वाढविल्या. त्याच्यानंतर त्याचा धाकटा भाऊ चित्रसेन हा महेंद्रवर्मन् या नावाने गादीवर बसला. हा पराक्रमी होता. त्याने आपले विजय साजरे करण्याकरिता लिंगमंदिरे बांधली व शंकराला अर्पण केली. याचा पुत्र ईशानवर्मन् याच्या हातात राज्याची सूत्रे येताच (६१६ – २७) याने आपले राज्य पश्चिमेकडे द्वारवतीपर्यंत वाढविले ईशानपुर नावाचे नवीन शहर वसविले आणि वायव्य कंबोडियातील चक्रकपुरा, अमोधपुरा व भीमपुरा या तीन राज्यांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. त्याच्यानंतर अनुक्रमे दुसरा भाववर्मन् (६२७ – ३९) आणि पहिला जयवर्मन् (६३९ – ८१) हे दोन राजे गादीवर आले. त्यांविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. जयवर्मनच्या मृत्युनंतर भाववर्मनच्या घराण्याचा शेवट झाला. यानंतर सु. एक शतक अराजक माजले. चेन – लाचे दोन तुकडे होऊन उत्तर चेन – ला मधून चीनला वकील गेले व चीनच्या साहाय्याने हे राज्य कसेबसे टिकून राहिले. चीनशी जोडलेले संबंध फक्त उत्तर चेन – लापुरतेच मर्यादित होते, मात्र दक्षिण चेन – लावर आठव्या शतकात जावाचे वर्चस्व असावे. याशिवाय ]श्रीविजयचे ]शैलेंद्र यांनीही आपले वर्चस्व स्थापले होते. दुसरा जयवर्मन् (८०२ – ५०) गादीवर येताच, त्याने पुन्हा राज्याची घडी बसविली. तत्पूर्वी हा वंश केवळ नामधारीच राहिला होता. त्याने शिवकैवल्य नामक ब्राह्मणाला धर्मगुरू करून देवराज पंथाची स्थापना केली आणि इंद्रपुर ही आपली राजधानी बनविली. पुढे त्याने हहिहरालय नावाचे दुसरे नगर वसविले आणि कंबोज देशास पूर्वीचे स्वातंत्र्य व वैभव मिळवून दिले. त्यानंतर त्याचा पुत्र जयवर्धन् (८५० – ७७) गादीवर आला. त्याने जयवर्मन् (तिसरा) हे नाव धारण केले. ह्यास हत्तीच्या शिकारीचा छंद होता. तिसऱ्या जयवर्मनच्या मृत्यूनंतर इंद्रवर्मन् (८७७ – ८९)गादीवर आला. त्याच्या कारकीर्दीत अनेक मंदिरे बांधली गेली आणि राज्यविस्तारही झाला. त्याच्यानंतर यशोवर्धन् हा यशोवर्मन् हे नाव धारण करून गादीवर आला (८८९ – ९००). तो स्वतः विद्याकलांचा व्यासंगी होता. त्याने संस्कृत भाषेला उत्तेजन दिले. त्याचे कार्यक्षम शासन व धार्मिक धोरण प्रशंसनीय आहे. त्याने यशोधरपुर नावाचे शहर वसविले. अंकोर संस्कृतीच्या विकासाचे सर्व श्रेय त्याला देण्यात येते. त्याच्यानंतर त्याचे दोन पुत्र हर्षवर्मन् आणि दुसरा ईशानवर्मन् हे अनुक्रमे गादीवर आले. परंतु यशोवर्मनचा मेहुणा चौथाजयवर्मन (९२१ – ४१) याने दुसऱ्या ईशानवर्मनच्या वेळी बंड करून ९२१ च्या सुमारास स्वतंत्र राज्य स्थापन केले आणि पुढे ईशानवर्मनच्या मृत्यूनंतर (९२८) त्याने सर्व कंबोज राज्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याने आपली राजधानी अंकोरपासून ८० किमी. वर जंगलात कोहकेर ह्या ठिकाणी हलविली. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा हर्षवर्मन् आणि त्यानंतर यशोवर्मनच्या धाकट्या बहिणीचा मुलगा राजेंद्रवर्मन् (९४४ – ६८) गादीवर आला. त्यानंतर पाचव जयवर्मन् (९६८ – १००१) आला. त्यांनी आपल्या पूर्वसूरींची आक्रमक धोरणे स्वीकारून शेजारच्या प्रदेशांवर वर्चस्व प्रस्थापित केले.


इंद्रवर्मन् आणि त्याच्या सात वारसांचा हा सु. १२५ वर्षांचा काळ अत्यंत भरभराटीचा होता. ह्या काळात साम्राज्याचा विस्तार वाढला आणि कला, धर्म व वाङ्मय यांचाही विकास झाला. कंबोज देश ख्मेर राष्ट्र या नावाने प्रसिद्धीस आला.

पाचव्या जयवर्मनच्या मृत्यूनंतर कंबोजमध्ये काही काळ वारसाहक्कासाठी यादवी माजली व १०१० मध्ये पहिला सूर्यवर्मन् गादीवर आला. त्याच्या कारकीर्दीत राज्यविस्तारा बरोबरच कला, धर्म, साहित्य ह्यांचीही वाढ झाली. हिंदू धर्माबरोबर त्याने बौद्ध धर्मासही प्रोत्साहन दिले. १०५० मध्ये तो मृत्यू पावला. त्या वेळी त्याच्या मंत्रिमंडळाने दुसरा उदयादित्यवर्मन् ह्यास गादीवर बसविले. पुढे १११३ मध्ये दुसरा सूर्यवर्मन् (१११३ – ४५) गादीवर येईपर्यंत राज्यात अनेक बंडाळ्या माजून अंदाधुंदी माजली. हर्षवर्मन् (तिसरा), जयवर्मन् (सहावा), धरणीद्रवर्मन् ह्यांसारखे दुबळे राजे आले व गेले. सूर्यवर्मनने बंडखोरांना जिंकून पुन्हा कंबोजचा एकतंत्री अंमल सुस्थिर केला. चीनशी राजनैतिक संबंध जोडून आपले राजदूत चीनमध्ये पाठविले. चीनच्या राजाने त्यास अनेक पदव्या दिल्या. ह्यावेळी कंबोजच्या साम्राज्यात ब्रह्मंदेश व मलाया यांचेही काही भाग अंतर्भूत होते. जयवर्मनने दिवाकर पंडित या गुरूच्या साहाय्याने कोटिहोम, लक्षहोम व महाहोम हे यज्ञ केले. तो विष्णूचा भक्त होता. त्याकरिता त्याने ]अंकोरवातचे भव्य मंदिर बांधले. त्याच्यानंतर धरणींद्रवर्मन् (दुसरा), यशोवर्मन् (दुसरा) वगैरे काही राजे गादीवर आले, परंतु त्यांसंबंधी विशेष माहिती उपलब्ध नाही. पुढे सातवा जयवर्मन् (११८१ – १२१८) गादीवर आला. ख्मेर राजांपैकी हा शेवटचा थोर राजा होय. त्याने लष्करी दृष्ट्या कंबोज बलवान करून लोकांसाठी अनेक सुखसोयी उपलब्ध करून दिल्या व हिंदू धर्माचे वर्चस्व वाढविले. त्याने ]अंकोरथोमची उभारणी करून ती आपली राजधानी केली. त्याच्या राज्यात ह्या वेळी सु. ७९८ मंदिरे व १०२ रुग्णालये होती, असे त्याच्या कोरीव लेखात म्हटले आहे.

जयवर्मनच्या मृत्यूनंतर ख्मेर साम्राज्यास उतरती कळा लागली. यानंतरचा सु. १०० – १५० वर्षांचा कंबोजचा इतिहास बंडे, परकीय आक्रमणे, अंतर्गत कलह इत्यादींनी भरलेला आहे. पुढे तर कंबोज थाय राजांच्या अंमलाखाली गेला आणि १८५४ मध्ये तो फ्रेंचांचा संरक्षित प्रदेश बनला.

सामाजिक स्थिती : ख्मेर संस्कृतीत राजा हाच सर्वश्रेष्ठ अधिकारी होता. राजा व प्रजा ह्यांच्या दरम्यान राजाचे मंत्रिमंडळ व इतर अधिकारी असत. ह्याशिवाय धर्मगुरूंना व विद्वानांना समाजात आणि राजदरबारी विशेष महत्त्व असे. बहुतेक ख्मेर लोक शेती करीत. भात हे त्यांचे प्रमुख पीक होते. प्रशासनाच्या सोयीकरिता राज्याची जिल्ह्यांत विभागणी केलेली होती व राजाने नेमलेले राज्यपाल त्याचा कारभार पाहत. त्या वेळी ताम्रपुर, आढ्यपुर, ध्रुवपुर, ज्येष्ठपुर, विक्रमपुर, उग्रपुर, ईशानपुर, भावपुर, श्रेष्ठपुर इ. अनेक शहरे होती. शहरांची तटबंदी व सभोवतीचे खंदक आणि आंतील तलाव यांची रचना वैशिष्ट्यपूर्ण होती. शहरांत विप्रशाळा, विद्यालये, ग्रंथालय, रुग्णालये, आरोग्यशाळा, धर्मशाळा वगैरे सार्वजनिक इमारती होत्या. यांतील धर्मशाळा व रुग्णालये यांसंबंधीचे अनेक तपशील कोरीव लेखांमधून आढळतात.

असुरबाणाचे अपोत्थित शिल्प, अंकोरवात.

आर्थिक स्थिती : बहुतेक ख्मेर राजे हिंदू धर्मीय होते आणि त्यांनी विष्णूबरोबर शिवाचीही मंदिरे बांधली. तथापि हिंदू धर्मापूर्वी येथे बौद्ध धर्माचाही शिरकाव झाला असावा, असे अवशिष्ट बौद्ध मूर्तींवरून दिसते. या मूर्तींचे हिंदू मूर्तिशिल्पात हिंदूंनी अनुकरण केलेले स्पष्ट दिसते. अर्थात हिंदू धर्मामुळे बौद्ध धर्म संपुष्टात आला नाही. याचे सरळ कारण म्हणजे हिंदू राजांची सहिष्णू वृत्ती हे होय. साहजिकच अवशिष्ट मूर्तिकामात व वास्तूंत दोन्हींचे अवशेष उपलब्ध झाले आहेत. देवालयांना वर्षासने देण्याची पद्धत होती. त्यामुळे मंदिरांची नीट जोपासना होई. अशा वर्षासनांच्या नोंदी, शिवलिंगांची व विष्णूच्या पादुकांची स्थापना इत्यादींसंबंधींचे शेकडो उल्लेख तत्कालीन कोरीव लेखांतून मिळतात. आज मात्र येथे बौद्ध धर्मीयांचे प्रमाण अधिक आहे.

साहित्य, भाषा इत्यादी : भारताबाहेर जी भारतीय संस्कृती विस्तारली, तिचा प्रारंभ संस्कृत भाषेने झालेला आढळतो. याला कंबोज किंवा ख्मेर अपवाद नाही. कंबोज देशांमध्ये जवळजवळ ३२० कोरीव लेख उपलब्ध झाले असून त्यांपैकी सु. १५० संस्कृत भाषेतील आहेत. ही भाषा अत्यंत काव्यमय व सुबोध असून पाणिनी, पतंजली तसेच वेदवेदान्त, स्मृती, रामायण – महाभारत, बौद्ध व जैन पवित्र ग्रंथ, षड्दर्शने, कामसूत्र, धर्मशास्त्र या सर्वांचे उल्लेख त्या लेखांत येतात. यांवरून हे सर्व वाङ्मय कंबोजमध्ये प्रचलित असावे, हे निश्चित. यांशिवाय कंबोजमध्ये ख्मेर भाषा रूढ होती. बहुतेक संस्कृत लेख ब्राह्मी लिपीत आहेत.

कला : प्राचीन कंबोडिया हे भारतीय कलानिर्मितीचे एक प्रमुख केंद्र होते. हिंदू व बौद्ध धर्मीयांच्या असंख्य कलाकृती येथे सापडतात. ख्मेर कलेचे स्फूर्तिस्थान भारतच होता, हे तेथील कलाविषयांवरून व त्यांतील ज्ञापकांवरून लक्षात येते.

ख्मेर कलेचा कळस म्हणजे अंकोरथोम. जुन्या ख्मेर कलेचे अमर वैभव येथे साक्षात रूप धारण करून उभे आहे. येथील मंदिरांची वास्तुशैली वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यांची शिखरे भारतीय नमुन्याची आहेत. त्यांत वास्तव किमान दिसत नाही, उलट विटा रचत वरपर्यंत गेल्याने वरील भाग हळूहळू निमुळता होत जातो. ह्या पद्धतीमुळे शिखर नेहमीच निमुळते होते. बहुतेक मंदिरांच्या सभोवती तट व त्यानंतर खंदक खोदलेला आहे. मंदिरांच्या रचनेत गोपुर, गर्भगृह, सभागृह इ. उपवास्तूंची वास्तुशास्त्रीय बांधणी असून वेदींच्या भिंतींवर उत्थित व अपोत्थित शिल्पांबरोबर काही ठिकाणी चित्रकामही केलेले आढळते.


बाफुआन, बेआन, बांटीश्री, प्रांबानन वगैरे स्थळांतील अनेक वास्तूंत अंकोरवातचे मंदिर अप्रतिम असून मानवी हातांनी इतकी भव्य, उदात्त व सुंदर कलाकृती कशी निर्माण झाली, याचा विस्मय वाटतो. तेथील स्थापत्यामध्ये प्रतीत होणारी एकात्मता व संवादित्व अप्रतिम आहे. मंदिरात शिरताना जो कठडा लागतो, त्यावर समुद्र मंथनाचे दृश्य शिल्पित केलेले आहे. त्यातील मूर्तींची उंची सु. सव्वा सहा मी. आहे. मुख्य देवालयाच्या चहूबाजूंच्या भिंतींवर उत्थिप शिल्पे कोरलेली आहेत. बाहेरच्या भिंतींवर जागोजागी मानवी आकाराएवढी सु. १,७५० अप्सरांची शिल्पे आहेत व यांतील प्रत्येक अप्सरेची केशरचना व शिरोभूषणे वेगळी आहेत. याशिवाय मंदिराच्या भिंतींवरील त्रिकोणी पर्णाकृतींत, गणेशपट्ट्यंवर व द्वारांवर चित्रविचित्र नक्षीकाम, कलाबूत व सुंदर शिल्पे कोरलेली आहेत.

अंकोरथोमचे दुसरे महत्त्वाचे देवालय म्हणजे बेऑन देवालय. हे बौद्ध देवालय आहे. ह्याची शेकडो शिखरे आजूबाजूच्या अरण्याचाच एक भाग वाटतात.

बाटीश्रीचे मंदिर अंकोरच्या ईशान्येस सु. २४ किमी. वर आहे. हे शिवमंदिर आकाराने मोठे नाही, पण ते ख्मेर संस्कृतीचे प्रतीक आहे. यातील भिंतींवर काढलेल्या त्रिकोणी पानांमधील कलाकृती चित्तवेधक आहेत. त्रिकोणी व सुंदोपसुंदांचे द्वंद्वयुद्ध आणि कैलास पर्वत हलवू पाहणारा रावण ही दृश्ये अत्यंत मनोवेधक आहेत.

डांग्रेक डोंगरावर बांधलेले शिवमंदिर गोपुरांवरील व भिंतींवरील असंख्य सुंदर शिल्पांकरिता प्रसिद्ध आहे.

वरील वास्तूंपैकी बऱ्याचशा वास्तू आज जीर्णावस्थेत आहेत. पुरातत्त्ववेत्त्यांच्या मते अशा प्रकारच्या असंख्य वास्तू ख्मेर काळात कंबुज प्रदेशात बांधण्यात आल्या असाव्यात परंतु आज त्यांपैकी फार थोड्या अवशिष्ट आहेत.

ख्मेर संस्कृतीवर भारतीय संस्कृतीचा जबरदस्त प्रभाव आहे. ख्मेर समाजाच्या देवदेवता, मंदिरे, धार्मिक विधी व संस्कार, शासनपद्धती, वाङ्मय या सर्वांतून त्याचे प्रत्यंतर येते.

पहा : ख्मेर प्रजासत्ताक बृहद्भारत.

संदर्भ : 1. Briggs, L. P. The Ancient Khmer Empire, London, 1951.

    2. Giteau, M. Khmer Sculpture, New York, 1965.

    3. Majumdar, R. C. Hindu Colonies in the Far East, Calcutta, 1963.

    4. Majumdar, R. C. Ed. The Struggle for Empire, Bombay, 1957.

    ५. गुप्ते, र. शं. बृहत्तरभारत¸औरंगाबाद, १९६०.

देशपांडे, सु. र.