मिंटो, गिल्बर्ट एलिटय: (२३ एप्रिल १७५१–२१ जून १८१४). हिंदुस्थानातील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर जनरल. जन्म सरदार घराण्यात एडिंबरो (इंग्लंड) येथे. डेव्हिड ह्यूम ह्या तत्त्वज्ञानाच्या मार्गदर्शनाखाली त्याचे पॅरिस येथे सुरुवातीचे शिक्षण झाले. पुढे त्याने ऑक्सफर्ड विद्यापीठातून कायद्याचा अभ्यास करून वकिलीस प्रारंभ केला (१७७४). नंतर त्याची संसदेवर निवड झाली (१७७६). त्याने वॉरन हेस्टिंग्जविरुद्धच्या दाव्यात बर्कला पूर्ण साहाय्य दिले. १७९४–९६ पर्यंत मिंटो कॉर्सिकाचा गव्हर्नर होता. त्याची व्हिएन्ना येथे खास राजदूत म्हणून नेमणूक करण्यात आली होती (१७९९–१८०१). यानंतर मिंटो ईस्ट इंडिया कंपनीच्या बोर्ड ऑफ कंट्रोलचा अध्यक्ष झाला. १८०७ मध्ये तो हिंदुस्थानचा गव्हर्नर जनरल झाला. या पदावर तो १८१३ पर्यंत होता. 

मिंटोने प्रथम अंतर्गत बंडाळ्यांचा मोड करून कंपनी सरकारचा राज्यविस्तार करण्याकडे लक्ष दिले. मध्य हिंदुस्थानात, विशेषतः वऱ्हाडमध्ये, पेंढाऱ्यांचे प्रस्थ वाढले होते. इंग्रजांनी भोसल्यांना संरक्षण देऊन पेंढाऱ्यांचा पुढारी अमीरखान याला वऱ्हाडमधून हाकलून दिले (१८०९). त्रावणकोरच्या राज्यात दंगा झाल्याच्या निमित्ताने मिंटोने तोही कारभार कंपनीच्या ताब्यात घेतला. अशाच तऱ्हेने बुंदेलखंडातील बंडाचाही त्याने बंदोबस्त केला. 

रशिया फ्रानच्या मैत्रीमुळे मिंटोच्या वेळी वायव्य सरहद्दीस विशेष महत्त्व प्राप्त झाले. फ्रान्स रशियाचा संभाव्य हल्ला या बाजूने होण्याचा धोका होता. त्याच सुमारास रणजितसिंगाने पंजाबमधून अफगाण लोकांचा पराभव करून तेथे शिखांची सत्ता स्थापन केली. त्याला यमुनेपर्यंत हद्द पक्की करावयाची होती. रणजित सिंगाच्या वाढत्या सत्तेस आळा घालण्यासाठी आणि फ्रेंचांच्या संभाव्य आक्रमणास तोंड देण्यासाठी मिंटोने ⇨ चार्ल्स मेट्‌काफ यास रणजितसिंगाकडे बोलणी करण्यासाठी पाठविले. बऱ्याच वाटाघाटी झाल्या परंतु काही निष्पन्न होईना. याच सुमारास तुर्कस्तान व इंग्लंड यांचे संबंध १८०९ च्या दार्दानेल्सच्या तहाने सुधारले होते आणि फ्रान्सचा संभाव्य धोकाही नष्ट झाला होता, तेव्हा मिंटोने ऑक्टलोनी यास सैन्य घेऊन रणजितसिंगावर पाठविले. त्याने लुधियाना घेताच रणजित सिंगाने १८०९ मध्ये अमृतसर येथे मेट्‌काफबरोबर तह करून सतलज नदीची सरहद्द कबूल केली.

तत्पूर्वी त्याने १८०८ मध्ये मॅल्कम यास इराणच्या शाहाशी मैत्रीचा तह करण्यासाठी पाठविले. याच वेळी इंग्लंडमधून गेलेले सर हार्फर्ड जोन्स याने हा तह केला होता. मिंटोने जोन्सच्या तहास मान्यता दिली. अशाच तऱ्हेने सरहद्दीच्या बंदोबस्तासाठी मिंटोने एल्फिन्स्टनला अफगाणिस्तानात पाठवून १८०९ मध्ये तेथून शाहाशी मैत्रीचा तह घडवून आणला. 

यानंतर मिंटोने चढाईचे धोरण स्वीकारले. त्याने फ्रेंचांचा पूर्वेकडील केप ऑफ गुडहोपपासून हॉर्न भूशिरापर्यंतचा प्रदेश काबीज केला. त्याने इंग्रज फौज पाठवून फ्रेंचांकडे असलेले मॉरिशस व बूर्बाँ ही बेटे काबीज केली. पूर्वेकडील डचांचे जावा बेटही इंग्रजांनी जिंकले. मलाकावर पाठविलेल्या फौजेबरोबर मिंटो स्वतः गेला होता. या स्वारीत त्याने बटेव्हिया जिंकून फ्रेंचांचा पराभव केला. 

मिंटोने ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या धर्मप्रसारास बंदी घातली व प्रशासनात आवश्यक ते फेरफार करून शिस्त आणली. गव्हर्नर जनरलच्या पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्याने उर्वरित आयुष्य इंग्लंडमधील सक्रिय राजकारणात घालविले. 

तो स्टीव्हेनेज (हार्टफर्डशर) येथे मरण पावला.

गोखले, कमल