जव्हार संस्थान : ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील महाराष्ट्रात असणारे एक जुने संस्थान. क्षेत्रफळ ८०३ चौ. किमी. लोकसंख्या सु. पाऊण लाख (१९४१).उत्पन्न सु. ९ लाख रुपये. ठाणे जिल्ह्याच्या ईशान्येस हे संस्थान वसले असून संस्थानाचा बहुतेक भूप्रदेश पठाराचा आहे. प्रथम हे संस्थान वारल्यांकडे होते. वारल्यांकडून जयाबा कोळ्याने १२९४ मध्ये ते मिळविले. जयाबानंतर त्याचा मुलगा नीमशाह गादीवर आला. १३४३ मध्ये दिल्लीच्या तुघलकांनी नीमशाहाला राजा ही पदवी दिल्यावरून नवीन शक सुरू झाला (५ जून १३४३). तो अखेरपर्यंत जारी होता. नीमशाहनंतर सु. दोनशे वर्षांच्या काळातील इतिहास ज्ञात नाही. पोर्तुगीजांशी युद्धे करून कोळी राजांनी वसई ते डहाणू टापूवर अंमल बसवला. १७८२ पासून पेशव्यांनी दुसऱ्या पतंगशाहावर १,००० रु. खंडणी बसवली. इंग्रज व जव्हार यांमध्ये कोणत्याही प्रकारचा तह झालेला नव्हता. खंडणी इंग्रजांनी माफ केली (१८२२).पण नवीन राज्याभिषेकाचा नजराणा कायम ठेवला. १८९० मध्ये संस्थानला दत्तकाचा अधिकार मिळाला. राजाला खूनखटल्यांचा अधिकार होता. जव्हार हीच राजधानी होती व संस्थानात १०८ खेडी होती. ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्याचे पूर्ण नियंत्रण संस्थानवर असे. स्वातंत्र्योत्तर काळात संस्थान प्रथम मुंबई प्रांतातील ठाणे जिल्हा आणि नंतर महाराष्ट्र राज्य यांत समाविष्ट करण्यात आले.

कुलकर्णी, ना. ह.