दुर्गावती : (? –? सु. १५६४). सोळाव्या शतकातील गोंडवनची (गढा–मंडला) कर्तृत्ववान राणी. महोबाचा चंदेल्ल राजा किरातराय याच्या या मुलीचा गोंडवनचा राजा दलपतशाहशी सु. १५४५ मध्ये विवाह झाला पण चार वर्षातच पती वारला. त्यामुळे आपला अल्पवयीन मुलगा वीर नारायण याच्या वतीने तिने पंधरा वर्षे कार्क्षक्षम रीत्या कारभार केला आणि गोंडवनीची गादी सांभाळली. तिच्या ताब्यात सु. ७७,००० चौ.किमी. प्रदेश होता व त्यात असंख्य खेडी होती. तिचे सैन्यही सुसज्ज असे. त्यात २०,००० घोडे आणि एक हजार हत्ती होते असे अबुल फज्ल अकबरनाम्यात म्हणतो. निकटवर्ती मुसलमानांना तिच्या ऐश्वर्याचा मत्सर वाटे. माळव्याचा बाज बहादूर व बंगालचे अफगाण सुलतान यांच्यापासून तिने अत्यंत धैर्याने राज्याचे रक्षण केले. १५६४ मध्ये अकबराच्या हुकमावरून काराचा (कडाचा) राज्यपाल असफखानने मोठ्या सैन्यानिशी सिंगारगढवर आक्रमण केले. दुर्गावती व तिचा मुलगा वीर नारायण यांनी मोठ्या शौर्याने मोगलांशी मुकाबला केला. असफखानाजवळ असलेले प्रबळ सैन्य व तोफखाना यांपुढे तिचा निभाव लागू शकला नाही. लढता लढता लागलेल्या बाणामुळे ती जखमी झाली. घराण्याची प्रतिष्ठा व अब्रू राखण्यासाठी शत्रूच्या हाती पडून अपमानित होण्यापेक्षा मरण बरे, या हेतूने तिने पोटात खंजीन खुपसून वीरांगनेचे मरण पतकरले. ती देखणी होती तसेच तिची निश्चयी वृत्ती, शौर्य व धाडस वाखाणण्यासारखे होते. ती नेमबाजीत पटाईत होती व शिकारीचा तिला छंद होता. कार्यक्षम शासनकर्ती म्हणून तिची इतिहासात प्रसिद्धी आहे. स्लीमन या इंग्रजी प्रशासकाने तिच्याबद्दल प्रशंसोद्‌गार काढले आहेत.

खोडवे, अच्युत