बेनीतो मुसोलिनीमुसोलिनी, बेनीतो : (२९ जुलै १८८३–२८ एप्रिल १९४५). इटलीचा हुकूमशहा (१९२२–४३) व फॅसिझम या तत्त्वप्रणालीचा प्रवर्तक. त्याचा जन्म सामान्य लोहाराच्या कुटुंबात दोव्हिया (प्रेदॉप्या) येथे झाला. त्याचे वडील आलेस्सांद्रो हे समाजवादी असून लोहारकाम करीत, तर आई रॉझा ही प्राथमिक शाळेत शिक्षिका होती. फॉर्लीम्‌पॉपॉली येथील शाळेतून मुसोलिनीने अध्यापनाची पदविका मिळविली (१९०१). शिक्षक म्हणून काही दिवस काम केल्यानंतर तो स्वित्झर्लंडला पळून गेला (१९०२) परंतु खोट्या पारपत्रामुळे त्याला इटलीला परतावे लागले (१९०४). या काळात त्याने कार्ल मार्क्स, सोरेल, प्येअर प्रूदाँ, लुई ब्लांकी, प्यॉटर क्रपॉटक्यिन इ. विचारवंतांचे साहित्य वाचले आणि तो कट्टर समाजवादी कामगारनेता बनला, राजकीय प्रचारासाठी त्याने ट्रेन्टमधील ला लोता दी क्लास या प्रांतिक वृत्तपत्राचे संपादकत्व स्वीकारले. यानंतर त्याची समाजवादी पक्षाचा संचालक म्हणून निवड झाली आणि तो लवकरच अवंती या मिलानमधील वर्तमानपत्राचा संपादक झाला (१९१२). त्याच्या परखड, सडेतोड लेखनामुळे अवंतीचा खप चौपटीने वाढला. पहिल्या महायुद्धात इटलीने तटस्थ राहावे, ही आधीची भूमिका सोडून त्याने देशाच्या महायुद्धप्रवेशाचे समर्थन केले. परिणामतः समाजवादी पक्ष व अवंती यांमधून त्याची हकालपट्टी झाली (१९१४). त्यानंतर त्याने आपल्या विचारांच्या प्रसारार्थ पोपोलो द इतालिया हे स्वतंत्र वृत्तपत्र काढले. या सुमारास त्याने वडिलांच्या नायना ग्विदी या विधवा प्रेयसीच्या राशेली या कनिष्ठ मुलीबरोबर लग्न केले (१६ डिसेंबर १९१५) परंतु तत्पूर्वीच तो तिच्याबरोबर १९०९ पासून राहत असे. त्यांना पाच मुले झाली. राशेली या पत्नीशिवाय लेदा राफानेल्ली, मार्गेरेता सार्फाती, इदा दॉल्सर, आंजेला कर्ती, क्लॅरेता पेतॅशी इ. स्त्रियांबरोबरची त्याची प्रेमप्रकरणे गाजली. क्लेरेता ही अखेरपर्यंत त्याच्याबरोबर होती.

मुसोलिनीने मिलान येथे २३ मार्च १९१९ रोजी फॅसिस्ट पक्षाची स्थापना केली. त्यानंतर १९२१ मध्ये तो संसदेवर निवडून आला. आंदोलनाचा मार्ग अवलंबून फॅसिस्टांनी बोलोन्या आणि मिलान या शहरांचा ताबा घेतला. प्रशासकीय यंत्रणा त्यांच्या हिंसक कृत्यांना आळा घालण्यास असमर्थ ठरत होती. अशा वेळी नेपल्स येथे फॅसिस्टांचे अधिवेशन भरले (१९२२). त्यात लूईजी फाक्ता सरकारच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. फॅसिस्टांना कारखानदारांसह उच्च मध्यमवर्गीयांचा पाठिंबा मिळाला. तेव्हा त्यांनी रोमवर मोर्चा काढला (२८ ऑक्टोबर १९२२). राजाने लष्करी कायदा पुकारण्याऐवजी फाक्ताचा राजीनामा घेऊन मुसोलिनीला नवी न मंत्रिमंडळ बनविण्याची आज्ञा केली. त्याने फॅसिस्ट व राष्ट्रीय पक्षाचे संयुक्त सरकार बनवले. राजाने व संसदेने मुसोलिनीला पंतप्रधान करून सर्वाधिकार दिले. सुरुवातीस त्याने घटनात्मक चौकटीतून शांतता प्रस्थापित करून अंतर्गत कारभारात फॅसिस्ट अधिकारी नेमले व राजाकडून आपल्या लष्करी संघटनेला मान्यता मिळवली. हळूहळू मुसोलिनीने नवा मतदानविषयक कायदा संमत करून, संसदेत आपल्या पक्षाचे वर्चस्व प्रस्थापित केले (१९२४).

फॅसिस्ट दहशतवादाला समाजवादी सदस्य गीया जाकोमो मात्तेऑत्ती याने फॅसिस्टी एक्स्पोझड नावाच्या ग्रंथातून गुन्ह्यांची यादी सादर करून कडवा विरोध केला, तेव्हा त्याचा खून करण्यात आला (१० जून १९२४). काही दिवस मुसोलिनीच्या लोकप्रियतेला धोका निर्माण झाला. तेव्हा मुसोलिनीने वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर निर्बंध लादून विरोधकांच्या सभांवर बंदी घातली. उदारमतवादी आणि कम्युनिस्ट यांनी यावेळी उग्र निदर्शने केली पण ती कठोरपणे मोडण्यात आली. अखेर मुसोलिनीने संसदेकडून ३१ जानेवारी १९२६ रोजी एका अधिकृत कायद्याने राज्य करण्याचा संपूर्ण अधिकार मिळविला आणि तत्काळ त्याने संप आणि टाळेबंदी अवैध ठरवून फॅसिस्ट युवक संघटना स्थापल्या. त्याच्या डोळ्यासमोर आर्थिक पुनर्रचनेवर आधारित इटलीचे श्रेणीसत्ताक राज्य (कार्पोरेटीव्ह स्टेट) स्थापण करण्याचे ध्येय होते. लोकशाही विरोधी भूमिकेमुळे त्याच्यावर तीन-चार प्राणघातक पण अयशस्वी हल्ले झाले. त्याने एका कायद्याने कामगारांचे कामाचे तास वाढवून नगरपालिका, प्रांत आणि पुढे सार्वत्रिक निवडणुका रद्द केल्या आणि पोलीस व लष्करी यंत्रणेत स्थायी सेवेवर फॅसिस्ट स्वयंसेवक नेमले. १९२८ मध्ये फॅसिस्ट ग्रँड कौन्सिल (पक्षाचे वरिष्ठ मंडळ) हीच शासनाची सूत्रधार होती आणि मुसोलिनी हा सर्वसत्ताधारी होता.

परराष्ट्रीय धोरणात मुसोलिनीच्या डोळ्यापुढे इटलीचे साम्राज्य-रोमन एंपायर-ही कल्पना असल्यामुळे साम्राज्यविस्तारास त्याने सुरुवात केली. इथिओपियावर स्वारी केली. (१९३५) आणि ते इटालियन साम्राज्यात समाविष्ट केले.  १९३९ मध्ये त्याने ॲबिसिनिया पादाक्रांत केला. प्रारंभी त्याला हिटलरविषयी आस्था नव्हती परंतु राष्ट्रसंघाने इटलीचे सभासदत्व रद्द केले आणि त्याच वेळी मुसोलिनीने स्पॅनिश यादवी युद्धात बंडखोरांचा नेता फ्रँको याला सहकार्य दिले. तेव्हा इंग्लंड आणि फ्रान्स या देशांशी त्याचे वैर निर्माण झाले. परिणामतः त्याला जर्मनीवर अवलंबून राहणे क्रमप्राप्त झाले. साहजिकच तो जागतिक परिस्थितीला अनुसरून हिटलरच्या पूर्ण कच्छपी गेला आणि हिटलरच्या ज्यू द्वेष व अन्य धोरणास त्याने संपूर्ण पाठिंबा दिला. इटलीची लष्करी तयारी नसतांनाही त्याने दुसऱ्या महायुद्धात उडी घेतली. अमेरिकेच्या युद्धप्रवेशानंतर इटलीच्या सैन्याची पीछेहाट होऊ लागली. महायुद्ध आणि साम्राज्यवादी धोरण यांमुळे जनसामान्यावरील कराचा बोजा वाढला आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याची गळचेपी झाली. तेंव्हा संत्रस्त जनतेने मुसोलिनीच्या राजीनाम्याची मागणी केली. फॅसिस्ट पक्षात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले. आवाक्याबाहेरच्या अंतर्गत परिस्थितीचा विचार करून मुसोलिनीने राजीनामा दिला. त्याला व त्याच्या सहकाऱ्यांना अटक करण्यात आली परंतु जर्मन सैनिकांनी त्यांची सुटका केली. जर्मनव्याप्त उत्तर इटलीत काही दिवस फॅसिस्ट पक्षाद्वारे त्याने राज्य केले परंतु जर्मनीचा पराभव होताच तो निष्प्रभ झाला आणि २८ एप्रिल १९४५ रोजी त्याने स्वित्झर्लंडमध्ये पळून जाण्याची योजना आखली पण विरोधकांनी त्याला पकडले आणि दाँग्गा (कोमो) येथे क्लेरेता या प्रेयसीसह त्याला गोळ्या घालून ठार मारले.

  यूरोपीय राजकीय संस्कृतीच्या संदर्भात फॅसिझमचा पराभव झाला. प्राचीन रोमन साम्राज्याचे स्वप्न आणि त्याची उग्र राष्ट्रवाद व सैनिकी सामर्थ्य ही साधने विसाव्या शतकातील यूरोपीय संस्कृतीशी विसंगत ठरणारी होती कारण या शतकात ब्रिटीशादिकांची साम्राज्येच खिळखिळी होत आली होती. प्रादेशिक विस्तारवाद राष्ट्रराज्याच्या उदयामुळे अशक्यप्राय आणि अन्याय्य ठरत होती. खुद्द इटली लष्करी दृष्ट्या पुरेसा सामर्थ्यवानही नव्हता. इतिहासाचा रोख व दिशा यांच्या अज्ञानाच्या त्या निदर्शक होत्या. हुकूमशाही व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीचे शेवटचे एक नमुनेदार स्वरूप मुसोलिनीच्या चरित्रातून दिसून येतो. तथापि त्यातही समाजवादाकडून अवचतिपणे हुकूमशाही महत्त्वाकांक्षेकडे झालेले त्याचे परिवर्तन हे त्याच्या चरित्रातील एक कायमचे रहस्य ठरेल. मात्र मुसोलीनीप्रणित फॅसिसिझमच्या प्रवृत्तीला लोकशाही मूल्यांनीच शह देता येईल, हेही जागतिक इतिहासात त्याच्याच चरित्राने सुचवून ठेवले आहे. त्याचे विविध वृत्तपत्रांतून कामगार चळवळ व समाजवादांचे समर्थन करणारे तसेच समाजवाद विरोधी व राष्ट्रीयत्वाचे प्रतिपादन करणारे – फॅसिस्ट प्रवृत्तीचा प्रसार करणारे प्रखर व जहाल लेख प्रसिद्ध झाले. त्याने आत्मचरित्र (१९२८) लिहिले. त्याची पत्रे पुढे प्रसिद्ध झाली.

पहा : फॅसिझम.

संदर्भ : 1. Cassels, Alan, Mussolini’s Early Diplomacy, Princeton, 1970.

             2. Deakin, F. W. The Brutal Friendship, New York, 1966.

             3. Fermi, Laura, Mussolini, Chicago, 1961.

             4. Hibbert, Christopher, Benito Mussolini, London, 1962.

             5. Kirkpatrick, Ivone, Mussolini : A Study in Power, London, 1964.

             6. Mussolini, Rachele, Benito Mussolini. New York, 1974.

             7. Wiskemann, Elizabeth, Facism in Italy : Its Development and Influence, New York, 1970.

देशपांडे, सु. र.