चाहमान घराणे : एक प्रसिद्ध राजपूत वंश. हा वंश आठव्या शतकाच्या मध्यास उदयास आला व चौदाव्या शतकाच्या शेवटी अस्तास गेला. याची शाकंभरी (सांभर) येथील शाखा मुख्य आणि रणथंभोर नड्‌डूल (नाडोल), जाबालिपूर (जालोर) व सत्यपुर (साचोर)–देवडा येथील शाखा गौण होत. बिजोलिया येथील कोरीव लेखात या वंशाचा मूळपुरुष, वत्सगोत्री सामंतनामक ब्राह्मण होता, असे म्हटले आहे. त्याच्या प्रदेशाला सपादलक्ष असे नाव असून त्याची राजधानी शाकंभरी (पूर्वीच्या जोधपूर) संस्थानातील सांभर ही होती. 

 या वंशातील पहिला ज्ञात ऐतिहासिक पुरुष दुर्लभराज हा जालोरच्या प्रतीहारांचा मांडलिक होता आणि त्याने त्याला पाल नृपती धर्मपाल याच्यावरील स्वारीत साहाय्य केले होते. त्याचा पुत्र गोविंदराज ऊर्फ गूवक हा प्रतीहार नृपती दुसरा नागभट्ट याचा सामंत होता आणि त्याच्याबरोबर त्याने सिंधचा राज्यपाल बशर याच्याशी युद्ध करून त्याचा पराभव केला होता. मुसलमानांच्या आक्रमणाला पायबंद घालण्याचे श्रेय प्रतीहार सम्राटांप्रमाणे चाहमान सामंतांनाही दिले पाहिजे. 

दहाव्या शतकाच्या आरंभी राष्ट्रकूट तिसऱ्या कृष्णाने कनौजवर हल्ला करून प्रतीहार सम्राटांची सत्ता खिळखिळी केली. तेव्हा त्यांच्या चाहमान सामंतांनी त्यांचे स्वामित्व झुगारून देण्यास आरंभ केला. सिंहराज चाहमानाने स्वातंत्र्यनिदर्शक महाराजाधिराज पदवी धारण केली आणि प्रतीहारांच्या काही सामंतांना बंदीत टाकले. तेव्हा प्रतीहार राजाला शाकंभरीत येऊन त्यांच्या सुटकेकरिता सिंहराजाची विनवणी करावी लागली. सिंहराजाचा पुत्र दुसरा विग्रहराज याने गुजरातच्या चालुक्यांशी युद्ध करून नर्मदेपर्यंत धडक मारली. 

अकराव्या शतकात गझनीच्या मुहंमदाच्या भारतावर स्वाऱ्या झाल्या पण राजस्थानच्या दुर्गम भूमीतील या चाहमानांना त्यांचा विशेष उपसर्ग पोहोचला नाही. बाराव्या शतकात या वंशात अजयराजनामक राजा होऊन गेला. त्याने आपल्या नावे अजयमेरू (सध्याचे अजमीर) हे नगर स्थापले. त्याचा पुत्र अर्णोराज याने चालुक्य नृपती सिद्धराज जयसिंह याच्या मुलीशी विवाह केला होता. तथापि त्याने तिचा अपमान केल्याच्या सबबीवर जयसिंहाचा पुत्र कुमारपाल याने त्याच्या राज्यावर स्वारी करून त्याचा पराभव केला पण त्याला पदच्युत केले नाही. 

अर्णोराजाचा पुत्र चौथा विग्रहराज हा महाप्रतापी निघाला. त्याने जाबालिपूर, नड्‌डूल वगैरे जवळच्या चालुक्यांच्या सामंतांना जिंकून आपल्या पित्याच्या परांजयाचा सूड घेतला. नंतर त्याने तोमरांचा पराजय करून दिल्ली काबीज केली आणि गझनीकडून नेमलेल्या पंजाबमधील राज्यपालांचा अनेक चकमकींत पराभव केला. आपण म्लेंच्छांना हाकून देऊन आर्यावर्ताचे नाव सार्थ केले आहे, असे तो आपल्या दिल्ली येथील कोरीव लेखांत म्हणतो. 

विग्रहराजानंतर दुसरा पृथ्वीराज हा गादीवर आला. त्याच्या पंजाबमधील प्रांताधिपतीने मुसलमानांचा पराभव करून त्यांची शहरे जाळून उद्‌ध्वस्त केल्याचे वर्णन कोरीव लेखांत आले आहे. 

पृथ्वीराज निपुत्रिक वारल्यामुळे त्याचा चुलता सोमेश्वर याला मंत्र्यांनी गुजरातेतून बोलावून आणून गादीवर बसविले. त्यापूर्वी तो चालुक्य नृपती कुमारपाल याला त्याच्या स्वाऱ्यांत मदत करीत असे. त्याला कर्पूरदेवीनामक कलचुरी राजकन्येपासून तिसरा पृथ्वीराज आणि हरिराज असे दोन पुत्र झाले. त्यांपैकी ⇨ पृथ्वीराज  हा पित्यानंतर ११७७ मध्ये गादीवर आला. 

पृथ्वीराजाचे नाव चंद बरदाईच्या पृथ्वीराज रासो  या काव्यावरून सुपरिचित झाले आहे. त्यापेक्षा पृथ्वीराजाचा समकालीन काश्मिरी कवी जयानक याचे पृथ्वीराजविजय  हे काव्य ऐतिहासिक दृष्ट्या अधिक महत्त्वाचे मानतात. दुर्दैवाने त्याचे एकच हस्तलिखित आणि तेही जीर्णशीर्ण अवस्थेत उपलब्ध झाले आहे. संस्कृत काव्यांच्या धर्तीवर त्यात पृथ्वीराजाला रामाचा अवतार म्हणून वर्णिले आहे. तथापि एकंदरीत त्यातील वर्णन ऐतिहासिक सत्यास धरून आहे. 

पृथ्वीराज हा शेवटचा बलाढ्य हिंदू राजा. याविषयी अनेक कथा प्रचलित आहेत. तो शूर होता यात संशय नाही. त्याने चंदेल्लांच्या राज्यावर तसेच गुजरातवरही स्वारी केली होती. पृथ्वीराजाचे गाहडवाल नृपती जयचंद्र याच्याशी पूर्वीपासूनच वैर होते व संयोगितेच्या स्वयंवराने ते अधिकच वाढले असे समजतात. मुइझ्झुद्दीन मुहंमद घोरीने पृथ्वीराजाच्या राज्यावर ११९१ मध्ये आक्रमण करून तबरहिंदचा दुर्भेद्य किल्ला घेतला आणि देशात धुमाकूळ माजविला. तेव्हा पृथ्वीराजाने मोठी फौज घेऊन त्याच्याशी सामना देण्याचे ठरविले. पंजाबात भतिंड्यापासून सु. ४४ किमी.वर तराईन (तोरवन-तरावरी) येथे दोन्ही सैन्याची घनघोर लढाई होऊन मुहंमदाचा पराजय झाला आणि त्याला रणांगणातून पळ काढावा लागला. राजपुतांनी त्याचा पाठलाग न करता त्याला जाऊ दिले, ही अक्षम्य चूक केली. तसेच या संधीचा फायदा घेऊन पंजाब प्रांत जिंकून वायव्येकडील खिंडी रोखाव्यात, तेही केले नाही.  

या पराभवाचे शल्य मुहंमदला सलत राहिले. त्याने पुढील वर्षी मोठी फौज जमवून पुन्हा स्वारी केली. तराईन येथेच दोन्ही सैन्यांची गाठ पडली. मुहमदाने अनेक प्रकारच्या हुलकावण्या दाखविल्यामुळे राजपूत सैन्य गोंधळून गेले. नंतर अचानक हल्ला करून मुहंमदाने जय मिळविला. पृथ्वीराज पकडला जाऊन पुढे मारला गेला (१२०६). अशा रीतीने शेवटच्या उत्तर भारतीय हिंदू साम्राज्याचा अंत झाला. 

इतर भारतीय राजांप्रमाणे चाहमानांनीही धर्म, विद्या व कला यांस उदार आश्रय दिला. काश्मीरी कवी जयानक याला पृथ्वीराजाने दिलेल्या आश्रयाचा उल्लेख अजमीर येथील देवालयात शिळांवर कोरून ठेवला आहे. त्याचा काही भाग सापडला आहे. विग्रहराजाने स्वतः हरकेलि  हे संस्कृत नाटक लिहिले आहे.

संदर्भ : Tod, James, Annals and Antiquities of Rajasthan, 2 Vols., London, 1920, 1957.

मिराशी, वा. वि.