पेरिक्लीझ

पेरिक्लीझ : (सु. इ. स. पू. ४९५ ?—४२९). अथेन्स या ग्रीक नगरराज्याच्या सुवर्णयुगाचा शिल्पकार. त्याचा पिता झँटिपस हा अथेन्सचा एक सेनाधिकारी मुत्सद्दी होता. त्याने मिकालीच्या इ.स.पू. ४७९ च्या युद्धात अथेन्सला विजय मिळवून दिला होता. त्याची आई अगरिस्त क्लीस्थीनीझ ही अँल्कमिऑनिडी या जमातीच्या पुढाऱ्याची पुतणी होती. पेरिक्लीझने ग्रीक परंपरेनुसार सुरुवातीस लष्करी व पुढे तत्कालीन अथेन्समधील उत्तम शिक्षकांकडून विविध विषयांचे शिक्षण घेतले. त्याने क्लीस्थीनीझचा आदर्श आपल्या पुढे ठेवला व लोकशाहीचा पुरस्कार केला. याकरिता डिमॉस (लोक) या पक्षाचे सभासदत्व स्वीकारून एफियॅल्टीझ या तत्कालीन नेत्याबरोबर तो काम करू लागला. सत्तास्पर्धेमुळे अथेन्स व स्पार्टा यांत प्रथमपासूनच वितुष्ट होते. पेरिक्लीझने स्पार्टाबरोबर संबंध असणाऱ्या सायमनसारख्या अनेक राजकीय नेत्यांवर भ्रष्टाचाराच्या खटल्यात फिर्यादी पक्षातर्फे काम केले व तो राजकीय क्षेत्रात प्रथमच चमकला.

यावेळी अथेन्सवर जुन्या परंपरा जोपासणारे अँरोपॅगस हे मंडळ सत्ता गाजवीत होते. पेरिक्लीझने एफियॅल्टीझ या वरिष्ठ सहकाऱ्याच्या मदतीने या मंडळातील लोकांना दूर केले. सायमनसारख्यांना हद्दपारीच्या शिक्षा ठोठावल्या आणि अँरोपॅगस मंडळावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. त्याने या मंडळाच्या संविधानात काही आमूलाग्र सुधारणा केल्या. इ. स. पू. ४६० मध्ये एफियॅल्टीझच्या खुनानंतर सर्व सत्ता पेरिक्लीझच्या हातात आली. अथेन्सचे वर्चस्व प्रस्थापिणे आणि त्याचे सौंदर्य वाढवून लोकशाहीची वृद्धी करणे, हे त्याचे धोरण होते. त्या दृष्टीने त्याने प्रथम परराष्ट्रीय धोरणात लक्ष घातले. साम्राज्यविस्तारासाठी त्याने काही मोहिमा केल्या अथेन्सचे आरमार वाढविले आणि शहराला तटबंदी केली. इराणविरुद्ध लढण्यासाठी त्याने प्रतिस्पर्धी स्पार्टाशी प्रसंगोपात्त मैत्री केली व सायमनला परत बोलविले. तसेच अथेन्सच्या नेतृत्वाखाली ⇨डेलियन संघाची स्थापना झाली होती तीत र्स्पाटाचे वर्चस्व वाढले होते. ते पेरिक्लीझने कमी केले व अथेनियन साम्राज्यविस्तारासाठी त्या संघाचा एक साधन म्हणून त्याने पुरेपूर उपयोग करून घेतला. सायमनच्या मृत्यूनंतर स्पार्टा व अथेन्समधील वितुष्ट पुन्हा विकोपास गेले. तेव्हा इराणबरोबर शांततातह करून पेरिक्लीझने स्पार्टाच्या पक्षाकडील काही मित्रपक्षांना लाच देऊन फोडले. इ. स. पू. ४४८ मध्ये त्याने सकल ग्रीक (पॅनहेलिनिक) नगरराज्यांची एक परिषद भरविण्याचा प्रयत्न केला पण तो स्पार्टाच्या विरोधामुळे निष्फळ ठरला. पुढे अथेन्स व स्पार्टामध्ये ३० वर्षांचा शांततातह झाला. स्पार्टाने डेलियन संघातील ईजायना, यूबीआ व इतर काही नगरे अथेन्सकडे ठेवण्यास संमती दर्शविली, तसेच अथेन्सचे आरमारी सामर्थ्य मान्य केले आणि अथेन्सनेही स्पार्टाचे भूमीवरील सामर्थ्य मान्य करून त्याच्याकडील कॉरिंथ वगैरे राज्यांना संमती दर्शविली. तथापि पेलोपनीशियन समूहातील नगरराज्यांवर स्पार्टाचे वर्चस्व होते आणि अथेन्सचे वर्चस्व त्याला जाचत होते, म्हणून काही वर्षांतच पुन्हा युद्धास तोंड फुटले. इ. स. पू. ४३०-४२९ मध्ये प्लेगची मोठी साथ आली. त्यात अनेक माणसे मरण पावली. अथेन्सचा पेलोपनीशियन युद्धात पराभव झाला. सततच्या युद्धांमुळे लोकांनी पेरिक्लीझला सत्तेवरून काही काळ दूर ठेवले पण पुन्हा त्यास बोलाविले. तथापि तो लवकरच प्लेगने मरण पावला.

पेरिक्लीझने अंतर्गत व्यवस्थेत अनेक सुधारणा केल्या : दंडाधिकारी व इतर शासकीय अधिकारी यांना त्याने पगार देण्याची पद्धत पाडली डेलियन संघाचा सर्व खजिना इराणी युद्धाच्या वेळी अथेन्समध्ये नेला आणि त्याचा उपयोग अथेन्सचे आरमार व सौंदर्य वाढविण्यात केला अथीना, प्रॉपिली, पार्थनॉन यांसारखी भव्य व अभिजात मंदिरे उभारली आणि वाङ्‍मय-तत्त्वज्ञान निर्मितीस उत्तेजन दिले. ह्या काळात सॉक्रेटीस, सॉफोक्लीझ इ. तत्त्वज्ञ तसेच युरिपिडीझ आणि अँरिस्टोफेनीस इ. नाटककांरानी नाट्यभूमी गाजविली. शिवाय फिडीयस शिल्पी, पिंडर कवी, हीरॉडोटस इतिहासज्ञ आदींनाही त्याने आश्रय दिला. पेरिक्लीझच्या अमदानीत अथेन्सचा सर्वांगीण विकास झाला, म्हणून त्याच्या युगाला सुवर्णयुग हे सार्थ नाव देतात.

पेरिक्लीझ हा सु. ३० वर्षे अथेन्सचा अनभिषिक्त राजाच होता. त्याने लोकशाहीचा पुरस्कार केला पण ती आपल्या इच्छेनुरूप राबविली. अथेन्सला अनेक युद्धमोहिमांत गुंतवूनही त्यांत त्याला पूर्णपणे यश कधीच लाभले नाही.

पेरिक्लीझच्या जीवनात अँसपेशिआ या स्त्रीला विशेष स्थान व महत्त्व होते. तत्कालीन कायद्यांमुळे या सुंदर बुद्धिमान आयोनियन स्त्रीशी त्याला विवाह करता आला नाही. तथापि अथेन्समधील लेखक, कलावंत, विचारवंत, राजकीय नेते यांना पेरिक्लीझभोवती गुंतवून ठेवण्यात अँसपेशिआचा फार मोठा वाटा होता.

पहा : अथेन्स पेलोपनीशियन युद्ध स्पार्टा.

संदर्भ : 1. Robinson, C. A., Ed. The Spring pf Civillization : Periclean Athens,New York, 1955.

2. Westlake, H. D. Individuals, in Thucydides, New York, 1968.

देशपांडे, सु. र.