ॲमोराइट : इ.स.पू. २६००—१७०० च्या दरम्यान सिरिया, पॅलेस्टाइन, ईजिप्त वगैरे प्रदेशांत राहणाऱ्या सेमिटिक भटक्या जमाती. ह्या बहुतकरून काननच्या म्हणजे पश्चिम पॅलेस्टाइनच्या प्राचीन रहिवासी असाव्यात. पश्चिम पॅलेस्टाइन हा प्रदेश यूरोप, आफ्रिका व आशिया यांच्या मध्यावर असल्याने तेथे अनेक जमातींचे मिश्रण होऊन हा मिश्रवर्णाचा समाज झाला असावा. त्यांच्या प्राचीन भाषेतील राजांची नावे आर्य भाषाकुलातील भाषेस जुळणारी आहेत. ही भाषा म्हणजे हिब्रूचीच एक अप्रगत अवस्था होय, असे म्हणतात. ‘अमोर’ हे एक देवाचे नाव आहे. ‘अमुरु’ या शब्दाचे बॅबिलोनियन भाषेत दोन अर्थ होतात : ॲमोराइट लोक व पश्चिम दिशा. ॲमोराइट लोकांची ठिकाणे बॅबिलोनच्या पश्चिमेस येतात. युफ्रेटीसच्या मध्यभागाच्या प्रदेशावर इ.स.पू. २५०० च्या आसपास ॲमोराइट लोकांची लहानमोठी तीस राज्ये असावीत, असे दिसते. इ.स.पू. २४००—२००० ह्या काळात अन्य जमातींच्या आक्रमणामुळे ॲमोराइट लोकांनी स्थलांतरे केली. बरेच लोक बॅबिलोनियात आले व काही दक्षिणेकडे सरकले. कालांतराने तेथे स्वतंत्र ॲमोराइट राज्ये उदयास आली. बॅबिलोनियात गेलेल्या लोकांपैकी सुमुझबून याने इ.स.पू. २००० च्या सुमारास बॅबिलोनवर सत्ता मिळविली. याचा पाचवा वारस हामुराबी (इ.स.पू. अठरावे शतक) ह्याच्या अमदानीत या राज्याची मोठीच भरभराट झाली. हामुराबीनंतर ॲमोराइट सत्तेवर कॅसाइट जमातींचे आक्रमण सुरू झाले. त्यांनी बरीच वर्षे कॅसाइट लोकांना थोपवून धरले परंतु हिटाइट  सम्राट पहिला मुरशिलिश याने बॅबिलोनवर हल्ला करून इ.स.पू. १५९५—१५५८ या काळात ॲमोराइट सत्ता नामशेष केली. या काळात व नंतरही त्यांमध्ये मार्डुक म्हणजे सूर्य आणि ईश्वर किंवा शक्तिदेवता यांची पूजा प्रचलित होती.

सिरियाच्या दक्षिणेस असलेल्या ॲमोराइट जमातीने काननच्या डोंगराळ भागात आणि पश्चिम लेबाननमध्ये आपले वर्चस्व स्थापन केलेले दिसते. पुढे ह्यांनी ईजिप्तचे मांडलिकत्व पतकरून कादेश या राजधानीतून पॅलेस्टाइनच्या पश्चिम किनाऱ्यापर्यंत राज्य वाढविले. एल्. अमार्ना व बोगाझकई येथील लेखांत या राज्याचे उल्लेख येतात. सिरियाच्या प्रदेशात ईजिप्तचा दबदबा कमी होऊन हिटाइट सत्ता जशी प्रबळ झाली, तसे ॲमोराइट राजांनी हिटाइटांचे मांडलिकत्व पत्करले. इ.स.पू. १२०० च्या सुमारास तिसरा रॅमसीझ ह्याच्या आक्रमणामुळे हे राज्यही नाश पावले. यानंतर जॉर्डनमध्ये ॲमोराइट सत्ता काही काळ टिकली. इ.स.पू. १००० च्या सुमारास स्वतंत्र ॲमोराइट सत्ता व राज्य संपुष्टात आली असावीत.

माटे, म. श्री.