कित्तूर संस्थान : पूर्वीच्या मुंबई इलाख्यापैकी बेळगाव जिल्ह्यातील एक संस्थान. धारवाड बेळगाव रस्त्यावर बेळगावच्या दक्षिणेस सु. ४२ किमी.वर ते वसले आहे. याचे मूळ पुरुष हिरे मल्लप व चिक्क मल्लप असे दोन लिंगायत बंधू होते. यांनी विजापूरची आदिलशाही चालू असताना गिजगनहळ्ळी, संपगाव, बिडी, परसगड इ. गावे देसकतीच्या (देशमुखी वतनाच्या) रूपाने आपल्या ताब्यात घेतली. हेच कित्तूरकर देसायांचे मूळ पुरुष होत. १७५६ मध्ये सावनूरच्या नबाबाचा काही प्रदेश मराठ्यांनी घेतला. त्यांनी कित्तूर व गोकाक ही गावे मात्र देसायांकडेच ठेवली. परशुराम भाऊ पटवर्धनांनी १७७९ मध्ये गोकाक घेतले व देसायास अटक केली. १७८५ मध्ये टिपूने कित्तूर घेतले. श्रीरंगपटणच्या १७९२ च्या तहान्वये हा प्रदेश मराठ्यांकडे आला. १८०० च्या सुमारास काही दिवस ते धोंड्या वाघाच्या ताब्यात होते. मराठी राज्य संपल्यावर ते इंग्रजांच्या ताब्यात गेले. एवढ्या अवधीत या घराण्यात बारा पुरुष होऊन त्यांनी २३९ वर्षे देसाइकी केली. या सर्वांना सर्जा अशी उपाधी होती. बारावा पुरुष शिवलिंगरुद्र सर्जा हा १८२४ मध्ये निपुत्रिक मेला. पण मरण्यापूर्वी त्याने दत्तक घेतला होता, अशी बातमी प्रसुत करण्यात आली. धारवाडचा कलेक्टर थॅकरे यास ते मान्य नसल्याने त्याने देसकत जप्त केली. त्यास शिवलिंगरुद्र सर्जाची आई चन्नम्मा हिने विरोध केला. या तंट्यात थॅकरे मारला गेला. तथापि २ डिसेंबर १८२४ रोजी कित्तूर इंग्रजांनी जिंकले. उठावाचा शेवट झाला आणि कित्तूर संस्थान खालसा करण्यात आले. रायप्प नावाच्या देसायाच्या एका जुन्या सेवकाने वादग्रस्त दत्तक मुलाला हाताशी धरून १८२९ मध्ये पुन्हा एकदा उठाव केला. पण तो इंग्रजांनी चार महिन्यात मोडून काढला आणि रायप्पास नंदगड येथे फाशी दिली.

कित्तूर येथे एक जुनी गढी असून एक बसवाचे मंदिर आहे. त्यात गोव्याचा राजा जयकेशी याच्या वेळचा एक शिलालेख आहे. देवळाच्या सज्ज्यात कित्तूरचा देसाई, त्याच्या दोन बायका व एक दिवाण यांच्या मूर्ती आहेत. विणकाम आणि काचेच्या बांगड्या तयार करणे हे उद्योग येथे चालतात.

खरे, ग. ह.