वॉटर्लूची  लढाई : फ्रान्सचा सम्राट पहिला नेपोलियन बोनापार्ट आणि ब्रिटिश व ब्रिटिशांचे मित्रपक्ष यांत १८ जून १८१५ रोजी झालेली निर्णायक लढाई. ही लढाई बेल्जियममध्ये ब्रूसेल्सच्या दक्षिणेस सु. १९ किमी.वर वॉटर्लूजवळ (५ किमी.) झाली. या लढाईत नेपोलियनचा पराभव होऊन फ्रान्समध्ये बूर्वाँ घराण्यातील अठरावा लूई पुन्हा गादीवर आला आणि फ्रान्स व अन्य यूरोपीय राष्ट्रे यांत २३ वर्षे सतत चाललेला संघर्ष समाप्त झाला. नेपोलियनच्या जीवनातील ही एक-दिवसीय लढाई त्याच्या सर्वनाशास कारण ठरली.

या युद्धाचे प्रमुख कारण म्हणजे नेपोलियनची यूरोपवर अधिसत्ता गाजिविण्याची जबर महत्त्वाकांक्षा, हे होय. प्रशिया, रशिया, ग्रेट ब्रिटन आणि ऑस्ट्रिया या यूरोपीय सत्तांनी १८१४ मध्ये युती करून नेपोलियनचा पराभव केला. पुढे त्यास पदच्युत करून एल्बा बेटावर त्याची रवानगी केली आणि युतीने फ्रान्सच्या गादीवर अठराव्या लूईस बसविले. एल्बा येथे नेपोलियन सु. एक वर्ष होता. दरम्यान व्हिएन्ना शांतता परिषदेत यूरोपीय सत्तांत मतभेद झाले त्यांचा नेपोलियनने फायदा उठविण्याचे ठरविले. नेपोलियनचे हितचिंतक या अस्थिर राजकीय परिस्थितीत त्याला वारंवार मायदेशास बोलावीत होतेच. २६ फेब्रुवारी १८१५ रोजी नेपोलियन एल्बा बेटावरून निसटला आणि सन्मानाने पॅरिसमध्ये आला. यापूर्वी त्याला प्रतिकार करणारे सैन्य त्याच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित झाले. तो २० मार्च १८१५ रोजी पुन्हा फ्रान्सच्या गादीवर बसला. अठरावा लूई बेल्जियमला पळाला आणि विस्कळित झालेले सैन्य हळूहळू फ्रान्समध्ये जमू लागले. व्हिएन्ना परिषदेमध्येच चार बड्या राष्ट्रांनी १७ मार्च १८१५ रोजी प्रत्येकी दीड लक्ष सैन्य उभारण्याचे निश्चित करून फ्रान्सच्या बेल्जियम हद्दीवरून १ जुलै १८१५ रोजी फ्रान्सवर आक्रमण करण्याचे ठरविले. नेपोलियनला आपल्या विरोधात असेलेली यूरोपीय राष्ट्रांची संयुक्त आघाडी पूर्ण होण्यापूर्वीच मोडावयाची होती. दोन महिन्यांत त्याने सु. साडेतीन लाख सैन्य जमविले आणि ११ जून १८१५ रोजी त्यांपैकी निम्म्या निवडक सैन्यानिशी तो पॅरिसमधून बाहेर पडला, उरलेले सैन्य त्याने फ्रान्समध्येच ठेवले. त्यावेळी ब्रिटिशांचा सेनापती ड्यूक ऑफ वेलिंग्टन ब्रूसेल्स येथे व प्रशियन सेनापती फील्ड मार्शल गेबार्ड फोन ब्ल्यूखर नामुर येथे छावणी करून होते. नेपोलियनकडे ७२,००० पलटणी असून वेलिंग्टनच्या संयुक्त सैन्यात (ब्रिटिश, डच, बेल्जियम आणि जर्मन) ६८,००० पलटणी होत्या. शिवाय ४५,००० सैन्य प्रशियन असून त्यांचा सेनापती ब्ल्यूखर होता. नेपोलियनने लीन्यी येथे प्रशियनांचा पराभव करून वेलिंग्टनला कट्र ब्रा या ठिकाणी खिळवून ठेवले. १५ जूनला नेपोलियनने वेगाने आणि शत्रूच्या नकळत सँब्रा नदी शार्लर्वा या ठिकाणी ओलांडली. ही बातमी वेलिंग्टनला १६ जूनला रात्री १ वाजता कळली. मार्शल मिशेल ने आणि जनरल एमॅन्वेल द ग्रूशी हे नेपोलियनचे सेनापती होते व ते १५ जून रोजी नेपोलियनच्या अनुक्रमे डाव्या व उजव्या बगलेवर होते. ब्ल्यूखरने नेपोलियनच्या सैन्याची एक मोठी तुकडी गुंतवून ठेवली होती. त्याचे काही सैन्य शार्लर्वा येथे मागे राहिले होते. यावेळी एकदम सरहद्द ओलांडून बेल्जियममध्ये उतरावे व अचानक वेलिंग्टन वा ब्ल्यूखर या दोहोंपैकी एकाचा धुव्वा उडवावा आणि नंतर दुसऱ्यावर तुटून पडावे, असा नेपोलियनचा डाव होता. त्याच दिवशी बेल्जियममध्ये सैन्य उतरण्यास सुरुवात झाली तथापि त्यांच्या दोन तुकड्या ठरल्या वेळी तेथे पोहचू शकल्या नाहीत. शिवाय बुरर्मोच्या आधिपत्याखालील तुकडी शत्रूला जाऊन मिळाली. नेपोलियनने शार्लर्वा ठिकाण घेतले. तीन दिवस नेपोलियन लहान-लहान चकमकी जिंकत वॉटर्लूच्या टेकडीवर आला. १७ जून हा दिवस दोन्ही बाजूंनी तयारीत गेला. १८ जून रोजी सकाळी लवकर लढाई सुरू करावी, असा नेपोलियनचा बेत होता पण आदल्या दिवशीच्या मुसळधार पावसाने ते शक्य झाले नाही. सकाळी ११.३० वा. युद्ध सुरू झाले. शक्यतो प्रशियन सैन्य तेथे पोहचण्यापूर्वी लढाईचा निकाल लागावा व तोही आपल्या बाजूने, अशी नेपोलियनची अटकळ होती. त्याचे घोडदळ, तोफखाना व पायदळ अत्यंत कार्यक्षम होते. याउलट टेकडीच्या खालच्या बाजूला पठारावर ब्रिटिश सेनापती वेलिंग्टन असल्यामुळे फ्रेंचांच्या हालचाली त्यास दिसत. त्याने बचावात्मक व्यूहरचना केली होती. दुपारी एकच्या सुमारास नेपोलियनने पहिला हल्ला केला. हळूहळू फ्रेंचांनी शत्रुसैन्याची दैना उडवून दिली. वेलिंग्टन ब्ल्यूखरची वाट पहात होता. फ्रेंचांची चढाई वेलिंग्टनच्या अंगाशी आली आणि संयुक्त सैन्याचा पराभव आता अटळ ठरणार, असे दिसू लागले. नेपोलियनने संध्याकाळी सहा वाजता पायदळ, घोडदळ व तोफखाना एकत्रित करून निकराचा हल्ला केला आणि ला ये सान्ते हे संयुक्त सैन्याचे मध्यवर्ती स्थान काबीज केले. वेलिंग्टनचे धाबे दणाणले त्याला सरदार पुढचा हुकूम विचारत असत, तेव्हा तो म्हणे ‘आता हुकूम कसले’? एक मनुष्य जिवंत आहे, तोपर्यंत निकराने लढा, मागे हटू नका’ अशा परिस्थितीत काही काळ गेला आणि साडेसात वाजता ब्ल्यूखर प्रशियन तुकडी घेऊन वेलिंग्टनच्या मदतीला धावला. पुन्हा निकराची लढाई झाली. ब्रिटिशांचे सर्व सैन्य फ्रेंचांवर तुटून पडले. त्यांनी शरणागतीसाठी तयार होण्यास विचारले. फ्रेंचांचे सैन्य धीर सोडून सैरावैरा पळू लागले. नेपोलियन काही वेळ स्तब्ध राहिला. नंतर तो कट्र ब्रा येथे पहाटेस पोहचला. येथे काही सैन्य मिळेल, अशी त्याची शेवटची आशा होती. वॉटर्लूची लढाई आधुनिक युद्धातील एक रक्तलांछित लढाई मानली जाते. १८ जून या दिवशी रणांगणवर चाळीस हजार फ्रेंच, पंधरा हजार ब्रिटिश व डच आणि सात हजार प्रशियन सैनिक मरण पावले, असा अंदाज आहे. तत्संबंधी इतिहासकारांत एकवाक्यता नाही. युद्धानंतरच्या तीन दिवस चालू असलेल्या मोहिमेत आणखी काही सैन्य ठार झाले. १५ जुलै १८१५ रोजी नेपोलियनने शरणागती पतकरली व त्याला अटलांटिक महासागरातील सेंट हेलीना या बेटावर हद्दपार करण्यात आले.

या युद्धातही नेपोलियनची नेहमीची चपलता, त्वेष आणि युद्धकौशल्य यांचे दर्शन घडले तथापि फ्रान्समध्ये ठेवलेल्या राखीव सैन्याचा नेपोलियनने योग्य वापर ऐनवेळी केला नाही. याशिवाय स्पॅनिश युद्धात वेलिंग्टनविरुद्ध लढलेल्या फ्रेंच सेनापतींचा सल्ला नेपोलियनने धुडकावून लावला. त्याच्या सेन्यात एकजूट नव्हती. ने या त्याच्या एका सेनापतीने त्याच्या हुकमांचे ऐन मोक्याच्या वेळी पालन केले नाही आणि दुसरा सेनापती ग्रूशी याच्या हालचाली मंद झाल्या होत्या. परिणामतः या युद्धात नेपोलियनचा दारुण पराभव झाला.

पहिल्या नेपोलियनने २२ जून १८१५ रोजी दुसऱ्यांदा राज्यत्याग केला आणि त्याची शंभर दिवसांची दुसरी कारकीर्द संपुष्टात आली. पुढे सहा दिवसांनी अठराव्या लूईस फ्रान्सच्या गादीवर पुन्हा बसविण्यात आले. या युद्धातील नेपोलियनचा संपूर्ण पराभव हा एवढा जबरदस्त होता की, वॉटर्लू हा शब्द पराभवाला समान अर्थी प्रतिशब्द म्हणून रूढ झाला [⟶ नेपोलियन, पहिला].

संदर्भ: 1. Becke, Archibald F. Napoleon and Waterloo, New York, 1972.

          2. Esposito, Vincent, J Elting, John Robert, A Military History and Atlas of the Napoleonic Wars, New York, 1964.

          3. Glover, Michael, The Napolenic Wars, London, 1979.

         4. Howarth, David, Waterloo Day of Battle, New York, 1968.

         5. Scymour, William &amp Others, Waterloo Battle of Three Armies, New York, 1980.

        6. Weller, Jac, Wellington at Waterloo, New York, 1967.

घाडगे, विमल.