कुत्बशाही : बहमनी राज्याची शकले होऊन स्थापन झालेल्या स्वतंत्र मुसलमानी राज्यांपैकी एक महत्त्वाचे राज्य. गोवळकोंड्याचा सुभेदार कुली कुत्बशाह (१५१८–४३)या पहिल्या सुलतानाच्या नावावरून त्यास कुत्बशाही हे नाव पडले. हा मूळचा इराणचा रहिवासी. पण भारतात आल्यावर सुलतान बनला. याने १५१८ मध्ये गोवळकोंडे येथे या राज्याची स्थापना केली. बहमनी सुलतान चौथा मुहम्मदशाह याच्या शरीर-रक्षकापासून हळूहळू तो सुभेदाराच्या पदापर्यंत चढला. त्याने प्रथम गोवळकोंडे किल्ल्याची डागडुजी केली व आजूबाजूच्या हिंदू राजांचे मुलूख घेऊन आपल्या राज्याचा विस्तार केला. त्याने ओरिसाच्या गजपतीला गोदावरी नदी ही आपल्या राज्याची सीमा मानावयास लावले. नंतर राज्याच्या पूर्वेकडील भाग जिंकून त्याने आपल्या राज्याची सीमा पूर्व समुद्रापर्यंत भिडविली. बरीदशाही,आदिलशाही, निजामशाही व विजयानगर यांच्याबरोबरही त्यास लढावे लागले. बाबरचे अभिनंदन करण्याकरिता १५२६ साली कुली कुत्बशाहाने आपला वकील पाठविला होता. तो ९८ वर्षांचा असताना त्याचा मुलगा जमशीद याने त्याचा मशिदीत नमाज पढत असताना ३ सप्टेंबर १५४३ रोजी खून करविला.

जमशीद (१५४३–५०): जमशीदची कारकीर्द यशस्वी झाली नाही. याच्या भीतीमुळे याचा भाऊ इब्राहीम हा विजयानगरला पळून गेला. आदिलशाहीच्या वाढत्या प्रभावाला थोपविण्याकरिता जमशीदने निजामशाह, इमादशाह व विजयानगरचा राजा यांचा संघ स्थापून आदिलशाहीवर चढाई केली. काही इतिहासकार हा संघ विजयानगरचा राजा व निजामशाह यांनी निर्माण केला असे म्हणतात. या स्वारीत त्यास यश आले, तरी विजापूरचा वजीर असदखान याने नंतर त्याचा दोन वेळा पराभव केला व काही प्रदेश परत मिळविले. १५५० मध्ये त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा सात वर्षांचा मुलगा सुब्हान कुली यास जमशीदच्या बेगमेने एक मातब्बर सरदार सैफखान याच्या मदतीने गादीवर बसविले. पण इतर दरबारी लोकांनी विजयानगरला पूर्वी पळून गेलेला जमशीदचा भाऊ इब्राहीम यास बोलावून गादीवर बसविले.

इब्राहीम (१५५०–८०) : इब्राहीम कुत्बशाहाची कारकीर्द ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाची आणि संस्मरणीय आहे. आपल्यास गादी मिळवून देण्यात साह्य करणाऱ्या जगदेवराव या हिंदू सरदारास त्याने आपला दिवाण केले. मुसलमान सरदारांस हे आवडले नाही. त्यामुळे त्यांनी शाहाचे कान जगदेवरावविरुद्ध भरले. लवकरच जगदेवरावास कुत्बशाही सोडावी लागली. इब्राहीमशाहाने आदिलशाही व निजामशाही या दोन राज्यांमध्ये समतोल कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दोघांच्या संघर्षात कधी त्याने आदिलशाहाची तर कधी निजामशाहाची बाजू घेतली. पूर्वी दिलेल्या आश्रयाबद्दल तो काही काळ विजयानगरच्या रामरायाशी कृतज्ञतेने व सलोख्याने वागला. पण नंतर रामरायाचा वेळोवेळी होणारा हस्तक्षेप व वर्चस्व सहन न होऊन त्याने त्याच्याविरुद्ध निजामशाह, आदिलशाह व बरीदशाह या मुसलमान राजांना एकत्र आणून ती युती कायम केली. १५६५ मध्ये राक्षसतागडी येथे विजयानगर सम्राटाशी झालेल्या लढाईत या युतीस यश मिळाले. रामराया मारला जाऊन विजयानगर साम्राज्य जवळजवळ नष्ट झाले. याबद्दल इब्राहीमला फार मोठे श्रेय देण्यात येते. त्याने दक्षिणेकडे व पूर्वेकडे आपल्या सत्तेची वाढ केली. सुब्हान कुलीच्या काळात गेलेले काकनी, कुर्नूल व कल्लूर हे प्रांत आदिलशाहाकडून त्याने परत मिळविले. कुल्बशाहीतील सुलतानांत हा सर्वांत कर्तबगार, कर्तव्यदक्ष, विद्वान, प्रजाहितदक्ष आणि न्यायतत्पर होता. याच्या पदरी जगदेवराव, मुरारराव इ. हिंदू सरदार मोठमोठ्या हुद्यांवर होते. मालमत्तेची आणि सुरक्षिततेची हमी वाटत असल्यामुळे याच्या राज्यात व्यापार-उदीमाची भरभराट झाली. त्याने आपल्या राज्यात अनेक सुंदर इमारती बांधल्या. इब्राहीमबाग, फुलबाग, भिक्षागृहे, इब्राहीमपतनचा तलाव, हुसैनसागर इ. त्याने केलेली बांधकामे प्रसिद्ध आहेत.

मुहम्मद कुली (१५८०–१६१२) :  इब्राहीमच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा मुहम्मद कुली हा गादीवर आला. आपल्या पूर्वजांप्रमाणे त्याने आदिलशाहीशी लढण्याचे धोरण ठेवले. पण त्यात त्यास यश आले नाही. शेवटी आपली बहिण मलिका-इ-जहान हिचा इब्राहीम आदिलशाहाशी विवाह लावून त्याने त्याची मैत्री संपादन केली. नंतर त्याने पेनुकोंड्यास असलेल्या विजयानगरच्या वंशजावर स्वारी केली पण तेथील राजा व्यंकटपतीने त्याचा पूर्ण पराभव केला. त्याने मुकुंदराजाचा बीमोड करून कारीमकोटा प्रांत आपल्या राज्यास जोडला असला, तरी राज्यविस्ताराच्या दृष्टीने याची कारकीर्द विशेष यशस्वी झाली नाही. मोगल सम्राट अकबर याची आपल्या राज्यावर वक्रदृष्टी होऊ नये, म्हणून त्याने भारी नजराणे त्याजकडे पाठविले. आपल्या वडिलांसारखा हाही विद्वान आणि बांधकामाचा शौकी होता. त्याने दखिनी उर्दूमध्ये कविता लिहून त्यांचा संग्रह-दीवान प्रसिद्ध केला. त्याने गोवळकोंड्याजवळ आपल्या पत्नीच्या नावाने भागानगर नावाचे एक सुंदर शहर वसविले (१५८९). हैदराबादची रचना व तेथील प्रसिद्ध चारमीनार ही वास्तू याच्याच कारकीर्दीत बांधली गेली. त्याने जुम्मा मशीद, अनेक दवाखाने, हमामखाने, पाठशाळा आणि भिक्षागृहे बांधली. याच्या दरबारी अघुझ्लू सुलतान नावाचा इराणचा वकील होता.

मुहम्मद कुली (१६१२–२६) : मुहम्मद कुलीच्या मृत्यूनंतर त्यास पुत्र नसल्यामुळे त्याचा पुतण्या व जावई मुहम्मद कुली यास गादीवर बसविण्यात आले. त्याने मोगलांविरुद्ध मलिकंबरला मदत केल्यामुळे जहांगीरने त्याजकडून वीस लाख रुपये खंडणी वसूल केली. जहांगीरविरुद्ध बंड करून शाहजहान आश्रयास आला असता, त्यास आश्रय न देता याने त्यास बंगालकडे पाठवून दिले. त्याने मशीद-इ-जामिअ बांधण्यास सुरुवात केली पण त्याच्या हयातीत ती पूर्ण झाली नाही. औरंगजेबाने उरलेला भाग पुरा केला. याने सुलताननगर नावाचे नवीन शहर वसविले. त्याचप्रमाणे दाद महल, मुहम्मदी महल, इलाही महल, बाग-इ-मुहम्मद इ. इमारती त्याने बांधविल्या. प्रख्यात मीर जुम्ला पुष्कळ वर्षे त्याचा दिवाण होता.

अब्दुल्लाह हुसैन (१६२६–७२) : मुहम्मद कुत्बशाह वारल्यावर त्याचा मुलगा अब्दुल्लाह हुसैन गादीवर आला. त्यास आपल्या कारकीर्दीत मोगल, आदिलशाह व मराठे यांच्याशी सतत लढावे लागले. राज्यास उतरती कळा लागली. खंडणी देऊन त्यास त्यांच्याशी मित्रत्व करावे लागले. त्याने मोगलांचे मांडलिकत्व पतकरले इतकेच नव्हे, तर शाहजहानच्या सांगण्यावरून तडजोडीच्या सर्व अटी सोन्याच्या पत्र्यावर लिहून शाहजहानकडे पाठविल्या. याचा एक जुना सरदार मीर जुम्ला याने बंड केले व तो मोगलांच्या पदरी नोकरीस गेला. अब्दुल्लाह हुसैन हा विद्येचा भोक्ता होता. त्याने अनेक ग्रंथ लिहिण्यास उत्तेजन दिले. बुर्हान-इ-कातिअ  हा त्याच्या कारीकीर्दीत लिहिलेला कोश त्यालाच अर्पण करण्यात आला आहे. त्याने पुष्कळ शाळा काढून त्यावर पगारी शिक्षक नेमले. मंगळवार त्याने सुट्टीचा दिवस ठरविला. १६३० साली पडलेल्या दुष्काळात त्याने आपल्या प्रजेस अन्न पुरविण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

अबुल-हसन (१६७२–८७) : अब्दुल्लाह हुसैन यास पुत्र नसल्यामुळे मरतेवेळी त्याने सांगितल्याप्रमाणे त्याचा जावई अबुल-हसन यास गादीवर बसविण्यात आले. हा इतिहासात तानाशाह या नावाने प्रसिद्ध आहे. आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीस सेंट थोम बंदरावरून त्याचा फ्रेंचांशी वाद झाला.शेवटी १६७४ साली फ्रेंचाना सेंट थोम कुत्बशाहाला द्यावे लागले. १६७६ साली त्याने मुजफ्फरखानास दिवाणपदावरून काढून मादण्णा नावाच्या एका हुशार ब्राह्मणास दिवाणपद दिले. त्याने मादण्णाचा भाऊ आक्कण्णा यास १६८२ साली सरलष्करी व कर्तबगार हिंदू पोडला लिंगप्पास कर्नाटकाची सुभेदारी दिली.


१६७७ साली शिवाजीने हैदराबादला भेट दिली. त्यावेळी अबुल-हसनने शिवाजीच्या कर्नाटक मोहिमेस पैसा पुरवावा असे ठरले. विजापूरच्या आदिलशाहासही या करारात सामील करून घेऊन मिळालेला प्रांत वाटून घेण्याचे ठरले. दक्षिणेतील सर्व लोकांनी एकत्र येऊन मोगलांची लाट थोपवावी, हा त्यामागील उद्देश होता. छत्रपती शिवाजीस मदत केल्यामुळे औरंगजेब नाराज होऊन त्याने गोवळकोंड्यावर दिलेरखानाच्या आधिपत्याखाली सैन्य पाठविले. (१६७७). अबुल-हसनने जरी मोगलांविरुद्ध विजापूरकरांना मदत केली असली, तरी विजापूरकरांनी मोगलांनाच साह्य केले. या एकत्रित फौजांचा मादण्णाने पराभव केला.

छत्रपती शिवाजीचा मुलगा संभाजी याच्याशीही अबुल-हसनचे संबंध स्नेहाचे राहिले. मोगलांना दक्षिणेतून घालविण्याकरिता सर्व दक्षिणेतील लोकांनी एकत्र येण्याचे १६८५ च्या सुरुवातीस ठरले. त्याप्रमाणे दोघांनीही आदिलशाहास मोगलांविरुद्ध मदत केली. औरंगजेबास हे समजताच त्याने आपल्या सरदारास कुत्बशाहीवर चढाई करण्यास पाठविले. तेव्हा हैदराबाद सोडून अबुल-हसन सर्व जडजवाहिरानिशी गोवळकोंड्याच्या किल्ल्यात गेला. याचा फायदा घेऊन मोगल सरदार शाहआलम याने हैदराबाद लुटले. यास शेवटी शाहआलमशी तह करावा लागला. या तहाप्रमाणे मादण्णा व आक्कण्णास काढण्याचे व एक कोट वीस लक्ष रु. देण्याचे ठरले. विजापूरचे राज्य नष्ट केल्यानंतर १६८७ च्या जानेवारीत औरंगजेबोन स्वत: मोठी फौज घेऊन गोवळकोंड्यावर पुन्हा स्वारी केली. तत्पूर्वी कर्तबगार मादण्णा व आक्कण्णा यांचे १६ मार्च १६८६ रोजी कपटाने खून करविण्यात आले. साहजिकच परिस्थितीशी खंबीरपणे मुकाबला करणारा लायक सरदार कुत्बशाहीत कोणी राहिला नाही. तरी पण अबुल-हसनने प्राप्त परिस्थितीत किल्ला बहादुरीने लढविला. सैनिकी डावपेचांचा उपयोग होईनासा पाहून औरंगजेबाने फंद-फितूरीस सुरुवात केली. शेवटी याच उपायाने १६८७ च्या सप्टेंबर मध्ये औरंगजेबाने किल्ला हस्तगत केला व अबुल-हसनला कैद केले. त्याने कुत्बशाहीचा सर्व प्रदेश मोगल साम्राज्यास जोडला व अबुल-हसनला दौलताबादच्या किल्ल्यात बंदिस्त केले. बंदिस्त असतानाच दौलताबादच्या किल्ल्यात अबुल-हसन १७०० मध्ये मृत्यू पावला. कुत्बशाहीचा हा शेवटचा राजा अत्यंत लोकप्रिय होता. त्याच्या शौर्याच्या व न्यायाच्या अनेक गोष्टी आजही प्रचलित आहेत. त्याची राजकीय दूरदृष्टी आणि धर्माच्या बाबतीतला उदार दृष्टिकोन यांची इतिहासकार प्रशंसा करतात.

राज्यविस्तार व धोरण : कुत्बशाहीचे राज्य स्थापन झाले, त्यावेळी त्याचा विस्तार पूर्व-पश्चिम ७८°–८१° रेखांश व दक्षिणोत्तर १६°–२१° अक्षांश एवढा होता. पण कुत्बशाही सुलतानांनी आपल्या कर्तबगारीने उत्तरेस गंजामपर्यंत, दक्षिणेस पुलिकत बंदरापर्यंत व पश्चिमेस गोदातीरावरील निर्मलपर्यंत आपल्या राज्याच्या सीमा भिडविल्या. बहमनी राज्याच्या विघटनातून निर्माण झालेल्या पाच मुसलमानी राज्यांपैकी कुत्बशाही राज्याने गंजाम ते पुलिकत अशी सलग पूर्व किनारपट्टी मिळविली. कुत्बशाहीचे बहुतेक राजे राज्यकारभारातही दक्ष होते. आपल्या प्रजेच्या सुखाची त्यांनी काळजी घेतली. सदावर्ते अथवा लंगरखाने व पाणपोयी यांची सोय करण्यात आली होती. मोठमोठ्या शहरांतून टपालाची व्यवस्था होती. धार्मिक दृष्टिकोन उदार होता. त्यामुळे ते शिया पंथी मुसलमान असूनही त्यांनी सुन्नी लोकांना किंवा हिंदू लोकांना छळले नाही. प्रत्येकाला आपल्या धर्माप्रमाणे वागण्याची मुभा दिली. इतकेच नव्हे, तर राज्यकारभारातही सर्वांना भाग घेण्यास मुभा होती. जगदेवराव, रायराव, मुरारी, मादण्णा, आक्कण्णा इ. हिंदू लोक मोठमोठ्या हुद्यांवर होते. त्यावेळच्या विशिष्ट परिस्थितीमुळे त्यांना हे धोरण ठेवणे कदाचित भाग पडलेही असेल. पण त्यामुळे परिस्थितीचा अचूक अंदाज घेऊन धोरण ठरविण्याच्या त्यांच्या क्षमतेस बाध येत नाही. मादण्णाच्या काळात हिंदु-मुसलमान परस्परांच्या समारंभात भाग घेत. धार्मिक भावनेपेक्षा सुलतानाची व्यक्तिगत इच्छा, महत्त्वाकांक्षा व स्थैर्य यानुसार राज्याचे धोरण ठरविण्यात येई.

बहुतेक कुत्बशाह सुविद्य व विद्याप्रेमी होते. फार्सी, उर्दू व स्थानिक तेलुगू भाषांसही त्यांनी उत्तेजन दिले. सुलतान मुहम्मद हा स्वत: कवी, चित्रकार, लेखक व संगीताचा भोक्ता होता. सुलतान मुहम्मदासारखी इतर सुलतानांसही कलाकौशल्याची आवड होती.  त्यांच्या कारकिर्दीत चारमीनार, मक्का मस्जिद इ. अनेक सुंदर आणि भव्य इमारती तसेच हुसैन सागरसारखे तलाव बांधण्यात आले. त्यांनी व्यापारास उत्तेजन देण्याकरिता यूरोपीय लोकांस व्यापारी सवलती दिल्या.

इतर शाह्यांशी संबंध : बहमनी सत्तेपासून सर्वांत शेवटी हे राज्य स्वतंत्र झाले. इतर राज्यांच्या मानाने हे सर्वांत छोटे राज्य होते. कुत्बशाहाने प्रथम बहमनी राज्याचा अभिमान व इमादशाहीशी सख्यत्व टिकविण्याचा प्रयत्न केला. बहमनी राज्य नष्ट झाल्यानंतर सरहद्दीवरील राजांशी, विशेषत: आदिलशाहीशी, कुत्बशाहांना झगडावे लागले. आदिलशाहाचा पाडाव करण्याकरिता त्यांनी निजामशाहीचे व प्रसंगी विजयानगरचेही साह्य घेतले. पण विजयानगरचे पारडे जड होत असल्याचे दिसून येताच त्यांनी आदिलशाही, निजामशाही व बरीदशाहीशी आपसांतील मतभेद विसरून युती केली व विजयानगरचे साम्राज्य प्राय: नष्ट केले. पुढे आदिलशाहीचा दुष्ट हेतू लक्षात घेऊन कुत्बशाहांनी अपमानास्पद अटी मान्य करून मोगलांशी सख्यत्व जोडले. पण मोगली सत्तेचा धोकाही ते ओळखून होते. त्यामुळे प्रसंग पडताच वैरभाव विसरून त्यांनी आदिलशाहास मोगलांविरुद्ध छुपे साह्य केले. प्रसंगी त्याकरिता त्यांना झीजही सोसावी लागली. आदिलशाही व मराठे यांचे सख्य व्हावे, म्हणूनही त्यांनी याच कारणाकरिता प्रयत्न केले. शेजारील राज्यांच्या भांडणात कुत्बशाहांनी कोणाचीही बाजू न घेता बहुतेक वेळा तटस्थ राहण्याचा प्रयत्न केला. याच कारणामुळे निजामशाही नष्ट झाल्यानंतर दक्षिणी राज्यांतील लढायांचा निकाल बऱ्याच वेळा कुत्बशाहीच्या धोरणावर अवलंबून असते.

मराठ्यांशी संबंध : कुत्बशाहाचे आणि मराठ्यांचे संबंध नेहमी मित्रत्वाचे राहिले. इतकेच नव्हे, तर मराठ्यांच्या उत्कर्षात कुत्बशाहांनी प्रत्यक्षाप्रत्यक्ष मदतच केली. आदिलशाहीच्या राज्यविस्तारास पायबंद घालण्याकरिता छत्रपती शिवाजीस द्रव्याची मदत करून अबुल-हसन कुत्बशाहाने परस्पर मैत्रीचा व साहाय्याचा करार केला. मराठ्यांच्या सख्यत्वाच्या जोरावरच अबुल-हसनचा वजीर मादण्णा दक्षिणेतील सर्व सूत्रे आपल्या हाती घेऊ शकला. शिवाजीसही कुत्बशाहीतर्फे इतर मुसलमान शाह्यांशी मैत्री करण्याचे साधन मिळाले. मराठ्यांचे सामर्थ्य वाढवून त्यांचे सामर्थ्य उपलब्ध झाल्यामुळे कुत्बशाहीचा अंत ५-६ वर्षे तरी पुढे ढकलला गेला व शेवटी मोगलांना जे सामर्थ्य कुत्बशाहीच्या विनाशाकरिता खर्च करावे लागले,त्यायोगे मोगल सत्ता स्वत:च खिळखिळी झाली.

संदर्भ : 1. Rama Rao, M. Glimpses of Dakkan History, Bombay, 1951  

    २. बेंद्रे, वा. सी.  संपा. गोवळकोंड्याची कुत्बशाही, पुणे, १९३४.  

    ३. सरदेसाई, गो. स. हिंदुस्थानचा अर्वाचीन इतिहास, भाग १ला, मुंबई १९१०. 

खोडवे, अच्युत