भोज परमार: (कार. सु. १०००-१०५५). माळव्यातील परमार घरण्यातील एक विद्वान व कलाभिज्ञ थोर राजा. वाक्‌पतिराज ऊर्फ मुंज याचा धाकटा भाऊ सिंधुराज याचा पुत्र. सिंधुराजाच्या मृत्यूनंतर परमारांच्या गादीवर इ. स. सु. १००० मध्ये तो आला. त्याच्या जन्ममृत्यूंच्या सनांविषयी तसेच राज्यारोहणतिथिविषयी इतिहासज्ञांत मतैक्य नाही. त्याच्या कारकीर्दीतील उपलब्ध कोरीव लेख इ. स. १०२० ते १०४७ दरम्यानच्या काळातील आहेत. तो स्वतःस त्रिभुवननारायण अशी उपाधी लावीत असे. त्याच्या कर्तृत्वाविषयी भोजप्रबंध या ग्रंथात विपुल माहिती मिळते. राज्यारोहणानंतर त्याने आपली राजधानी उज्जयिनीहून (उज्जैन) धारानगरी (विद्यमान धार) येथे नेली. त्यामुळे त्याला धारेश्रव हे नामाभिधान मिळाले. दक्षिणेतील चालुक्य (कल्याणी) व परमार या दोघांत पिढीजाद वैर होते. चालुक्य राजा जयसिंह यावर त्याने कलचुरी गांगेयदेव व तंजावरचा राजेंद्र चोल यांची मदत घेऊन स्वारी केली पण तीत त्याचा पराभव झाला. पुढे भोजाने दक्षिणेकडील आदिनगर (मुखलिंगम), कोकण, लाट (दक्षिण गुजरात) वगैरे प्रदेश जिंकून आपल्या राज्यास जोडले व राज्यविस्तार केला परंतु इ. स. १०२० मध्ये चालुक्य जयसिंहाचा मुलगा पहिला सोमेश्वर याने परमार राज्यावर स्वारी करून मांडूचा किल्ला घेतला आणि धारानगरी लुटली. भोज परमारने बुंदेलखंडातील चंदेल्ल, ग्वाल्हेरचे कच्छपघात आणि कनौजचे राष्ट्रकूट यांच्याशीही युद्धे केली होती पण त्यांत त्याला फारसे यश आले नाही. नंतर त्याने कलचुरी गांगेयदेवाचा पराभव केला पण गांगेयदेवाचा मुलगा कर्ण याने गुजरातचा राजा चालुक्य भीम याच्याशी मैत्री करून माळव्यावर आक्रमण केले. त्याच सुमारास भोज निधन पावला असावा.

भोजाने प्रदीर्घकाळ राज्य केले. या काळात त्याने चितोड, बांसवाडा, डूंगरपूर, खानदेश, कोंकण इ. भाग घेऊन भारतातील मोठ्या भूप्रदेशावर आपले स्वामित्व स्थापिले होते. बुंदेलखंड वा बाधेलखंड हे प्रदेश वगळता नर्मदा नदीच्या उत्तरेकडील मुलूख व दक्षिणेकडील गोदावरी नदीपर्यंतच्या भूप्रदेशावर त्याचे आधिपत्य होते. इ. स. १०४३ मध्ये मुसलमानांच्या आक्रमणाला आळा घालण्यासाठी हिंदु राजांचा एक सहासंघ स्थापन झाला होता त्यातही भोजाने सहभाग घेतला होता, असे परंपरा सांगते. भोज हा सतत युद्धांत गुंतला असला, तरी विद्या आणि कला यांना त्याने दिलेला आश्रय आणि त्याची ग्रंथसंपदा यांमुळे परमारांची कीर्ती भारतीय इतिहासात अजरामर झाली आहे. त्याने मंदिरे बांधली, तद्वतच भोपाळजवळ एक तलाव खोदला. उज्जयिनी व धार येथील अवशेषांपैकी भोजशाला, राजमार्तंड नावाचा राजमहल, जयस्तंभ, सरस्वतिसदन पाठशाला आणि काही मंदिरे अवशिष्ट असून भोजशाला भोजराजाकी निसाल किंवा कमाल मौला या नावाने प्रसिद्ध आहे. येथे त्या वेळी वेदशाक्याभ्यासाची सोय होती. त्याने संस्कृत विद्येस उत्तेजन देऊन राज्यात विद्यालये व पाठशाला स्थापन केल्या. भोज विद्वान होता आणि विद्वानांचा चाहता होता. परिमल वा पद्मगुप्त, धनपाल, भट्ट गोविंद, विद्यापती भास्कर भट्ट इ. विद्वानांना व पंडितांना त्याचा उदार आश्रय होता. भोजाने स्वतः ग्रंथ लिहिले व विद्वानांकडून लिहूनही घेतले.

त्याने साहित्याचे विविध प्रकार हाताळले होते. त्याच्या ग्रंथांपैकी राजमृगाङ्‌क, राजमार्तण्ड, विद्वज्जनवल्लभ प्रश्नज्ञानम्, आदित्यप्रतापसिद्धांत, सरस्वतीकण्ठाभरण, व्यवहारसमुच्चय, चारुचर्या, समरांगण-सूत्रधार, युक्तिकल्पतरु, विश्रांतविद्याविनोद इ, ग्रंथ प्रसिद्ध आहेत. समरांगण-सूत्रधार व युक्तिकल्पतरु ह्या दोन ग्रंथांत  त्याने शिल्पशास्त्र, वास्तुकला, चित्रकला तसेच शासनव्यवस्था, सैन्याचे प्रकार, नौकानयन, कर व अर्थव्यवस्था इ. विविध विषयांची सांगोपांग चर्चा केली आहे. यांशिवाय चम्पुरामायण, विद्याविनोद यांसारख्या ग्रंथांवरून त्याने काव्य हा विषयही सहजतेने हाताळलेला दिसतो. तसेच त्याचे शालीहोत्रम्, शब्दानुशासनम्, सिद्धांतसंग्रह, सुभाषितप्रबंध इ. ग्रंथही महत्त्वपूर्ण आहेत. टेओडोर आउफ्रेख्ट या जर्मन भारतविद्या पंडिताने भोज राजाच्या तेवीस ग्रंथांचा उल्लेख आपल्या ग्रंथसूचीत केला आहे. तसेच अल्‌-बीरूनी या अरबी इतिहासकारानेसुद्धा आपल्या इतिहासविषयक ग्रंथात भोज परमाराच्या लेखनासंबंधी गौरवोद्‌गार काढले आहेत. धारानगरीत सरस्वतीकंठाभरण नावाच्या पाठशाळेतील कूर्मशतक व भर्तृहरीच्या कारिका दगडांवर कोरलेल्या असून ते कोरीव लेख आजही पाहावयास सापडतात.

भोज हा पराक्रमी व विद्वान राजा होता. त्याची सर्व धर्मांविषयी समान व उदार दृष्टी होती. ‘त्रिविधवीर चूडामणी’ हे त्याला दिलेले उपाधिदर्शक विशेषण त्याने सर्वार्थाने सिद्ध केले, हे त्याच्या चरित्रावरून स्पष्ट होते.

पहा : परमार घराणे.

संदर्भ:  1. Bhatia, Pratipel, Paramars : a Study in the Political and Cultural History of Their Kingdom, New Delhi, 1970.

            2. Ganguly, D. C. History of the Paramara Dynasty, Dacca, 1933.

            3. Jain, K. C. Malwa Through the Ages, New Delhi 1972.

            4. Majumdar, R. C. Ed. The Struggle for Empire, Bombay, 1971.

           ५. ओक, शि. का.धारसंस्थानचा संक्षिप्त प्राचीन इतिहास, धार १९१९.

शेख, रुक्साना