ह्‌वारेस, बेनितो पाब्लो : (२१ मार्च १८०६–१८ जुलै १८७२). एक प्रसिद्ध मेक्सिकन क्रांतिकारक, मुत्सद्दी आणि मेक्सिकोचा बेनितो पाब्लो ह्‌वारेस अधूनमधून दीर्घ काळ राहिलेला राष्ट्रपती. त्याचा जन्म मेक्सिकोतील ग्वालेताओ गावी (वहॉक प्रांत) झपोटेक या एका इंडियन जमातीत झाला. तो अवघा तीन वर्षांचा असताना त्याचे आईवडील वारले. तेव्हा त्याचे संगोपन व सुरुवातीचे शिक्षण त्याच्या चुलत्यांनी केले.पुढे १८१८ मध्ये तो आपल्या बहिणीकडे वहॉक येथे वास्तव्यास गेला. तेथे त्याने धर्मगुरू होण्यासाठी औपचारिक शिक्षण घेतले तथापि१८३१ मध्ये त्याने वहॉक इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट्स अँड सायन्सिसमधून ( सध्याचे बेनितो ह्‌वारेस ऑटॉनॉमस युनिव्हर्सिटी ऑफ वहॉक) कायद्याची पदवी घेतली. नंतर तो नगरपरिषदेत सल्लागार म्हणून काम करू लागला. तो १८४१ मध्ये वहॉक प्रांताचा न्यायाधीश झाला. त्याने वहॉकमधील मार्गारिता माझा या युवतीशी लग्न केले (१८४३). त्यानंतर १८४७–५३ या काळात तो वहॉकचा राज्यपाल होता परंतु त्याच्या उदारमतवादीधोरणांमुळे राष्ट्राध्यक्ष सांता आनाने त्याला हद्दपार केले. १८५५ मध्येक्वान आल्बारेसच्या नेतृत्वाखालील उदारमतवादी क्रांतिकारकांस मिळण्याकरिता ह्‌वारेस मेक्सिकोला परतला. आल्बारेसने आपल्या काही क्रांतिकारक मित्रांच्या मदतीने मेक्सिकोची एक नवीन राज्यघटना तयार केली आणि सांता आनाला राष्ट्राध्यक्षपदावरून पदच्युत केले. तेव्हा आल्बारेसने इग्नॅशिओ कॉमफोर्त (१८१२–६३) यास राष्ट्राध्यक्ष केले ( कार. १८५५–५७). त्या वेळी ह्‌वारेस सर्वोच्च न्यायालयाचा अध्यक्ष व तत्कालीन संविधानानुसार मेक्सिकोचा उपराष्ट्रपती झाला. जानेवारी १८५८ मध्ये हुजूर पक्षाने बंड करून कॉमफोर्तला पदच्युत केले, तेव्हा ह्‌वारेस राष्ट्रपतिपदावर आपला हक्क सांगितला. त्याने धर्मपीठे व लष्कर यांच्या अधिकारांवर नियंत्रक कायदे केल्यामुळे रूढिवादी व धर्मगुरू यांनी बंड उभारून त्यास कैद केले. तो कैदेतून निसटल्यावर व्हेराक्रूझ येथे त्याला तीन वर्षे स्वतंत्र शासन व संविधान प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागले. या काळात धर्मपीठांविरुद्ध कडककायदे करून त्यांची प्रार्थनामंदिरे सोडून सर्व मालमत्ता त्याने जप्त केली. यामुळे यादवीने उग्र स्वरूप धारण केले. अ. सं. सं.ची मान्यताह्‌वारेसला, तर यूरोपीय राष्ट्रांची त्याच्या विरोधकांस होती तथापि ह्‌वारेस यशस्वी झाला. १८६१ मध्ये मेक्सिकोचा राष्ट्रपती म्हणून त्याची निवडझाली. यादवीत देश कर्जात बुडालेला असतानाच ब्रिटन, स्पेन व फ्रान्स यांनी आपल्या देण्यांबद्दल निकड लावली. ह्‌वारेस दोन वर्षेकर्जफेड स्थगित केली (जुलै १८६१). त्यामुळे या तिन्ही राष्ट्रांनी सैन्यबळाच्या जोरावर वसुली करण्याचे ठरविले तथापि आपले हितसंबंध सुरक्षित ठेवण्याच्या वचनामुळे ब्रिटन व स्पेन यांनी आपले सैन्य काढून घेतले पण फ्रान्सचे आक्रमण थांबले नाही. राजधानी पडल्याने ह्‌वारेसला उत्तरेत दुर्गम भागात आश्रय घ्यावा लागला. तिसऱ्या नेपोलियनच्या नेतृत्वाखालील फ्रान्सने मॅक्सिमिल्यनला मेक्सिकोचा सम्राट म्हणूनघोषित केले (१८६४–६७) परंतु त्याला फ्रान्सची मिळणारी मदतपुढे बंद झाली आणि १८६७ मध्ये मॅक्सिमिल्यनचा पाडाव करूनह्‌वारेस त्याला मृत्युदंडाची शिक्षा दिली. त्याच वर्षी तो राष्ट्रपती म्हणून निवडून आला. तत्काळ त्याने निवडणुका जाहीर केल्या आणि घटनेतील दुरुस्त्यांसाठी जनमतपृच्छा जाहीर केली. त्यामुळे घटनेतील बदलांबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. या दरम्यान त्याला पक्षाघाताचा झटका आला (१८७०). तत्पूर्वी त्याच्या पत्नीचेही निधन झाले तथापि त्याने निवडणूक लढवून राष्ट्रपतिपद पुन्हा हस्तगत केले (१८७१). मात्र अविश्रांत श्रमांमुळे पुढे मेक्सिको सिटी येथे त्याचे हृदयविकाराने निधन झाले. 

ह्‌वारेस प्रगत लोकशाहीचा वारसा मेक्सिकोस दिला. त्याच्या निःस्वार्थ, धीरोदात्त जीवनामुळे त्यास लोकांनी ‘एल् बेनेमिएन्तो( सद्गुणवंत) हे नामाभिधान दिले. मेक्सिकोचा वॉशिंग्टन म्हणून तो ओळखला जातो. त्याच्या स्मरणार्थ अमेरिका तसेच अन्य देशांतील शहरांचे, रस्त्यांचे, शैक्षणिक संस्थांचे तसेच सार्वजनिक उद्यानांचे नामकरण केले गेले. इटलीचा हुकूमशहा मुसोलिनी याचे नाव बेनितो असे ठेवण्यात आले. ‘वॉर्नर ब्रदर्स’ या प्रख्यात चित्रपट कंपनीने त्याच्या जीवनपटावर आधारित ह्‌वारेस नावाची चित्रफित १९३९ मध्ये काढली. अमेरिकेतील न्यूयॉर्क सिटी तसेच वॉशिंग्टन डीसी शहरांत त्याचे पुतळे उभारले गेले. भारत सरकारने दक्षिण दिल्लीतील एका महत्त्वाच्या रस्त्याला ‘बेनितो ह्‌वारेसअसे नाव दिलेले आहे.

संदर्भ : 1. Roeder, Ralph, Juarez and His Mexico, 2 Vols., New York, 1968.

         2. Smart, Charles A. Viva Juarez ! : A Biography, Westport, 1975.

शहाणे, मो. ज्ञा.