तूची, जूझेप्पे : (५ जून १८९४– ). इटालियन प्राच्यविद्या पंडित व १९७६ सालच्या नेहरू पुरस्काराचे सन्माननीय मानकरी. त्यांचा जन्म इटलीत माचेराता या गावी झाला. रोम विद्यापीठात त्यांनी उच्च शिक्षण घेतले व डॉक्टरेट ही पदवी संपादन केली. प्रारंभी ते त्याच विद्यापीठात भारत व अन्य पौर्वात्य देशांतील धर्म व तत्त्वज्ञान यांचे प्राध्यापक होते. १९३० नंतर त्यांनी प्रत्यक्ष संशोधनाचे कार्य सुरू केले व त्यासाठी अनेक वेळा नेपाळ, तिबेट आणि मध्य व प. आशियाई देशांचे दौरे केले. काही काळ कलकत्ता विद्यापीठात ते चिनी, तिबेटी व इटालियन भाषेचे प्राध्यापक होते. १९५६ साली त्यांनी पाकिस्तान, इराण व अफगाणिस्तान या देशांत जाऊन संशोधनकार्य केले. दिल्ली व इतर अनेक विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डॉक्टरेट ही पदवी दिली आहे.

ते रॉयल इटालियन अकादमीचे सदस्य असून फ्रान्सच्या सोसायटी एशियाटिकाचे सन्मान्य सदस्य आहेत. ‘मिडल अँड फार ईस्ट इन्स्टिट्यूट’चे ते अध्यक्ष आहेत. या संस्थेच्या संशोधनात्मक नियतकालिकाचे ते संपादक आहेत. त्यांनी संशोधनात्मक स्वरूपाची विपुल ग्रंथरचना केली. त्यांचे काही महत्त्वाचे ग्रंथ पुढीलप्रमाणे होत : डॉक्ट्रिन्स ऑफ मैत्रेयनाथ, सीक्रेट्स ऑफ तिबेट, प्रेदिन्नग बुद्धिस्ट लॉजिक, इंडो–तिबेटिका (१९४९), तिबेटन पेंटेड स्क्रॉल्स (१९४९), तिबेटन फोक–साँग्ज (१९४९), द टूम्झ ऑफ द तिबेटन किंग्ज (१९५०), नेपाळ (१९६०), थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ द मण्डल (१९६१), तिबेट : लँड ऑफ स्नोज (१९६६) इत्यादी.

साक्रीकर, दिनकर