इतिहास : इतिहासाची अधिकात अधिक वस्तुनिष्ठ अशी व्याख्या करायची, तर इतिहास ह्या संस्कृत शब्दाचा व्युत्पत्तिसिद्ध जो अर्थ आहे, तोच स्वयंपूर्ण आणि प्रमाण मानावा लागेल. ‘इति + ह् + आस’ म्हणजे ‘असे झाले’, ‘याप्रमाणे घडले’. ह्यात सर्व घडलेल्या गोष्टी आल्या आणि अर्थात त्या घडल्या तशाच सांगितल्या गेल्या, हेही इथे अभिप्रेत आहे. जे घडले ते सर्वच्या सर्व इतिहासाच्या कक्षेत न घेतल्यामुळे इतिहास म्हणजे भूतकालीन राजकारण, अशा प्रकारच्या संकुचित व्याख्या निर्माण होतात. एखाद्या कालखंडाचा इतिहास म्हणजे त्या काळातील मानवी जीवनाच्या सर्व अंगांचा आढावा, असाच अर्थ झाला पाहिजे. आवश्यकतेप्रमाणे घटनांची निवड करता येते,केलीही जाते मात्र अशा वेळी आपण ज्याचा आढावा घेत अहोत, तो भूतकालीन जीवनाचा केवळ एक भाग आहे, ह्याची स्पष्ट जाणीव ठेवावी लागते.

इतिहासाच्या व्याख्येत ‘असे असे झाले’ असे मोघमपणे म्हटले, तरी काय झाले व कसे झाले हे सांगणारा अभ्यासक इतिहासकथनाच्या क्रियेत त्या घटनांकडे पाहण्याची आपली द्दष्टी थोडीबहुत आणणारच. काही अज्ञान, काही पूर्वग्रह व काही प्रमाणात भूतकालातील विचार व भावना समजण्याची माणसाची असमर्थता यांमुळे इतिहासलेखन हे खरोखरी अगदी जसे घडले तसेच्या तसे सांगितले, अशा स्वरूपाचे होणे शक्य नाही. तथापि आदर्श स्वरूपात इतिहास म्हणजे जे घडले ते जसेच्या तसे सांगणे व जेवढे सर्व सांगणे, असाच अर्थ करावा लागेल.

माणूस जेव्हा इतिहासाचा विचार करतो, तेव्हा त्याचे लक्ष्य मानव हेच असते. माणसाप्रमाणे एखाद्या हत्तीला, वृक्षाला किंवा दगडालाही भूतकाळ आहेत. प्राणिशास्त्रज्ञाच्या दृष्टीने हत्तीचा इतिहास, वनस्पतीशास्त्रज्ञानाच्या दृष्टीने वृक्षाचा भूतकाळ आणि भूवैज्ञानिकाच्या दृष्टीने दगडाचे जुने स्वरूप ह्याही गोष्टी अर्थपूर्ण आहेत. तथापि जेव्हा इतिहास विषयाचा ती एक ज्ञानशाखा म्हणून विचार होतो, तेव्हा अभ्यासविषय म्हणून मनुष्यप्राणीच अभिप्रेत असतो. जीवनपद्धतीत प्रयत्‍नपूर्वक आणि जाणीवपूर्वक होत जाणारी स्थित्यंतरे ही फक्त मानवाच्या बाबतीत शक्य आहेत. अधिकाधिक सुखसमृद्धीसाठी मानव धडपडत असतो. ह्या उद्योगात जय असतात. पराजयही असतात. ह्या सर्व यशापयशांची कथा आणि चिकित्सा म्हणजे इतिहास.

अभ्यासक आवश्यकतेनुसार प्रादेशिक किंवा सांस्कृतिक मर्यादा आखून घेतात आणि त्यांवरून इतिहासकथनाचे निरनिराळे प्रकार निश्चित होतात. राजकीय सत्तेच्या स्थानात आणि स्वरूपात जी स्थित्यंतरे होतात, तेवढीच सांगणारा तो राजकीय इतिहास कुटुंब, विवाह इ. सामाजिक संस्थांच्या स्वरूपातील बदलांचा आढावा घेणारा तो सामाजिक इतिहास आणि शेती, उद्योगधंदे वगैरेंची प्रगती व परागती नोंदविणारा तो आर्थिक इतिहास होय. जीवनाच्या इतर अंगांची अनुषंगाने अगदी आवश्यक तेवढीच दखल घेऊन एखाद्या विशिष्ट बाबीपुरतीच मानवी जीवनाच्या वाटचालीची कथा सांगता येते. इतिहास वाङ्‌मयापुरता, कलेपुरता किंवा चित्रकला, संगीत अशा एखाद्या विशिष्ट कलेपुरताही मर्यादित होऊ शकतो. प्रादेशिक भूमिकेतून सबंध मानवी समाज एक कल्पून जगाचा किंवा मानवाचा इतिहास सांगितला जातो. आजच्या राष्ट्रीय सीमा, धर्मकल्पना किंवा सामाजिक भेद आहेत तसेच गृहीत धरून त्यांच्या भूतकाळाच्याही सुसंबद्ध हकिकती सांगण्याचे प्रयत्‍न होतात. भारताचा इतिहास, ख्रिश्चन धर्माचा इतिहास आणि ज्यू लोकांचा इतिहास ही अशा प्रकारांची काही उदाहरणे होत.

इतिहासलेखनासाठी निवडलेला प्रदेश किंवा काळ हा इतिहासलेखकाच्या आणि त्याच्या वाचकांच्या विशिष्ट गरजेतून आणि विशिष्ट मनोभूमिकेतून निर्माण होत असतो. आजच्या संस्कृतीत राष्ट्र हे एक निष्ठास्थान आहे राष्ट्रीयता हे एक मूल्य आहे आणि म्हणूनच राष्ट्रीय इतिहासात रस निर्माण होतो. अशा इतिहासामागे सद्यःकालीन भावना हीच प्रबळ असते. पाकिस्तानचा भूतकाळ असे जेव्हा म्हटले जाते, तेव्हा पाकिस्तान म्हणून आज अस्तित्वात असलेला प्रदेश पायाभूत मानण्यात येतो आणि त्या प्रदेशात मानवसंस्कृतीच्या प्रारंभापासून आजतागायत जे जे घडले ते सर्व पाकिस्तानच्या इतिहासात जमा होते. १९४७ पूर्वी जेव्हा पाकिस्तान अस्तित्वात नव्हते, तेव्हा फक्त हिंदुस्थानाचा इतिहास सांगण्यात येत होता आणि पाच हजार वर्षांपूर्वी होऊन गेलेली मोहें-जो-दडो संस्कृती हिंदुस्थानच्या इतिहासातील पहिले प्रकरण म्हणून वर्णिली जात होती. हिंदुस्थानच्या फाळणीने पाकिस्तान हे नवे राष्ट्र १९४७ मध्ये निर्माण झाले. ताबडतोब त्याला अतिप्राचिन इतिहास प्राप्त झाला. मोहें-जो-दडो हे गाव आणि तेथील उत्खनित प्रदेश पाकिस्तानी हद्दीत गेल्यामुळे ती संस्कृती म्हणजे पाकिस्तानचाच पूर्वेतिहास झाला आणि प्रसिद्ध पुरातत्त्ववेत्ता डब्ल्यू. एच्. व्हीलर हा मोहें-जो-दडोवरील आपल्या पुस्तकाला ‘पाकिस्तानची पाच हजार वर्षे’ असे नाव देऊन मोकळा झाला. ह्याच राष्ट्रीय भावनेतून इंग्‍लंडचा इतिहास, जर्मनीचा इतिहास, रशियाचा इतिहास आणि भारताचा इतिहास अशा प्रकारची इतिहासपुस्तके तयार होतात. ह्यांत इंग्‍लंड, जर्मनी, फ्रान्स, रशिया वगैरे देशांच्या आजच्या चतुःसीमा लक्षात घेऊन ह्या प्रदेशांत पूर्वी होऊन गेलेले सर्व काही आपलाच वारसा म्हणून सांगितले जाते. एखादा देश आज स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्वात असला, तरी काही काळापूर्वी तशा राष्ट्रीयत्वाच्या जाणिवेने तो अस्तित्वात नसेलही, हे लक्षात घेतले जात नाही.

राष्ट्रीयत्वाप्रमाणेच इतरही काही सांप्रतच्या मूल्यांच्या व निष्ठांच्या मागोव्याने इतिहासकथन करण्याचे प्रकार होत असतात. ह्या निरनिराळ्या प्रकारच्या स्वाभिमानांच्या प्रेरणेतून जे इतिहास निर्माण होतात, त्यांचे स्वरूप बहुधा स्वाभिमानाने निश्चित केलेले असते– भूतकालीन वस्तुस्थितीने नव्हे– हे लक्षात घेतले पाहिजे. म्हणून जातींचे इतिहास, धर्मांचे इतिहास, राष्ट्रांतर्गत लहान लहान प्रदेशांचेही इतिहास निर्माण होतात. 

विविध प्रकारांनी व विविध दृष्टिकोनांतून सांगितलेल्या भूतकालीन घडामोडींच्या हकिकतींप्रमाणे त्या हकिकती कशा मिळविल्या, कशा जुळविल्या, कशा सांगितल्या आणि कशासाठी सांगितल्या, ह्यासंबंधी विचार केला जातो. प्राचीन हत्यारे, इमारती, नाणी व इतर अनेक प्रकारचे अवशेष, पूर्वजांनी स्वतःविषयी कोरून किंवा लिहून ठेवलेली माहिती, ह्या सर्वांचा पद्धतशीर उपयोग करून प्रत्यक्ष इतिहालेखन करणे हे एक स्वतंत्र शास्त्र झाले आहे. ह्या योग्य तऱ्हेने जमविलेल्या इतिहाससाधनांचा अर्थ कसा लावावयाचा आणि इतिहासलेखनाला मानवी जीवनात काय स्थान द्यावयाचे, ह्यांबद्दलचे चिंतन गेली कित्येक शतके चाललेले आहे. इतिहास म्हणजे प्रत्यक्ष घडामोडी, ह्या कोणत्यातरी नियमांनी बद्ध असतात, मानवी समाज एका विशिष्ट दिशेने वाटचाल करीत आहे आणि पुढेही तो त्याच ठरलेल्या दिशेने चालत राहणार आहे, ह्यापासून तर इतिहासात एकामागून एक घडत जाणाऱ्या घटनांच्या मागे कोणतेही सूत्र नाही, असूच शकत नाही, ह्यापर्यंत अनेक विचार प्रकट केले गेले आहेत. अनुषंगाने इतिहासाच्या ज्ञानाचा माणसाला निश्चित उपयोग तरी काय, असा मूलभूत प्रश्न उपस्थित करून इतिहासावाचून माणसाचे क्षणभरही चालणार नाही येथपासून, तर इतिहास म्हणजे नुसती अडगळ आहे, येथपर्यंत सर्व प्रकारची उत्तरे देण्यात आलेली आहेत. कालगतीचा अर्थ लावण्याच्या किंवा त्यातील अर्थशून्यता सांगण्याच्या ह्या सर्व प्रयत्‍नांना स्थूलपणे इतिहासाचे तत्त्वज्ञान असे म्हटले जाते. इतिहासलेखनाच्या तंत्राचा ऊहापोह आणि इतिहासाच्या तत्त्वज्ञानाचा व उपयोगितेचा शोध हे इतिहासाध्ययनाचे प्रत्यक्ष ऐतिहासिक घटनांच्या आढाव्याइतकेच, किंबहुना त्याहूनही अधिक महत्त्वाचे असे भाग आहेत.

इतिहासाच्या संबंधात निर्विवाद असलेली गोष्ट एकच. ती म्हणजे एकामागून एक होणारी स्थित्यंतरे. माणूस कापसाचे, रेशमाचे, लोकरीचे, टेरिलीनचे वस्त्र केव्हातरी वापरीत नव्हता. तो केव्हातरी ते वापरू लागला हे निश्चित. तसेच राजकीय जीवनात पूर्वी जगाच्या बहुतेक भागांत सर्वसत्ताधीश असे राजे राज्य करीत होते, तर आज जगाच्या बहुतेक सर्व भागांत लोकशाही पद्धतीचा राज्यकारभार चालू आहे. सामाजिक व्यवहारात जगातील अनेक समाजात पूर्वी बहुपत्‍नीकत्व होते, ते आता गेले आहे. आता हे स्थित्यंतर फक्त जीवनाच्या बाह्य स्वरूपातीलच आहे. एक सजीव प्राणी म्हणून भूक, तहान, लैंगिक भावना इ. मूलभूत विकार जे आहेत, ते कोणत्याही काळी कोणत्याही समाजात सारखेच असतात, असे म्हणता येईल. हे जरी मान्य केले, तरी आपल्या निरनिराळ्या भुका भागविण्याच्या, निरनिराळ्या इच्छा पुऱ्या करून घेण्याच्या माणसाच्या पद्धती बदलतात. बदल– बाह्य स्वरूपातील बदल म्हणा हवे तर– हे एक उघड दिसणारे आणि वादातीत असे सत्य आहे. काहीतरी असते ते नाहीसे होते किंवा त्याचे रूप तरी पालटते, काही नसलेल्या गोष्टी नव्याने येतात किंवा जुन्याच गोष्टी नव्या स्वरूपात अवतरतात. पण काहीना काही घडामोड ही चालूच अलते. ह्या घडामोडींचे अर्थ कसेही लावले, तरी घडामोड नावाचे सत्य मानायलाच पाहिजे. इतिहासाचा दुसरा कोणताही अर्थ लागो किंवा न लागो, इतिहास म्हणजे बदल, इतिहास म्हणजे स्थित्यंतर, हे मान्य करूनच पुढे त्या विषयासंबंधी अधिक ऊहापोह व्हावा.

पहा : इतिहासलेखनपद्धति इतिहासाचे तत्त्वज्ञान.

संदर्भ : 1. Carr, E. H. What is History ?, London, 1962.

     2. Rowse, A. L. The Use of History, London, 1946.

      ३. भारत इतिहास संशोधक मंडळ, दत्तोपंत आपटे स्मारकग्रंथ, पुणे, १९४७.

आठवले, सदाशिव