मुहम्मद इब्न कासिम : (आठव्या शतकाचे पहिले चतुर्थक). एक तरुण तडफदार अरब सेनानी. आठव्या शतकाच्या सुरुवातीस सिंधचा राजा दाहिर (दाहर) व इराकचा अरब सुभेदार अल् हज्जाज यांत वितुष्ट झाले. तेव्हा अल् हज्जाजने दाहिरवर स्वारी करण्यासाठी मुहम्मद बिन कासिम या तरुण अधिकाऱ्याची फौज देऊन नेमणूक केली. या स्वारीच्या वेळी मुहम्मदाचे वय फक्त सतरा वर्षांचे होते. मुहम्मद ६,००० सिरियन घोडेस्वार आणि तोफखाना घेऊन ७११ च्या हिवाळ्यात स्वारीवर निघाला आणि सर्वप्रथम त्याने देवल हे शहर जिंकून घेतले. तेथल्या बायका-मुलांना गुलाम करून बऱ्याचशा लोकांचे सक्तीने धर्मांतर केले. देवलनंतर त्याने ७१२ च्या सुरुवातीस नीरून व सेहवान ही शहरे घेतली. त्यानंतर सिंधू नदी पार करून दाहिर राजाशी रावर येथे लढाई केली. या लढाईत दाहिरने खूप मोठा पराक्रम केला. परंतु तो शत्रूच्या बाणाने घायाळ झाला आणि नंतर मृत्यूमुखी पडला. अशा रीतीने दाहिरचा पराभव करून मुहम्मद बहमनाबादेकडे वळला. दाहिरचा मुलगा जयसिंग पळून गेल्याने बहमनाबाद त्याच्या ताब्यात आले. अशा तऱ्हेने ७१२ च्या ऑक्टोबरपर्यंत सिंधूमधील रावर, सेहवान, निरून, घालिया आणि इतर महत्त्वाची ठिकाणे त्याच्या ताब्यात आली. अशा प्रकारे त्याने सिंधू नदीच्या खालच्या खोऱ्यात अरब सत्ता प्रस्थापित केली. येथे त्याने अरब सुभेदारांची नेमणूक करून राज्यकारभारात सुस्थिरता आणली. राजा दाहिरची बायको राणी लाडी हिच्याशी त्याने विवाह केला. त्यानंतर त्याने अलोर आणि मुलतान अशी दोन महत्त्वाची शहरे जिंकून घेऊन सिंधू नदीच्या खोऱ्यात मुसलमानी सत्तेचा पाया रोवला. पण अखेरचा खलीफ सुलेमान याची त्याच्यावर गैरमर्जी झाल्यामुळे त्यास कच्च्या चामड्यात शिवून काढून खलीफाकडे नेण्यात आले. तेव्हा तो वाटेतच मरण पावला.

कुलकर्णी, गो. त्र्यं.