कुत्बुद्दीनऐबक: (?–१२१०). दिल्लीच्या तख्तावर बसणारा पहिला मुसलमान सुलतान व गुलाम घराण्याचा संस्थापक. हा मुइझ्झुद्दीन मुहम्मद घोरीचा गुलाम होता. स्वत:च्या कर्तृत्वामुळे तो थोर पदास चढला. हिंदुस्थानातील साम्राज्याचे रक्षण करण्याकरिता मुइझ्झुद्दीनने त्यास आपला प्रतिनिधी म्हणून नेमले. ११९२–१२०६ पर्यंत ऐबकने काही राजपुत राजे आणि बयाना, अजमेर, ग्वाल्हेर, अनहिलवाड यांवर आक्रमण करून दिल्लीपासून गुजरातपर्यंत घोरींची सत्ता स्थापन केली.

मुइझ्झुद्दीनच्या मृत्युनंतर १२०६ मध्ये कुत्बुद्दीनने आपल्या हातात राज्याची सूत्रे घेतली. तो स्वत:ला घोरीचा प्रतिनिधी समजत असल्यामुळे त्याने सुलतान ही पदवी घेतली नाही व स्वत:च्या नावाची नाणीही पाडली नाहीत. याच्या काळात ताजुद्दीन व नासिरूद्दीन या शासकांनी पंजाब जिंकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी १२०८ मध्ये ऐबकने त्यांचा पराभव करून गझनीचा व दिल्लीचा संबंध कायमचा तोडला. त्याने बंगालमध्ये झालेल्या बंडाचा मोड केला. पोलोचा खेळ खेळताना भयंकर जखमी होऊन तो मरण पावला.

ऐबक हा साहसी, धोरणी व शूर होता. तो इस्लाम धर्माचा पुरस्कर्ता असून हिंदूंवर त्याची वक्रदृष्टी होती. सत्तावीस लाख देहलीवाल किंमतीची देवालये पाडून त्यांच्या अवशेषांनी त्याने दिल्लीत कुव्वतुल इस्लाम नावाची मशीद बांधली. त्याच्या काळात कुतुबमीनार इमारतीचा पहिला मजला बांधला गेला. भारतात इस्लामी राज्याचा पक्का पाया घालणारा ऐबक हा पहिला राज्यकर्ता होय,असे म्हणावयास हरकत नाही.

गोखले, कमल