अल्तमश, शम्सुद्दीन : ( ?—१२३६). दिल्लीचा १२११ ते ३६ या काळातील सुलतान. याच्या पूर्वी गादीवर असलेला सुलतान कुत्बुद्दीन ऐबकचा अल्तमश (इल्तुल्मिश) गुलाम होता. अल्तमशच्या गुणांकडे पाहून ऐबकने त्याची गुलामगिरीतून मुक्तता केली व निरनिराळ्या अधिकारांच्या जागी त्याची नेमणूक केली. पुढे ऐबकने त्यास आपला जावई करून उत्तर प्रदेशातील बदाऊन येथे सुभेदार नेमले.

राज्यावर येताच त्याला कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागले. सिंध प्रांतातील नासिरुद्दीन कुबैचा, बंगालमधील धियासुद्दीन इझ व पंजाबमधील यिल्दिझ यांनी बंडाळी सुरू केली. या तिन्ही प्रांतांतील बंडे त्याने मोडून काढली. चंगीझखानाने ख्वारिज्मच्या सुलतानावर स्वारी करून त्याचा पराभव केला. नंतर त्याने सुलतानाचा मुलगा जलालुद्दीन मंगबर्नी याचा खोरासान, अफगाणिस्तान व सिंधू नदीपर्यंत पाठलाग केल्यामुळे तो अल्तमशच्या आश्रयास भारतात आला. अल्तमशने त्यास आश्रय नाकारून राज्यावरील मोगलांच्या स्वारीचे संकट टाळले. मंगबर्नी परत गेल्यानंतर अल्तमशने सिंधच्या कुबैचाचा पराभव करून त्या प्रांतावर आपली सत्ता प्रस्थापित केली. त्याने राजस्थान व माळवा भागात स्वाऱ्‍या करून १२२६ मध्ये रणथंभोर १२३२ मध्ये ग्वाल्हेर १२३३ मध्ये कालिंजर, अजमेर, कनौज, वाराणसी, भेलसे व उज्‍जयिनी ही स्थळे जिंकली व तेथील हिंदू देवालये पाडून टाकली.

अल्तमश शूर योद्धा व कुशल सेनापती पण धर्मवेडा होता. उत्तर हिंदुस्थानात त्याने प्रबळ साम्राज्य स्थापले. भारतातील मोगलपूर्व मुसलमानी सत्तेच्या काळातील हाच पहिला कर्तृत्ववान सत्ताधीश मानावा लागेल. बगदादच्या खलीफाने त्यास स्वतंत्र राजा म्हणून वस्त्रे पाठविली होती. अल्तमशने मुस्लिम कवींना व विद्वानांना आश्रय दिला. त्याने मुइझ्झिया व नासिरिया ही दोन महाविद्यालये दिल्लीजवळ बांधली.

अल्तमशने वास्तुकलेकडे बरेच लक्ष पुरविले होते. ऐबकने बांधलेल्या दिल्ली येथील कुव्वतुल इस्लाम मशिदीचा अल्तमशने विस्तार केला. या व त्याने आपल्या थोरल्या मुलासाठी ⇨कुतुबमीनारपासून जवळच तीन मैलांवर मलकापूर येथे बांधलेल्या सुलतान घारी ह्या वास्तूत भारतीय-इस्लामी पद्धतीचा ठसा आढळतो. ऐबकने सुरू केलेल्या कुतुबमीनारचे काम त्याने ६९·६ मी. पर्यंत बांधून पूर्ण केले.

गोखले, कमल