लॉर्ड वेलस्लीवेलस्ली, लॉर्ड रिचर्ड कॉली : (२० जून १७६०–२६ सप्टेंबर १८४२). हिंदुस्थानातील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर जनरल (१७९७–१८०५). राजनीतिज्ञ व ब्रिटिश मुत्सद्दी. ⇨ड्यूक ऑफ वेलिंग्टन याचा ज्येष्ठ बंधू. त्याचा जन्म डॅंगन कॅसल (आयर्लंड) येथे झाला. त्याने ईटन व ख्राइस्ट चर्च कॉलेज (ऑक्सफर्ड) येथे शिक्षण घेऊन पदवी मिळविली (१७८१). पुढे हाउस ऑफ कॉमन्सवर तो निवडून आला (१७८४). धाकट्या विल्यम पिटचा तो स्नेही होता. पिट पंतप्रधान झाल्यावर त्याने वेलस्लीला खजिनदार केले आणि `इंडिया बोर्ड ऑफ कंट्रोल’ चा आयुक्त नेमले (१७९३-९७). त्यानंतर त्याची हिंदुस्थानात प्रथम मद्रासचा गव्हर्नर व नंतर बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक करण्यात आली (१७९७-१८०५).

हिंदुस्थानात वेलस्लीने विस्तारवादी धोरण स्वीकारले, ⇨तैनाती फौजेचा प्रसार केला आणि एतद्देशीय सत्ताधीशांना नमवून हिंदुस्थानचे ब्रिटिश साम्राज्यात रूपांतर केले. निजामावर त्याने तैनाती फौजेचा पहिला प्रयोग केला. निजामाच्या साहाय्याने टिपू सुलतानचा पराभव करून म्हैसूरच्या गादीवर कृष्णराज ओडेयर या मूळ राजास बसविले व त्यास तैनाती फौज स्वीकारण्यास लावली. नंतर त्याने दुसरा बाजीराव, यशवंतराव होळकर, दौलतराव शिंदे, नागपूरकर भोसले आदी मराठी सत्ताधीशांचा पराभव करून त्यांच्यावर तैनाती फौजेची सक्ती केली. मांडलिक संस्थानिकांनी तैनाती फौजेच्या खर्चासाठी मुलूख तोडून द्यावा इंग्रजांच्या परवानगीशिवाय इतर यूरोपीयांस नोकरीस ठेवू नये आणि अन्य सत्तांशी करार करू नये तसेच संस्थानांची देखरेख इंग्रजांचा रेसिडेंट हा अधिकारी करेल, यांसारख्या कडक अटी घालून त्याने हिंदुस्थानातील ब्रिटिश सत्तेचा पाया पक्का केला. तंजावरचा राजा तुळाजी निधन पावल्यावर (१७८७) जो वारसासाठी संघर्ष सुरू होता, त्याचा फायदा घेऊन ते राज्य त्याने खालसा केले (१७९९). तसेच कर्नाटकाचा नबाब मुहम्मद अलीच्या निधनानंतर (१८०१) त्याचा मुलगा उम्मत्त अली गादीवर आला पण वेलस्लीने काहीतरी कारण काढून तेही खालसा केले. त्यानंतर सुरतचे राज्य खालसा करून त्याने अयोध्येच्या वजीर अलीवर दडपशाही करून त्याचे अर्धे राज्य खालसा केले व रोहिलखंड, गोरखपूर, अलाहाबाद इ. ठिकाणी इंग्रती अंमल बसविला. अशा प्रकारे त्याने जवळजवळ सर्व हिंदुस्थान इंग्रजी अंमलाखाली आणला.

यूरोपातील नेपोलियनच्या कारवायांकडेही वेलस्लीचे लक्ष होते. म्हणून त्याने नेपोलियनच्या फौजांचा बंदोबस्त करण्यासाठी ईजिप्तमध्ये हिंदुस्थानातून सैन्य धाडले. तसेच जॉन मॅल्कम यास इराणला पाठवून व्यापाराच्या सवलती मिळविल्या. न्यायदानासाठी त्याने गव्हर्नर जनरल इन कौन्सिलकडील न्यायदानाचे अधिकार काढून ते न्यायाधीश मंडळाकडे सुपूर्त केले पण त्याच वेळी त्याने मुद्रणस्वातंत्र्यावर काही निर्बंध लादले. त्याच्या विस्तारवादी धोरणामुळे लष्कराचा खर्च फार वाढला म्हणून त्याला कंपनीने इंग्लंडला परत बोलाविले. त्याला महाभियोगाची भीतीही घातली. तरीसुद्धा परतल्यावर त्याची सेव्हिल येथे राजदूत म्हणून नियुक्ती झाली (१८०९). त्यानंतर त्यास आयर्लंडमध्ये लॉर्ड लेफ्टनंट म्हणून नेमण्यात आले (१८२१–२८). यावेळी प्रॉटेस्टंट व कॅथलिक यांमधील संघर्ष मिटविण्याचा त्याने प्रयत्न केला परंतु धार्मिक तणाव वाढून देशाचे विभाजन झाले आणि स्वतंत्र आयर्लंड प्रजासत्ताक अस्तित्वात आले. त्याचा भाऊ ड्यूक ऑफ वेलिंग्टन पंतप्रधानपदी येताच (१८२८–३०) वेलस्लीने राजीनामा दिला पुढे पुन्हा त्याच्याकडे लॉर्ड लेफ्टनंटचे पद आले (१८३३-३४). अखेरच्या दिवसांत आपल्याला ड्यूक ऑफ हिंदुस्थान हा दर्जा देऊन भावाच्या योग्यतेबरोबर आणावे, अशी त्याची तीव्र इच्छा होती. ती असफल झाल्यामुळे तो भ्रमिष्टासारखा वागू लागला. लंडन येथे त्याचे निधन झशले. हिंदुस्थानात रॉबर्ट क्लाइव्हने इंग्रजी सत्तेचा पाया घातला. वॉरन हेस्टिंग्जने तो दृढतर केला आणि वेलस्लीने त्याचे साम्राज्यात रूपांतर केले. [→ इंग्रजी अंमल, भारतातील].

संदर्भ : 1. Kulkarni, V. B. British Statesmen in India, New Delhi, 1961.           2. Roberts, Paul Ernest, India Under Wellesley, London, 1929.           3. Woodruff, Philip, The Men Who Ruled India : The Founders, London, 1963.           ४. सरदेसाई, गो. स. ब्रिटिश रियासत, उत्तरार्ध, पुणे, 1991.

गोखले, कमल