बल्बन, घियासुद्दी न : (? १२०७ – ? १२८७). गुलाम घराण्यातील दिल्लीचा नववा सुलतान. अल्तमशच्या तुर्की गुलामांतील एक विश्र्वासू गुलाम. ह्याचे पूर्वज एलबरीमधील होते. ह्याचे मूळ नाव वहाउद्दीन. अल्तमशने बल्बनची गुलामगिरीतून मुक्तता करून त्याची नियुक्ती चाळीस सरदारांच्या गटात केली. रजिया सुलतानाच्या कारकीर्दीत अमीर-इ-शिकार या पदावर त्यास बढती मिळाली. त्याने आपली मुलगी सुलतान नासिरूद्दीन (कार. १२४६-६६) यास देऊन त्याच्या दरबारात मंत्रिपद मिळविले. प्रत्यक्षात दिल्लीचा सर्व कारभार तो आपल्या जावयाच्या नावाने पाहत असे. आपल्या वीस वर्षांच्या कारकीर्दीत त्याने हिंदू राजांस पादाक्रांत केले. तसेच मंगोलांच्या स्वार्यांकचाही बंदोबस्त केला. नासिरूद्दीन निपुत्रिक होता. त्यामुळे त्याच्यानंतर बल्बनच दिल्लीच्या तख्तावर आला.

सुलतान झाल्यावर (इ. स. १२६६) राज्यात स्थिरता आणण्याकरिता  वल्बनने  सैन्याची  संघटना  करून  कार्यक्षम प्रशासनाद्वारे  अनेक  विधायक  योजना  राबविल्या.  मेवाती, कांपिल, पतियाळी, भोजपूर  इ.  टोळ्यांनी  दिल्लीच्या  आसपास  धुमाकूळ घातला होता. बल्बनने बंडखोरांचा पराभव करून राज्यांत शातंता प्रस्थापिली. वायव्य सरहद्दीवरील मंगोल लोकांच्या आक्रमणापासून देशाचे संरक्षण व्हावे, म्हणून बल्बनने सीमा भागात अनेक किल्ले बांधले आणि तेथे शूर कडव्या अफगाणांची नेमणूक केली. सीमा प्रदेशाचे दोन भाग पाडून तेथे राजपुत्र मुहम्मद व बोघराखान यांची नेमणूक केली. १२७९ मध्ये बंगालचा सुभेदार तुघ्रीलखान हा स्वंतत्रपणे वागू लागला. तेव्हा बल्बनने त्याचा बायकामुलांसह नाश केला. राजपुत्र मुहम्मद मंगोलांशी लढताना मरण पावला. पुत्रशोकाने बल्बन वयाच्या ऐंशिव्या वर्षी मरण पावला.

बल्बनने राज्यातील गोंधळ नाहीसा करून राजपदाचा दरारा वाढविला. राज्ययंत्रणा सुरळीत चालावी, म्हणून त्याने गुप्तहेर खाते निर्माण करून त्यावर पुष्कळ पैसा खर्च केला सर्व राज्यात हेरांची नेमणूक केली. जंगले तोडून शेती व वसाहती यांची योग्य तरतूद केली. तो सुन्नी पंथाचा अनुयायी होता. स्वभावाने तो क्रूर असून हिंदूंचा द्वेष्टा होता.

बल्बनने विद्या व कला यांना प्रोत्साहन दिले. त्याच्या दरबारात अनेक विद्वान व कलावंत यांना उदार आश्रय मिळाला. त्याला संगीताची विशेष आवड होती. तो भारतीय संगीताला मान देई. त्याने नवस्थापित तुर्क राज्याचे संघटन आणि संरक्षण करून देशात शांतता व सुव्यवस्था स्थापन केली.                     

गोखले, कमल