रक्तहीन राज्यक्रांति : इंग्लंडमध्ये इ. स. १६८८ साली मानवी रक्ताचा एक थेंबही न सांडता झालेली राज्यक्रांती. या क्रांतीचा उल्लेख वैभवशाली राज्यक्रांती असाही केला जातो. स्ट्यूअर्ट घराण्यातील दुसरा चार्ल्‌स या राजाच्या मृत्यूनंतर त्याचा भाऊ दुसरा जेम्स (कार. १६८५–८८) हा इंग्लंडच्या गादीवर आला. ईश्वरदत्त व अनियंत्रित राजसत्तेच्या तत्त्वांवर त्याचा विश्वास होता. त्याचा ओढा कॅथलिक पंथाकडे असल्यामुळे इंग्लंडमध्ये रोमन कॅथलिक संप्रदायाची स्थापना व्हावी, म्हणून तो प्रथमपासून प्रयत्नशील होता. त्याने चर्च, विश्वविद्यालये व इतर महत्त्वाची खाती यांवरील प्रमुख जागी कॅथलिक व्यक्तींना नेमले आणि त्याकरिता पार्लमेंटची संमती न घेता त्याची सभा पुढे ढकलली. १४ व्या लूईच्या सल्ल्याने त्याने इंग्लंडमध्ये कॅथलिक पंथाचा प्रसार करण्यासाठी ४ एप्रिल १६८७ रोजी ‘डिक्लेरेशन ऑफ इंडलजन्स’ हे फर्मान काढले आणि पार्लमेंटने केलेले सर्व धार्मिक कायदे रद्द केले. असेच दुसरे फर्मान ३ मे १६८८ रोजी त्याने प्रसिद्ध केले. हे फर्मान वाचण्याची आपल्यावर सक्ती होऊ नये, अशी विनंती करणाऱ्या सात प्रमुख बिशपांवर खटले भरले. कॅथलिकांना टेस्ट व कॉर्पोरेशन ॲक्टमधून मोकळीक देण्याचा हुकूम काढला. त्याच्या दोन्ही मुली-मेरी आणि ॲन-प्रॉटेस्टंट असल्याने कदाचित जेम्सच्या मृत्यूनंतर हे धोरण बदलेल, अशी लोकांना आशा होती परंतु १० जून १६८८ रोजी जेम्सला मुलगा झाला. हा जेम्स एडवर्ड कॅथलिक वातावरणात व मेरी ऑफ मॉडेना या कॅथलिकपंथी राणीच्या पोटी जन्मल्यामुळे तोसुद्धा कॅथलिकच असणार, या भीतीने लोकांनी जेम्सच्या जावई (मेरीचा पती), हॉलंडचा राजा, विल्यम ऑफ ऑरेंज याला पाचारण केले. हा विल्यम म्हणजे इंग्लंडच्या पहिला चार्ल्स या राजाचा नातू (मुलीचा मुलगा) होता. ५ नोव्हेंबर १६८८ रोजी तो आपल्या १५,००० सैन्यासह इंग्लंडमध्ये टॉर्बे बंदरापाशी दाखल झाला. विल्यमबरोबर लढाई करण्यास जेम्सकडे सुसज्ज सैन्य होते, पण त्याची मुलगी ॲन व इतर सहकारी तसेच जॉन चर्चिल (भावी ड्यूक ऑफ मार्लबरो) याच्यासह काही सेनापती जेम्सच्या विरोधात गेल्यामुळे त्याला देशत्यागाशिवाय अन्य पर्याय राहिला नाही. तो इंग्लंड सोडून फ्रान्सला पळून गेला (डिसेंबर १६८८). जाताना त्याने राजाधिकारदर्शक शिक्कासुद्धा टेम्स नदीत भिरकावून दिला.

या आणीबाणीच्या प्रसंगी चौदाव्या लूईने जेम्सला मदत केली नाही किंवा जेम्सनेही फ्रान्सची मदत मागितली नाही. कदाचित त्याला आपल्या कर्तृत्वाविषयी फाजील आत्मविश्वास असावा किंवा आपल्या राज्यात लूईसारख्या बलाढ्य राजास हस्तक्षेप करून देणे त्याला रुचले नसावे, असे काही इतिहासकारांचे मत आहे. जेम्सच्या राज्यत्यागानंतर कोणताही संघर्ष न होता सत्तांतर झाले आणि ही राज्यक्रांती घडून आली. म्हणून तिला रक्तहीन क्रांती हे यथार्थ नाव प्राप्त झाले आहे.

या क्रांतीचे दूरगामी परिणाम झाले. विल्यमची पत्नी मेरी ही ज्येष्ठ मुलगी असल्याने तीच खरी वारस होती पण विल्यमने केवळ राणीचा पती या नात्याने राहण्याचे नाकारले आणि राजा म्हणूनच आपण इथे आलो आहोत, अन्यथा स्वदेशात परत जाऊ असे स्पष्ट सांगितले, तेव्हा कन्व्हेंशन पार्लमेंटने काही अटींवर विल्यम आणि मेरी या दोघांस संयुक्तपणे राजपद दिले तथापि इंग्लंडमधील पक्षोपपक्षांत या मुद्यावर एकमत नव्हते. जेम्सचे अनुयायी आणि काही लहान संघ सोडले तर देशात टोरी आणि व्हिग हे प्रमुख पक्ष होते. टोरी पक्षातही तीन भिन्न विचारांचे गट होते. पहिल्या गटाला जेम्सबरोबर समझोता करून त्यास परत बोलवावे आणि त्यालाच स्थानापन्न करावे, असे वाटत होते. दुसऱ्या गटाचे मत असे होते, की राजाला वेडा ठरवून राजमुखत्याराने (रीजन्सीने) राज्यकारभार चालवावा. राजाने राज्यत्याग केला आहे ही वस्तुस्थिती गृहीत धरून मेरीला वारसाहक्काने गादी द्यावी, असे तिसऱ्या गटाचे मत होते. मात्र जेम्स पळून गेल्यामुळे रिक्त सिंहासनावर नवीन व्यक्ती बसविण्याचा अधिकार लोकांचा आहे, हे तत्त्व व्हिग पक्षाने मांडले. यानंतर लोकांनी आपल्या हक्कांचा मसुदा तयार केला. तो राजदंपतीकडून १२ मार्च १६८९ रोजी जाहीर करण्यात आला. त्याच्या आधारावर लोकांच्या हक्कांचे विधेयक (बिल ऑफ राइट्स) १६८९ मध्ये संमत करण्यात आले. इंग्लंडच्या संविधानात्मक इतिहासात या विधेयकाचे स्थान ⇨मॅग्ना कार्टाच्या बरोबरीचे मानण्यात येते. या क्रांतीने इंग्लंडमध्ये घटनात्मक शासन अस्तित्वात आले. वरील विधेयकात पार्लमेंटचे वर्चस्व हे महत्त्वाचे सूत्र होते. याशिवाय इंग्लंडचा राजा किंवा राणी प्रॉटेस्टंट पंथीय असले पाहिजेत आणि त्यांनी पार्लमेंटच्या संमतीखेरीज कायदे रद्द किंवा कायम करू नयेत, असे बंधन घालण्यात आले. लोकांना भाषणस्वातंत्र्याची हमी देण्यात आली आणि त्यांच्या गाऱ्हाण्यांना वाचा फोडण्याचे अभिवचनही मिळाले. राजाने प्रसंगोपात्त पार्लमेंटचा सल्ला घ्यावा, पार्लमेंटच्या संमतिविना कर बसवू नयेत, दंड करू नये व खडी फौजही ठेवू नये असे नमूद करण्यात आले. या विधेयकाने लोकांना आपले प्रतिनिधी पार्लमेंटमध्ये पाठविण्याचा अधिकार दिला आणि लोकशाहीची निकोप वाढ व्हावी म्हणून वारंवार पार्लमेंटची सभा घेण्याचे राजाला आवाहनही केले.

यांतील अनेक तत्त्वे यापूर्वीच्या मॅग्ना कार्टात ग्रथीत होती, पण कालौघात त्यांची विस्मृती झाली होती. त्यामुळे या कायद्यात ती पुन्हा संग्रहीत करण्यात आली. हे विधेयक पक्षोपपक्षांचे मतभेद बाजूला ठेवून देशहितासाठी सर्वानुमते संमत करण्यात आले. हे त्याचे आणखी एक वैशिष्ट्य होय. थोडक्यात, या क्रांतीने पार्लमेंटचे वर्चस्व प्रस्थापित करून राज्यघटनेचा मूलभूत पाया निश्चित केला आणि इंग्लंडची राजसत्ता ही लोकसत्तेवर आधारित आहे, हे पुन्हा स्पष्ट केले. राजा आणि पार्लमेंट यांच्यात सु. ६० वर्षे चाललेल्या दीर्घ कलहाचा निकाल या क्रांतीमुळे लागला आणि लोकमताविरुद्ध जाणाऱ्या राजास बाजूला सारण्याचे हक्क लोकांना–पार्लमेंटला–आहेत, हे पुन्हा सिद्ध झाले. त्यामुळे इंग्लंडमध्ये घटनात्मक नियंत्रित राजेशाही अस्तित्वात आली. इंग्लंडची रक्तहीन राज्यक्रांती १८ व्या शतकातील अमेरिकन व फ्रेंच राज्यक्रांतीलाही प्रेरणादायी ठरली.

पहा : ग्रेट ब्रिटन.

संदर्भ : 1. Dicey, A. V. The Law of the constitution, New York, 1960.

2. Halliday, F. E. Concise History of England, London, 1964.

3. Keir, David Lindsay, The Constitutional History of Modern Britain since 1485, Oxford, 1964.

4. Maurois, Andre, Trans. A History of England, New York, 1960.

5. Western, J. R. Monarchy and the Revolution : The English State in the 1680, London, 1985.

राव, व. दी.