गझनी घराणे : (गझ्नवी घराणे) भारतात कायमच्या मुसलमानी सत्तेची सुरुवात करणारा पहिला तुर्की वंश. यास यमिनी वंश असेही म्हणतात. या वंशाच्या मूळ संस्थापकाचे नाव अलप्तगीन. अलप्तगीननंतर इसहाक इब्राहीम (९६३–६६), बल्कातिगीन (९६६–७२) व पीराई (९७२–७७) हे तीन राजे गादीवर आले पण त्यांच्या कारकीर्दी फारशा महत्त्वाच्या ठरल्या नाहीत. पीराईनंतर गादीवर आलेल्या सबक्तगीनाने (९७७–९७) पंजाबचा राजा जयपाल याचा पराभव करून आपली सरहद्द दक्षिणेकडे सिंधू नदीपर्यंत वाढविली. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा इस्माईल (९९७–९८) गादीवर आला. नंतर स्वतःच्या भावाशी भांडून गादीवर आलेला सुलतान महंमूद (९९८–१०३०) यास या वंशातील सर्वांत कर्तबगार सुलतान समजतात. त्याने हिंदुस्थानवर सतरा स्वाऱ्या करून अगणित लूट नेली सोमनाथाचे पवित्र मंदीर उद्ध्वस्त केले. लुटारू म्हणून ख्यातनाम पावलेला महंमूद विद्येचा आणि कलेचा मोठा भोक्ता होता. जगातील प्रसिद्ध राजांत त्याची गणना होते. महंमूदानंतर गझ्नवी घराण्याला उतरती कळा लागली. महंमूद, पहिला मसूद (१०३०–४०), मवद्दद (१०४०–४९), दुसरा मसूद, अली, अब्दुर्रशीद, फर्रूखझाद, इब्राहीम (१०४९–९९), तिसरा मसूद (१०९९–१११५), शीरझाद, अर्सलान बहराम (१११६–५२), खुस्त्रवशाह (११५२–६८), खुस्त्रवमलिक (११६८–८६) हे सुलतान झाले, पण ते केवळ नामधारी होते. शेवटचा राजा खुस्त्रवमलिक यास शिहाबुद्दीन मुहम्मद घोरीने ठार मारून आपल्या वंशाची स्थापना केली.

गझनी घराण्यातील राजे निरंकुश होते. त्यांच्या कारकीर्दीत प्रजेवर करांचा बोजा फार व त्यांची वसुली निर्दयतेने होई. सुलतान स्वतः न्याय देण्याचे काम करी. गुप्तहेरखातेही अस्तित्वात होते. टपालाची सोय बहुशः सरकारी कामकाजाकरिताच होती. गझनी घराण्याच्या लष्करात गुलामांचा भरणा असे. सुस्वरूपांना बढतीची संधी मिळे. लष्करात गाझी नावाचे विशेष स्वयंसेवक दल असे. सुलतान स्वतः सैनिकांची पहाणी करी आणि सर्वसाधारण नोंदणीवहीत नोंदलेली नावे तपासी.

महंमूद आणि मसूदच्या काळात गझनी हे सांस्कृतिक केंद्र बनले होते. या काळात इमारती बांधण्याची विशिष्ट पद्धत रूढ झाली. या पद्धतीत संगमरवर व कोरीव सजावटीचा वापर झाला. या काळातील वास्तू आणि कला यांवर भारतीय ज्ञापकांचा परिणाम झालेला दृष्टोत्पत्तीस येतो. या काळात बांधल्या गेलेल्या कालव्यांपैकी बद-इ-महमूदी अस्तित्वात असून त्याचा उपयोग आजही करण्यात येतो. १९५१ मध्ये लष्कर-इ-बाझार या आणखी एका वास्तूचा शोध लागला. सबक्तगीन व महंमूद यांच्या कबरी पाहिल्यावर त्याकाळातील वास्तुकलेची कल्पना येते.

भारतात गझनी राजे आपली सत्ता पंजाबच्या पुढे नेऊ शकले नाहीत. संपत्ती लुटणे व मंदिरांची नासधूस करणे, हेच या घराण्याचे हिंदुस्थानातील कार्य आहे. तरीही याच काळात लाहोर हे इस्लामी संस्कृतीचे केंद्र बनले. याच काळात फार्सी भाषेच्या व सूफी पंथाच्या प्रसारास सुरुवात झाली. गझनी घराण्यापासून इस्लामी सत्ता भारतात मूळ धरू लागली.

संदर्भ : 1. Dowson, John, Ed. The History of India, History of Ghazni, Vols. I &amp II, Calcutta, 1953 and 1954.

          2. Haig, Woleseley, The Cambridge History of India, Delhi, 1958.

          3. Prasad, Ishwari, History of Mediaeval India, Allahabad, 1966.

खोडवे, अच्युत