प्लूटार्क : (इ.स. सु. ४६ ?—सु. १२० ?). प्रसिद्ध ग्रीक इतिहासकार, चरित्रकार, तत्त्वचिंतक व निबंधकार. ग्रीसमधील केरनिआ (बेओशिया) येथे जन्मला. त्याने अथेन्स येथे वक्तृत्वविद्या, तत्त्वज्ञान व गणित ह्यांचे शिक्षण घेतले आणि नीतिशास्त्राचा अभ्यास केला. ग्रीस, इटली, आशिया मायनर, ईजिप्त इ. देशांत त्याने प्रवास केला. रोममध्ये त्याचे काही वर्षे वास्तव्य होते. तेथे त्याने तत्त्वज्ञानावर व्याख्याने दिली. नंतर तो आपल्या गावी परत आला व दंडाधिकारी झाला. पुढे काही दिवस तो हाटाधिकारीही होता. अधूनमधून तो डेल्फाय या गावी जाऊन धार्मिक प्रवचने देत असे. आपल्या गावी त्याने एक विद्यालय स्थापन केले होते. हे सर्व करीत असता, त्याने लेखनाकडे मात्र दुर्लक्ष केले नाही. त्याने लिहिलेली Bioi Paralleloi (इं. शी. पॅरलल लाइव्हज) आणि Ethica वा Moralia (इं. शी. मॉरल्स) हे दोन ग्रंथ प्रसिद्ध असून पहिल्यात तत्कालीन ग्रीक व रोमन व्यक्तींची चरित्रे आहेत तर दुसऱ्यात नीतिशास्त्र, धर्म व इतर संकीर्ण विषयांवर लिहिलेले चिकित्सक निबंध आहेत. प्लूटार्क ग्रीक परंपरेचा पुरस्कर्ता होता. भूतकाळाची थोरवी समजून घेऊन तिचे पुनरुज्जीवन करावे, अशी त्याची धडपड होती. त्याने लिहिलेली चरित्रे प्रसिद्ध असून त्यांचे पहिले इंग्रजी भाषांतर सर टॉमस नॉर्थने १५७९ मध्ये केले. त्या भाषांतराचा शेक्सपिअरने आपल्या नाटकांच्या कथानकांसाठी भरपूर उपयोग केलेला आढळतो. प्लूटार्ककृत चरित्रे एके काळी इतकी उद्‌बोधक वाटली की, इंग्लंडमधील अनेक कर्तबगार पुरुषांनी त्यांचे आलोडन केल्याचे व त्यांच्यावर त्यांचा प्रभाव पडल्याचे आढळते.

संदर्भ : 1. Hutchins, R. M. Ed. Great Books of the Western world : Plutarch, London, 1952.

2. Wardman, Alan, Plutarch’s Lives, Berkeley, 1974.

देशपांडे, सु. र.