हिमलर, हाइन्रिख : (७ ऑक्टोबर १९००–२३ मे १९४५). जर्मन नाझी पुढारी. त्याचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात म्यूनिक येथे झाला. शालेय शिक्षण घेऊन त्याने पहिल्या महायुद्धानंतर कृषी विषयात पदविका मिळविली (१९२०) आणि तत्काळ तो उजव्या विचारसरणीच्या सैनिकीसम हाइन्रिख हिमलरसंघटनांत प्रविष्ट झाला. हिटलरच्या अयशस्वी म्यूनिक (बीअर हाल) आक्रमणात तो सहभागी झाला (१९२३). हिमलरने १९२५ मध्ये नाझी पक्षात प्रवेश केला आणि एका सामान्य कार्य-कर्त्यापासून पक्षाच्या अधिपतिश्रेणीत चढत चढत तो हिटलरचा अंगरक्षक बनला. पुढे हिमलरची संघटनशक्ती व चातुर्य लक्षात घेऊन त्यास १९२६ मध्ये नाझी स्वयंसेवक संघटनेचे(स्टॉर्मट्रूपर्स) प्रमुख नेमण्यात आले. त्याने नाझी पक्षाचा प्रसार-प्रचार वाढवून संघटनेची संख्या ५०,००० केली (१९३३). नाझी स्वयंसेवक संघटनेने केलेल्या दडपशाही व दहशतवादी प्रकारास बहुतांशी तो जबाबदार होता. हिटलर सत्ताधीश झाल्यानंतर हिमलर म्यूनिक पोलीस शाखेचा प्रमुख व नंतर सर्व जर्मन पोलीस शाखांचा मुख्य झाला. १९३६ मध्ये जेव्हा गेस्टापो ही गुप्तहेर संघटना हिमलरच्या नाझी स्वयंसेवक संघटनेत विलीन करण्यात आली, तेव्हा त्याचा अधिकार अनन्यसाधारण असा झाला.त्याने आपल्या हाताखालील संघटनेद्वारा पक्षसभासदांत व इतर जनतेच्या मनात प्रचंड दहशत निर्माण केली. त्याचा ज्यूद्वेष अत्यंत प्रखर होता. ज्यूंचा छळ करण्याचे छळ-छावण्यांसह सर्व मार्ग त्याने अवलंबिले होते. १९४३ च्या ऑगस्टमध्ये हिटलरने त्याची अंतर्गत विभागाचा मंत्री म्हणून नेमणूक केली. १९४४ च्या जुलैनंतर हिमलर सर्व जर्मनीचा जवळजवळ हुकूमशहा बनला. त्याच्या अखत्यारीत गुप्तहेर खाते, अंतर्गत प्रशासन व लष्करी शस्त्रसंभार होता. पक्षात हिटलरच्या खालोखाल त्याचाच अधिकार होता. दुसऱ्या महायुद्धाच्या अंतकाळात तो मनोदैहिक (साइकोसोमॅटिक) व्याधीने हैराण झाला होता. त्यामुळे त्याने शत्रूशी तह करण्याचा प्रयत्न केला. आपल्या मृत्यूच्या आधी हिटलरने त्याला पक्षातून व इतर सर्व महत्त्वाच्या पदांवरून हाकलून दिल्याची घोषणा केली आणि त्यास अटक करण्याची आज्ञा दिली. तेव्हा त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. १९४५ च्या मे महिन्यात ब्रिटिश लष्कराने त्यास अटक केली. युद्ध गुन्हेगार म्हणून हिमलरवर खटला दाखल होण्याआधीच त्याने विष खाऊन ल्यूनबर्ग येथे आत्महत्या केली.

 

संदर्भ : 1. Chris, McNab, The SS : 1923–45, London, 2009.

           2. Peter, Longerich, Heinrich Himmler : A Life, Oxford, 2012.

 

देशपांडे, अरविंद