गुप्तोत्तरकाल : हर्षपूर्वकाल. गुप्त साम्राज्याच्या अवनतीनंतर उत्तर हिंदुस्थानात राजकीय अस्थिरता निर्माण झाली व अनेक लहानमोठे राजवंश सत्ता गाजवू लागले. तथापि एकही स्थिर राज्य निर्माण झाले नाही. मात्र या शंभर वर्षांच्या अस्थिर कालावधीनंतर हर्षवर्धन हा बलवत्तर राजा उत्तर हिंदुस्थानात निर्माण झाला. या ५०० ते ६०६ दरम्यानच्या संक्रमणकाळास स्थूलमानाने गुप्तोत्तरकाल किंवा हर्षपूर्वकाल ही संज्ञा देण्यात येते.

स्कंदगुप्ताचे ४६७ च्या सुमारास निधन झाल्यावर गुप्त साम्राज्याला उतरती कळा लागली आणि त्या राजवंशात गृहकलह सुरू झाला. पुढे लवकरच हूणांची पुन्हा टोळधाड येऊन तिने पंजाबपासून मध्य भारतापर्यंत सर्व प्रदेश पादाक्रांत केला. त्यामुळे गुप्त साम्राज्य खिळखिळे झाले. गुप्तांचा शेवटचा कोरीव लेख ५४३ चा बंगालमधील आहे. त्यातील गुप्त राजाचे नाव नष्ट झाले आहे. पण त्या पूर्वी पन्नास-पाऊणशे वर्षे गुप्त साम्राज्यातील अनेक प्रदेश स्वतंत्र होऊ लागले होते. त्यांची माहिती पुढीलप्रमाणे :

वलभीचे मैत्रक : स्कंदगुप्ताच्या निधनानंतर लवकरच सेनापती भटार्क याने ४७० च्या सुमारास काठेवाडात आपले राज्य स्थापून वलभी ही आपली राजधानी केली. त्याला चार पुत्र होते. ते एकामागून एक गादीवर बसले. सर्वांत वडील मुलगा धरसेन याने पित्याप्रमाणेच सेनापती पदवी धारण केली. पण त्यानंतर गादीवर आलेल्या द्रोणसिंहाने ती पदवी टाकून महाराज ही पदवी धारण केली. त्याच्या कारकीर्दीच्या आरंभी मैत्रकांचे सामर्थ्य इतके वाढले, की स्वतः गुप्त सम्राटाने त्याला राज्याभिषेक केला, असे मैत्रकांच्या ताम्रपटात म्हटले आहे. त्यानंतर गादीवर आलेल्या ध्रुवसेन व धरपट्ट यांनीही तीच पदवी घेतली. ते स्वतःचे वर्णन परमभट्टारक पादानुध्यात (सम्राटाच्या पायांचे चिंतन करणारे) असे करीत. त्यावरून ते वरकरणी गुप्तांचे स्वामित्व कबूल करीत होते असे दिसते पण धरपट्टाचा पुत्र गुहसेन याने तेही पूर्णपणे झुगारून देऊन आपले स्वातंत्र्य जाहीर केले. त्याचा पुत्र द्वितीय धरसेन आणि नातू शीलादित्य धर्मादित्य (सु. ६०५ ते ६१५) यांच्या कारकीर्दीत मैत्रकांची सत्ता वाढत गेली. हा धर्मादित्य आपल्या बिरुदाप्रमाणे धार्मिक प्रवृत्तीचा थोर राजा होऊन गेला. त्याचा उल्लेख ह्युएनत्संगने केला आहे.

राजपुतान्यातील गुर्जर : सहाव्या शतकाच्या उत्तरार्धात राजपुतान्यात जोधपूरजवळ गुर्जरांनी आपले राज्य स्थापिले. तेव्हा त्या प्रदेशाला गुर्जरत्रा असे नाव पडले. या वंशाचा मूळ पुरुष हरिश्चंद्र हा वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मण होता. त्याने हूणांचे आक्रमण आणि यशोधर्म्याच्या स्वाऱ्या यांनी उत्पन्न झालेल्या अस्थिर राजकीय परिस्थितीचा फायदा घेऊन राजपुतान्यात आपले राज्य स्थापिले. त्याला ब्राह्मण आणि क्षत्रिय अशा दोन ज्ञातीतील स्त्रिया होत्या. क्षत्रिय स्त्रीपासून त्याला भोगभट, कक्क, रज्जिल आणि दद्द असे चार पुत्र झाले. त्यांनी जोधपूरजवळचा प्रदेश काबीज करून मांडव्यपूर (जोधपूरपासून आठ किमी.वरचे मंदोर) येथे आपली राजधानी केली. रज्जिलानंतर नरभट व त्यानंतर पहिला नागभट यांनी राज्य केले. नागभटाने मेडन्तक (जोधपूरच्या ईशान्येस ११२ किमी.वरचे मेर्त) ही आपली राजधानी केली. हर्षाचा पिता प्रभाकरवर्धन याने या गुर्जरांवर विजय मिळविला होता. सर्वांत धाकटा मुलगा दद्द यांच्या वंशजांनी पुढे गुजरातेत नांदीपुरी (भडोच जिल्ह्यातील नांदोद) येथे स्वतंत्र राज्य स्थापिले. त्यानंतर त्या प्रदेशाला गुजरात हे नाव पडले. त्याचे पूर्वीचे नाव लाट होते.

कलचुरी : कलचुरी नृपती कृष्णराज याने ५५० च्या सुमारास माहिष्मती (पूर्वीच्या इंदूर संस्थानातील महेश्वर) येथे आपली राजधानी करून मध्य भारत, गुजरात, महाराष्ट्र व विदर्भ या प्रदेशांवर आपली सत्ता पसरविली. याचा नातू बुद्धराज (सु. ६००–६२०) हा या सर्व प्रदेशांवर राज्य करीत होता. पुढे दुसऱ्या पुलकेशीने त्याचा उच्छेद करून आपले साम्राज्य उत्तरेस नर्मदेपर्यंत पसरविले. उत्तरेस त्याने गुर्जरांची सामन्त म्हणून स्थापना केली.

मगध व उत्तर प्रदेशातील मौखरी : पाचव्या शतकाच्या प्रथमार्धात गया जिल्ह्यात एक मौखरी सामन्त घराणे उदयास आले. त्याचा मूळ पुरुष यज्ञवर्मन याने गुप्तांचे स्वामित्व कबूल केले असावे पण पुढे त्याचा नातू अनन्तवर्मन याच्या लेखात कोणत्याही गुप्त सम्राटाचा नामनिर्देश नाही. त्यामुळे हे मौखरी राजे वस्तुतः स्वतंत्र होते, असे दिसते. या मौखरी घराण्याचा पुढील इतिहास उपलब्ध नाही.

उत्तर प्रदेशातील कनौज येथील दुसरे मौखरी घराणे जास्त प्रसिद्ध आहे. प्राचीन इतिहासातील याची कामगिरीही महत्त्वाची आहे. या घराण्यातील ज्ञात राजे येणेप्रमाणे : हरिवर्मन, आदित्यवर्मन, ईश्वरवर्मन, ईशानवर्मन, शर्ववर्मन, अवन्तिवर्मन आणि ग्रहवर्मन. पहिल्या तीन राजांची पदवी महाराज होती. त्यावरून त्यांचे राज्य विस्तृत नसावे. सहाव्या शतकाच्या पूर्वार्धातील अस्थिर परिस्थितीचा फायदा घेऊन यांनी आपले राज्य स्थापलेले दिसते. ईशानवर्मन याने आंध्र, शूलिक (ओरिसातील शुल्की) आणि गौड या राजांचा पराभव करून आपले सामर्थ्य वाढविले. त्याचा ५५४ चा शिलालेख उत्तर प्रदेशात हराहा येथे सापडला आहे. त्याने महाराजाधिराज ही पदवी प्रथम धारण केली, ती त्याच्या नंतर शर्ववर्मन व अवन्तिवर्मन यांनी पुढे चालविली. शर्ववर्मन याने हूणांच्या टोळधाडीपासून उत्तर भारताचे संरक्षण केले. या त्याच्या महनीय कामगिरीचा उल्लेख, त्याचे शत्रू उत्तरकालीन गुप्त यांच्याही लेखांत आढळतो. अवन्तिवर्मन हा हर्षाचा पिता प्रभाकरवर्धन याचा समकालीन होता. त्याचे राज्य उत्तर प्रदेशावर पसरले होते. त्याची प्रशंसा बाणाने आपल्या हर्षचरितात केली आहे. त्याच्या निधनानंतर प्रभाकरवर्धनाने त्याचा पुत्र ग्रहवर्मन याला आपली कन्या राज्यश्री देऊन मौखरी घराण्याशी संबंध जोडला.

उत्तरकालीन गुप्त : मौखरीप्रमाणे हेही आरंभी गुप्त सम्राटांचे मांडलिक असावेत. यांचा नक्की कोठे उदय झाला, हा प्रश्न वादग्रस्त आहे. तथापि हे आरंभी पूर्व माळव्यात राज्य करीत असावेत. गयेजवळ अफसड येथे या वंशाचा शिलालेख सापडला आहे. त्यात खालील राजनामे आली आहेत: कृष्णगुप्त, हर्षगुप्त, जीवितगुप्त, कुमारगुप्त, दामोदरगुप्त, महासेनगुप्त, माधवगुप्त आणि आदित्यसेन. या राजांपैकी कुमारगुप्त आणि दामोदरगुप्त यांची मौखरी नृपती ईशानवर्मन आणि शर्ववर्मन यांच्याशी युद्धे झाली होती. महासेनगुप्ताने मगध देश जिंकून आसामचा राजा सुस्थितवर्मन याचा पराभव केला होता. हर्षाचा पिता प्रभाकरवर्धन याने महासेनगुप्ताचा पराजय केल्यावर त्याने आपले दोन पुत्र कुमारगुप्त आणि माधवगुप्त यांना स्थानेश्वरास राज्यवर्धन आणि हर्ष यांचे सेवक म्हणून पाठविले होते. नंतर मालव देशात क्रांती होऊन देवगुप्ताने गादी बळकावली, असे हर्षचरित  व हर्षाचे कोरीव लेख त्यांवरून दिसते. पुढे हर्षाने मगध जिंकल्यावर तेथे माधवगुप्ताची स्थापना केली असावी.


दशपूरचे औलिकर : उज्जयिनीच्या उत्तरेस दशपूर नामक (सध्याचे मंदसोर) प्राचीन नगर आहे. तेथे गुप्तांचे औलिकरनामक मांडलिक घराणे राज्य करीत होते. त्याची वंशावळ अशी : जयवर्मन →सिंहवर्मन → नरवर्मन → विश्ववर्मन → बंधुवर्मन प्रभाकर → आदित्यवर्मन →द्रव्यवर्धन → यशोधर्मन ऊर्फ विष्णुवर्धन. बंधुवर्मन यापूर्वीचे राजे बरेच प्रबळ होते असे दिसते. त्यांच्या लेखांत गुप्त सम्राटांचा नामनिर्देश नाही. बंधुवर्मनने प्रथम कुमारगुप्ताचे स्वामित्व कबूल केले. पुढे गुप्तांच्या अवनत दशेत आदित्यवर्मनाने उज्जयिनी काबीज करून तेथे आपली राजधानी नेली आणि दशपूर येथे एक मांडलिक घराणे स्थापन केले. नंतर ⇨यशोधर्मनने दशपूर येथे हूण नृपती मिहिरकुल याचा पराजय करून उत्तर भारतात विशाल राज्य स्थापिले पण त्याच्या निधनानंतर ते नष्ट झाले व कलचुरी नृपती कृष्णराज याने ५५० च्या सुमारास उज्जयिनी येथे आपला अंमल प्रस्थापित केला.

मध्य भारतातील परिव्राजक व उच्चकल्प राजे : हे प्रथम गुप्तांचे मांडलिक होते. यांचे काही ताम्रपट मध्य भारतात पूर्वीच्या नागोद संस्थानात सापडले आहेत. त्यांत गुप्त संवत् १७४ ते २१४ (४९४ ते ५३४) या वर्षांचा उल्लेख आहे. पण तत्कालीन गुप्तसम्राटांचा नामनिर्देश नाही. तेव्हा हे राजे वरकरणी गुप्तांचे मांडलिकत्व कबूल करीत असले, तरी वस्तुतः स्वतंत्रच होते. त्यांतील काहींनी तर वाकाटकांचे सार्वभौमत्व स्वीकारले होते.

बंगालचा शशांक : ५४३ नंतर गुप्तांचे लेख बंगालमध्ये सापडत नाहीत. उत्तरकालीन गुप्त नृपती महासेनगुप्त याने सहाव्या शतकाच्या अखेरीस बंगालवर आक्रमण केले असावे. पण त्याला निश्चित प्रमाण नाही. त्यानंतर लवकरच बंगालच्या शशांकनामक राजाने दंडभुक्ती, उत्कल आणि कोंगोद हे प्रदेश जिंकून गौड देशात आपले राज्य स्थापले. त्याची राजधानी कर्णसुवर्ण (मुर्शिदाबाद जिल्ह्यातील रांगामाती) येथे होती. पुढे शशांकाने कनौजवर चाल करून हर्षाचा वडीलभाऊ राज्यवर्धन यास विश्वासघाताने ठार मारल्याचे हर्षचरितात वर्णिले आहे.

कामरूपचे नरकवंशी : कामरूप (आसाम) मधील नरकासुराच्या वंशातील राजा समुद्रगुप्ताचा मांडलिक झाला होता. तेव्हापासून तेथे गुप्त संवत् प्रचलित झाला. ५५० च्या सुमारास गुप्त साम्राज्याच्या अखेरीस कामरूपात महाराजाधिराज भूतिवर्मनने अश्वमेध करून आपले स्वातंत्र्य जाहीर केले. नंतर चंद्रमुखवर्मन, स्थितवर्मन, सुस्थितवर्मन हे राजे झाले. सातव्या शतकाच्या आरंभी सुस्थितवर्मनचा पुत्र भास्करवर्मन गादीवर आला. त्याने हंसवेगनामक आपल्या दूतास पाठवून हर्षाला मैत्रीची विनंती केली होती, असे हर्षाच्या चरित्रात वर्णन आहे.

स्थानेश्वरचे वर्धन : हर्षाच्या लेखांत त्याच्या पूर्वजांची नरवर्धन, राज्यवर्धन, आदित्यवर्धन आणि प्रभाकरवर्धन अशी नावे आली आहेत. त्यांतील पहिल्या तिघांची पदवी महाराज अशी साधी असल्याने त्यांचा राज्यविस्तार मोठा नसावा. यशेधर्मनाच्या मृत्युनंतर प्राप्त झालेल्या संधीचा फायदा घेऊन प्रभाकरवर्धनाने उत्तर, दक्षिण आणि पश्चिम दिशांस आक्रमण केले आणि अनेक विजय संपादन केले. त्यांचे आलंकारिक वर्णन हर्षचरितात आले आहे. त्याने पश्चिमेच्या सिंधू देशाच्या राजाचा आणि राजपुतान्यातील गुर्जर राजाचा, तसेच दक्षिणेकडील लाट (दक्षिण गुजरात) आणि मालव या देशांच्या राजांचा आणि उत्तरेकडील पेशावरजवळच्या गांधार देशाच्या राजांचा पराभव करून आपला दरारा सर्वत्र बसविला. त्याने महाराजाधिराज ही पदवी धारण केली. पूर्वेच्या मौखरींशी त्याचे संबंध स्नेहाचेच होते. त्या दोघांनी मिळून रानटी हूण टोळ्यांच्या आक्रमणास प्रतिबंध केला होता. ही राजकीय मैत्री दृढ करण्याकरिता त्याने आपली कन्या राज्यश्री मौखरीकुमार ग्रहवर्मन यास देऊन त्यांचा विवाह स्थानेश्वर येथे मोठ्या थाटाने साजरा केला.

प्रभाकरवर्धनाने आपला वडीलपुत्र राज्यवर्धन यास उत्तरेत हूणांचे आक्रमण थोपवून धरण्याकरिता पाठविले होते. धाकटा मुलगा हर्ष शिकारीकरिता हिमालयाच्या परिसरात गेला होता. त्याचवेळी प्रभाकरवर्धन आजारी पडला. हर्ष लागलीच राजधानीस परतला आणि त्याने राज्यवर्धनास आणण्याकरिता जासूद पाठविले. त्या दुखण्यात प्रभाकरवर्धनाचा अंत झाला. राज्यवर्धन परत आल्यावर हर्षाच्या विनंतीप्रमाणे गादीवर बसण्याचे अव्हेरून त्याने वनात जाण्याची तयारी केली. इतक्यात बातमी आली, की मालव राजाने कनौजवर स्वारी करून ग्रहवर्मनास ठार मारले आणि राज्यश्रीस बंदीत टाकले. ही हृदयद्रावक वार्ता ऐकताच राज्यवर्धनाचा क्रोध उफाळला. त्याने दहा हजार घोडेस्वार घेऊन मालव राजाच्या शासनाकरिता प्रयाण केले. या मालवराजाचे नाव हर्षचरितात आले नाही. पण हर्षाच्या लेखात ते देवगुप्त असे दिले आहे. राज्यवर्धनाने त्याचा पराभव करून त्याची लष्करी सामग्री हस्तगत केली. तितक्यात गौडाधिप शशांक मालव राजाच्या मदतीस येत होता. त्याने राज्यवर्धनास संधीकरिता भेटण्यास बोलाविले आणि तो एकटा व निःशस्त्र असताना त्याचा विश्वासघाताने वध केला. ⇨हर्षवर्धनाच्या राज्यारोहणप्रसंगी उत्तर भारतात अशी राजकीय परिस्थिती होती. देशात अनेक लहान लहान राज्ये उत्पन्न झाली असून त्यांची नेहमी परस्परांत युद्धे चालत. कोणी दुष्ट वर्तन केल्यास त्यास शासन करण्याचे सामर्थ्य इतरांत नव्हते. त्यामुळे राज्यवर्धनाच्या वधासारखे अधम कृत्य करताना शशांकाला भीती वाटली नाही. भारतात केंद्रसत्ताच नसल्याने हूणांच्या वरचेवर होणाऱ्या टोळधाडीचा प्रतिकार करणे कठीण जात असे. म्हणून गौडाधिपाचे पारिपत्य करण्याचे हर्षाने जाहीर करताच, त्याचा वृद्ध आणि अनुभवी सेनापती सिंहनाद याने त्याला म्हटले, “ हा एका गौडाधिपाचा प्रश्न नाही. तू आता अशी परिस्थिती निर्माण कर, की इतःपर असे अधम कृत्य करण्यास कोणीही धजणार नाही.” हर्षास ते मान्य होऊन त्याने सर्व देशांच्या अधिपतींस आपणापुढे नम्र होण्याचे किंवा युद्धास सज्ज होण्याचे आव्हान दिले होते.

सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती : गुप्तोत्तरकाळ हा सु. शंभर वर्षांचा संक्रमणकाळ होय. यातील सामाजिक वा आर्थिक परिस्थिती वर्णन करण्यास तत्कालीन साधने उपलब्ध नाहीत. कोरीव लेखांत फक्त राजांच्या वंशावळी आणि त्यांच्या विजयांचे वर्णन येते. या काळात कोणी परदेशी प्रवासीही भारतात आला नव्हता. तेव्हा त्याच्या प्रवासवृत्ताचे साधनही उपलब्ध नाही. तथापि सामान्यतः गुप्तकाळातील परिस्थितीच या काळातही चालू होती, असे मानण्यास हरकत नाही.

ह्युएनत्संग हर्षाच्या वेळी भारतात आला. त्याने कनौजचे जे वर्णन लिहून ठेवले आहे ते हर्षकाळातील असले, तरी त्यापूर्वीच्या मौखरींच्या काळालाही ते तितकेच लागू पडते. तो लिहितो, ‘कनौज गंगेच्या पूर्व किनाऱ्यावर वसले असून त्याची लांबी सु. आठ किमी. आणि रुंदी दोन किमी. आहे. त्याची तटबंदी भक्कम असून त्यात सर्वत्र उत्तुंग वाडे आहेत. नगरात सुंदर उद्याने आणि निर्मल जलाचे तलाव आहेत. लोक सुखी असून कित्येक कुटुंबे तर समृद्ध स्थितीत आहेत. फळे आणि फुले मुबलक आहेत. लोक सुसंस्कृत दिसतात आणि ते तलम रेशमी वस्त्रे धारण करतात. ते विद्या आणि कला यांत निपुण असून त्यांचे भाषण स्पष्ट व सूचक असते.’ मौखरींच्या काळात कनौजला महत्त्व प्राप्त होऊन त्याची भरभराट झाली होती. गुप्तोत्तरकाळातील उज्जयिनी, दशपूर, प्राग्ज्योतिषपूर इ. राजधानींच्या नगरांनाही हे वर्णन लागू पडेल.

गुप्तोत्तरकाळात अशांततेमुळे राज्यांची आर्थिक स्थिती मात्र खालावली असावी. तिचे प्रतिबिंब तत्कालीन मौखरींच्या नाण्यांत दिसते. गुप्तांच्या बरोबर सोन्याची नाणीही नष्ट झाली. गुप्तोत्तरकाळात यशोधर्मनसारख्या जगज्जेत्या राजांनीही तशी–किंबहुना कोणतीही–नाणी पाडल्याचे माहीत नाही. मौखरींनी गुप्तांच्या चांदीच्या नाण्यांचे अनुकरण करून काही नाणी पाडली पण त्यांची घडण निकृष्ट प्रकारची आहे. त्यांचेच अनुकरण हूण तोरमाणाने केले. मिहिरकुलाने ‘जयतुवृषः’ असा लेख असलेली तांब्याची नाणी पाडली होती. विशेष उल्लेखनीय गोष्ट ही, की बंगालच्या शशांक राजाने ९·३ ग्रॅ. वजनाची सोन्याची नाणी पाडली होती. त्यांच्या पुढील बाजूंवर वृषभारूढ शिव आणि त्याच्या उजव्या बाजूस राजनामद्योतक पूर्णचंद्र आणि मागील बाजूंवर लक्ष्मी आणि श्री शशांक असे लेखही दिसतात. ही नाणी शशांकाच्या राज्याच्या भरभराटीची द्योतक आहेत.


धर्म आणि पंथ : गुप्तकाळात बौद्ध धर्माचा राजाश्रय नष्ट झाल्यामुळे जनतेतील त्याचा प्रभाव कमी होऊ लागला होता. तीच परिस्थिती गुप्तोत्तरकाळात चालू राहून काही प्रदेशांतून बौद्ध धर्म जवळजवळ पूर्णपणे नष्ट झाला होता. भारताच्या ईशान्य प्रदेशात ह्युएनत्संगला सर्वत्र शेकडो स्तूप व विहार उद्ध्वस्त स्थितीत आढळले. वायव्य भागात हूणांच्या अत्याचारांनी तीच परिस्थिती उत्पन्न झाली होती. ६२० च्या सुमारास चिनी प्रवासी ह्युएनत्संग हा गांधार देशात गेला होता. त्याने त्या देशाच्या राजाचे वर्णन केले आहे. तो म्हणतो, ‘हा राजा स्वभावाने क्रूर व खुनशी आहे. त्याची बुद्धावर मुळीच श्रद्धा नाही. तो दानवांची उपासना करतो. त्याने बौद्धांचा अनन्वित छळ केला आहे.’ हे वर्णन हूणवंशी मिहिरकुलाला लागू पडते. तो स्वतः शिवोपासक होता. यशोधर्मनाच्या मंदसोर येथील स्तंभलेखात म्हटले आहे, की त्याने भगवान शंकराशिवाय दुसऱ्या कोणापुढेही आपली मान लवविली नव्हती. त्याची नंदीछापाची नाणी प्रसिद्ध आहेत. काही कारणाने त्याचा बौद्ध धर्माबद्दलचा द्वेष एवढ्या पराकोटीला गेला होता, की त्याने आपल्या राज्यातील सर्व बौद्ध विहार उद्‌ध्वस्त करण्याची आज्ञा केली होती. बौद्ध विहार हे बौद्ध धर्माच्या प्रसाराचे प्रभावी साधन असे. तेच उद्ध्वस्त झाल्यामुळे त्या प्रदेशात बौद्ध धर्माच्या ऱ्हासाला आरंभ झाला असल्यास नवल नाही. बंगालचा शशांक हाही शिवोपासक असून बौद्ध धर्मद्वेष्टा होता. त्याने गयेतील पवित्र बोधिवृक्ष तोडून टाकून त्याची पाळेमुळे खणून काढली होती आणि ती जाळून टाकली होती. तथापि काही ठिकाणी, उदा., काठेवाडातील वलभी आणि उत्तर प्रदेशातील कनौज या ठिकाणी, बौद्ध धर्म भरभराटीत होता. मैत्रक राजांचे अनेक ताम्रपट बौद्ध विहारांना दिलेल्या दानांविषयीचे आहेत. ह्युएनत्संग सांगतो, की कनौज देशात १०० बौद्ध विहार असून त्यात दहा हजार हीनयान आणि महायान पंथांचे भिक्षू राहतात.

या काळात हिंदू धर्माचा पूर्वीप्रमाणे प्रसार चालू राहिला. विष्णू, शिव, सूर्य इ. देवतांची नवीन देवालये बांधण्यात आली व जुन्यांचा जीर्णोद्धार झाला. त्यांचा उल्लेख काही कोरीव लेखांत येतो. ह्युएनत्संग सांगतो, की कनौजच्या परिसरात २०० हिंदू देवतांची मंदिरे असून त्यांच्या उपासकांची संख्या कित्येक हजार आहे.

सांस्कृतिक स्थिती : गुप्तोत्तरकाळात राजकीय परिस्थिती अस्थिर होती, तरी सांस्कृतिक प्रगती खुंटली नव्हती. वलभीच्या विद्यापीठाला मैत्रक राजांचा उदार आश्रय होता. नालंदा येथील विद्यापीठ याच काळात भरभराटले. त्याला या काळातील गुप्त, मौखरी व नरकवंशी राजांनी उदार देणग्या दिल्या होत्या. त्यांतून तेथील विहार, स्तूप व चैत्य मंदिरे बांधली गेली होती. या राजांच्या कित्येक मुद्रा नालंदाला सापडल्या आहेत. त्यांवरून तत्कालीन इतिहास काहीसा ज्ञात झाला आहे. याशिवाय ठिकठिकाणी गुरुकुले व ऋषिमुनींचे आश्रम यांतून अध्ययन, अध्यापन व चर्चा चाले. विंध्यपर्वतातील अशा एका आश्रमाचे हुबेहुब वर्णन बाणाने हर्षचरितात केले आहे. त्याचा अध्यक्ष दिवाकरमित्रनामक बौद्ध आचार्य होता. तथापि त्या आश्रमात सांख्य, भागवत, लोकायत, वैशेषिक, वेदान्त इ. तत्त्वज्ञानांची चर्चा चालत असे. मीमांसा, धर्मशास्त्रे, पुराणे, व्याकरण, शैवादी पंथांचे ग्रंथ यांचेही अध्ययन-अध्यापन होई त्याप्रमाणेच जातक, अभिधर्मकोश  इ. बौद्ध वाङ्‌मयाचे व तत्त्वज्ञानविषयांचेही परिशीलन होत होते.

या काळातील वाङ्‌मयनिष्पत्तीविषयी फारशी माहिती नाही. तथापि विशाखदत्ताचे मुद्राराक्षस  आणि देवी चंद्रगुप्त  ही संस्कृत नाटके या काळात लिहिली गेली, असे काही विद्वानांचे मत आहे. नाटकांच्या भरतवाक्यांत पुष्कळदा तत्कालीन राजांचा उल्लेख असतो. मुद्राराक्षसाच्या भरतवाक्यात म्लेच्छ (हूण) शत्रूंपासून देशाचे रक्षण करणाऱ्या तत्कालीन राजाला प्रलयप्रसंगी आपल्या दाताने सागरातून पृथ्वीला वर उचलणाऱ्या वराह अवताराची उपमा दिली आहे. त्या श्लोकाच्या द्वितीयार्धाचा एक पाठ असा :

म्लेच्छैरुद्विज्यमाना भुजयुगमधुना संश्रिता राजमूर्तेः ।

स श्रीमद्बन्धुभृत्यश्चिरमवतु महीं पार्थिवो ऽवन्तिवर्मा ॥

यात वर्णिलेला अवन्तिवर्मा हा मौखरी वंशाचा तन्नामक सुप्रसिद्ध राजा होय, असे काही विद्वानांचे मत आहे. हा पाठ स्वीकारल्यास वरील दोन नाटकांचा कर्ता विशाखदत्त हा या काळात होऊन गेला, असे मानावे लागेल.

संदर्भ : Majumdar, R.C. Ed. The Classical Age, Bombay, 1970.

मिराशी, वा. वि.