जमखंडी संस्थान : ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील मुंबई इलाख्यातील दक्षिणेकडील एक संस्थान. क्षेत्रफळ सु. १,४२० चौ. किमी. लोकसंख्या सव्वा लाख (१९४१). जमखंडी, बिद्री आणि कुंदगोळ हे तालुके त्यात समाविष्ट होते. संस्थानचा प्रदेश सलग नव्हता. पेशव्यांनी पटवर्धन कुटुंबास दिलेल्या सरंजामातील हे एक संस्थान असून परशुरामभाऊ पटवर्धनांच्या जहागिरीची १८०८ मध्ये वाटणी झाली. त्यांचा मुलगा रामचंद्रपंत हा या संस्थानचा पहिला अधिपती झाला. तेव्हाचे त्याचे उत्पन्न सु. साडेपाच लाख रु. असून त्याबद्दल त्यास १,७२८ स्वार बाळगावे लागत. पेशवाई-अस्तानंतर अधिपती गोपाळराव यांनी इंग्रजांशी तह करून ३०० स्वार बाळगावे व तीस हजारांची त्यांना तैनात मिळावी असे ठरले. १८२१ मध्ये चिंचणी फुटून निघाली. १८४८ मध्ये तासगावला वारस नाही म्हणून ते खालसा झाले. सु. अडीच लाखांवर आलेल्या उत्पन्नापैकी तैनाती फौजेच्या बदल्यात इंग्रजांस संस्थानला २०,५१६ रु. खंडणी द्यावी लागे. गोपाळरावांनंतर दत्तकपुत्र रामचंद्रराव गादीवर आले (१८४०). तेव्हा इंग्रजांनी नजराणाही घेतला. त्यांना अखत्यारी मिळेपर्यंत (१८५३), दत्तक आई व पुढे इंग्रज कारभारीच प्रशासन व्यवस्था पाहात होते. १८५७ च्या उठावात भाग घेतल्याच्या संशयावरून ते वर्षभर प्रतिबंधात होते. रामचंद्रराव व त्यांच्या मृत्यूनंतर गादीवर आलेले (१८९७) दत्तकपुत्र परशुरामभाऊ यांनी संस्थानात अनेक सुधारणा केल्या विशेषतः प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले, त्यामुळे प्रजा शिक्षित झाली. आरोग्य, सरकारी बँक, जनावरांची प्रदर्शने, पाण्याची सोय इ. क्षेत्रांत कामे झाली. प्रजेची गाऱ्हाणी राजा जातीने ऐकत असे. प्रजेला शासनावर टीका करण्याचा अधिकार होता. स्वातंत्र्योत्तर काळात (१९४७) प्रथम ते मुंबई प्रांतात विलीन झाले. पुढे स्वतंत्र म्हैसूर (आता कर्नाटक) प्रांत झाल्यावर त्यामध्ये ते अंतर्भूत केले.

कुलकर्णी, ना. ह.