तुंकू अब्दुल रहमानतुंकू अब्दुल रहमान : (८ फेब्रुवारी १९०३– ). मलेशियाच्या संघराज्याचा पहिला पंतप्रधान व आग्नेय आशियाचा एक मान्यवर नेता. त्याच्या कारकीर्दीत मलाया स्वतंत्र होऊन पुढे त्याचे रूपांतर मलेशियाच्या संघराज्यात झाले व तेथील नवजात स्वातंत्र्य व लोकशाही व्यवस्थेला सुस्थिरता प्राप्त झाली.

आलॉर स्टार येथे जन्म. केडाचा सुलतान अब्दुल हमीद हलिम शाह हे त्याचे वडील. १९२० ते १९३१ पर्यंत इंग्लंडमध्ये शिक्षण घेतल्यानंतर मलायात परत येऊन काही काळ केडाच्या सरकारी नोकरीत तो होता. १९४७ मध्ये पुन्हा इंग्लंडला जाऊन तो १९४९ मध्ये कायद्याची परीक्षा उत्तीर्ण झाला. १९५१ पर्यंत त्याने मलायन फेडरल लीगल डिपार्टमेन्टमध्ये सरकारी वकीलाचे काम केले. नंतर नोकरीचा राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश केला व युनाइटेड मलाया नॅशनल ऑर्गनायझेशनचे अध्यक्षपद मिळविले. अध्यक्ष होताच त्याने प्रथम राष्ट्रीय ऐक्य निर्माण करण्यासाठी मलाया चायनीज असोसिएशन व मलाया इंडियन काँग्रेस या अनुक्रमे चिनी व भारतीय लोकांच्या संघटनांशी युती केली. त्यांच्या संयुक्त आघाडीने १९५५ च्या निवडणुका जिंकल्या व तुंकू अब्दुल रहमान मलायाचा पंतप्रधान झाला. १९५६ मध्ये लंडन येथे वाटाघाटीसाठी गेलेल्या मलायन शिष्टमंडळाचा तो नेता होता. या वाटाघाटी सफल होऊन ऑगस्ट १९५७ मध्ये स्वतंत्र मलाया राष्ट्र अस्तित्वात आले व तुंकू त्याचा पहिला पंतप्रधान झाला. १९७० च्या जून महिन्यात त्याची इस्लामी परिषदेचे महासचिव म्हणून निवड झाल्यानंतर त्याने काही काळाने पंतप्रधानपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला व २२ सप्टेंबर १९७० रोजी तो राजकारणातून निवृत्त झाला. त्याच्या जागी अब्दुल रझाक तुन पंतप्रधानपदावर आला. 

पंतप्रधान या नात्याने तुंकू अब्दुल रहमान याने मलेशियातील मले, चिनी व भारतीय अशा विविध गटांची एकजूट करून एकसंध राष्ट्र बनविण्यासाठी प्रयत्न केले. त्याचप्रमाणे मलायाची राष्ट्रीय सुरक्षितता बाह्य आक्रमणाने व कम्युनिस्ट उठावाने धोक्यात येऊ नये, या उद्देशाने परराष्ट्र धोरण आखले. एप्रिल १९६१ मध्ये त्याने मलाया, थायलड व फिलिपीन्स यांचा ‘असोसिएशन ऑफ साउथ ईस्ट एशिया’ हा गट स्थापन केला, पण उत्तर बोर्नोओच्या प्रश्नावर फिलिपीन्सशी कलह निर्माण झाल्यामुळे तो मोडला. १९६३ मध्ये त्याने याच देशांचा ‘माफिलिंडो’ हा संघ स्थापण्यात पुढाकार घेतला पण हा गटही साबा व सारावाक यांच्या प्रश्नावर फुटला. १९६३-६४ साली सूकार्णो हे इंडोनेशियाचे अध्यक्ष असताना इंडोनेशियाच्या अनाधिकृत आक्रमणालाही त्याला तोंड द्यावे लागले. १९६६ सालापर्यंत हा संघर्ष चालू होता. १९६७ मध्ये इंडोनेशिया, सिंगापूर, थायलंड, फिलिपीन्स या देशांबरोबर त्याने जो संघ स्थापन केला, तो मात्र अधिक यशस्वी ठरला. ही संघटना आर्थिक सहकार्यासाठी आहे.

मलेशिया राष्ट्रकुलाचा सभासद आहे. १९५७ मध्ये तुंकूने इंग्लंडशी संरक्षणाचा करार केला. १९६० मध्ये राष्ट्रकुलातून वर्णवर्चस्ववादी द. आफ्रिकेची हकालपट्टी करण्यात तुंकूने पुढाकार घेतला होता. त्याने भारताबरोबर सतत स्नेहाचे व सहकार्याचे संबंध ठेवण्याचे धोरण ठेवले आणि त्यामुळे १९६५ च्या भारत–पाक संघर्षाचे वेळी पाकिस्तानने मलेशियाची राजनैतिक संबंध तोडले. भारताची मैत्री हा त्याच्या परराष्ट्रीय धोरणाचा महत्वाचा घटक होता.

तिसऱ्या जगाला संपन्न राष्ट्रांविरुद्ध आर्थिक प्रश्नावर जो सामना द्यावा लागला आहे, त्यातही तिसऱ्या जगाचे प्रतिनिधी म्हणून तुंकू अब्दुल रहमान याने भरीव कामगिरी केली. विशेषतः कथिल व रबर या मालांचे उचित भाव मिळावेत, म्हणून तो सतत प्रयत्नशील राहिला.

स्वातंत्र्यानंतरच्या आणीबाणीच्या काळात देशांतर्गत बंडाळी, बाह्य आक्रमण, विविध राष्ट्रीय गटांतील संघर्ष या सर्व आपत्तींतून सुरक्षितपणे राष्ट्राचा गाडा पुढे नेऊन राजकीय स्थैर्य व आर्थिक स्वास्थ्य प्राप्त करून देणारा पंतप्रधान म्हणून मलेशियाच्या आणि विशेषतः आग्नेय आशियाच्या इतिहासात त्याचे स्थान महत्वाचे राहील.

साक्रीकर, दिनकर