फडके, हरिपंत : (? १७२९–२० जून १७९४). उत्तर पेशवाईतील एक मुत्सद्दी व सेनानी. त्यांच्या जन्मतारखेविषयी निश्चित माहिती मिळत नाही. त्यांचे घराणे मूळचे कोकणातील गुहागराचे. येथील दीक्षित–पटवर्धन घराण्यांबरोबर हे घराणे इ. स. १७०० च्या आगेमागे देशावर आले. बाळाजी हरी हे हरिपंतांचे वडील. ते दक्षित-पटवर्धनांकडे काम करीत. ते १७५५ साली वारले. १७६१ पर्यंत हरिपंत दीक्षित-पटवर्धनांकडे सावकारीच्या कामावर कारकून होते. पुढे थोरल्या माधवराव पेशव्याने त्यांना नाना फडणीसांच्या हाताखाली कारकुनीचे काम दिले. हरिपंत स्वकर्तृत्वाने चढत सवाई माधवरावांच्या कारकीर्दीत हुजूरातीत सेनापती बनले. नारायणराव पेशव्याच्या वधप्रसंगी आपल्या हातून निर्णयप्रमाद घडल्याच्या भीतीने ते वधाची बातमी कळताच बारामतीस पळून गेले होते पण पुढे नाना फडणीसांच्या सर्व योजनांत-बारभाईचे कारस्थान, तोतयाचे बंड, मोरोबाचे बंड, रघुनाथरावांचा व खुन्यांचा पाठलाग, टिपूशी युद्ध इत्यादींत हरिपंतांचे बहुमोल साहाय्य लाभले. हरिपंत नाना फडणीसांचे मुख्य सल्लागार होते. कित्येकदा त्यांनी सौम्यपणे नानांच्या चुका दाखविल्या व मतभेद व्यक्त केला. ते खऱ्या अर्थाने मराठी राज्याचे एकनिष्ठ सेवक होते. राज्यहिताची दृष्टी, निःस्वार्थीपणा, निर्भीडपणा, गुणग्राहकता व लोकसंग्रहाची दृष्टी हे त्यांचे विशेष गुण होत. यामुळेच पेशव्यांनी आपले कोकणातील देशमुखी वतन त्यास करून दिले. सिद्धटेक येथे त्यांचे निधन झाले.

सासवडकर, प्र. ल.