सेन घराणे : बंगालमधील एक मध्ययुगीन राजघराणे. त्याच्या मूलस्थानाविषयी तसेच मूळपुरुषाविषयी इतिहासतज्ञांत एकमत नाही. ते स्वतःस कर्नाट-क्षत्रिय, ब्रह्म-क्षत्रिय आणि क्षत्रिय मानत. त्यावरून सेन राजे हे कर्नाटकातून बंगालमध्ये आलेले क्षत्रिय होते. ते बहुधा उत्तरकालीन चालुक्य राजांबरोबर बंगाल, आसाम वगैरे उत्तरेच्या स्वाऱ्यांत येऊन राढा प्रदेशात (पश्चिम बंगालमध्ये) स्थायिक झाले असावेत. पहिला उल्लेखनीय सेन राजा सामंतसेन असून त्याने चालुक्यांच्या बाजूने लढून चोलांपासून राढा सुरक्षित ठेवले. त्याच्यानंतर हेमंतसेन गादीवर आला. त्याचा तत्कालीन लेखात महाराजाधिराज या बिरुदाने उल्लेख आढळतो. त्याचा मुलगा विजयसेन इ. स. १०९५ मध्ये गादीवर आला. विजयसेन हा या वंशातील सर्वश्रेष्ठ राजा असून तो पाल नृपती मदनपालाचा समकालीन होता. त्याने आसाम, मिथिला आणि मगध यांवर स्वाऱ्या केल्या आणि बराच प्रदेश जिंकून घेतला. त्याने शूर घराण्यातील विलासदेवी हिच्याशी विवाह केला. तिच्यापासून त्याला बल्लालसेन (वल्लालसेन) हा मुलगा झाला. विजयसेनाने कलिंगचा राजा अनंतवर्मन चोडगंग याच्याबरोबर मैत्री करून हुगळीपर्यंत राज्यविस्तार केला. एवढेच नव्हे, तर कनौजच्या गाहडवाल राजाविरुद्ध त्याने नाविक मोहीम काढली. देवपार, बराकपोरे आणि पैकोरे येथील कोरीव लेखांत त्याच्या वर्चस्वाखाली गौड, वंग आणि राढा हे प्रदेश असल्याचे स्पष्ट होते. विजयसेनाने बंगालवर आधिपत्य मिळवून शेजारच्या प्रदेशांत दहशत निर्माण केली होती. त्याने अरिराज-वृषभ-शंकर हे बिरुद धारण करून प्रद्युम्नेश्वर शिवाचे मंदिर राजशाही जिल्ह्यात बांधले. त्याच्या दरबारात उमापतिधर हा कवी होता. त्याने देवपारा प्रशस्ती रचली. त्यावरून विजयसेनाच्या चरित्रावर प्रकाश पडतो. त्याच्या विलासदेवी राणीने कनकतुलापुरुष महादाननामक विधी विक्रमपुरा या त्याच्या राजधानीत केला. विजयसेनानंतर त्याचा मुलगा बल्लालसेन सु. ११५८ मध्ये गादीवर आला.

 

बल्लालसेनाने निःशंक-शंकर हे बिरुद धारण केले. हा जसा शूर होता तसा विद्‌वानही होता. त्याने मिथिला पूर्णपणे आपल्या राज्यात खालसा केली. त्याच्या अंमलाखाली वंग, राढा, बाग्‌डी, वरेंद्री व मिथिला हे प्रदेश असून गौडपुरा, विक्रमपुरा आणि सुवर्णग्राम ह्या तीन राजधान्या होत्या. त्याने अनिरुद्ध गुरूच्या मार्गदर्शनाखाली पुराणे आणि स्मृतींचे वाचन केले होते. शिवाय त्याने दानसागर (११६९) नावाचा ग्रंथ लिहिला आणि अद्‌भुतसागर नावाच्या ग्रंथाचे लेखन सुरू केले होते. ते पूर्ण होण्यापूर्वीच त्याचे निधन झाले.

सुमारे ११७८ मध्ये बल्लालसेनाचा पुत्र लक्ष्मणसेन गादीवर आला. त्याने आपला पिता आणि पितामह यांच्या स्वाऱ्यांत भाग घेतला होता. ओरिसावर आक्रमण करून जगन्नाथपुरी येथे त्याने जयस्तंभ उभारला. त्याने कनौजच्या गाहडवालांशी यशस्वी रीतीने सामना देऊन काशी आणि प्रयाग पर्यंत आगेकूच केली. छत्तीसगढातील रत्नपूरच्या कलचूरींचा वैश्य सामंत वल्लभराज याने गौड नृपतीचा पराभव केल्याचे कलचुरींच्या लेखात वर्णन आहे. तो गौड नृपती लक्ष्मणसेनच असावा पण लक्ष्मणसेनाचा आश्रित उमापतिधर या युद्धात लक्ष्मणसेनच विजयी झाल्याचे वर्णन करतो. लक्ष्मणसेनाने अरिराज-मदन-शंकर हे बिरुद धारण केले होते. त्याचे सात ताम्रपट उपलब्ध असून ते त्याच्या राज्यविस्तार व पराक्रमाविषयी माहिती देतात.

याप्रमाणे लक्ष्मणसेनाने दूरदूरच्या प्रदेशांवर स्वाऱ्या केल्या होत्या पण त्याच्या कारकीर्दीचा अंत दुःखपर्यवसायी झाला. मुहम्मद बख्त्यार खिलजी याने प्रथम मगध जिंकून बिहार शरीफ येथील बौद्ध विहार उध्वस्त केला. त्यानंतर तो एकदम नवद्वीप (नडिया) येथे लक्ष्मणसेनाच्या राजवाड्यासमोर आपल्या निवडक घोडेस्वारांसह दाखल झाला. त्या नगरीतील लोकांना ते घोडे विकणारे व्यापारी आहेत असे वाटून ते गाफील राहिले. लक्ष्मणसेन तर त्यावेळी दुपारचे जेवण करीत होता असे म्हणतात. तो गडबडीने पूर्व बंगालमध्ये निसटला आणि तेथे त्याने लक्ष्मणावतीहून (लखनावती) तीन-चार वर्षे राज्य केले. तो सु. १२०७ मध्ये निधन पावला. त्याच्यानंतर त्याचे पुत्र विश्वरूपसेन आणि केशवसेन यांनी काही वर्षे राज्य केले. त्यांच्या अंमलाखाली पूर्व आणि दक्षिण बंगाल होता, असे दिसते.

सेन राजांचा धर्म, विद्या व कला यांना उदार आश्रय होता. विजयसेन व बल्लालसेन हे शिवोपासक, तर लक्ष्मणसेन हा विष्णूपासक होता. या राजांमुळे हिंदू धर्माला बंगालात प्रतिष्ठा लाभली आणि पाल राजांच्या कारकीर्दीत बौद्ध धर्माचे वर्चस्व कमी झाले. सेन राजांचा विद्वानांना आणि कवींना उदार आश्रय होता. गीतगोविंदचा कर्ता जयदेव हा लक्ष्मणसेनाच्या दरबारी होता. त्याशिवाय धोयी, श्रीधरदास, शंकरधर, गोवर्धन आणि हलायुध हेही त्याच्या राजसभेत होते. यांपैकी हलायुध हा त्याचा मुख्यमंत्री होता तर शंकरधर हा युद्धमंत्री होता. लक्ष्मणसेनाला श्रियादेवी, कल्याणदेवी आणि चांद्रादेवी या राण्या व विश्वरूपसेन आणि केशवसेन हे दोन मुलगे होते. स्वतः लक्ष्मणसेन हा चांगला कवी होता. शिवाय त्याने आपल्या पित्याने आरंभिलेला अद्‌भुतसागर हा ज्योतिषग्रंथ पूर्ण केला होता. बल्लालसेन आणि त्याच्या दरबारच्या अनेक कवींचे श्लोक लक्ष्मणसेनाचा महामांडलिक सभाकवी श्रीधरदास याच्या सदुक्तिकर्णामृत (१२०५) या श्लोकसंग्रहात घेतले आहेत. बिहारमध्ये प्रचलित असलेली कालगणना लक्ष्मणसेनाने सुरू केली होती. [⟶ कालगणना, ऐतिहासिक].

लक्ष्मणसेनाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा विश्वरूपसेन बंगालच्या गादीवर आला. त्याने वृषमांक-शंकर हे बिरुद धारण केले. त्याने चौदा वर्षे राज्य केले आणि मुस्लिमांच्या आक्रमणाला पायबंद घालण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्याला कुमारसेन व पुरुषोत्तमसेन असे दोन मुलगे होते तथापि त्याच्यानंतर त्याचा धाकटा भाऊ केशवसेन गादीवर आला. त्याने असह्य-शंकर हे बिरुद धारण केले. मिन्हाजुद्दीनच्या तबकात-इ-नासिरी या ग्रंथामध्ये सेन राजांनी वंग प्रदेशावर इ. स. १२४५ पर्यंत अधिसत्ता गाजविली असल्याचे दिसते. विश्वरूपसेन आणि केशवसेन हे सूर्यभक्त होते.

संदर्भ : Majumdar, R. C. Ed. The Struggle For Empire, Mumbai, 2002.

मिराशी, वा. वि.