दतिया संस्थान : ब्रिटिशांकित हिंदुस्थानच्या मध्य प्रदेश राज्यातील एक संस्थान. क्षेत्रफळ २,३३० चौ. किमी. लोकसंख्या १,७४,०७२ (१९४१). उत्पन्न सु. २० लाख रुपये. सिंद व बेटवा या नद्यांमधील सपाट प्रदेशात हे संस्थान वसले असून ग्वाल्हेर व इतर संस्थानांचे भाग याच प्रदेशात असल्यामुळे संस्थानी प्रदेश बराच विखुरलेला होता. संस्थानची काही खेडी मध्य बुंदेलखंडातही होती. ओर्छाचा राजा वीरसिंगदेव बुंदेल्याने आपला मुलगा भगवानराव याला दतिया ही जहागीर दिली. त्याने संस्थानचा विस्तार मोगलांच्या सनदा मिळवून आणि युद्धे करून केला. भगवानरावाच्या मृत्यूनंतर (१६५६) त्याचा मुलगा शुभकरण गादीवर आला. औरंगजेबाने आपल्या भावांशी केलेल्या संघर्षात त्याने औरंगजेबाची बाजू घेतली. चंपतराय बुंदेल्याविरुद्ध औरंगजेबाला केलेल्या मदतीमुळे शुभकरणाला बुंदेलखंडाची सुभेदारी मिळाली होती. तो १६८३ मध्ये मरण पावला. पुढे चौथा राजा रामचंद्र (१७०६–३३) याच्या मृत्यूनंतर गादीच्या वारसाहक्काबद्दल तंटे सुरू झाले. त्या वेळी ओर्छाच्या राजाचा सल्ला घेण्यात आला. ओर्छाच्या उद्योतसिंगाने रामचंद्राचा नातू इंद्रजीत यास गादीचा वारस ठरविले. या सुमारास मराठ्यांनी चौथाई–सरदेशमुखीच्या वसुलीसाठी बुंदेलखंडावर स्वाऱ्या केल्या. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात चौथाई वसूल करणाऱ्या अनूपगीर गोसावीचे काही काळ प्रभुत्व होते. १८०४ मध्ये सातवा वंशज परीच्छतने इंग्रजांची मांडलिकी पतकरली. ब्रिटिशांनी १८१८ मध्ये संस्थानाच्या सेवेबद्दल सिंद नदीच्या पूर्वेकडील काही प्रदेश (चौरासी इलाखा) व इंद्रगढ किल्ला त्यास दिला. परीच्छत राजाने १८२६ मध्ये विजय बहादुरसिंग (१८३९–५७) हा मुलगा दत्तक घेतला. तो १८३९ मध्ये गादीवर आला, पण निपुत्रिक वारला (१८५७). त्यानंतर गादीवर आलेल्या दत्तकपुत्र भवानीसिंगाविरूद्ध दासीपुत्र अर्जुनसिंगाने केलेली बंडाळी इंग्रजांनी मोडून काढली आणि १८८२ मध्ये बरोनीच्या उपद्रवी ठाकुरांशी त्याचा समझोता करून दिला. भवानीसिंग लहान असल्यामुळे राज्यकारभार विधवा राणी पहात असे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात बेटवा नदीचा कालवा, डाक, रेल्वे, रस्ते अशा काही सुधारणा संस्थानात झाल्या. १९०३ पासून ब्रिटिश नाणी सुरू झाली. भवानीसिंगानंतर राजे गोविंदसिंग बहादुर (१९०७ –  ) गादीवर आले. त्यांनी पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांना सर्वतोपरी मदत केली.

दतिया हीच संस्थानची राजधानी असून वीरसिंहदेवाचा राजवाडा सुंदर आहे. दतियाखेरीज सेवंधा व नदीगाव ही शहरे व ४५५ खेडी संस्थानात होती. राजाला संस्थानात सर्व प्रकारचे शासकीय अधिकार, लोकेंद्र ही उपाधी व १५ तोफांच्या सलामीचा मान होता. १९४८ मध्ये हे संस्थान विंध्य प्रदेश संघात विलीन करण्यात आले व पुढे १ नोव्हेंबर १९५६ रोजी ते मध्य प्रदेश राज्यात समाविष्ट केले.

कुलकर्णी, ना. ह.