सॉलोमन : ( इ. स. पू. ९७३ – ९२२ ). प्राचीन इझ्राएलची संयुक्त राज्ये आणि ज्यूडो यांचा श्रेष्ठ राजा. त्याच्या जन्म-मृत्यूच्या तारखा आणि पूर्वायुष्य यांविषयी निश्चित माहिती ज्ञात नाही. सॉलोमन विषयीची माहिती मुख्यत्वे बायबल च्या ‘ जुना करार’ व ‘नवा करार ’ आणि बखरी यांतून मिळते. बखरींचा वृत्तांत दंतकथा व वदंतांवर बेतलेला आहे. राजा डेव्हिड व राणी बॅथशिबा या शाही दांपत्याचा सॉलोमन हा मुलगा असून वृद्घ वडिलांच्या हयातीतच तो इ. स. पू. ९६५–९६१ मध्ये इतर ज्येष्ठ भावांना डावलून गादीवर आला. या कारस्थानात बॅथशिबाचा मोठा वाटा होता. त्या वेळी त्याचे राज्य ईशान्येस युफ्रेटिस, आग्नेयीस गल्फ ऑफ अकाबा आणि नैर्ऋत्येस ईजिप्त व फिलिस्टिया यांच्या सीमांपर्यंत पसरलेले होते. त्याने वडिलांच्या निधनानंतर आपले स्थान बळकट करण्यासाठी एकामागून एक शत्रूंचा नि:पात केला आणि राज्यविस्ताराचे धोरण अवलंबिले. जिंकलेल्या प्रदेशांतील लष्करी ठाणी व धार्मिक संस्था यांवर आपल्या नातेवाईकांची मित्रांची नियुक्ती केली. राज्य स्थिरस्थावर करण्यासाठी त्याने शेजारील राष्ट्रांशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. शिवाय वैवाहिक संबंधांनी काही राज्यांशी मैत्रीचे संबंध द्दढतर केले. दक्षिण सीमेवरील शांततेसाठी त्याने ईजिप्तच्या फेअरो राजाच्या कन्येशी विवाह केला. त्याच्या जनानखान्यांत सु. ७०० पत्न्या आणि ३०० रखेल्या होत्या अशी वदंता आहे. त्याने या विशाल राज्याचे प्रशासकीय सोयीसाठी बारा जिल्ह्यांत विभाजन केले आणि त्या प्रत्येकावर एक राज्यपाल नेमला तसेच त्या सर्वांवर नियंत्रण ठेवणारा एक उच्चाधिकारी नेमला. शिवाय राज्यातील कर जमा करण्यासाठीही एक विशेष उच्चाधिकारी नेमला.

त्याने राज्याच्या संरक्षणाकरिता सुसज्ज लष्कर निर्माण केले. पायदळाला साहाय्य करण्यासाठी रथ आणि घोडेस्वारांची पलटण तयार केली. इझ्राएल आणि ज्यूडा येथील प्राचीन नगरींतून झालेल्या उत्खननांत तत्कालीन किल्ल्यांचे-राजप्रासादांचे अवशेष उपलब्ध झाले असून, मिगिड्‌डो ( पॅलेस्टाइन ) येथील पुरातत्त्वीय उत्खननात घोड्यांच्या काही पागांचे अवशेष मिळाले आहेत. संरक्षणाच्या दृष्टीने त्याने जेरुसलेम, टायर, निनेव्ह वगैरे राज्यांतर्गत शहरांना तटबंदी करुन घेतली. तसेच काही नवीन किल्ले बांधले, राजप्रासाद बांधले आणि त्याबरोबरच जेरुसलेम या राजधानीत एक भव्य मंदिर बांधले. या सर्व बांधकामासाठी त्याने वेठबिगार पद्घतीचा सर्रास वापर केला होता. हे मंदिर यहुदी ( ज्यू) आणि प्राचीन ख्रिस्ती धर्माचे एक प्रमुख केंद्रस्थान होते. जेरुसलेमचे हे पहिले हिब्रू मंदिर होय.

सॉलोमन केवळ कार्यक्षम प्रशासक व एकतंत्री राजा नव्हता. तो कवी आणि कलाभिज्ञ रसिक होता. त्याने द बुक्स ऑफ प्रॉव्हर्ब्ज इक्लीझिॲस्टस, द विझ्‌डम् ऑफ सॉलो आणि साँग ऑफ सॉलो किंवा साँग ऑफ साँग्ज हे ग्रंथ लिहिले होते, असे बिब्लिकल परंपरा सांगते. त्याच्या साँग ऑफ सॉलो या काव्यसंग्रहात १,००५ कविता असून त्याची काही धर्मवचने व सूत्रे ख्रिस्ती जगतात रुढ झाली आहेत. यामुळे ख्रिस्ती धर्माच्या इतिहासात त्याला मानाचे स्थान मिळाले. प्राचीन ख्रिस्ती धर्मात सॉलोमन हा शब्द वा संज्ञा शहाणपणाचे प्रतीक म्हणून मानण्यात येऊ लागली.

सॉलोमनने दीर्घकाल सत्ता उपभोगली. अखेरीस त्याच्या एकतंत्री व जुलमी कारभारामुळे तसेच लादलेल्या करांच्या असह्य बोजामुळे असंतोष वाढून बंडे झाली. त्याच्या मृत्यूनंतर रीअबोअम हा त्याचा मुलगा इझ्राएलच्या गादीवर आला. त्याने अत्याचाराचे धोरण अवलंबताच उत्तरेकडील आदिम टोळ्यांनी स्वतंत्र राज्य स्थापन केले आणि सॉलोमनच्या साम्राज्यास उतरती कळा लागली. सॉलोमनविषयी प्रसृत झालेल्या कथा, दंतकथा-वदंता नंतरच्या काळात निर्माण झालेल्या अरेबियन नाइट्स, इनकान्टेशन बाऊल्स वगैरे ग्रंथांतून आढळतात. ‘सॉलोमन आणि शिबा राणी’ ही अत्यंत गाजलेली कथा त्यांपैकीच एक होय.

संदर्भ : 1. Charlesworth, J. H. The Odes of Soloman, New York, 1983.

2. Gordon, Cyrus H. The Ancient Near East, Norton 1965.

3. Peterson, M. Three Kings of Israel, Salt Lake City, 1980.

देशपांडे, सु. र.