लॉर्ड वेव्हेलवेव्हेल, लॉर्ड आर्चिबॉल्ड पर्सव्हल : (५ मे १८८३ – २४ मे १९५०). ब्रिटिशांकित हिंदुस्थानचा व्हाइसरॉय व फील्ड मार्शल. जन्म कोलचेस्टर (एसेक्स) येथे सरदार घराण्यात. सॅंडहर्स्ट अकादमीतून त्याने लष्करी शिक्षण पूर्ण केले (१९००). पुढे त्याची ब्लॅक वॉच या शाही पलटणीत अधिकारपदी नियुक्ती झाली. पहिल्या महायुद्धात (१९१४-१८) त्याने आफ्रिकेत ईजिप्शियन भूसैन्यात उत्तम कामगिरी केली व त्याला मेजर जनरलची पदोन्नती मिळाली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात (१९३९-४५) त्याला ब्रिटिश कमांडर – इन – चीफ हे पद देऊन त्याच्याकडे मध्यपूर्वेतील लष्करी मोहिमांची सूत्रे सोपविण्यात आली. त्याने लिबियात सरस संख्याधिक्य असलेल्या इटालियन सैन्याचा धुव्वा उडविला (डिसेंबर १९४० – फेब्रुवारी १९४१) मात्र ग्रीस व क्रीट यांवरील जर्मन सैन्याचे आक्रमण त्यास थोपविता आले नाही (मे १९४१). त्यानंतर त्याची आग्नेय आशियात सरसेनापती म्हणून नियुक्ती झाली. इथेही त्यास मलाया, सिंगापूर आणि ब्रह्मदेश (म्यानमार) या ब्रिटिशांकित वसाहतींना जपानी सैन्यांपासून वाचविता आले नाही. तथापि ब्रिटिश शासनाने त्यास फील्ड मार्शल करून व्हाइसरॉय म्हणून हिंदुस्थानात त्याची नेमणूक केली (१९४३-४७).

वेव्हेल हिंदुस्थानात आला त्यावेळी बंगालमधील दुष्काळ, जातीय दंगली, छोडो भारत आंदोलन यांनी देशातील परिस्थिती गंभीर व स्फोटक बनलेली होती. वेव्हेलने प्रथम महात्मा गांधींसह वरिष्ठ नेत्यांची सुटका केली. सत्तांतराच्या संदर्भात नवा मसुदा केला. सिमला येथे जून 1945 मध्ये राष्ट्रीय नेत्यांची परिषद घेतली. लीग व कॉंग्रेसचे मतैक्य होईना, म्हणून दुसरी परिषद घेतली (जुलै १९४५). वेव्हेल इंग्लंडला जाऊन मसुद्याविषयी वरिष्ठांशी चर्चा करून परत आला. त्याने प्रांतिक व केंद्रीय विधिमंडळांच्या निवडणुकांची घोषणा केली. पुढे त्रिमंत्री शिष्टमंडळ आले (१९४६). वेव्हेलने बारा सदस्यांचे हंगामी सरकार स्थापन केले (२ सप्टेंबर १९४६) होते. मात्र त्यानंतर राजीनामा देऊन वेव्हेल इंग्लंडला परतला (फेब्रुवारी १९४७). लंडन येथे त्याचे तीन वर्षांनी निधन झाले.

वेव्हेल साहित्याचा भोक्ता होता आणि त्याला अनेक भाषा अवगत होत्या. त्याने द पॅलेस्टाइन कॅम्पेन्स (१९२८), अदर मेन्स फ्लॉवर्स (१९४४), द गुड सोल्जर (१९४८) आणि सोल्जर्स अँड सोल्जरिंग (१९५६) ही पुस्तके लिहिली.

संदर्भ : 1. Collins, Major General R. H. Lord Wavell, London, 1957.

            2. Mersey, Viscount, The Viceroys and Governors-General of India, 1857-1947, London, 1957.

देवधर, य. ना.