पुळुमावि (यि) : पुराणांतील राजवंशावळींत सातवाहन वंशातील तीन पुळुमावी राजांचा उल्लेख आहे. त्यांपैकी वासिष्ठीपुत्र पुळुमावी आणि तिसरा पुळुमावी यांचेच कोरीव लेख व नाणी सापडली आहेत. त्यांतही पहिला विशेष प्रसिद्ध आहे. कोरीव लेखांत व नाण्यांवरील लेखांत यालाच ‘शीवश्री पुळुमावी’असेही म्हटले आहे.

वासिष्ठीपुत्र पुळुमावी हा महाराष्ट्रातील शक क्षत्रपांचा उच्छेद करणाऱ्या गौतमीपुत्र सातकर्णीचा ज्येष्ठ पुत्र असून, टॉलेमीने (इ.स.१५०) याचा उल्लेख ‘प्रतिष्ठानचा राजा’ म्हणून केला आहे. पुराणांत याने अठ्ठावीस वर्षे राज्य केले असे म्हटले आहे. त्यावरून याची कारकीर्द इ.स.सु. १३० ते १५९ अशी मानण्यात येते.

याचे दहा कोरीव लेख कार्ले, नासिक, व अमरावती (आंध्र प्रदेश) येथे आणि नाणी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ व आंध्र या प्रदेशांत सापडली आहेत. याच्या कारकीर्दीच्या आरंभी उज्जैनीच्या महाक्षत्रप रुद्रदामनने याचा दोनदा पराभव करून सातवाहन साम्राज्यातील नर्मदेच्या उत्तरेचे प्रदेश जिंकले होते पण याने आपले साम्राज्य दक्षिणेत कुंतल देशावर (कर्नाटकावर) पसरविले आणि ‘दक्षिणापथेश्वर’ अशी पदवी धारण केली. याचा पिता गौतमीपुत्र सातकर्णी याने आपल्या नावाने नासिक येथे क्र.३ चे देवीलेणे खोदण्यास सुरुवात केली. हे लेणे त्याने पूर्ण करवून त्याला कोरीव कामाने सुशोभित केले आणि त्यात गौतमीपुत्र सातकर्णीचे सविस्तर वर्णन खोदविले. त्यात तो आपले वर्णन ‘आपल्या आजीची सेवा करणारा आणि तिला संतुष्ट करणारा’ असे करतो.

कुंतल देश जिंकल्यावर याने तेथील राजकन्येशी विवाह करून तिला आपली महादेवी (पट्टराणी) केली होती. तिची स्मारकशिला उत्तर कानडा जिल्ह्यात वनवासी येथे सापडली आहे.

त्याच्या निधनानंतर साम्राज्याची वाटणी त्याचे धाकटे सख्खे भाऊ स्कंद सातकर्णी आणि वासिष्ठीपुत्र सातकर्णी यांच्यात झाली व त्यांना अनुक्रमे महाराष्ट्र (विदर्भासह) आणि आंध्र प्रदेश मिळाले.

पुळुमावी (तिसरा) हा सातवाहन वंशातला शेवटचा राजा. याचा कोरीव लेख बेल्लारी जिल्ह्यात व नाणी विदर्भात सापडली आहेत. याविषयी इतर फारशी माहिती मिळत नाही.

मिराशी, वा. वि.