स्पॅनिश यादवी युद्ध : स्पेनमधील प्रजासत्ताकवादी व राष्ट्रवादी यांमधील देशांतर्गत यादवी संघर्ष. हा संघर्ष १९३६—३९ दरम्यान स्पेनमध्ये विकोपाला गेला होता आणि अखेरीस त्याची परिणती सेनादलाचा प्रमुख जनरल फ्रॅन्सिस्को फ्रँको (१८९२—१९७५) या हुकूमशहाच्या सत्ताग्रहणात झाली.

स्पेनमध्ये राजेशाही होती आणि तेराव्या आल्फॉन्सो राजाच्या (कार. १८८६—१९३१) कारकिर्दीत बहुसंख्य जनतेने प्रजासत्ताक शासनासाठी मतदान केले. परिणामतः १९३३ मध्ये प्रजासत्ताक शासन सत्तेवर आले. तत्पूर्वी १९३१ मध्ये जनतेचा विरोधी कौल लक्षात घेऊन राजा देश सोडून गेला मात्र त्याने आपला गादीवरील राजपदाचा हक्क सोडला नव्हता.१९३६ च्या सुरुवातीच्या काळात स्पेनची आर्थिक स्थिती चिंताजनक झाल्याची जाणीव प्रजासत्ताक शासनाला झाली. तिचा राजकीय व सामाजिक परिस्थितीवर परिणाम झाला आणि कामगारांनी संप पुकारले, देशभर निषेधाची निदर्शने केली. त्याला हिंसक वळण लागले. अनेक राजकीय नेत्यांचे खूनही पडले. लोकांचा प्रजासत्ताकावरील विश्वास उडाला. तेव्हा ही अस्थिर परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यासाठी शासनाने आणीबाणी जाहीर करावी, असा सल्ला जनरल फ्रँको याने तत्कालीन राज्यकर्त्यांना दिला पण तो त्यांनी मानला नाही. त्या वेळी सर्वप्रथम मोरोक्कोमधील स्पॅनिश लष्करी पलटणींनी १७ जुलै १९३६ रोजी शासनाविरुद्ध बंडखोरी केली. अल्पकाळातच ती स्पेनमध्ये प्रसृत झाली. अर्ध्याअधिक लष्कराने देशभर सर्वत्र उठाव केले. उठाव करणारे उजव्या विचारसरणीचे लोक होते. त्यांना राष्ट्रवादी म्हणत. त्यांच्यामध्ये लष्करी अधिकारी, रोमन कॅथलिक चर्चचे काही समूह (राजेशाही प्रस्थापित व्हावी या मताचे) आणि फॅसिस्ट हे फॅलॅन्जी इस्पॅन्यॉला या राजकीय पक्षाचे (हुकूमशाही यावी या मताचे) लोक होते, तर दुसर्‍या, डाव्या विचारसरणीच्या लोकांना प्रजासत्ताकवादी म्हणत.त्यांत मुख्यत्वे समाजवादी, कम्युनिस्ट आणि अराज्यवादी (शासनविरहित राज्याचे पुरस्कर्ते) होते. थोडक्यात, हा प्रजासत्ताकवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा लढा होता.

सुरुवातीच्या संघर्षात लष्कराचे जनरल सॅम्यूएल गोदेद आणि जनरल होसे सांजुर्जो हे दोन सेनाधिकारी प्रजासत्ताकवाद्यांकडून मारले गेले तथापि राष्ट्रवाद्यांनी झपाट्याने स्पेनची भूमी हस्तगत करण्याची मोहीम अधिक तीव्रतर केली. प्रजासत्ताकवाद्यांच्या ताब्यात मुख्यत्वे औद्योगिक वसाहती आणि माद्रिदसह काही मोठी शहरे होती. राष्ट्रवाद्यांनी हजारो कामगारांची आणि प्रजासत्ताकवाद्यांची हत्या केली, तर प्रजासत्ताकाच्या अखत्यारीत राहणार्‍या नागरिकांची कामगारांनी हत्या केली. तसेच या भागातील अराज्यवादी कामगारांनी आणि डाव्या संघटनांनी शासकीय संस्थांच्या जागी आपल्या मालकीचे कृषी व औद्योगिक समूह नेमून कामगार वर्गाचे वर्चस्व प्रस्थापित केले. जुलैच्या अखेरीस राष्ट्रवाद्यांनी बर्गोसनामक (राष्ट्रीय संरक्षण मंडळ) मंडळ स्थापन केले. त्यांनी प्रतिसरकार स्थापन केले व त्यातील जनरल इमिलिओ मोला या एका राष्ट्रवादी बंडखोर नेत्याने मोरोक्कोत जनरल फ्रँकोची राष्ट्रीय सरकारच्या प्रमुखपदी नियुक्ती केल्याचे जाहीर केले (ऑक्टोबर १९३६) आणि बंडखोरी करणार्‍या सर्व लष्कराचा तो प्रमुख झाला. या नवशासनाचे स्वरूप फॅसिस्ट, रूढिवादी-पारंपरिक तत्त्वावर आधारित होते. त्याने रोमन कॅथलिक चर्चला या शासनात विशेषा-धिकार दिले. साहजिकच १९३७ च्या अखेरीस सर्व राष्ट्रवादी समूह जनरल फ्रँकोच्या नेतृत्वाखाली एकत्र आले.

स्पेनमधील या यादवीत सहभागी न होण्याचा निर्णय फ्रान्स, जर्मनी, इटली, ग्रेट ब्रिटन आणि अन्य यूरोपीय राष्ट्रांनी ऑगस्ट १९३६ मध्ये एक औपचारिक करार करून घेतला. त्या वेळी २७ राष्ट्रे तटस्थ राहिली. इंग्लंड आणि फ्रान्स यांची प्रजासत्ताकाला सहानुभूती होती परंतु त्यांनी मदत केली नाही. तथापि पुढे जर्मनी व इटली यांनी करार धुडकावून राष्ट्रवाद्यांना खाण उद्योगातील काही हक्कांच्या मोबदल्यात लष्करी साहित्य व सैन्य पुरविले. रशियाने सोन्याच्या खाणींच्या मोबदल्यात प्रजासत्ताकवाद्यांना अन्न, कपडे आणि लष्करी साहित्य दिले. यांशिवाय रशियाने पोलीस दल आणि लष्कराच्या पलटणी पाठविल्या. तेथील कॉमिन्टर्न या संघटनेने अनेक देशांतील स्वयंसेवकांना पाचारण करून त्यांची लोकसेना (मिलिशिआ) स्थापन केली. तिला आंतरराष्ट्रीय ब्रिगेड म्हणत. या सेनेस प्रजासत्ताकवाद्यांच्या मदतीस पाठविले. जनरल फ्रँकोने जर्मनांच्या साहाय्याने २६ एप्रिल १९३७ रोजी उत्तर स्पेनवर हल्ला केला. त्याने गेरनीक शहराचा बराच भाग उद्ध्वस्त केला आणि सु. १,५०० नागरिकांना कंठस्नान घातले. त्यानंतर जूनमध्ये बिलबाओ शहरावर ताबा मिळविला आणि प्रजासत्ताक-वाद्यांच्या अखत्यारीतील उत्तर किनारपट्टी व औद्योगिक वसाहती पादाक्रांत केल्या. तसेच मार्च १९३८ मध्ये त्याने ॲरागॉनचा प्रदेश घेतला. एप्रिल १९३८ पर्यंत त्याच्या सैन्याने भूमध्य समुद्रापर्यंत मुसंडी मारली होती मात्र व्हॅलेंशियावरील त्याच्या आक्रमणास प्रजासत्ताकाच्या लोकसेनेने प्रतिहल्ला करून थोपविले. ही एब्रोची लढाई १९३८ मध्ये जुलै ते नोव्हेंबर अशी प्रदीर्घ काळ चालली. यातील प्रजासत्ताकवाद्यांच्या पराभवामुळे राष्ट्रवाद्यांचे सैन्य ईशान्येकडील कॅटलोनिया येथे दाखल झाले. जानेवारी १९३९ मध्ये प्रजासत्ताकवाद्यांच्या ताब्यातील बरासचा प्रदेश बार्सेलोनासह राष्ट्रवाद्यांच्या अंकित झाला. अखेर प्रजासत्ताकवाद्यांच्या फौजा आणि नागरी लोकसेना यांनी माघार घेतली. प्रजासत्ताकवाद्यांच्या फौजेमध्ये अंतर्गत दुफळी माजली आणि दोन तट पडले. त्यांपैकी क्वान नेग्रीन या तत्कालीन स्पेनच्या प्रजा-सत्ताकाच्या पंतप्रधानाने (कार. १९३७ — ३९) शासनास हे यादवी युद्ध पुढे चालू ठेवावे, अशी इच्छा व्यक्त केली आणि आपला शरणागतीस विरोध दर्शविला परंतु डाव्या आघाडीच्या रशियापुरस्कृत पक्षांना हा प्रतिकार निरर्थक वाटत होता. पक्षाच्या लोकांनी मार्च १९३९ मध्ये माद्रिद येथे प्रति-सरकार स्थापन केले. त्यानंतर अल्पावधीतच नेग्रीनचे शासन संपुष्टात आले. तेव्हा माद्रिदमध्ये कम्युनिस्ट व कम्युनिस्टेतर यांच्या फौजांत संघर्षाला प्रारंभ झाला. या नवीन शासनाच्या प्रतिनिधींनी राष्ट्रवाद्यांबरोबर वाटाघाटी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. २८ मार्च १९३९ रोजी जनरल फ्रँकोच्या सैन्याने माद्रिद राजधानीत प्रवेश केला. तेव्हा स्पेनमधील प्रजासत्ताकवाद्यांच्या सर्व फौजा शरण आल्या आणि जनरल फ्रँकोने १ एप्रिल १९३९ रोजी युद्ध- समाप्तीची घोषणा केली. जनरल फ्रँकोने उजव्या विचारसरणीच्या लोकांना हाताशी धरून सर्व सत्ता आपल्या हाती घेतली. त्याने अनेक प्रजा-सत्ताकवाद्यांच्या सहाध्यायांना ठार मारले. सर्व राजकीय पक्ष अवैध ठरविले. त्याच्या मृत्यूपर्यंत (१९७५) स्पेन लोकशाहीपासून वंचित राहिला.

या यादवी युद्धात ६—८ लाख लोक मृत्युमुखी पडले. अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या आणि जनजीवन विस्कळित झाले होते.

पहा : फ्रँको, फ्रॅन्सिस्को स्पेन (इतिहास).

संदर्भ : 1. Alpert, Michael, A New International History of the Spanish Civil War, 2004.

            2. Durgan, Andy, The Spanish Civil War, New York, 2007.

            3. Helen, Graham, The Spanish Civil War : A Short Introduction, New York, 2005.

देशपांडे, सु. र.