वेल्लोरचे बंड : वेल्लोर (तमिळनाडू राज्य) जिल्ह्यातील वेल्लोर किल्ल्यात १८०६ मध्ये झालेले हिंदी शिपायांचे बंड. या बंडाची तात्कालिक कारणे धार्मिक आहेत. मद्रास भूसेनेचा सरसेनापती सर जॉन क्रॅडॉक याने काही आक्षेपार्ह आज्ञा शिपायांना दिल्या. उदा., शिपायांनी दाढी-मिशा ठेवू नयेत, फेटा बांधू नये आणि धार्मिक रिवाज म्हणून कपाळाला टिळा लावू नये इत्यादी. त्यावेळी किल्ल्यात ब्रिटिशांच्या एकोणसत्तराव्या पलटणीचे २८० शिपाई आणि काही अधिकारी होते. त्यांनी तात्काळ तेथील सु. १,५०० शिपायांवर हे निर्बंध लादले. त्यामुळे हिंदी शिपायांना आपला धर्म बुडणार, असे वाटले. त्यातच ⇨टिपू सुलतानाच्या मुलांनी व नातेवाईकांनी शिपायांना चिथविले. १० जुलै १८०६ रोजी हिंदी लष्करी अधिकाऱ्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्याची कत्तल केली आणि ब्रिटिश शिपायांना त्यांच्या निवासस्थानातच स्थानबद्ध केले. प्रतिकार करणाऱ्या ८२ ब्रिटिश शिपायांना ठार मारण्यात आले. बंदिस्त ब्रिटिश शिपायांनी जोन्स व डीन या दोन तरुण शल्यचिकित्सकांच्या नेतृत्वाखाली किल्ल्याच्या तटावर चढून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यापैकी अनेकांना पकडून ठार मारण्यात आले. दरम्यान किल्ल्याबाहेर राहणाऱ्या एका अधिकाऱ्याने हे दृश्य पाहिले आणि तात्काळ घोड्यावरून २२ किमी. वरील राणीपेट कॅंटोनमेंट गाठले. तेथे कर्नल गिलेस्पी होता. तो घोडदळ आणि एक भली मोठी पलटण घेऊन किल्ल्याकडे आला. त्याने किल्ल्याच्या तटावरून आत प्रवेश केला आणि दिसेल त्यास गोळी घालून हे बंड चिरडून टाकले. या झटापटीत सु. ३५० हिंदी शिपाई ठार झाले. एकोणीस शिपायांना शिक्षा म्हणून ठार करण्यात आले. एकूण या बंडात दोन्हीकडील मिळून सु. पाचशे माणसे ठार झाली. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ आतील बाजूस दफनभूमी असून मृत शिपायांच्या स्मरणार्थ तेथे एक स्मारकशिळा आहे.

संदर्भ : 1. Fass, Virginia, The Forts of India, Allahabad, 1986.

            2. Toy, Sidney, The Strongholds of India, London, 1957.

देशपांडे, सु. र.