उदयसिंह : (१४ ऑगस्ट १५२१–१८ फेब्रुवारी १५७२). मेवाडचा विषयासक्त दुर्बल राजा. राणा संग्रामसिंह व राणी कर्णवती यांचा मुलगा. त्याच्या लहानपणी गादीवर बसलेला त्याचा चुलत भाऊ बनबीर (दासीपुत्र) याने त्यास ठार मारण्याचा प्रयत्न केला. पण स्वामिभक्त पन्ना दाईने आपल्या मुलाचा बळी देऊन त्याचे प्राण वाचविले व त्यास कुंभळगढ किल्ल्यावर वाढविले. पुढे राजपूत सरदारांनी बनबीराचा पराभव करून १५४० मध्ये उदयसिंहाला मेवाडच्या गादीवर बसविले. राजपूत राज्ये संघटित करण्याच्या दृष्टीने उदयसिंह कर्तृत्वशून्य होता. मोगल बादशाहा अकबराने १५६७ साली चितोडवर केलेल्या स्वारीच्या वेळीही किल्ला लढविण्याचे काम जयमल राठोड व प्रतापसिंह सिसोदिया या सरदारांवर सोपवून तो स्वतः मेवाडच्या जंगलात पळून गेला. तेथूनही उदयसिंहाने शत्रूचा पराभव करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले नाहीत. जयमल व प्रतापसिंह यांनी बहादुरीने किल्ला लढविला. पण अखेरीस अकबराने चितोड जिंकून घेतलेच. १५६८ मध्ये त्याने रणथंभोरही जिंकले. असे असूनही उदयसिंहाने ऐषाराम व विलासप्रियता कधी सोडली नाही. गेलेला प्रदेश मिळविण्याची जिद्दही त्याने दाखविली नाही. त्याने उदयपूर वसवून तेथे काही महाल, तलाव व उदयश्यामचे मंदिर बांधले.

संदर्भ :गहलोत, जगदीशसिंह- राजपुताने का इतिहास, पहला भाग, जोधपूर, १९३७.

खोडवे, अच्युत