मुहम्मद घोरी : (कार. ११७५–१२०६). भारतातील मुस्लिम सत्तेचा संस्थापक व दिल्लीचा पहिला सुलतान. घोरी घराण्यातील हा कर्तबगार सुलतान. शिहाबुद्दीन उर्फ मुइझ्झुद्दीन घोरी ऊर्फ मुहम्मद या नावांनी इतिहासात प्रसिद्ध आहे. भाऊ घियासुद्दीन घोरीने गझनीचे राज्य जिंकले (११७३), तेव्हा घियासुद्दीन पश्चिमेकडील प्रांताचा कारभार पाहात असे. पूर्वेकडील प्रांतात शिहाबुद्दीन ऊर्फ मुहम्मद हा सुभेदार म्हणून काम करत असे. दोघा भावाचे संबंध चांगले होते. मुहम्मदाने ११७५ मध्ये मुलतान हस्तगत केले. हिंदुस्थानावर त्याने एकुण नऊ स्वाऱ्या करून भयंकर कत्तली केल्या आणि अगणित संपत्ती लुटून नेली.

गुजरातच्या इ. स. ११७८ मध्ये केलेल्या स्वारीत मुहम्मदाचा पराभव झाला असूनही ११७९ मध्ये त्याने पेशावर येथे आपला अंमल बसविला. जम्मूच्या विजयदेव राजाशी हातमिळवणी करून त्यांने लाहोरच्या सुलतान खुसरौखानचा पराभव केला व पंजाबमध्ये आपली सत्ता स्थापिली. ११९२ मध्ये पृथ्वीराज चौहानविरुद्ध झालेल्या लढाईत मुहम्मदाचा पराभव झाला परंतु आपल्या पराभवाचा सूड उगवण्यासाठी अफगाण व तुर्क लोकांचे सैन्य जमवून त्याने ११९३ मध्ये पुन्हा मोहीम काढली. त्याने तराईन येथे राजपुतांचा पराभव केला. ह्यानंतर अजमीर, कनौज, वाराणसी ही राज्ये घेतली. जिंकलेल्या प्रदेशांची व्यवस्था पहाण्याकरिता त्याने दिल्ली येथे आपला गुलाम कुत्बुद्दीन ऐबक यास सुभेदार नेमले. शिहाबुद्दीनच्या बख्तियार खल्‌जी नावाच्या दुसऱ्या एका सरदाराने अयोध्या आणि बिहार हे प्रांत जिंकून तेथील हिंदू सत्तेचा शेवट केला. अशा रीतीने माळवा व त्याजवळच्या काही प्रांताखेरीज सर्व उत्तर हिंदुस्थान मुसलमानांच्या ताब्यात आला.

घियासुद्दीन मुहम्मद मरण पावल्यावर (१२०३) शिहाबुद्दीन मुहम्मद गझनीच्या तख्तावर बसला. त्यानंतर त्याच्यावर अनेक संकटे आली. १२०५ मध्ये ख्वारिज्मच्या शाह अलाउद्दीन मुहम्मदने शिहाबुद्दीनचा अंदखूई (मध्य आशिया) येथे पराभव केला. शिहाबुद्दीन सिंधू नदीकाठी गख्खर लोकांचे बंड मोडण्यात गुंतला असता, त्याचा विश्वासघाताने खून झाला.

मुहम्मद घोरीने जिकंलेल्या प्रदेशांत कायमची सत्ता रहावी म्हणून त्या ठिकाणी अनेक कर्तबगार अधिकारी नेमले, तसेच आपल्या सैन्यात व राज्यव्यवस्थेत योग्य माणसे नेमली. मुहम्मद पराक्रमी होता.

पहा : घोरी घराणे.

संदर्भ : Pandey, A. B. Early Medieval India, Allahabad, 1960.

गोखले, कमल