बुंदी संस्थान : ब्रिटिश भारतातील राजस्थानमधील एक संस्थान. क्षेत्रफळ ५,६८३.२ चौ. किमी. लोकसंख्या सु. अडीच लाख (१९४१). वार्षिक उत्पन्न सु. १८,१०,१००. उत्तरेस जयपूर, टोंक पश्चिमेस उदयपूर व दक्षिण-पूर्वेस कोटा या संस्थानांनी ते सीमित झाले होते. नयेन्‍वा व बुंदी ही दोन शहरे, बारा तहसील व ८१७ खेडी त्यात होती. हाडा राजपुतांपैकी रावदेवाने (देवराज) १३४२ च्या सुमारास मीना जमातीकडून हा प्रदेश जिंकून घेतला. संस्थानिक उदयपूरचे प्रभुत्व मानीत व त्यांच्याशी रोटीबेटी व्यवहार करीत. १५५४ मध्ये गादीवर आलेला रावसूर्जन याच्याकडून संस्थानला महत्त्व प्राप्त झाले. त्याने रणथंभोरचा प्रसिद्ध किल्ला मिळविला पण अकबराने तो किल्ला जिंकून त्याच्याशी सन्माननीय तह केला (१५६९) आणि बुंदीला मोगलांचे सेवक बनविले. तेव्हापासून उदयपूरशी त्यांचे कायम वैर निर्माण झाले. तत्पूर्वी पंधराव्या शतकात माळव्याच्या सुलतानांनी काही काळ बुंदीवर अधिकार गाजवला. १६२५ मध्ये कोटा बुंदीपासून वेगळे झाले. मोगलांतर्फे रावराजा छत्रसालने मर्दुमकी गाजविली. बुधसिंग याने महाराव राजा किताब मिळवला (१७०७). अठराव्या शतकात मल्हारराव होळकराने चौथाईच्या मोबदल्यात जयपूरविरुद्ध त्यास संरक्षण दिले पण यशवंतरावाने १८०४ मध्ये बुंदी हे शहर लुटले. १८१८ मध्ये इंग्रजांची मांडलिकी पतकरेपर्यंत पेंढाऱ्यांचाही उपद्रव संस्थानला झाला. जोधपूरचा दिवाण किशनराम याचा बुंदीत खून झाल्यामुळे इंग्रजांनी हस्तक्षेप केला (१८३०). १८६० मध्ये शिंद्यांना मिळत असलेला पाटणचा महसूल धरून संस्थानाची खंडणी रुपये ४०,००० ची रुपये १,२०,००० झाली पण तेवढ्या महसूलाचा प्रदेश संस्थानला १९२४ मध्ये देण्यात आला. दळणवळण, आरोग्य, शिक्षण यांत संस्थान मागासलेले होते. उद्योगधंदे तर नव्हतेच. पहिल्या महायुद्धानंतर ब्रिटिश दिवाण नेमले गेले. संस्थानचे स्वतःचे सैन्य व चेहराशाही नाणी होती. मीना जमातीची प्रजा १३ टक्के होती. १९४८ मध्ये संस्थान राजस्थान संघात विलीन झाले.

कुलकर्णी, ना. ह.